परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

विचाराने जगायचे तर किंमत चुकवावी लागते

सर्वांना सस्नेह नमस्कार.

‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या परिसंवादाच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो? इकडे माझा प्रवास कसा झाला? हे मी विषद करतो. मी लहान असताना आमच्याकडे ‘घोड्यावरचा देव’ नावाचा एक प्रकार असायचा. तर त्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती जायचो. ‘सासनकाठी’ नावाचा एक प्रकार इकडे असतो. म्हणजे काय? तर काहीतरी एक उत्सव असतो. त्यात गुलालामध्ये बुडवलेलं खोबरं असतं. ते खोबरं मंदिरावरती टाकायचं आणि तिथून ते खाली पडलं की उचलून खायचं, असा तो प्रकार असतो. खोबरं जिथे पडायचं, तिथे खाली चिखल, माती असायची. मला ते खायला घाण वाटायचं. बाकीचे सगळे “खा की, खा की” म्हणून मागे लागायचे. मी काही ते खात नसे. मग त्यावरून वाद व्हायचे. मग एक टप्पा असा आला की मी तिकडे न जाण्याचं ठरवलं. तर मग “देव असं करेल, तसं करेल” अशी मला धमकी येऊ लागली. म्हटलं, “मी आणि देव बघून घेऊ.” तर, अशाप्रकारे लहानपणापासून एक विद्रोही विचार, विद्रोही म्हणण्यापेक्षा, मला जे पटत नाही ते करायचं नाही असा एक विचार माझ्या डोक्यामध्ये घोळायला लागला होता. 

आमच्याकडे आणखी एक प्रकार असायचा. यल्लामा आमची कुलदैवत! माझे वडील २००७ साली वारले. त्यानंतर माझी आई मला एसटीने कर्नाटकच्या यल्लमा देवीला घेऊन जायची. मी २०१० ला एकदा आईला म्हणालो, “एक वर्ष नाही जाऊया देवीला. बाबा गेल्यानंतरची गेली तीन वर्षे सातत्याने जातोच आहेत आपण. आता न जाऊन बघूया एकदा.” तर ती चिडली. म्हणे, “देवी कडक असते.” पण मी न जाण्याचा निश्चय केला. आई जात राहिली, मी जाणं थांबवलं.

हा सगळा प्रवास होत असताना मी टीव्हीवरती निखिल वागळे यांचा ‘आजचा सवाल’, ‘ग्रेट भेट’ हे कार्यक्रम बघायचो. माझ्या नास्तिकतेच्या प्रवासामध्ये निखिल वागळेने चालवलेल्या ह्या कार्यक्रमांचा फार मोठा प्रभाव होता. २०१५ सालापासून मी ‘दैनिक लोकसत्ता’ वाचतो. ते वाचत असताना बऱ्याच गोष्टी मला समजत गेल्या. त्यातून माझ्यामध्ये एक विचार रुजला की, आपण विचार केला पाहिजे. अनेक लोक चिकित्सकपणे विचार मांडत असतात. तशी चिकित्सक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग मी हळूहळू या गोष्टींकडे वळायला लागलो. तेव्हा मनामध्ये विचार यायला लागले की, यल्लम्मा कोपते हे आपण ऐकतो. पण महावीर कोपतो, बुद्ध कडक असतो किंवा आदिनाथ कधीतरी कोपतो म्हणजे जैनांचे जे चोवीस तीर्थंकर वगैरे आहेत त्यापैकी कुणी… असं तर आपण कधीच ऐकलं नाही. आपल्याकडे भूत काढण्याचा एक विधी असतो, पण मी जैनांना कधी भूत काढताना बघितलं नाही. बुद्धिस्ट लोकांमध्ये ही कल्पना आहे की नाही मला माहिती नाही पण, मनामध्ये असे अनेक प्रश्न मात्र यायला लागले. 

