परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य आणि राजकारणी

साथींनो जिंदाबाद.

आज या नास्तिक परिषदेत ‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या विषयावर आपण बोलतो आहोत. नास्तिकतेचा माझा अनुभव मी सांगते. जवळपास सहा महिन्यांपासून परिषदेच्या निमित्ताने मी लोकांमध्ये जात होते. “आम्ही नास्तिक परिषद घेणार आहोत. तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. आणि आम्हाला फंडचीही गरज आहे.” असे सातत्याने जेव्हा मी लोकांपुढे मांडत होते तेव्हा लोकांमधून प्रश्न आला, “मॅडम तुम्ही? नास्तिक? तुम्ही तर नगरसेविका!” साधारण सगळ्यांनाच वाटते की नास्तिक्य आणि राजकारण हे अगदी वेगळे विषय आहेत. राजकारणी हा नास्तिक मंचावर असूच शकत नाही. पण या दोन्हींचं प्रतिनिधित्व करणारी मी आज तुमच्यासमोर आहे.

माझा नास्तिकतेचा प्रवास सांगायचा तर, अगदी अठरा विश्वे दारिद्र्यात आमचं लहानपण गेलं. माझ्या वडिलांचे कमी वयातच दोन्ही पाय तुटले होते. माझी बहीणसुद्धा अपंग होती. संपूर्ण घरामध्ये पन्नास टक्के अपंग होते तर पन्नास टक्के कसेबसे असे आम्ही होतो. अशा परिस्थितीत “तुम्हाला सांभाळणं आमच्याकडून होत नाही” असं म्हणून आम्हाला घरातून हाकलून दिलं होतं. तेव्हा आम्ही होतो पाच-सहा वर्षांचे. देवधर्माशी आमचा काडीमात्र संबंध नव्हता. पोट भरणं आणि बापाला, बहिणीला जगवणं अशा परिस्थितीत आम्ही झोपडपट्टीत एका उकिरड्यावर जीवन जगलो. आता उकिरड्यावर जीवन जगत असताना कसले देवधर्म, कसली पूजा-अर्चा? मला एक आता कळून चुकलंय की, देवधर्म, व्रत, पूजा हे सारं कोणाला सुचतं? ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे, पैसा आहे त्याला. गरिबाला नाही सुचणार हे! आमच्या डोक्यावर सतत ताणतणाव असायचे. आम्हाला एक घर चालवायचं आहे, पोट भरायचं आहे आणि दोन्ही पाय तुटलेल्या आपल्या बापाला सांभाळायचं आहे. तर वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षांपासूनच मी अर्थार्जन करू लागले. अर्थार्जन म्हणजे काय तर कुठेतरी मिर्गुंड वीक, राजगिऱ्याचे लाडू वीक, कुठेतरी पिशव्या वीक, फटाके वीक अशा पद्धतीने काम करत गेले.

त्यावेळी मी राजकारणात पडण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. मी ज्या झोपडपट्टीत राहत होते, ज्या घाणीच्या साम्राज्यात राहत होते ते कुठेतरी बदलायला पाहिजे, त्यात परिवर्तन झालं पाहिजे असं मला सतत वाटत असे. कुठलाही देवबिव काही आपल्यात परिवर्तन आणू शकत नाही. ते आपलं आपल्यालाच केलं पाहिजे. या समजेतून मी एसएफआय, ‘स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या चळवळीत सामील झाले; म्हणजे कुठेतरी बदल व्हावा यासाठी. साम्यवादी पार्टीत सभासद होण्यासाठी गेले. तेव्हा वय होतं पंधरा. आठवीला शिकत होते. मला ते म्हणाले, “तुम्हाला सभासद करता येणार नाही, किमान १८ वर्षं पूर्ण पाहिजेत. मग तुम्ही एसएफआयच्या विंगमध्ये जाल.” शेवटी मी त्यात शिरले. आज मी जी काही आहे ती फक्त एसएफआयमुळे! एसएफआयच्या चळवळीत काम करत असताना मी अन्यायाविरुद्ध लढले. आंदोलने करणे, मोर्चे काढणे आणि जीव ओतून काम करणे हे सारे मी तेव्हा करत होते. माझे आईवडील काही फार रॅशनल किंवा नास्तिक वगैरे नाहीत. पण पोरगी काहीतरी करते आहे, धाडसाने करते आहे, तर करू दे, एवढा विश्वास माझ्या आईवडिलांनी माझ्यावर दाखवला. 

