विवेकवाद आणि नास्तिकता

आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा इतिहास काय आहे, याचा सामान्य माणूस फारसा विचार करीत नाही. किंवा तसा विचार करून या शब्दांचा वापर करीत नाही. तसेच या दोन संकल्पनांचा परस्परात काय सबंध आहे, याचाही बारकाईने विचार करण्याचे कारण कोणाला वाटत नाही. शास्त्रीय विवेचनात मात्र असे करून चालत नाही. येथे शब्दाचा वापर जपून आणि नेमक्या अर्थाने करणे आवश्यक आहे. कारण विचारात नेमकेपणा, सुसंगती आणि शिस्त आणण्यासाठी शब्दांच्या अर्थाचा नेमकेपणा महत्त्वाचा ठरतो. तसेच विवेकवाद आणि नास्तिकता यांच्यामध्ये असलेल्या संबंधाचे आकलन होण्यासाठीही त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

विवेकवाद म्हणजे काय?

विवेक हा संस्कृत किंवा पाली भाषेतील शब्द आहे. संस्कृत व्याकरणानुसार ‘विच्’ या धातूला ‘वि’ हा उपसर्ग लागून विवेक हा शब्द तयार होतो. ‘वि’ या अव्ययाचे संस्कृतमध्ये अनेक अर्थ होतात. परंतु विवेकमधील ‘वि’ चा अर्थ भेद करणे किंवा वेगळे करणे असा होतो. ‘विच्’ धातुचेही समज, ज्ञान, बुद्धी किंवा वेगळे करणे, भेद करणे, निर्णय करणे या प्रकारचे अर्थ होतात. प्रस्तुत विवेचनावरून वि +‘विच्’ यापासून तयार होणाऱ्या विवेक या शब्दाचा अर्थ एकमेकात मिसळून गेलेल्या अनेक गोष्टी एकमेकापासून वेगळ्या करणे किंवा वेगळ्या करण्याची क्षमता असणे असा होऊ शकतो. जगात वावरताना आपल्याला आपल्या आसपासच्या वस्तू, घटना आणि वर्तनप्रकार यांच्यामध्ये चांगले-वाईट; सत्य-मिथ्या; न्याय-अन्याय असा फरक करणे आवश्यक असते. म्हणूनच हंसाच्या तथाकथित दुधापासून पाणी वेगळे करण्याच्या कृतीला किंवा क्षमतेला नीरक्षीरविवेक असे म्हटल्या जाते.

सदर लेखाच्या शीर्षकातील विवेक या शब्दाचा अर्थ मात्र काहीसा वेगळा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील Reason आणि Rationalism या शब्दासाठी मराठीत अनुक्रमे विवेक आणि विवेकवाद या शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे आपण Reason आणि Rationalism ह्या अर्थानेच विवेक आणि विवेकवाद या शब्दांचा वापर करणार आहोत. Reason अर्थात् विवेक म्हणजे सत्याच्या शोधाच्या उद्देशाने बुद्धी (Reason) आणि इंद्रियानुभव (Empirical experience) यांचा वापर करून उपलब्ध असलेल्या माहितीवरून किंवा नव्याने उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीवरून निष्कर्ष (Conclusion) काढण्याची क्षमता होय. वास्तवासंबंधी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी वरील प्रक्रिया उपयुक्त आहे, यावर विवेकवादी मनुष्य विश्वास ठेवतो. तसेच तो ज्ञानप्राप्तीसाठी वेळोवेळी या पद्धतीचा वापर करतो. याच अर्थाने तो ‘विवेकवाद’ ह्या संकल्पनेचा वापर करीत आहे, असे आपण समजतो. तथापि १८व्या शतकापूर्वी विवेकवाद या शब्दाचा अर्थ काहीसा संकुचित असून तो आताच्या अर्थापेक्षा वेगळा होता. तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करताना विवेकवाद या संकल्पनेचे दोन्हीही अर्थाने विवेचन केले जात असते. त्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून आपण १६व्या शतकापासून (म्हणजे देकार्तच्या काळात) विवेक आणि विवेकवाद हे शब्द ज्या अर्थाने वापरले जाऊ लागले त्याचा विचार करूयात.

पाश्चात्य तत्त्वज्ञ रेने देकार्त (Rene Descartes) याला Rationalism चा अर्वाचीन काळातील प्रणेता मानले जाते. त्याच्या सभोवताली असलेल्या तत्त्वज्ञानातील भोंगळपणा त्याला अस्वस्थ करीत होता. त्यामुळे जे सर्वमान्य होईल आणि निःसंशय असेल असे ज्ञान कोणते आणि ते करून घेण्याचा उपाय कोणता, हे शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. पंचज्ञानेंद्रियांनी होणारे ज्ञान हे निश्चित आणि निःसंशय स्वरूपाचे असत नाही, हे त्याच्या प्रत्ययाला येत होते. अशा ज्ञानावर अवलंबून राहिल्यास आपली फसगत होऊ शकते, असे त्याचे मत होते. अंधारात साप असल्याचे दिसले तरी तो सापच असेल, याची खात्री देता येत नाही. अंधारात असलेल्या दोरीच्या ठिकाणी सापाचा भासही झालेला असू शकतो. तसेच सूर्य हा भ्रमण करणारा आणि पृथ्वी ही स्थिर असल्याचे आपल्याला दिसत असते. त्यामुळे निश्चित, सत्य, निःसंशय आणि सार्विक (Universal) ज्ञानासाठी फक्त पंचज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहता येत नाही, असे देकार्तचे मत होते. दुरून मनोरे गोलाकार दिसतात, पण जवळ आल्यावर ते चौकोनी असल्याचे दिसते, असे एक इंद्रियज्ञानाच्या मर्यादा दर्शविणारे उदाहरण त्याने दिले आहे. त्याच्या चिंतनातून त्याला निश्चित, सत्य, निःसंशय आणि सार्विक (Universal) ज्ञानाचा उपाय Intuition आणि Deductive reasoning यांच्यामध्ये सापडला. Intuition म्हणजे आपल्या बुद्धीच्या साह्याने एकाच वेळी होणारे स्पष्ट आणि विशिष्ट आकलन किंवा ज्ञान होय. देकार्तच्या म्हणण्यानुसार “Intuition is the indubitable conception of a clear and attentive mind which proceeds solely from the light of reason” (quoted from ‘Cartesian Intuition’ by Elliot Samuel Paul) अर्थात् Intuition म्हणजे निःसंदिग्ध, स्पष्ट आणि जागृत असलेल्या मनाची संकल्पना असून ती बुद्धीच्या प्रकाशातून पुढे येते. वरील विवेचनावरून Intuition म्हणजे अंतर्ज्ञान किंवा साक्षात्कार असे नसून ती एक बौद्धिक क्रिया आहे, हे स्पष्ट होण्यासारखे आहे. थोडक्यात Intuition ही मनाची आकलनक्षमतेची किंवा समजून घेण्याची कृती होय. (Intuition is cognitive act of mind) वरील विवेचनावरून देकार्तच्या मतानुसार निश्चित, सत्य, निःसंशय आणि सार्विक ज्ञान प्राप्त करण्याचे बुद्धीशिवाय कोणतेही साधन असू शकत नाही. देकार्तनुसार ज्ञान मिळविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे निगमन (Deduction) होय. निगमनाचा अर्थ खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