चिकित्सकपणे विचार करत असताना जाणवलं की माझा पाहिला अपघात झाला त्यावेळेला वाटलं होतं की, आपण देवामुळे वाचलो. नंतर वाटलं, देव असेल तर त्याने माझा अपघातच होऊ द्यायला नको होता.

पुढे वाचन वाढलं. आणि असं लक्षात आलं की लोक जोपर्यंत विचारशील नसतात तोपर्यंत ते या प्रवासाला लागतच नाहीत. आणि आपल्याला लहानपणापासून विचार करायला शिकवलेलंच नाही. ही आपली सगळ्यात मोठी उणीव आहे. आपल्याला सांगितलं जातं की, मोठ्यानं बोलायचं नाही, उलट उत्तरं द्यायची नाहीत. गप्प बसावं. वाक म्हणलं की वाकावं. या संस्कारांमध्ये आपण वाढतो. शाळेमध्ये प्रश्न विचारणारी मुलं आगाऊ ठरवली जातात. खरं तर चिकित्सकवृत्ती असायलाच हवी. पण शाळेतल्या शिक्षकांनाही प्रश्न विचारणारी मुलं आवडत नाहीत. आणि म्हणूनच आपल्याकडे सॉक्रेटिस जन्माला येत नाही.

नास्तिकतेच्या प्रवासामध्ये श्रद्धा हा घटक फार महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्या शेजारी एखादी मुलगी बसलेली असेल आणि मी म्हणालो की ही माझी बायको आहे यावर श्रद्धा ठेवा, तर ठेवणार आहात का तुम्ही श्रद्धा? तुम्ही पुरावा मागणार. Marriage Certificate मागणार. लग्नाला कोण लोक होते ह्याचा पुरावा मागणार. देवाधर्माच्या बाबतीत मात्र कुठलाही पुरावा आणि कुठलंही लॉजिक ह्या गोष्टींचा संबंधच येऊ द्यायचा नाही. वर्षानुवर्षं सत्यनारायणाची पूजा घालणारे लोक मी बघितलेले आहेत. पण त्यांची आर्थिक परिस्थिती होती तिथेच राहते. एखाद्या आजारावरती एखाद्या डॉक्टरचा आपल्याला गुण येत नसेल, आपल्या तब्येतीत फरक पडत नसेल तर आपण डॉक्टर बदलतो ना? तसं गुण लागला नाही तर, पूजा तरी बदलून बघूया की. पण हेही धाडस नाही! 

देवाचं आणि धर्माचं अस्तित्व दोन गोष्टींवरती टिकलेलं आहे. एक म्हणजे भीती आणि दुसरी, आमिष! म्हणजे तुम्ही जर गरीब असाल, मध्यमवर्गीय असाल, तुम्हाला प्रगतीची अपेक्षा असेल तर तुम्हाला आमिष दाखवणारे पूजा, कर्मकाण्ड, विधी सांगितलेले आहेत. आमिष कसं की, सत्यनारायणाची पूजा घातल्यावर कोटकल्याण होतं. दुसरी काय? सतत भीती घातलेली आहे. भीती म्हणजे काय? “तुम्ही अमुक केलं नाही तर तसं होणार, तमुक केलं नाही तर असं होणार”. तर भीती आणि आमिष याच्या दडपणाखाली माणूस सतत राहत असतो.

लोक काय म्हणतील? अशी एक सामाजिक भीडही असते. ही सतत तुम्हाला चेपत असते. ती नाकारण्याचं धाडस येणं आवश्यक असतं. तुम्ही ज्यावेळेला एखादी भूमिका घेता, ती सुस्पष्टपणे घेता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की, तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. तुमच्यामध्ये किंमत चुकवण्याचं धाडस असेल तरच तुम्ही जाहीर भूमिका घेऊ शकता. माझ्याकडे ते धाडस आहे. मी राजकारणामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून काम करतो. गेली दोन वर्षं मी सगळ्यांना स्पष्टपणे सांगत आलो आहे की, धार्मिक कार्यक्रमांचं आमंत्रण मी स्वीकारणार नाही. माझ्या या भूमिकेमुळे मला नगरसेवक व्हायला अडचण आहे, निवडून यायला अडचण आहे याची मला कल्पना आहे. तर किंमत चुकवण्याची मानसिक तयारी मला करावी लागेल. विचाराने जगायचे असेल, तत्त्वनिष्ठ राहायचं असेल तर, तुम्हाला किंमत चुकवावीच लागते. 