मी नगरसेविका झाले ती एफ.वाय.ला असताना, कॉलेजला शिकत असताना. तेव्हा वेळ अशी होती की आमचे मास्तर कुठे भेटले तर मला शंभर रुपये द्यायचे. “का?” तर म्हणायचे, “तू निवडणूक लढवते आहेस ना? लागतील अडीअडचणीला.” मी पहिली निवडणूक १९९६ साली लढवली. लोक मला शंभर, दोनशे, पाचशे रुपये देत होते. आमची सगळी एसएफआयची पलटण शेंगदाणे, चुरमुरे खाऊन प्रचार करत होती. त्यावेळी फॉर्म भरायला माझ्याकडे १२ रुपयेसुद्धा नव्हते आणि त्या परिस्थितीतही मी लढले. 

लोक राजकारण्यांना सामान्यपणे विचारतात की त्यांचा व्यवसाय काय? राजकारण! राजकारण हा व्यवसाय कसा असू शकतो? हा प्रश्न मला नेहमीच छळायचा. त्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय असं मी कधीच म्हटलं नाही. माझा व्यवसाय मार्केटिंग असेल, माझा व्यवसाय इन्शुरन्स असेल. मी इन्शुरन्सची एजंट म्हणून काम करायचे, करते. अगदी टॉपच्या लेव्हलला. तर एक असायचं, ते म्हणजे कुठलंही काम करायचं तर ते जिद्दीने. या जिद्दीमुळेच माझा परफॉर्मन्स नेहमी चांगला असतो. एलआयसीमध्ये शुभारंभाच्या दिवशी सत्यनारायण घातला जातो. परफॉर्मन्स ज्याचा चांगला असतो त्याच्या हस्ते पूजा असते. तिथे मात्र मी अतिशय ठामपणे “सॉरी, मला जमणार नाही, मी करणार नाही.” हे सांगितलं. मग कुणाला काहीही वाटो. 

नवरात्रीमध्ये सगळ्या एलआयसीमधल्या बायका धार्मिक नियमानुसार प्रत्येक दिवसाला ठरल्याप्रमाणे त्या रंगाची साडी परिधान करतात. पहिल्या वर्षी मी केलं आणि नंतर माझं मलाच वाटलं, हे किती अतार्किक आहे, हा किती मूर्खपणा आहे. मी त्यांच्यासाठी करायचं, पण मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही का? मी जे करतेय ते योग्य आहे की नाही असा विचार मनात येणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मी ते सगळं बदलत गेले.

मला अशा गोष्टी पटत नाहीत, कारण कृतिशील असणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. नुसतं भाषण देऊन उपयोगाचं नाही. त्यामुळे मी कधीही नुसतं भाषण करत नाही, पहिले स्वतः कृती करते. 

मी लहान वयापासून वृद्धाश्रमात काम करत होते. ५ वर्ष मी अनाथ मुलीसारखं जीवन जगले. माझ्या परिस्थितीमुळे ती वेळ माझ्यावर आली होती. आश्रमात एवढे कष्ट करावे लागत होते की मी म्हणायचे, “देवा, मला उचल. कुठे आहेस का नाही तू? किती कष्ट करायचे आम्ही? किती मर मर मरायचं?” मग विचार केला की देव तर हे सगळं बघतच नाही, देवाचा संबंधच नाही कशाशी. देव असेल तर तो करेल ना! अगदी तारुण्यात हे मला कळू लागलं. एखादी आजी गेली आश्रमातली आणि तिच्याविषयी तिच्या मुलांना फोन केला तर ते म्हणायचे, “तिथल्या तिथं काय ते आवरून टाका.” आश्रमातील मृत आज्यांचे अंतिम संस्कार आम्हालाच करावे लागत असत. चिता रचण्यापासून अग्नी देणे व अस्थिविसर्जन करण्यापर्यंत! मी विचार करायचे, देव जर असेल तर हे करेल? 