Intuition च्या साह्याने आपल्याला निश्चित आणि निःसंशय असे ज्ञान अभिव्यक्त करणारी मूलविधाने (Premises) प्राप्त होतात. एकाच विषयाच्या मूलविधानांत परस्परसंबंध असतात. या मूलविधानांची एक साखळी बनते. निगामी पद्धतीने त्यातून अखेरीस निष्कर्ष निघतो. मूलविधाने सत्य असल्याने त्यांच्यापासून निघणारे निष्कर्षही सत्यच असले पाहिजेत. थोडक्यात, निगमन म्हणजे Intuition च्या द्वारे प्राप्त झालेल्या मूलविधानांपासून (Premises) वैध युक्तीवादाद्वारे (Valid arguments) निष्कर्ष प्राप्त करणे होय. वरील विवेचनावरून निगमनाच्या साह्यानेही आपल्याला सत्य ज्ञानाची उपलब्धी होते, असे देकार्तचे मत आहे, हे स्पष्ट आहे. ‘मी विचार करतो म्हणून मी आहे’, हे देकार्तने दिलेले उदाहरण आहे. ह्या उदाहरणावरून वरील बाब स्पष्ट होते. ‘मी विचार करतो’, हे ज्ञान आपल्याला होण्यासाठी कोणत्याही इंद्रियाची गरज नाही. आपल्या बुद्धीला ते थेट कळते. आणि हे ज्ञान संशयातीत आहे. म्हणूनच ‘मी विचार करतो’ हे विधान मूलविधान (Premise) ठरते. हे मूलविधान सत्य असेल तर त्यापासून निष्पन्न होणारे ‘मी आहे’ हे विधानही निगमनाने सत्य ठरते. ‘अ’ आणि ‘ब’ हे ‘क’ बरोबर असतील तर अ = ब हे निर्गमित विधान सत्य ठरते.

वरील विवेचनावरून Intuition आणि Deduction या दोन साधनांच्या साह्याने ज्ञान मिळविता येते आणि ही साधने आपल्या बुद्धीच्या प्रकाशात कार्य करीत असतात, हे देकार्तच्या विवेकवादाचे सार आहे, असे म्हणता येऊ शकेल. असे असले तरी देकार्तच्या परंपरेने इंद्रियज्ञानाला फारसे महत्त्व दिलेले नाही. त्याच्या मते इंद्रियांनी मिळालेले ज्ञान हे निःसंशय आणि निश्चित स्वरूपाचे नसते. त्यामुळे देकार्तचा हा विवेकवाद तेव्हा प्रचलित असलेल्या अनुभववादाच्या (Empiricism) विरुद्ध असल्याचे दिसते. अनुभववादानुसार ज्ञानेंद्रियांनी मिळणारा अनुभव हेच केवळ ज्ञानाचे साधन आहे. त्यांच्या साह्यानेच आपल्या श्रद्धा, समजुती, विश्वास यांची तपासणी केली जाऊ शकते. देकार्तच्या विवेकवादाने इंद्रियानुभवाला प्राधान्य दिले नसले तरी त्याचे महत्त्व पूर्णतः दुर्लक्षित केलेले नाही. अशा ज्ञानातील त्रुटी विवेकाने म्हणजे बुद्धीने मिळणाऱ्या ज्ञानाच्या मदतीने दूर करता येतात, असे त्याचे म्हणणे होते. देकार्तच्या विवेकवादात शंकेला विशेष महत्त्व आहे. त्याच्या मते आपल्याला होणाऱ्या कोणत्याही ज्ञानावर शंका घेतली पाहिजे. बुद्धीच्या साह्याने या ज्ञानावरील शंका जितक्या प्रमाणात कमी होतील, तितक्या प्रमाणात त्या ज्ञानाचे प्रामाण्य वाढत जाईल. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा हा पायाच आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

वर्तमानकालीन विवेकवाद (Contemporary Rationalism)

सध्या ज्याला विवेकवाद म्हटले जाते तो देकार्तच्या विवेकवादापेक्षा भिन्न असून त्याचे अनुभववादाशी भांडण नाही. उलट नव्या विवेकवादाच्या विकासात ह्या दोन्हीही विचारपद्धतींचे  भरीव योगदान आहे. १७व्या शतकापासून उदयास आलेल्या विज्ञानानेही विवेकवादाला वैज्ञानिक स्वरूप देण्याचे काम केलेले आहे. म्हणून वर्तमानातील विवेकवादाला वैज्ञानिक विवेकवाद म्हणणे अन्वर्थक ठरेल. यथार्थ ज्ञान मिळविण्याचे बुद्धी हे एक साधन असून ज्ञानेंद्रियांनी मिळविलेले ज्ञान हाही बौद्धिक प्रक्रियेचा विषय आहे. यथार्थ ज्ञानासाठी धर्म, लोकरूढी, पारंपरिक समजुती, विश्वास आणि कोणत्याही धर्मग्रंथाचे किंवा धर्मगुरुचे किंवा विशिष्ट विचारसरणीचे प्रामाण्य मानण्याची आवश्यकता नाही, असे हा विवेकवाद सांगतो. विवेकवाद हा केवळ विचार नसून एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे या विवेकाच्या प्रकाशातच आपल्याला आपला मार्ग धुंडाळावयाचा आहे, यावर विवेकवाद्यांचा विश्वास असतो. म्हणूनच विवेकवाद म्हणजे बुद्धी आणि पुरावा यांच्यावर आधारित जीवनविषयक दृष्टिकोन आहे, असे म्हणता येईल. याचा अर्थ या जगात वावरताना, जगताना, नैतिक कृती करताना, व्यक्ती, समाज, राज्य, धर्मिक व्यक्ती किंवा गट यांच्याशी आंतरक्रिया करताना, एखाद्या गोष्टीवर विश्वास-अविश्वास ठेवताना विवेकवादाचे बोट धरून वाटचाल केली पाहिजे, असे विवेकवाद्यांना वाटते. विवेकवादावरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी प्रथम आपल्याला जगातील वस्तुंचे, घटनांचे, मानवी वर्तनाचे, सामाजिक संबंधांचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपली बुद्धी, इंद्रियानुभव, तर्क यांचा वापर करावा लागतो. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी बुद्धी, अनुभव आणि पुरावा यांच्या कसोटीवर त्या घासून घेणे आवश्यक आहे. आपल्या बुद्धीला न पटणारे किंवा आपल्या इंद्रियानुभवाच्या कक्षेत न येणारे तथाकथित ज्ञान हे यथार्थ ज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत नाही, असे विवेकवाद्यांचे म्हणणे असते. असे यथार्थ ज्ञान मिळविण्यासाठी तत्त्वचिंतक, शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आलेले आहेत. नैतिक मूल्यांचा शोध घेण्यासाठी तत्त्वज्ञ, वस्तू आणि घटना यांचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ आणि मानवी आणि सामाजिक वर्तनाचा शोध घेण्यासाठी सामाजिकशास्त्रांचे तज्ज्ञ अभ्यास, चिंतन आणि प्रयोग करीत असतात. त्यांच्या या अभ्यासातून आपल्याला विज्ञानाची आणि इतर शास्त्रांची मूलभूत तत्त्वे सापडतात. आणि ही तत्त्वे आपल्या वर्तनासाठी सदैव मार्गदर्शक ठरतात. ही तत्त्वे शोधण्यासाठी निखळ बुद्धी, निरीक्षण, प्रयोग, अनुभव यांचाच वापर केल्या जात असल्यामुळे या तत्त्वांवर विश्वास ठेवणे विवेकवादात अभिप्रेत असते.

