परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

आपला नास्तिकवाद आपण तपासून पाहिला पाहिजे

नमस्कार.

मला खूप अवघडल्यासारखं झालंय. कारण, एक तर सभेत बोलायची माझी सवय मोडली आहे. आणि आज तुमच्यासमोर बोलताना तर मला आणखीन भीती वाटतेय. कारण, मी गेली ५० वर्षे जरी चळवळीत काम करत असले तरी, ज्या असोशीने तुम्ही नास्तिकतावादाचा पुरस्कार करताय, त्याचा प्रचार करताय, त्या प्रकारे मी नास्तिकतावादाचा पुरस्कार किंवा प्रचारही केलेला नाहीये. एकतर मी ज्यावेळेला चळवळीमध्ये पडले त्यावेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांची चळवळ फोफावलेली होती. चळवळीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते घरी गेल्यानंतर काय करतात त्यापेक्षा गिरणीच्या दरवाज्यावर ते काय करतात, काय बोलतात यावरच सगळं लक्ष केंद्रित झालेलं असायचं. दरवाज्यावरती आलेला कामगार हा त्याची जातपात, धर्म, त्याचं खाणं-पिणं हे सगळं घरी ठेऊन यायचा आणि गिरणीवर आल्यावर तो लालबावट्याचा व्हायचा. गिरणीमधून घरी गेल्यावर काय त्याचं दैनंदिन जीवन असेल ते. आपण म्हणतो तसं काहीसं  schezophrenic life. कारण इथे घरी गेल्यावर घरातली माणसं, त्याच्या आजूबाजूचे सगळे, वेगवेगळ्या समुदायामधले लोक, आणि गावाला गेल्यानंतर वेगळंच काहीतरी राजकारण! 

या सगळ्यांच्यामध्ये राहून शिकण्याची जी संधी मला मिळाली ती आताचा जो माहोल आहे त्यापेक्षा जरा वेगळी होती; त्यामुळे त्यावेळेला देव आहे की नाही? त्याचं काय करायचं असतं? असला तर कुठे असेल? अशा चर्चा करायचा प्रसंग माझ्यावर कधी आलाच नाही. 

कामगारांच्या बरोबर काम करत असताना दैनंदिन जीवनातले त्यांचे प्रश्न आणि त्याहीपेक्षा त्यांना मिळणारी मजुरी, त्यांचे श्रम आणि त्या श्रमातून निर्माण होणारी संपत्ती याच्याशीच सगळं निगडीत होतं. शिवाय त्या गोष्टी समजायाला जे काही अर्थकारण किंवा राजकारण शिकावं लागायचं, ते शिकवणारी मंडळी स्वतःच कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांचं ते शिकवणं आमच्या दृष्टीने पुरेसं वाटत होतं. कम्युनिस्ट लोकांमध्ये साधारणपणे अशीच पद्धत आहे. पुढाऱ्यांनी शिकवलं की ते आपण पोपटासारखं इतर ठिकाणी जाऊन बोलायचं असतं. कम्युनिस्टाने कधीही एखाद्या व्यक्तीला “तू स्वतः अभ्यास कर आणि हे शीक” असं सांगितलेलं मी तरी पाहिलेलं नाही. त्याला काही अपवाद आहेत. कॉ. डांगे त्यातले एक होते. ते म्हणायचे, “तू खेळायला जा, कॉलेजमध्ये जा, तिथे भाग घे, पुस्तकं वाच.” असं सांगणारे कम्युनिस्ट त्यावेळी फार कमी होते. एरवी सगळ्यांचं आपलं हेच, “आम्ही सांगतो ते बरोबर आहे आणि याचा जाऊन प्रचार करा.” 

तर, या पठडीत मी वाढले आहे. त्यामुळे तुमच्यासारखं विचारांनी घासूनपुसून वगैरे मी काही नास्तिक झालेले नाही. मला वाटत गेलं तशी मी नास्तिक झाले आणि त्यासाठी मला कोणत्याही प्रकारचा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. 

