अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके

‘आधुनिक’ या सदैव कालसुसंगत/कालनिरपेक्ष (?) असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद अशी सर्वमान्य व्याख्या अजूनही प्रलंबितच आहे. आणि त्यामुळे आधुनिक, उत्तराधुनिक, उत्तरोत्तराधुनिक, + + + × × × ….. असे फसवे व भ्रामक तथा अर्थदुष्ट(!) शब्दप्रयोग करून/वापरून ‘आधुनिक’ या निसर्गतःच स्वतंत्र व स्वायत्त संकल्पनेची ऐशीतैशी करण्यात आजची प्रचलित विचारशैली मश्गुल असल्याचे पदोपदी व सदैव आढळून येते. 

अशा या सांकल्पनिक उपपत्तींच्या सम्यक व समग्रग्राही आकलनाअभावी अतिसौम्य/शिथिलरित्या वापरल्या जाणाऱ्या प्रतिगामी व पुरोगामी या विचारपद्धतीसुद्धा आपापल्या रंगीबेरंगी वर्तुळात हळूहळू अतिरेकी रूप धारण करू लागतात. विचारपद्धती प्रतिगामी असो वा पुरोगामी ती अतिरेकी झाली की तिचे पर्यावसान शक्तिशाली नकारात्मक/विनाशात्मक परिणामाला कारणीभूत ठरण्यातच होते, हे सर्वविदित आहे. पर्यायाने समाजजीवनातील एकजिनसीपणा नष्ट होऊन ‘मेरे मुर्गेकी एकही टांग’ ही मुजोर, स्वसापेक्ष आणि भेदजनक वृत्ती फोफावत जाते. आणि अखेर दुर्गंधीयुक्त (अ)विचारडबक्यांची संख्या वाढत जाते. 

वस्तूतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही विचारपद्धतीचे परिशीलन केल्यास प्रत्येकच विचारसरणीतील उणिवा दिसून येतात. पण एखादी विचारपद्धती जेव्हा दृढ श्रद्धेत रुपांतरीत होते तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन झाकोळत जाऊन ती श्रद्धा लवकरच भयंकर अंधश्रद्धेचे विचारदुष्ट रूप धारण करू लागते. आणि अशा प्रसंगी निसर्ग व विज्ञानसंमत असा ‘प्रणाली सिद्धांत’ सपशेल नाकारला जाऊन ‘संवाद-प्रक्रिया’च खंडित होते. मग ‘एकतर तू, नाहीतर मी’ ही आदिमानवाची आदिम मनःस्थिती पुन्हा उपस्थित होऊन संभाव्य ‘प्रलया’ला कारणीभूत ठरू लागते/शकते.

प्रतिगामी आणि पुरोगामी विचारपद्धतींच्या नैसर्गिक व स्वाभाविक मर्यादा न आकळल्याने त्यांच्या अतिरेकी आग्रहापोटी मध्यम विचारपद्धतीसुद्धा आहे/असते आणि त्याद्वारे ‘उत्तरे’ही शोधता येतात/सापडतात, याचा सोयीस्कर विसर पडतो. पर्यायाने प्रश्नांची व समस्यांची उकल व/वा सोडवणूक न होता ते आणखी चिघळू लागतात. या अशा परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा गैरफायदा मग सत्तापिपासू व्यवस्था व मूठभर वितंडवादी अचूकपणे, अलगद उचलतात व आपला ‘ताबा-प्रदेश’ फैलावत जातात.

असे असले तरी अंधश्रद्वेने अंधभक्त झालेले अतिरेकी प्रतिगामी-पुरोगामी विचारपद्धतींचे अनुयायी जागेच होत नाहीत. त्यांच्यातील ‘डोळसपणा’ही जागृत होत नाही. ही त्या-त्या अतिरेकी (प्रतिगामी-पुरोगामी) विचारपद्धतीची नियतीच होऊन बसते. आणि दुर्दैवाने ही कटू वस्तुस्थिती (BitterReality) वेळीच ओळखण्याची क्षमता नसलेल्यांचीच चलती मग जिथेतिथे वाढू लागते.

अशाच, सध्या धुमाकूळ घालत असलेल्या एका अतिरेकी स्त्रीवाद आणि अतिरेकी पुरुषवाद या दोन्ही अतिरेकी विचारपद्धतींचा निष्पक्ष, तटस्थ व निसर्गसंमत वृत्तीने आढावा घेऊन अवलोकन केले असता प्रथमदर्शनी असे दिसून येते की, अतिरेकी पुरुषवादाने जन्माला घातलेला अतिरेकी स्त्रीवादसुद्धा अशा अतिरेकी विचारपद्धतींच्या प्रवर्तनाला अपवाद ठरू शकलेला नाही. पर्यायस्वरूप या दोन्ही वादांच्या व विचारपद्धतींच्या अतिरेकी आचरणाने सत्यवान-सावित्री या जोडीतील सावित्री आणि ज्योतीबा-सावित्री या जोडीतील सावित्री, अशा दोन्ही सावित्रींमध्येच आभासी/काल्पनिक अशा कालभ्रमात्मक स्वरूपाच्या अनर्थकारक शब्दयुद्धाची अनर्थपोषक घोषणा होताना दिसत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या शब्दयुद्धात आयुधे म्हणून वापरण्यात येत असलेले शब्द व शब्दसमूह आपापल्या अंतर्निहित शब्दार्थाशी फितूर होऊनच प्रगट होत आहेत, असेही दिसून येते.