यथार्थ ज्ञानाची साधने
. इंद्रियानुभव

वर उल्लेख केल्याप्रमाणे इंद्रियानुभवाने मिळणारे ज्ञान हे प्रत्येक वेळी यथार्थच असेल, हे सांगता येत नाही. हे खरे असले तरी इंद्रियानुभवाद्वारे मिळत असलेले किंवा निरीक्षण आणि प्रयोग यांद्वारे मिळविले जाणारे ज्ञान हे विज्ञानाच्या विकासाचा पाया ठरलेले आहे. देकार्तच्या विवेकवादात अशा अनुभवांना महत्त्व नसले तरी या अनुभवांनी विज्ञानात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. म्हणूनच वर्तमानकालीन विवेकवादात इंद्रियानुभवांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा प्रकारे प्राप्त होणारे ज्ञान हे भौतिक आणि मानवी वर्तनविषयक ज्ञानसंग्रहात फार मोलाची भर टाकते. भौतिक जगताचे विश्लेषण करण्याच्या कार्यात विज्ञानाची भूमिका अपार महत्त्वाची ठरलेली आहे. विज्ञानाच्या साह्याने संशोधित केलेल्या अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने आपल्या इंद्रियांची आणि बुद्धीची क्षमता अनेक पटींनी वाढलेली आहे. त्यामुळे निरीक्षण आणि प्रयोगातून पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक माहिती उपलब्ध होत आहे. या माहितीचे विश्लेषण, वर्गीकरण आणि व्यवस्था करून त्याआधारे वस्तुस्थितीविषयक अनुमाने केली जातात. आणि या अनुमानांची पडताळणी करून आपल्या हाती महत्त्वाची तत्त्वे लागतात. त्यातूनच विज्ञानाबरोबरच समाजशास्त्र, अर्थशास्त्र आदी सामाजिकशास्त्रांत महत्त्वाची भर पडत गेलेली आहे. त्यातूनच वर्तमानकालीन विवेकवाद सामर्थ्यवान बनला आहे. विवेकवादामुळे विज्ञानादी शास्त्रांचा विकास होतो. आणि या शास्त्रांमुळे विवेकवादही अधिकाधिक महत्त्वाचा बनत जातो.

. बुद्धी

इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचे विश्लेषण, संश्लेषण, वर्गीकरण करून त्याची व्यवस्था लावण्याचे आणि त्यातून निष्कर्ष काढण्याचे काम बुद्धी किंवा Reason करते. यासाठी बुद्धीची अमूर्त संकल्पना समजून घेण्याची, तसेच तर्क, अनुमान करण्याची क्षमता उपयोगी पडते. सर्जनशीलता, समस्यांची सोडवणूक करण्याचे कौशल्य, माहितीतील विसंगती शोधणे या गोष्टी माणसाला बुद्धीमुळेच शक्य होतात. बऱ्याच वेळा इंद्रियसंवेदनेतून मिळालेले ज्ञान विसंगतीने युक्त किंवा आभासी असू शकते. बुद्धीमुळे माणसाला त्यातील विसंगती शोधता येतात, तसेच आभासापलीकडील वास्तवाचा वेध घेता येतो. आपल्या इंद्रियानुभवाप्रमाणे पृथ्वी स्थिर असून सूर्य आणि इतर ग्रह तिच्याभोवती परिभ्रमण करतात असेच आपल्याला वाटते. परंतु माणसे बुद्धिमानही असतात. अशाच माणसांपैकी खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती असणाऱ्या कोपर्निकस नावाच्या बुद्धिमान व्यक्तीने हा प्रश्न धसास लावला. त्याने ग्रहांची गती, कक्षा, ग्रहांचे आकारमान आणि त्यांचे परस्परांपासूनचे अंतर आदी गोष्टींचा निरीक्षणाद्वारे वेध घेतला. गणिताच्या साह्याने वरील बाबींचे मोजमाप केले. त्याच्या निरीक्षणातून आणि गणिताच्या मदतीने त्याला सुदूर असणाऱ्या ग्रहांजवळून पृथ्वी जात असताना ते ग्रह काही काळासाठी उलट गतीने (Retrograde Motion) जात असल्याचे दिसत होते. विश्वाच्या तत्कालीन पृथ्वीकेंद्रित मॉडेलच्या साह्याने या पश्चगामी गतीचे (Retrograde Motion) स्पष्टीकरण देता येत नव्हते. मग त्याने सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना करून या उलट गतीचा विचार केला. तेव्हा त्याला कळले की पृथ्वीची गती त्या ग्रहापेक्षा जास्त असल्याने आपली पृथ्वी आणि आपण पृथ्वीवासी त्या ग्रहाजवळून जात असताना तो ग्रह आपल्याला उलट गतीने जात असल्याचा भास होतो. आणि त्यावरूनच पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत असल्याचा शोध त्याला लागला. कोपर्निकसने यामध्ये निरीक्षणाबरोबरच केवळ बुद्धीचाच विषय असलेल्या गणिताचाही वापर केल्याचे स्पष्ट आहे. विज्ञानाचा विकास होण्यात गणिताची भूमिका निर्णायक ठरलेली आहे. कारण गणितामुळे अनुभवातून मिळालेल्या माहितीमध्ये नेमकेपणा आणि निश्चितता येते. आणि विज्ञानाच्याच काय कोणत्याही शास्त्राच्या विकासाची ती पूर्वअटच आहे.