मी शाळेत होते त्यावेळी ‘चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला उद्याच्या जगाची आण’ अशा प्रकारची गाणी आमचे शिक्षक आम्हाला शिकवत असतं. त्याला कोणी प्रचारकी गाणी म्हणायचे नाहीत. ते असं म्हणायचे की, ‘राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला जी काही मुभा दिलेली आहे, जी काही स्वातंत्र्याची देणगी दिलेली आहे, तिचा योग्य वापर करायचा असेल तर आपण श्रमाची किंमत जाणली पाहिजे.’  आता श्रमाची किंमत जाणणं आणि नास्तिकता याचा काही संबंध आहे का? मला नाही वाटत. पण मी श्रमाची किंमत जाणत होते. मी नास्तिक होते की नाही मला माहिती नाही. पण श्रमाची किंमत आहे, श्रम करणाऱ्याचीही किंमत आहे आणि श्रम करणाऱ्याच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे, असं मी लहानपणापासून शाळेतून शिकले. 

आमच्या शाळेच्या आजूबाजूचे जे वातावरण होते, त्यात मुलींनी बाहेर खेळायला जाणं स्वीकार्य नव्हतं. गावच लहान! मुलींनी खेळायला जायचं असेल तर, काय करायचं? तर आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की, आपण गावातून फिरूया आणि मुलींना गोळा करूया. आता ह्याच्यामागे खूप मोठं तत्त्वज्ञान असं काही नव्हतं. एक शाळा निघाली, त्या शाळेमध्ये केवळ मुलांनीच नाही तर मुलींनीसुद्धा आलं पाहिजे, त्या शाळेला मैदान असलं पाहिजे, त्या शाळेमध्ये मुलांनी शिकलं पाहिजे आणि खेळलंपण पाहिजे, असं सांगणारी शाळा मला त्या काळी मिळाली. त्यामुळे माझा प्रवास थोडा सुकर झाला. अशा पद्धतीने माझा सगळा प्रवास झालेला असल्यामुळे मला कधी वाद घालायची खुमखुमी पण नाही आली. म्हणजे मला असं वाटायचं की तुम्हाला नाही पटलं ना, सोडून द्या. नंतर पुन्हा बघा कधीतरी. 

पुढे मी कामगारांमध्ये काम करायला सुरुवात केली. मी काम करायला सुरुवात केली म्हणजे काय, ती माझीच हौस! मला वाटायचं की आपण कष्ट करणाऱ्या लोकांसोबत असायला पाहिजे. आता ह्याला जर माझ्या घरूनच विरोध झाला असता तर माझं काय झालं असतं? मी त्यांच्या दबावाला बळी पडले असते की त्यांच्या दबावाला तोंड देऊनसुद्धा तिकडे गेले असते, कुणास ठाऊक? माझे आईवडील त्या वातावरणातले नसूनही त्यांनी मात्र मला पाठिंबाच दिला. माझे वडील मला म्हणायचे, “तुला जायचं तिकडे जा. पण जे करशील ते नीट कर.” आता हा असा संवाद एकदा झाल्यानंतर मी कुठेही गेले तरी, ते माझ्यावर लक्ष ठेवून असायचे, पण त्यांनी मला कधी अडवलं नाही. आता  ५७-६० सालाची गोष्ट आहे ही. म्हणजे आतापासून जवळजवळ ५० वर्षांपूर्वीची. माझे आईवडील अत्यंत दारिद्र्यामध्ये वाढले. दारिद्र्यातून मार्ग काढण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट केले. त्या अफाट दारिद्र्यामध्ये त्यांनी जे कष्ट केले, त्या कष्टाचे मोलच करता येणार नाही आम्हाला. तसा एक खूप मोठा समाज त्यावेळेला दरिद्री होता. फार वेगळं काही नव्हतं आजूबाजूला.