त्या आश्रमात सगळे हिंदू संस्कार प्रचंड प्रमाणात दिसून येत. तासतासभर आरत्या चालत. आरत्या तर माझ्या तोंडपाठ होत्या त्यावेळी. मी आश्रमात राहूनच शिक्षण केलं होतं. वृद्धाश्रमातसुद्धा सेवेला आमच्यासारख्या बायका असायच्या. पाळीच्या दिवसांत त्या बायकांना आरत्या करताना बाहेर बसवलं जायचं. मला प्रश्न पडायचा,`बायकांना बाहेर बसवायचा प्रश्नच काय येतोय? म्हणजे देव एवढी विषमता मानतो?’ याच कामातील अनुभवांची शिदोरी घेऊन मी स्वतःला चळवळीत झोकून दिलं.

अशी टोकाची भूमिका मांडत असूनसुद्धा मी तीन वेळा निवडून आले आहे. पंधरा वर्षे मी नगरसेविका होते आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षातून आणि वेगवेगळ्या वॉर्डातून निवडून आलेले आहे. ज्योती आदाटे कुठल्या पक्षाची आहे हे लोकांनी कधीच बघितलं नाही. ज्योती आमची लढवय्यी कार्यकर्ती आहे आणि आपण काम केलं तर ती त्याला न्याय देऊ शकते एवढा सगळ्यांचा विश्वास होता. मी चित्रपटातही काम केलंय. बावीस चित्रपट झाले. एकदा मला फोन आला, “तुम्हाला एक चांगला रोल आहे.” “कुठला?” “अंबाबाईचा.” “माफ करा. मी अंबाबाईचा रोल करणार नाही.” “अहो, लीड रोल आहे.” “सॉरी!” कारण मी जे वास्तवात जगते तेच मला केलं पाहिजे. 

मी सिंगल मदर असताना एक बाळ दत्तक घेतलं, सहा महिन्यांचं. ते माझं बाळ आज तेविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. रूढी-परंपरांच्या पलीकडे जाऊन त्या बाळाला मी माझं नाव लावलं आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्या मृतदेहाजवळ थांबून नेत्रदान करून घेतलं. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे काम करून बुरसटलेल्या परंपरेला फाटा दिला व त्यांच्या अस्थी झाडांना अर्पण केल्या. त्यावेळी नातेवाईकांनी विरोध केला. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता हे कर्तव्य पार पाडले. तसेच माझ्या आईची आई, माझी आजी तिच्या अखेरच्या क्षणी माझ्याकडेच होती. ती अडगळ झाल्याने तिच्या मुलांनी तिला सोडून दिले होते. तिचा जीव गेला त्यावेळी हजारो वर्षांची परंपरा झुगारून देऊन आम्ही अंनिसच्या चार कार्यकर्त्यांनी १०८ वर्षांच्या माझ्या आजीला खांदा दिला आणि अत्यंत धार्मिक वृत्तीच्या तिच्या मुलीलाच शिंकाळे पकडायला लावले.