. तर्क

निरीक्षण आणि प्रयोग यांतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण आणि वर्गीकरण आणि त्याची व्यवस्था लावण्याचे काम बुद्धीच्या साह्याने केले जाते. त्यावर केलेल्या बौद्धिक प्रक्रियेच्या साह्याने मूलविधाने (Premise) निश्चित केले जातात. या मूलविधानापासून विशिष्ट निष्कर्ष काढले जातात. मूलविधान ते निष्कर्ष हा प्रवास अचूक विचार (Reasoning) आणि युक्तिवाद (Arguments) यांच्या साह्याने पूर्ण होतो. हा प्रवास ज्या बौद्धिक प्रक्रियेने पूर्ण होतो त्या बौद्धिक प्रक्रियेला तर्क किंवा तर्कबुद्धी म्हणता येईल. थोडक्यात मूलविधानापासून तर्काने निष्कर्ष काढले जातात. असे निष्कर्ष वैध ठरण्यासाठी चिकित्सक विचार आणि त्यावर आधारलेले युक्तिवाद अचूक असण्याची गरज आहे. याचा अर्थ अचूक तर्क आपल्याला वैध निष्कर्षाप्रत पोचवितात. विवेकवादात या तर्काचे महत्त्व विशेष असते. कारण तर्कदोषांमुळे विवेकवाद्यांची फसगत होऊ शकते किंवा केली जाते आणि त्यातून चुकीचे निष्कर्ष हाती येतात. अशा तर्कातील चुकांना तर्कदोष (Logical fallacy) म्हणतात. आपली फसगत होऊ नये म्हणून आपल्याला तर्कदोष माहीत असायला हवेत. तर्कदोषांची काही उदाहरणे खाली देत आहे.

माणसाच्या सर्व कृती स्वार्थप्रेरित असतात. समाजसेवा करणारे लोकही स्वार्थी असतात. कारण असे लोक स्वतःच्याच मनाचे समाधान करण्याची त्यांची इच्छा समाजसेवा करून पूर्ण करतात. येथे स्वार्थ या शब्दाचा अर्थ दोन्हीकडे सारखाच घेतलेला आहे. या तर्कदोषाला Equivocation fallacy म्हणतात.

सोनिया गांधी पंतप्रधानपदाला लायक नाहीत. कारण त्यांचे मूळ परदेशातील आहे. येथे पंतप्रधानपदाची योग्यता आणि संबंधित व्यक्तीचे मूळ यांचा काहीही सबंध नाही, हे लक्षात घेतलेले नाही. या तर्कदोषाला Ad hominem fallacy असे म्हणतात.

एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यास, तो आरोपाचे उत्तर देताना, ‘आरोप करणाऱ्यानेही मागच्या काळात भ्रष्टाचार केला होता’, असे सांगतो. येथे आरोपी नेता आपल्यावरील आरोपाचे उत्तरच देत नाही. या तर्कदोषाला Tu quoque असे म्हटल्या जाते.

दोषरहित तर्काच्याही काही मर्यादा असतातच. त्याची मुख्य मर्यादा म्हणजे ‘तर्क’ ज्या Premise वर आधारित असतो, त्याची सत्यता तर्काने सिद्ध करता येत नाही. उदा. सज्जन व्यक्ती दुःख भोगतो, कारण त्याने मागच्या जन्मात पापकर्म केलेले होते. येथे पूर्वजन्म सिद्ध झालेला नसतानाच तो सत्य असल्याचे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे त्या आधारावर केलेला तर्क निरर्थक ठरतो. दुसरे उदाहरण असे – रस्ते ओले आहेत. याचा अर्थ नुकताच पाऊस पडून गेला आहे. येथे रस्ते ओले फक्त पावसानेच होतात, असे नाही. पूर आल्याने किंवा पाण्याचा पाईप फुटल्यानेही रस्ते ओले होऊ शकतात. तर्काच्या अशा काही मर्यादा असल्या तरी विवेकवादात तर्काचे महत्त्व मुळीच कमी होत नाही. कारण Premise वरून निष्कर्ष काढता येत असल्यानेच ज्ञानाची सत्यता सिद्ध करता येते.

विज्ञानाचा प्रभाव : वैज्ञानिक विवेकवाद

जड-चेतन पदार्थांचे आणि एकंदर विश्वाचे वस्तुनिष्ठ स्वरूप आणि नैसर्गिक घटनांमागील शाश्वत नियम या गोष्टी जाणून घेण्याच्या इच्छेतून आणि त्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांमधून विज्ञानाचा जन्म झाला. प्राचीन काळापासून मानवी जिज्ञासा सृष्टीसंबंधी वास्तव जाणून घेण्यासाठी सातत्याने कार्यरत होतीच. पण प्रबोधन काळापासून या प्रयत्नांना पद्धतशीर स्वरूप प्राप्त झाले. या शोधांसाठी शास्त्रज्ञांनी विविध पद्धती वापरल्या. १६व्या शतकात रेने देकार्त आणि फ्रान्सिस बेकन यांनी आज प्रचलित असलेल्या वैज्ञानिक पद्धतीचे (Scientific Method) सुतोवाच केल्याचे दिसून येते.

जगातील वस्तू आणि घटना याबद्दल मानवाला अपार जिज्ञासा राहिलेली आहे. या जिज्ञासेमुळे त्याला जगातील पदार्थ आणि घटना याविषयी असंख्य प्रश्न पडत असत. त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याने सुरुवातीला उपलब्ध असलेल्या आणि नंतर गोळा केलेल्या माहितीचा वापर केला. या माहितीच्या आधारावर त्याने त्याला पडलेल्या प्रश्नांची प्राथमिक उत्तरे शोधली. त्यापासून वेळोवेळी अभ्युपगम अर्थात् Hypothesis तयार केले गेले. त्यानंतर या अभ्युपगमांची पडताळणी करण्यासाठी अखंड निरीक्षण आणि प्रयोग करण्यात आले (Observation and Experimentation). या निरीक्षणातून आणि प्रयोगातून मिळालेल्या माहितीचे गणिताच्या साह्याने काटेकोर विश्लेषण, वर्गीकरण करून त्याला व्यवस्थित (Systematic) रूप दिले. अशा व्यवस्थाबद्ध ज्ञानातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर निष्कर्ष (Conclusion) काढण्यात आले. हे निष्कर्ष जर आधीच तयार करण्यात आलेल्या अभ्युपगमाशी जुळत असतील तर त्या अभ्युपगमाचे वस्तुनिष्ठ ज्ञानात रुपांतर केल्या जात होते.