पोट भरायचे म्हणून माझी आई नर्सिंग शिकली. नर्सिंग शिकतानाही तिच्या घरात देव-धर्म चालूच असायचा ना! पण ते कधी तिच्या नर्सिंगच्या आड नाही आलं. कारण तिचे वडीलपण असेच होते. ते म्हणायचे, “स्वतःसाठी जगलास तर मेलास! दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास!” असं म्हणणारे वडील तिला मिळाले. तेही दरिद्री, दारू पिणारे, पण त्या परिस्थितीतही माझी आई शिकली. त्यानंतर तिने आपल्या मुलांना शिकायला मिळावं म्हणून भरपूर त्यागही केला. त्यावेळेला सगळेच असं करायचे. नवीन काही नव्हतं त्यात! आता आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या वगैरे वाटतात. कारण, आताच्या आईवडिलांना आणि विशेषतः तेव्हाचा गरीब मध्यमवर्ग जो आता गरीब मध्यमवर्गातून सुस्थित मध्यमवर्गात आलेला आहे, त्यांना आता अनेक सुविधा सहजगत्या मिळतात; आणि म्हणून त्या सुविधा त्यांना हक्क वाटायला लागला आहे.  स्वतःचा तो हक्क जपण्यासाठी ते इतरांवर कितीही दबाव टाकण्याची तयारी दाखवतात. हे आमच्या पिढीमध्ये नव्हतं. 

तर सांगायचा मुद्दा असा की, आपण आपल्याला पटत असणारे विचार लोकांसमोर मांडत असताना पलिकडच्या बाजूचा, जो ऐकणारा माणूस आहे त्याची जडणघडण काहीतरी वेगळ्या प्रकारे झाली असेल, लहानपणापासून त्याच्या समाजाने, त्याच्या समुदायाने त्याला काही वेगळ्या प्रकारची दिलेली शिदोरी असेल, त्याला undermine करून जर आपण आपलं वैचारिक सामर्थ्य प्रस्थापित करणार असलो तर ते शक्य होणार नाही. 

बरं हे काय आहे आता? नास्तिक आहे म्हटल्यानंतर लगेच ते गणपती वगैरे ऐकलं की काढला फणा. मघा गाण्यात ऐकलं ते नेमकं काय होतं? तो विज्ञान विसरला… विज्ञान नाही विसरत तो. तो ऑपरेशन करताना बरोबर ऑपरेशन करतो, विज्ञान नाही विसरत तो. पण त्याला वाटतं की आपल्याला हे जे काही ऑपरेशन करायला शिकवलंय, हे शिकायची बुद्धी आणि संधी आपल्याला कुणीतरी दिली म्हणून आपण शिकलो. आपल्याला हे देवाने दिलंय. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो तो. नास्तिकतावादाच्या नावाखाली आपण त्याचा अपमान नको करायला. 

मला वाटतं की मी तुमच्या नेहमीच्या पठडीतला जो काही नास्तिकतावाद असेल त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बोलतेय. पण मी जे बोलतेय तो माझा अनुभव आहे. आता एक बघा ना.. डॉक्टरच्याच बाबतीत बघा. मला एक डॉक्टरीणबाई भेटल्या. मी त्यांना विचारलं, “तुम्ही किती बाळंतपणं केली आहेत?” त्या बोलल्या, “मी हजारो बाळंतपणं केलेली आहेत. साधी सरळ मार्गाने होणारी बाळंतपणं सोडून द्या पण, अवघड बाळंतपणं होतात ना, तेव्हा देवच आठवतो. त्या अवघड बाळंतपणातील बाईला आपण सोडवतो तर असं वाटतं की आपल्या हाताला कोणीतरी गाईड करतोय. त्यावेळी आताच्या सोयी नव्हत्या तेव्हा आपल्याला दिसत नाही – ना गर्भाशय, ना काही; तेव्हा तोच योग्य जागी येईल, योग्य रीतीने त्या बाळाला बाहेर काढेल. मग त्यांना जर असं वाटत असेल की करतंय कोणी गाईड त्यांना आणि हा गाईड करणारा हात परमेश्वराचा आहे; तर काय बिघडतं आपलं? लोक ज्या पद्धतीने भावना व्यक्त करतात त्याच्यावरून ते विज्ञानाचा वापर करतात की नाही हे कृपया ठरवू नका. त्यांचं जे शिक्षण आहे, जे प्रशिक्षण आहे त्या वापर करत असताना तिथे त्यांचा देव आडवा नाही येत, तर तिथे देव त्यांना मदत करतो असं वाटतं. आताचे सगळे देव आपल्याला आडवे येताय तो भाग सोडून द्या.