हे सगळं सांगायचं कारण एकच की, माझ्या पुढच्या पिढीला मी नास्तिक बनवलं, विचार करायला शिकवलं आहे. माझ्या आईला मी फारसं बदलू शकले नाही पण माझी मुलं स्वतः म्हणतात, “देवबिव सगळं झूठ आहे.” म्हणूनच मला सांगायचं आहे की, आपण कृती करूया आणि आपल्या मुलाबाळांना घडवूया. पोलीओग्रस्त असलेल्या माझ्या बहिणीचे एका मुस्लिम मुलावर प्रेम होते. मी त्यांच्या लग्नाला लगेच होकार दिला. गेली १८ वर्षे छान संसार करताहेत दोघं. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन आपण मानवता बघणं मला गरजेचं वाटलं. माझं एक म्हणणं असतं, नुसती भाषणबाजी न करता आपण आपल्या आयुष्यात या गोष्टी आचरणात आणणे गरजेचे असते.

अंधश्रद्धेविरोधात कार्यक्रम करताना मी बायकांना सांगते की तुमच्या मुलांना बिघडवायला समाज कारणीभूत नाही, आईबापच कारणीभूत असतात. 

तर आता थांबते. पण ज्या व्यासपीठावर जावेदजी बसले आहेत, त्या रॅशनल मैफिलीचा शेवट करताना एक शेर जरूरी आहे.

तो एक बात बोलती हूं, हम सबके लिए।

मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्सों में आती है
क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीकेसे अंजाम देने की ताक़त रखते है।

धन्यवाद!

ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

अभिप्राय 2

  • या लेखातून मला एक नवीन गोष्ट कळली. मार्क्सच्या सिद्धांतानुसार धर्म ही एक अफू आहे Opium of the masses. म्हणजे सामान्य लोकांचे धकाधकीचे ,कष्टाचे, दारिद्र्याचे,भय व दुःख यांनी ग्रस्त जगणे सुसह्य होण्यासाठी धर्माची नशा उपयोगी पडते असा माझा समज होता .पण लेखिकेने जे लिहिले आहे :”देवधर्म, व्रत, पूजा हे सारं कोणाला सुचतं? ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे, पैसा आहे त्याला. गरिबाला नाही सुचणार हे!”- ते काही अंशी तरी खरं वाटत.
    त्याचप्रमाणे नास्तिक विचारांवर लेख लिहिणे, भाषण देणं यापेक्षा तिने दाखवलेला मार्ग योग्य वाटतो:”कारण कृतिशील असणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. नुसतं भाषण देऊन उपयोगाचं नाही. त्यामुळे मी कधीही नुसतं भाषण करत नाही, पहिले स्वतः कृती करते”
    ही कृती म्हणजे समाजसेवा, राजकारण,विज्ञान प्रसार व निसर्ग संवर्धन हे काहीही असू शकतं असे मला वाटते.
    एकुणच वेगळे विचार मांडले आहेत व अशीच दिशा बुध्दिवादाला दिली पाहिजे.

  • ज्योतीबेटी, तूं लहानपणापासून खूपच खडतर जीवन जगून जीवनात यशस्वी झालीस हे मान्य करावेच लागेल. तुझा परमेश्वरावर विश्वास नाही. पण बेटी, एक गोष्ट लक्षात ठेव, की सनातन हिंदू धर्मात एक विश्वास आहे; ” ज्याने जन्माला घातले, ज्यांने चोच दिली, त्याने दाणा सुध्दा निर्माण केलेला असतो.” तूं प्रयत्नवादी आहेस. आणि ‘ प्रयत्नांती परमेश्वर’ अशी म्हणच आहे. कलीयुगात परमेश्वर प्रत्यक्ष दिसत नसला, तरी तो कोणत्या ना कोणत्या रुपाने प्रत्येक जीवाला मदत करत असतो. तूं जे लिहिले आहेस की तू नगर नगरपालिकेची निवडणूक लढवलीस तेव्हा कोणी शंभर, कोणी पांचशे अशी त्यांच्या ऐपतीप्रमाणे तुला मदत केली. याचा अर्थ परमेश्वरानेच तुला हस्ते परहस्ते मदत केली होती. अर्थात नास्तिक लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण हेच सत्य आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.