साधारणपणे या पद्धतीचा वापर करून १६व्या शतकापासून सभोवतालच्या सृष्टीचे आणि त्यातील पदार्थांचे यथार्थ ज्ञान संपादन करण्यात विज्ञानाला मोठे यश आले. वैज्ञानिक पद्धतीच्या यशाचा इतर सामाजिकशास्त्रांवरही प्रभाव पडला. त्यामुळे या शास्त्रांशी संबंधित संशोधनातही या वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यातून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आदी सामाजिकशास्त्रांतही मूलगामी संशोधन सुरू झाले. त्यातून अनेक नवीन संकल्पनांचा उदय झाला.

विज्ञानाने या प्रकारे जे ज्ञान प्राप्त केले होते, ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे (Objective) होते. याचा अर्थ अशा ज्ञानाची तपासणी करून त्याचा प्रत्यय घेण्याची योग्यता सगळ्या माणसांत असते. या ज्ञानाचा प्रत्यय एखाद्या पुण्यात्म्यालाही येतो, एखाद्या पापी माणसालाही येतो. थोडक्यात, अशा ज्ञानाचा प्रत्यय साक्षात्कारासारखा, तो अनुभव घेणाऱ्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उद्गामी (Induction) पद्धतीने मिळणारे हे ज्ञान निश्चयात्मक किंवा अंतिम असेलच असे नाही. असे ज्ञान हे पुराव्यांवर आधारित असल्याने जितका पुरावा, तितके ते सत्य असते. नवीन पुराव्याने त्याची सत्यता जशी वाढते तसेच त्याविरुद्धच्या पुराव्याने ती कमी किंवा सुधारित किंवा नाहीशीही होऊ शकते. त्यामुळे विज्ञानात एकाच घटनेच्या स्पष्टीकरणासाठी वेगवेगळे सिद्धांत मांडले जातात. अणूच्या (Atom) संरचेनेबाबत एकामागोमाग अनेक सिद्धांत मांडले गेले, ते याचमुळे. शास्त्रज्ञांच्या अशा दीर्घोद्योगामुळेच आपल्याला पदार्थांचे स्वरूप आणि भौतिक घटनांमागील नियमांचे ज्ञान झालेले आहे. आता आपल्याला कोणत्याही भौतिक घटनांचे स्पष्टीकरण प्राप्त करण्यासाठी कोणत्याही धर्मग्रंथाला, धर्मगुरूला किंवा कोणत्याही साक्षात्कारी व्यक्तीला शरण जाण्याची गरज नाही. किंबहुना या साक्षात्काराचीच तपासणी आता विज्ञान करीत असते.

आपले इंद्रियानुभव आणि बुद्धी यांच्या साह्याने जरी विज्ञानाचा उदय आणि विकास झाला असला तरी विज्ञानाच्या या शोधांमुळेच आपले इंद्रियानुभव आणि बुद्धी यांच्या कक्षाही विस्तारल्या आहेत. तर्क करण्यासाठी जी आधारविधाने (Premise) असतात, त्यांची सत्यासत्यता तर्क पडताळू शकत नाही. विज्ञान मात्र तर्कासाठी सत्य असलेली किंवा सत्याच्या जवळ जाणारी आधारविधाने उपलब्ध करून देते. त्यामुळे तर्काचा उपयोगही अधिक परिणामकारकरीत्या करता येतो. विज्ञानाच्या मदतीने वर्तमानकालीन विवेकवाद अधिक सामर्थ्यवान झाल्याचे यावरून आपल्या लक्षात येईल. वैज्ञानिक विवेकवादाने सिद्ध होऊ न शकणाऱ्या पदार्थांना आणि घटनांना अस्तित्वात राहण्याचा हक्कच नाही, असा दावा आज विवेकवाद करू शकतो. केवळ नजरेने एखादी वस्तू हलविण्याचा कोणी दावा करीत असेल तर हा दावा न्यूटनच्या नियमांच्या विरुद्ध असल्याने तसे होऊ शकत नाही, असे विवेकवादी ठामपणे म्हणू शकतो. जगात घडणाऱ्या सर्व घटना निश्चित अशा नियमानुसार घडत असल्याने करणी, भानामती अशा तथाकथित शक्ती या घटनांमध्ये काहीही बदल करू शकत नाहीत, यावर विवेकवाद्यांचा पूर्ण विश्वास असतो. भौतिक बलाचा वापर न करता होणारे वस्तूंचे स्थलांतर, उदाहरणार्थ भिंत चालणे, हे न्युटनच्या गतीनियमांच्या विरुद्ध असल्याने ते होऊच शकत नाही. बहुतेक सर्व मानवेतर प्राण्यांच्या स्वरयंत्राची रचना शब्द उच्चारण्यास समर्थ नसल्याने रेडा ‘वेद’ कसे काय बोलू शकणार, असे विवेकवादी विचारतो.

संतांनी भिंत चालविण्यापेक्षा अज्ञान, रूढी, परंपरा यांनी ‘जड’ झालेला झालेला समाज चालविला, हे अधिक महत्त्वाचे होते. रेड्याकरवी वेद बोलविण्यापेक्षा अज्ञानाने मूढ झालेल्या सामान्य माणसाच्या ठिकाणी त्याला स्वतःला अभिव्यक्त करणारे चार उद्गार काढण्याचे सामर्थ्य उत्पन्न करणे आपल्याला अधिक क्रांतिकारी का वाटू नये?

विवेकवादानुसार ‘कारणाशिवाय कार्य घडत नाही’ हा नियम कोणत्याही घटनेसाठी लागू होणारा आहे. धर्माचे अभिमानी एखाद्या नैसर्गिक घटनेचे काहीतरी पारलौकिक कारण सांगतात. परंतु त्या कारणाचे अस्तित्व, मोजमाप अनुमानानेही सांगू शकत नाहीत. राहू आणि केतू ही दैत्ये अनुक्रमे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण घडवून आणतात असा परंपरेचा विश्वास असतो. राहू आणि केतू यांचे अस्तित्व ते दुरान्वयानेही सिद्ध करू शकत नाहीत. तरीही त्यांवर विश्वास ठेवावा, हा परंपरेचा आग्रह असतो. विवेकवादी हा आग्रह धुडकावून लावतो, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. यावर काहीजण राहू-केतू हे छायाग्रह आहेत, असे सांगून त्यांच्या अस्तित्वामागील अन्वयार्थ सांगू इच्छितात. पण ग्रहणाच्या स्पष्टीकरणासाठी त्याची गरजच काय, असे विवेकवादी विचारू इच्छितो.