आणखी एक गमतीदार किस्सा सांगते तुम्हाला. त्यावेळेला आम्ही चांगले मोठे होतो. स्त्रीवाद, साम्यवाद या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो होतो. एके ठिकाणी हळदीकुंकुवाचं निमंत्रण आलं. तर मी, छाया दातार आणि ज्योती म्हापसेकर तिघी विचारात पडलो, जायचं की नाही हळदीकुंकुवाला? मी तर कुंकू लावत नाही, म्हापसेकर बाई चांगलं ठसठशीत मंगळसूत्र घालतात आणि कुंकू पण लावतात. आणि छाया दातार, तिने तर त्या काळामध्ये मंगळसूत्र घालायचं सोडून दिलं होतं.. तर, आम्हाला आलं होतं संक्रांतीचं निमंत्रण. आम्ही गेलो. तिथं लिहिलं होतं सौ. शारदा साठे, सौ. छाया दातार आणि सौ. ज्योती म्हापसेकर. तिथं जी बाई उभी होती, तिनं बघितलं, ह्या साठ्ये! ह्यांच्या कपाळावर कुंकू नाही, अंगावर दागिने नाहीत. मग तिनं भराभर ‘सौ.’ पुसून टाकलं. नंतर तिनं छाया दातारकडे बघितलं. अरे! हिच्या गळ्यात पण मंगळसूत्र नाही. पण, कुंकू आहे, टिकली लावते ती. मग तिनं भराभर तिच्या नावापुढचं ‘सौ.’ ही खोडून टाकलं. कुणास ठाऊक, कुमारी आहे की काय ते? मग म्हापसेकर. चांगलं ठसठशीत मंगळसूत्र आणि कुंकू लावलेल्या. मग त्यांच्या नावापुढचं ‘सौ.’ तसंच ठेवलं. छाया मला म्हणाली, “हे चाललंय काय?” मी म्हटलं, “बघूया तर खरं, काय चाललंय ते.” मंगळसूत्र घातलं आहे म्हणून मग त्यांनी संक्रांतीचं वाण ज्योतीला दिलं. छाया म्हणाली, “अगं, माझं पण लग्न झालंय. पण माझं वाण गेलं.” मी म्हणाले, “मी तर विधवाच! कपाळाला कुंकू नाही, काही नाही. मला तरी कसचं वाण-बिण मिळणार?” तर सांगायची गंमत अशी की, लोकांचा प्रतीकवाद वगैरेवर फार विश्वास असतो. तो काही आज बसलेला नाही. जन्माला आल्याबरोबर देखील बसलेला नाही. समाजाचा जो व्यवहार ते बघत आले त्यातून तो आला आहे.

मुद्दा असा आहे की, हा जो प्रतीकवाद आहे, ही जी काही जीवनात वागण्याची व्यावहारिक पद्धत आहे ती ठरलेली असते. ती सहजासहजी टाकली जात नाही. आपणही नाही टाकली. नास्तिक आहोत म्हणून काय सगळ्यांनी कुंकू लावायचं सोडलेलं नाही. हातामध्ये फॅशनेबल बांगड्या घालायचं सोडलेलं नाही. सोडलंय का कोणी? नाही ना! तुम्ही कदाचित हौस म्हणून घालत असाल, तर लोक त्या परंपरा म्हणून घालत असतील. दोन्हींमध्ये फरक कसा करणार तुम्ही? रस्त्याने चाललेल्या बाईकडे बघून ही नास्तिक बाई आहे आणि ही परंपरावादी बाई आहे, असा फरक कसा कळणार ? असा फरक करता येत नाही. तेव्हा आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून लोकांच्या जीवनामधल्या निरनिराळ्या कमतरता असतील, निरनिराळया कमजोरी असतील, त्यांच्या वागण्याच्या निरनिराळया पद्धती असतील तर, त्याकडे आपण सहृदयतेने बघायला शिकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकवेळी त्याची टिंगलटवाळी करता कामा नये. आपण आस्तिक आहोत का नास्तिक आहोत याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही.