तसे पाहिले असता निसर्गाने मानवाची निर्मिती करताना मानवाच्या पुनरुत्पादनाची म्हणजेच मानवाच्या अस्तित्व-सातत्याची किल्ली आपल्या हातात/कह्यात न ठेवता ती किल्ली पुरुष व स्त्री यांना संयुक्त मालकीच्या रुपात प्रदान केलेली आहे. या किल्लीवर एकटा पुरुष वा एकटी स्त्री यांची एकल/एकांगी मालकी(!) न ठेवता ती किल्ली स्त्री-पुरुषाच्या संयुक्त मालकीची ठेवण्यामागे निसर्गाचे काहीतरी गमक असलेच पाहिजे. ते नेमके गमक कोणते, हे आजच्या मानवाला कदाचित अजून गवसावयाचे असेल पण तसे काहीतरी/कोणतेतरी गमक आहे, हे स्त्री-पुरुष दोघेही चांगल्याप्रकारे जाणून आहेत, हे नाकारता येत नाही. अशा या सध्यातरी गूढतम असलेल्या गमकाच्या अनुषंगाने विचार करता आणखी एक गोष्ट/बाब स्पष्ट होते की, निसर्गाने स्त्री-पुरुष यांना परस्परविरुद्ध वा परस्परशत्रू म्हणून निर्माण न करता परस्परपूरक वा परस्पर-स्नेहांकित असे निर्माण केले आहेत, हे सर्वविदित विश्वसत्यच नव्हे तर वैज्ञानिक सत्यसुद्धा आहे. या अशा विश्वसत्य आणि वैज्ञानिक सत्याच्या दृष्टिकोनातूनही पाहिले व अभ्यासले असता अतिरेकी पुरुषवाद व तद्जनित अतिरेकी स्त्रीवाद ह्या दोन्ही विचारपद्धती अतिरेकाधारित असल्याने त्यांचे अंतिम पर्यवसान अपरिहार्य डबक्यात विसर्जित होणे हेच ठरते, असे माझे या संदर्भातील अभिप्रायवजा निवेदन अथवा अल्पबुद्धि आकलन आहे.

वस्तुतः शरीरशास्त्र, मानसशास्त्र, यौन-विज्ञान, प्राणिशास्त्रीय अद्ययावत संशोधन, मानवी मेंदूविषयक अद्ययावत संशोधन, पुरुष व स्त्री शरीरातील सेक्स पॉईंट्सची (ऑर्गन्स नव्हे!) भिन्न भिन्न संख्या, त्या सेक्स पॉईंट्सची व त्याद्वारे उत्तानावस्थेची वैज्ञानिक अवस्था व व्यवस्था, निसर्गसंमत घटकत्वाचा प्रणाली सिद्धांत, अशा आणखी संबंधित विभिन्न अद्ययावत वैज्ञानिक शोधसंकल्पना व सिद्धांत यांचा कोणताही साधा वा साकल्याने अभ्यास व/वा विचार न करता “मला वाटते, मी म्हणतो/ते, माझाच अभ्यास, माझे तत्त्वज्ञान” अशा अवैज्ञानिक, अंधश्रद्धासंपृक्त व मुजोर आयुधांनी आपापली अतिरेकी विचारपद्धती बेमुर्वतपणे लढविली जाते. पर्यायाने या अनंत विश्वात (अजून तरी) एकमेव असलेल्या मानव जातीमधील स्त्री-पुरुष यातील संवाद व संश्लेषण हळूहळू संपत असून त्याची जागा विसंवाद, वितंडवाद, कृत्रिम भेदवृत्ती, आदि अनैसर्गिक व अमानवी गोष्टी/बाबी घेत असल्याचे संकेत पदोपदी जाणवत आहेत.

वास्तविक पाहता या विश्वातील पहिला जीव ही ‘स्त्री’च असून पुरुष हा त्यानंतर आलेला/आणलेला/विकसित झालेला उपरा जीव आहे/असावा की काय, याबाबतचे वैज्ञानिक व वैश्विक सत्य आज प्रयोगाने सिद्ध होण्याच्या मार्गावर असल्याचे विविध माध्यमांतून सांगितले/चर्चिले जात असल्याचे आपण पाहतो/वाचतो. असे असले तरी या दोन्हींमध्ये (स्त्री-पुरुष यांमध्ये) कृत्रिम व पूर्वग्रहदूषित वैर जन्माला घालण्याचेच कार्य ह्या दोन्ही अतिरेकी विचारपद्धती करीत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.  

त्यामुळेच म्हणावेसे वाटते की, एखादी विचारपद्धती जसजशी अतिरेकी होत जाते तसतसे तिचे रूपांतर कोणत्यातरी ‘वादा’त होऊ लागते. आणि काही कालावधीने अशा ‘वादा’चे रुपांतरण ‘विचारडबक्या’त होऊन त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडू लागते. म्हणूनच कोणत्याही अतिरेकी विचारपद्धतीला शरण न जाता आपल्या अगाध अज्ञानाची जाणीव सतत जागृत ठेवून नदीच्या सदैव नवनवोन्मेषशाली प्रवाहासारख्या मध्यम स्वरूपाच्या विचारधारांचे निसर्गस्नेही व निसर्गसंमत अनुकरण व अनुसरण केल्यास त्यात सदैव नवविचार सामावण्याची क्षमता असल्याने आपणही निर्विषपणे सदैव अविकारी व ताजेतवाने राहू शकतो व पर्यायाने कोणत्याही अतिरेकी विचारपद्धतींना/विचारवादांना शरण न जाता, हे विश्व नष्ट न होता नवनिर्माणवृत्तीने परिपोषित होण्यास आपण सर्व (स्त्री-पुरुष) साह्यभूत ठरू शकतो असे माझे अल्पबुद्धी आकलन आहे. 

बोरकन्हार (झाडीपट्टी)-४४१९०२,
ता.आमगांव, जि.गोंदिया, विदर्भ-महाराष्ट्र 
चलभाष : 8208557164, ईमेल : lskatre55@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.