कार्यकारणभावाचा नियम मानणाऱ्यांना, कोणत्याही घटनेचा कारणापासून कार्यापर्यन्तचा प्रवास सांगता आला पाहिजे. जन्मकुंडलीवरून भविष्य सांगणारे ज्योतिषी आकाशातील ग्रह आणि मानवी जीवनातील घडामोडी यांच्यातील संबंधांचा कोणताही पुरावा देऊ शकत नाहीत. प्राचीन काळातच विमान, दूरदर्शन, प्लास्टिक सर्जरी यांसारखे शोध लागलेले होते, असा दावा धर्माभिमानी करीत असतात. पण त्यासाठी कोणतेही पुरावे दिले जात नाहीत. विज्ञानाची त्या पातळीवरील प्रगती होण्यासाठी त्यापूर्वी विज्ञानात काय काय घडावे लागेल, याचा विचार हे लोक करीत नाहीत. किंवा या घडामोडींचा कोणताही पुरावा आज उपलब्ध नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

वैज्ञानिक विवेकवाद आणि सामाजिकशास्त्रे

वैज्ञानिक पद्धतीचा प्रभाव सामाजिकशास्त्रांच्या विकासावरही पडल्याचा उल्लेख मागेच केलेला आहे. सामाजिकशास्त्रांच्या संशोधनात वैज्ञानिक पद्धतीचा आणि स्वतंत्र बुद्धीचा वापर केल्यामुळे या शास्त्रांचा स्वतंत्रपणे विकास झाला. धर्मग्रंथांचे प्रामाण्य कमी होण्यास प्रारंभ झाल्याने धार्मिक कल्पनांच्या जोखडातून त्यांची मुक्तता झाली. बुद्धी, अनुभव, निरीक्षण आणि प्रयोग हीच ज्ञानाची साधने प्रयुक्त झाल्यामुळे ही शास्त्रे आता स्वातंत्र्य अनुभवू लागली. यातूनच मानवी जीवनविषयक अभिनव तत्त्वांचा आणि मूल्यांचा शोध लागला. या जगात मानव हा मुळातच स्वतंत्र असून मानव म्हणून त्याची प्रतिष्ठा त्याला उपजतच प्राप्त झालेली आहे. त्याला आतापर्यंत जखडून ठेवणाऱ्या रूढी,परंपरा आणि धर्म हे कृत्रिम असून एका गटाने दुसऱ्या गटांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी या खोट्या कल्पनांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला आपला विकास करण्याचा पूर्ण हक्क आहे. थोडक्यात, माणसाने आपल्या तर्कबुद्धीच्या सामर्थ्याने स्वातंत्र्य, समता, मानवी हक्क आदी मूल्यांचा शोध लावला. पारतंत्र्य हे ‘बळी तो कान पिळी’ या आदिम न्यायाने किंवा धार्मिक कल्पनांमुळे अस्तित्वात आलेले आहे. इहलोक अर्थात् अनुभवाला येणारे हे जगच खरे असून परलोकाच्या कल्पना निराधार आहेत, हे वैज्ञानिक विवेकवादामुळे माणसाला समजू लागले. त्यामुळे आपले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहार करायला आपण स्वतंत्र आहोत, त्यासाठी कोणत्याही धार्मिक आदेशांची पर्वा करण्याचे कारण नाही, याबद्दल आधुनिक विवेकवाद्यांना आत्मविश्वास वाटू लागला. त्यातूनच मानवी गरजापूर्तीच्या दृष्टीने ऐहिक नीति आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा आविष्कार झाला. एकदा मानवाचे आणि बुद्धीचे स्वातंत्र्य मानले की मानवी समाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे राजकीय तत्त्वज्ञान माणूस आपल्या बुद्धी, संशोधन आणि पुरावे यांच्या आधाराने निर्माण करतो. मानवी समता आणि स्वातंत्र्य यांच्याशी सुसंगत असे लोकशाही हे मूल्यही त्यातूनच निर्माण होते. राज्य चालविण्यासाठी धार्मिक मार्गदर्शनाची गरज राहत नाही. त्यातूनच आपापल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनुसार विविध देशातील लोक आपापली राजकीय तत्त्वज्ञाने निर्माण करतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास, विवेकवादाचे मूलभूत तत्त्वज्ञान हे उदारमतवाद, स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा आणि प्रगती, कायद्याचे राज्य, मानवी समता, मानवी हक्क आणि मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी प्रेरक ठरलेले आहे.

विवेकवाद आणि नास्तिकता

विवेकवाद आणि नास्तिकता यांचा परस्परांत संबंध आहे. त्याचे स्वरूप पाहण्यापूर्वी आपण प्रथम नास्तिकता म्हणजे काय, याचा आढावा घेऊयात.

मनुस्मृतीत “नास्तिकोः वेदनिंदकः” असे म्हटलेले आहे. अर्थात् वेदांची निंदा करणाऱ्याला नास्तिक म्हटले जाते. त्यामुळेच पूर्वमीमांसा हे दर्शनशास्त्र ईश्वर मानत नसूनही आस्तिक असल्याचेच समजले जाते. कारण स्मृतीकाळात ईश्वर नव्हे तर वेद हेच धर्माचे मूळ असल्याचे मानले जात होते. त्यामुळे आस्तिक ठरण्यासाठी ईश्वराला माना की न माना, वेदांना मानले की पुरे होत असावे. परंतु व्यवहारात मात्र देवाच्या अस्तित्वाला नकार देणाऱ्यालाच नास्तिक म्हटले जाते. प्रस्तुत लेखाच्या शीर्षकातील नास्तिकता हा शब्द जवळपास याच अर्थाने वापरलेला असला तरी त्याचा अर्थ अधिक व्यापक आहें, हे पुढील विवेचनावरून दिसून येईल.