मी नास्तिक आहे असं मी म्हणते. पण कदाचित सगळे म्हणाले तर देवाला नमस्कारही करून टाकेन. मला काही फरक नाही पडत. माझ्या नास्तिकत्वामध्ये समोरच्या गणपतीच्या मूर्तीला नमस्कार केल्यामुळे फरक पडतो का? तर मला नाही वाटत की फरक पडतो. मी जशी लोकांना वाटतं म्हणून देवाला नमस्कार करते, तशीच मी माणसालाही नमस्कार करते. माणसालाही नमस्कार करायच्या ऐवजी त्याच्या थोबाडीत मारायला शिकलो तर मात्र जरा प्रश्नच आहे. 

तर मला असं वाटतं की, आपण काही नास्तिकतेचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. समाजामध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये भाग घेत घेत आपल्या बुद्धीप्रमाणे वागायला लागतो. काही वेगळं पालनपोषण मिळालं तर, त्याप्रमाणे विचार करायला लागतो आणि मग नास्तिक्याकडे वळतो. आपलं नास्तिक्य मिरवण्याची काहीही गरज नाही. पण जर कुणी विचारलं की, देवावर विश्वास आहे की नाही? तर त्याचं उत्तर मात्र आपल्याला स्पष्टपणाने देता आलं पाहिजे. वितंडवाद घालायची अजिबात गरज नसते. कारण ज्याचा देवावर विश्वास आहे त्याचा विश्वास तुम्ही तुमच्या बोलण्याने घालवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमचा देवावर विश्वास नसेल तर, कोणीही कितीही भजन केलं देवाचं तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होणार आहे का? नाही! मग कशाला भांडायचं तिथे? त्याच्या अनुभवातून जो जेव्हा शिकेल तेव्हा शिकेल. आपल्याला काय त्याचं? म्हणजे एवढी घाई काय लागली आहे सबंध जगाला नास्तिक बनवण्याची? असं काही होत नसतं; आणि आपण जर या पद्धतीने सबंध जग नास्तिक घडवायला गेलो तर तसं होणार नाही. उलट आपला मोदी होईल. मोदी सगळ्यांना त्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करतोय. पण घडतोय का आपण? नाही घडत आहोत! प्रत्येक माणसामध्ये विचार करण्याची शक्ती असते. ती विचारशक्ती तो वापरत असतो. त्याच्या कुवतीनुसार तो विचारानेच चालत असतो. त्याचा विचार ज्यावेळेला चुकीचा आहे असं त्याला पटतं, त्यावेळेला तो विचार सोडून देण्यासाठी जी मानसिक ताकद लागते, ती मानसिक ताकद देण्याचं काम करणं म्हणजे नास्तिकवादाचा प्रचार करणं, असं मला वाटतं. साधं, सिंपल! काही फार नाही. 

हे लक्षात घेऊन आपण सगळे नास्तिक असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण सगळे एकाच पद्धतीने नास्तिक आहोत का हे आपण दर खेपेला स्वतःशी  तपासून पाहिलं पाहिजे. आपला नास्तिकवादसुद्धा आपण तपासून पाहिला पाहिजे. आपला नास्तिकवाद आपण तपासून पाहिला नाही तर, दुसऱ्याचा आस्तिकवाद तपासण्याचा अधिकार आपल्याला नाही. हे आपण लक्षात ठेवलं तर, आपल्या खूप गोष्टी सुकर होतील. मग तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल की, अमक्याने गणपतीला नमस्कार केला पण, तो काही जातपात पाळत नाही. म्हणजे गणपतीला नमस्कार करणं आणि जातपात पाळणं याच्यामध्ये मी प्राधान्य कुणाला देईन? तुला नमस्कार करायचा तर कर, जातपात पाळू नकोस झालं. समाज तितका पुढे गेला ना! कशाला एवढं अगदी की, आजच्या आज सगळं जग नास्तिक झालं पाहिजे, आजच्या आज सगळं जग पुरोगामी झालं पाहिजे, आजच्या आज सगळया जगाने जुन्या चालीरीती मोडून, तोडून टाकल्या पाहिजे. काही घाई नाही आपल्याला. पृथ्वी काही एवढ्यात नष्ट होणार नाहीये. आणि कोणीही कितीही नष्ट करण्याचे प्रयत्न करण्याचं ठरवलं तरी त्यांना ते जमणार नाहीये. कारण आता लोकांमध्ये जागरूकता वाढत चालली आहे. तेव्हा आपण लोकांवर विश्वास ठेवूया ना थोडा या बाबतीत. लोक आज ना उद्या सुकर पद्धतीने, सुकृत पद्धतीने, मानवतेच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघायला शिकतील असा विश्वास बाळगून आपण आपला नास्तिकतावाद तपासून पाहणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही सगळे जण एकमेकांना आणि इतरांनाही मदत करालच. ती मदत करत असताना दुराग्रही पद्धतीने, माझं तेच खरं या पद्धतीने न जाता, ज्याला तुम्हाला पटवायचं आहे त्याला समजून घेण्याची पद्धत जर आपण आंगिकारली तर, पुढच्या मार्गामध्ये असे खूप लोक तुम्हाला भेटतील ज्यांना तुम्ही आजवर आस्तिक समजत आला होता, पण ते वेगळंच काहीतरी वागताहेत आणि ते वेगळं वागणं तुमच्यापेक्षा अधिक पुरोगामी असण्याची शक्यता आहे. एवढी नम्रता जर आपल्याला प्राप्त झाली तर आपण खूप काही काम करू शकू.