नास्तिकतेची कल्पना समजून घेण्यासाठी प्रथम आस्तिकता म्हणजे काय, हे समजले पाहिजे. कारण जो आस्तिक नाही तो नास्तिक असल्याचे समजले जाते. बहुतेक सर्व आस्तिक लोकांच्या मतानुसार यच्चयावत सृष्टीचा नियंता किंवा निर्माता-नियंता एक ईश्वर किंवा अनेक देवदेवता असतात. त्यांच्या मूर्तींची किंवा नाममूर्तीची पूजा किंवा भक्ती केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या मागण्या पूर्ण करतो. देव आणि भक्त यांच्यामध्ये देवाचा मध्यस्त म्हणून पुरोहितही असतोच. देवाला प्रसन्न करण्याचे किंवा देवाचा कोप दूर करण्याचे अनेक मार्ग तो सांगतो. देवाला काय आवडते, हे त्याला माहीत असते. हे माहीत करून घेण्यासाठी त्याला अनेक धर्मग्रंथ आणि अधूनमधून स्वप्न किंवा साक्षात्कार या साधनांची मदत होते. या बदल्यात त्याला काही मोबदलाही द्यावा लागतो. तीर्थ-क्षेत्र-व्रत आदी साधनेही देवाला प्रसन्न ठेवण्यासाठीच असतात. त्याची विधिवत आराधना केली नाही तर तो आपल्यावर कोपतोदेखील. देवाच्या भक्तीने किंवा त्याने ठरवून दिलेल्या मार्गावर चालल्याने भक्ताला पुण्य प्राप्त होते. आणि त्यामुळे देव त्याला मृत्युनंतर स्वर्गात पाठवितो. अन्यथा त्याच्या नशिबी नरक ठरलेलाच. गतजन्मात पाप केल्यानेच या जन्मात दुःख भोगावे लागते. आणि ते अपरिहार्यही असते. देव म्हटला की दानव, भूत, पिशाच्च आलेच. ही मंडळी माणसाला त्रास द्यायला टपलेलीच असतात. त्यांचा ताप टाळण्यासाठी मंत्र-तंत्रादी साधनांनी त्यांना खुश ठेवावे लागते.

वरील विवेचनावरून आस्तिक लोक ईश्वर, देवता, भूत-पिशाच्च, स्वर्ग-नरक, पुण्य-पाप, कर्मविपाकाचा नियम, पुनर्जन्म आदी अलौकिक गोष्टींना निःसंशयपणे मानतात. या गोष्टींच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसतात. त्यांना पुरावे विचारल्यास ते त्यांची या गोष्टींवर श्रद्धा असल्याचे सांगतात.

विवेकवादी या सर्व गोष्टींकडे कसे पाहतो, सांगितले पाहिजे. पहिल्या प्रथम अशी व्यक्ती वरील सर्व अलौकिक संकल्पनांना पूर्णपणे नाकारते. याचा अर्थ अशी व्यक्ती ही बुद्धीने विचार करते, प्रत्यक्ष प्रमाणांवर विश्वास ठेवते आणि कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व मानण्यासाठी पुराव्यांचा आग्रह धरते. आस्तिकांच्या वरील संकल्पनांचे अस्तित्व वैज्ञानिक विवेकवादाच्या कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे विवेकवादी व्यक्ती विवेकवादाच्या साह्याने वरील कल्पनांचे खंडन करते. म्हणूनच विवेकवादी माणूस नास्तिक असण्याची शक्यता असते. शक्यता म्हणण्यापेक्षा विवेकावादाचा परिणाम अपरिहार्यपणे नास्तिक्य भावनेत होतो, असेच म्हणणे अधिक योग्य राहील. नास्तिक म्हणजे केवळ देवालाच नाही तर त्या अनुषंगाने रचलेल्या सर्वच कल्पनांना नकार देणे होय. अलीकडचे सुशिक्षित लोक ‘आम्ही देव मानतो, पण इतर कल्पनांवर मात्र विश्वास ठेवीत नाही’, असे म्हणत असतात. आणि त्या आधारावर स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेतात. असे लोक खऱ्या अर्थाने विवेकवादी नसतात, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण खरा विवेकवादी ज्या गोष्टीला बुद्धीचा, प्रत्यक्ष प्रमाणाचा किंवा वैध पुराव्यांचा आधार नाही, त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. याचाच अर्थ तो नास्तिक बुद्धीचा असतो. आपला धर्मग्रंथ ईश्वरप्रणित असून आपल्या धर्मगुरूंना या ग्रंथांपासून आणि साक्षात्काराने ज्ञान झालेले आहे, प्राचीन ऋषी-मुनींसारखा फक्त पुण्यवान व्यक्तीलाच असा साक्षात्कार होत असतो, असा आस्तिकांचा दावा असतो. विवेकवादी अशा व्यक्तीनिष्ठ ज्ञानावर आणि शब्दप्रामाण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. विश्वास ठेवण्यासाठी तो पुराव्यांची मागणी करतो. आणि असे दावे करणाऱ्यांकडे पुराव्यांचा पूर्ण अभाव असतो. महत्त्वाची बाब म्हणजे विवेकवादानुसार तथ्यांचे ज्ञान हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असले पाहिजे. याचा अर्थ ज्ञानाचा प्रत्यय लहान-थोर, पुण्यवान-पापी या सर्वांना एकाच प्रकारे आणि सारख्याच प्रमाणात यायला हवा. जे साक्षात्कार ठरावीक लोकांनाच होतात, ते खरे ज्ञान असण्याची शक्यता नसते. कारण व्यक्तीनिष्ठ अनुभवांना कोणताही पुरावा देता येत नाही. चांगल्या कर्माचे चांगले आणि वाईट कर्माचे वाईट फळ मिळते, अशी आस्तिकांची पक्की धारणा असते. परंतु ‘कर्म’ ते ‘त्याचे फळ’ यांच्यामधील घटनांची साखळी आणि तिचे स्वरूप याविषयी आस्तिकांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. कारण कर्म या कारणाचे फळ मिळण्यासाठी मध्ये काही तरी घडायला हवे ना? तसेच कर्माचे आणि त्याच्या फळाचे ‘मोजमाप’ यांच्याबद्दलही कोणीही आस्तिक काही सांगू शकत नाही. आकाशात असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांची गती, कक्षा, आकारमान, त्यांचे परस्परांमधील अंतर यांचा वैज्ञानिकांनी वेध घेतलेला आहे. त्याचे पुरावेही उपलब्ध असून कोणीही त्यांची तपासणी करू शकते. परंतु स्वर्ग-नरक असल्याचे कोणतेही पुरावे आजपर्यंत आस्तिकांना देता आलेले नाहीत. वरील विवेचनावरून वैज्ञानिक विवेकवादाच्या कसोटीवर आस्तिक विचारांचा टिकाव लागू शकत नाही, हे स्पष्ट होण्यासारखे आहे. खरे तर तथाकथित आस्तिकांना आस्तिक म्हणणे हे फारसे अर्थपूर्ण वाटत नाही. कारण ते ज्या गोष्टींच्या अस्तित्वाचे किंचितही पुरावे नाहीत, त्या गोष्टींना त्या आहेत असे मानतात. पण जी भौतिक सृष्टी आणि लौकिक जीवन निश्चितपणे अस्तित्वात आहे, त्याचे महत्त्व मात्र कमी लेखतात. म्हणूनच या तथाकथित आस्तिकांना नास्तिक आणि जे लोक या लौकिक जीवनाला आणि सभोवतालच्या भौतिक सृष्टीलाच अंतिम सत्य मानतात, तेच खरे आस्तिक म्हटले पाहिजे. म्हणूनच सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे हे आपल्या एका पुस्तकाला ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, असे नाव देतात.