धन्यवाद!

ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

अभिप्राय 3

 • सगळेच कन्फ्युज वाटतात.
  संस्कृती आणि देव यातला फरक यायला पाहिजे.
  संस्कृती ला अमान्य करणे चुकीचे.
  कोणाचा विरोध म्हणून एकत्र येणे चूकीचे.

 • नास्तिक लोक देव नाही ,धर्म नाही, अंधश्रद्धा नाही असे सांगत असतात. पण काय अस्तित्वात आहे ,कशावर विश्वास ठेवावा, काय समाजोपयोगी कार्य करावे,ज्ञानप्रसार व विज्ञान प्रसार कसा करावा, विज्ञाननिष्ठ उत्सव का करावेत,नवीन रूढी आणि कर्मकांड कशी रुजवावी , कला व संस्कृती यांचे बहुविध आविष्कार बुद्धी व भावना यांचा मिलाफ करून सादर व्हावेत :असे रचनात्मक रूप नास्तिकवादाला दिले पाहिजे.
  सर्वंकष मांडणी केलेले तत्वज्ञान आजकालचे नास्तिक विचारवंत मांडत नाहीत. Epicurus या ग्रीक तत्ववेत्याने जडवादी तत्वज्ञान या सर्व विषयांना स्पर्श करत मांडले. एपिक्यूरसच्या विचारसरणीला विज्ञानाचा आधार देत आधुनिक विज्ञानवाद मांडण्याची गरज आहे. बुध्दीची मोठी झेप घेण्याची वेळ आलेली आहे ज्यात भावनाना सुध्दा पुरेसे स्थान असेल.

 • स्वतःला नास्तिक म्हणवणारे यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख! श्रीमती शारदा साठ्ये यांनी अतिशय यथायोग्य विचार मांडले आहेत. नास्तिक लोकांनी दुसय्रांच्या जीवनपध्दतीत ढवळाढवळ करण्याची गरजच काय? तुम्हाला वाटते तसे तुम्ही जगा, आस्तिकाल वाटते तसे तो जगेल. सत्य असत्याशी मन केले ग्वाही..या एकांकितेत श्री. यशोधन गडकरी यांच्या लिखाणावर मी माझे विचार मांडले आहेत. त्या माझ्या विचारांना या लेखाने पुष्टीच मिळाली आहे. कुटुंबातिल नास्तिक मुलाच्या हटवदीपणामुळे त्या कुटुंबात किती अनर्थ ओढवला हे दिसून आले आहे. श्रीमती साठ्येंनी सर्जन डॉक्टरांचे दिलेले उदाहरण वास्तवच आहे. एवढे सुविद्य डॉक्टर सुध्दा कठीण शस्त्रक्रियेच्या वेळी मनोमन देवाची प्रार्थना करतातच. मग नास्तिक लोकांचा देव नाकारण्याचा अट्टाहास काय म्हणून असावा?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.