नास्तिकता: एक जीवनपद्धती

विवेकवादाचा स्वाभाविक परिणाम नास्तिकतेमध्ये होतो, हे आपण मागे पाहिलेच आहे. विवेकवाद हा केवळ विज्ञानालाच प्रेरणा देत नसून तो मानवी वर्तनाचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे विवेकवादी केवळ नास्तिक राहत नसून तो विवेकाच्या साह्याने आपल्या भोवती एक विवेकवादी विचारसृष्टी बनवितो. त्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि नैतिक क्रिया या बुद्धीच्या आणि पुराव्याच्या कसोटीवर ठरत असतात. त्यातूनच वर उल्लेखित सामाजिकशास्त्रातील तत्त्वे निर्धारित होतात. या तत्त्वनिर्धारणाच्या कार्यात धर्म, देव, अवतार यांसारख्या पारलौकिक शक्तींची किंवा कल्पनांची त्याला गरज नसते. नास्तिकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बुद्धी आणि पुराव्यांवर आधारित असतो. विवेकवाद हा लोकांना आपल्या भोवतीच्या लौकिक सृष्टीकडे आत्मीयतेने बघायला शिकवितो. कारण या सृष्टीच्या सान्निध्यातच त्याचा जन्म झालेला असून त्याचा अंतही येथेच होणार आहे, यावर तो ठाम असतो. कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी पुराव्यांची दखल घेणे त्याला आवश्यक वाटते. आपल्या दैनंदिन जीवनाची वाटचालही तो देव-धर्माच्या मार्गदर्शनात नव्हे, तर विवेकाच्या प्रकाशात करीत असतो. मानवी नैतिक मूल्यांची उभारणीही मानवी गरजांनुसार या लौकिक जगातूनच होत असते, असा नास्तिकांचा विश्वास असतो. नास्तिक लोक विवेकवादी असल्याने ते उदारमतवादी आणि मानवी स्वातंत्र्य आणि समतेचे पुरस्कर्ते असतात. राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी ते लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरतात. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी पहिला आघात आस्तिक भावनेवरच केला पाहिजे, असा बहुतेक नास्तिकांचा आग्रह असतो. लोकांच्या भावना दुखून ते आपल्याला सहकार्य करणार नाहीत, म्हणून देवाविषयी बोलता कामा नये, ही तडजोड त्यांना मान्य नसते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, नास्तिक लोक पूर्वग्रहाऐवजी प्रत्यक्षाला; अंधश्रद्धेच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोनाला; धार्मिक विश्वासाऐवजी प्रत्यक्ष पुराव्याला; पारलौकिक जगाऐवजी इहलोकाला अधिक महत्त्व देतात, यात शंका नाही.

सारांश

विश्वातील पदार्थ, घटना आणि प्रचलित संकल्पना यांच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे हा वैज्ञानिक विवेकवादाचा प्रयत्न असतो. त्यासाठी बुद्धी, इंद्रियानुभव, तर्क आणि पुरावे यांच्या साह्याने वास्तवाचा वेध घेतल्या जातो. त्यामुळे मानवाला विश्वाचे स्वरूप आणि त्याचे नियम यांचे यथार्थ ज्ञान होण्याला मदत होते. सृष्टीत घडणाऱ्या विविध घटनांमागची तत्त्वे समजल्याने तो निसर्गाशी योग्य तर्‍हेने आंतरक्रिया करू शकतो. वैज्ञानिक विवेकवादामुळे जसे विश्वाचे ज्ञान होते, तसे जगात प्रचलित असलेल्या भ्रामक समजुतीचे निराकरणही होते. अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा आणि धर्म यांचा मानवी जीवनावरील प्रभाव कमी होऊ लागतो. त्यातूनच देवाला आणि आनुषंगिक पारलौकिक संकल्पनांना नकार देणारा नास्तिकभाव उदित होतो. अनेक अवैज्ञानिक संकल्पनांचा पगडा दूर झाल्याने मानवी बुद्धी स्वच्छ आणि स्वतंत्र होते. या स्वातंत्र्यामुळे माणूस या जगाकडे आणि ह्या जगाशी असलेल्या त्याच्या संबंधाकडे मोकळेपणाने आणि कुतूहलाने पाहायला लागतो. हे लौकिक जीवन हेच अंतिम सत्य असल्याची त्याला जाणीव होते. मग तो एकंदर मानवी वर्तन आणि मानवाच्या परस्परांशी आणि आपल्या समूहाशी असलेल्या संबंधांबाबतीत विचार करू लागतो. मानवाचे ऐहिक हित हेच सर्वोच्च असल्याची त्याला जाणीव होते. मग तो मानवी हिताच्या दृष्टिकोनातून नवनवीन संकल्पनांची निर्मिती करतो. मानवी जीवनातील ईश्वराचा हस्तक्षेप दूर झाल्याने तो फक्त बुद्धी, निरीक्षण, प्रयोग आणि तर्क यांच्या आधारावर अनेकविध सामाजिकशास्त्रांची निर्मिती करतो. त्यातूनच मानवी सबंध आणि व्यवहार यांच्या नियमनासाठी अनेक संस्था जन्माला येतात. मानवाच्या दीर्घकालीन हिताचा विचार केल्यानेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता, मानवी समता, बंधुता, स्वातंत्र्य अशा मूल्यांच्या निर्मितीला योग्य असे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विवेकवाद आणि तद्जनित नास्तिकता ही निरोगी मानवी संबंधांसाठी आणि चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्याच्या मूलतत्त्ववादाच्या विकृत आणि मानवताविरोधी पार्श्वभूमीवर तर ही आवश्यकता अधिकच जाणवते, हे कोण नाकारील?

लातूर.
मोबाईल क्रमांक ८७९३८३८३८९ / ९४२०३५८३८३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.