राजकीय आणि सामाजिक, या दोन्ही क्षेत्रांचे नियम वेगळे आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला सांगतात की, तडजोडी कराव्याच लागतात. मी अशा लोकांना गणपतराव देशमुखांचे उदाहरण देतो. पाच पैशांचीही वर्गणी न देता ५५ ते ६० वर्षं ते आमदार होते. मी अनेक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचंही उदाहरण देतो. हिंदू धर्मानुसार समुद्र ओलांडणे हे पाप आहे. मी असंही ऐकलं आहे की, लोकमान्य टिळक विलायतेहून भारतात आले तेव्हा त्यांनी शेणाचा गोळा खाऊन प्रायश्चित्त केलं होतं. आता शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आणि टिळकांचा कार्यकाळ यात जवळपास दोनशे, तीनशे वर्षांचं अंतर आहे. पण शिवाजी महाराजांनी तर आरमाराची उभारणी केली होती. म्हणजे काय तर, काळाच्या गरजेनुसार वर्तन करायला हवं हे त्यांनी सकृत दाखवून दिलं. ज्याकाळी समुद्र ओलांडणं पाप होतं, तेव्हादेखील शिवाजींनी आरमार उभं केलं. समुद्रामधल्या त्यांच्या मोठ्या लढायाही आहेत. तर अशा गोष्टींवर विचार करत बसणं, त्याच्याविषयी लोकांशी चर्चा करणं, या टप्प्यापर्यंत मी हळूहळू आलो. 

असासुद्धा एक वर्ग मी बघितलेला आहे – “जाऊ दे रे, मी फक्त येतो” किंवा “माझ्या मनात नसतं, पण बसायचं म्हणून मी पूजेला बसतो”. पण, मी मात्र ह्यातलं काहीही पाळत नाही. 

माझ्या बायकोला मी विद्या बाळ यांचा हळदीकुंकुवाविषयीचा एक व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर ती कधीच कुठल्या हळदीकुंकुवाला गेली नाही. मी तिला सांगितलं, “मी मेल्यानंतर तुझं काही अस्तित्वच नाही असं अजिबात नाही. तुला तुझं आयुष्य आहे आणि माझ्यानंतरदेखील तू ते आनंदाने जगलं पाहिजे, सन्मानपूर्वक जगलं पाहिजे.” म्हणजे ते ‘कुंकुवाचा धनी’, ‘कुंकुवाचा मालक’ या संकल्पना तुम्ही नाकारल्या पाहिजेत. 

माझ्या डोक्यात जे विचार येत असतात, ते मी सातत्याने माझ्यासोबतच्या लोकांसोबत बोलत राहतो. मला बरेचदा सांगितलं जातं की, तुम्ही अमुक एका विशिष्ट समुदायात जन्माला आलेले आहात, तुम्ही त्या संघटनेचे प्रमुख व्हा, त्या संघटनेची जबाबदारी घ्या आणि काम करा. मी जातीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनांसाठी काम करण्यास स्पष्टपणे नकार देत आलेलो आहे. 

तर माझं सांगणं इतकंच आहे की, अधिकाधिक लोक या विचाराकडे यावेत. यासाठी लोकांना आधी विचार करण्यासाठी प्रवृत्त करावं. डॉ. दाभोलकर म्हणायचे, “लोकहो! तुम्ही विचार करायला का घाबरता?” अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे तर फार लांबचे टप्पे आहेत. आधी निदान विचार करायला, चिकित्सा करायला, डोकं वापरायला सुरुवात तर होऊ द्या. इतकं जरी झालं तरी नास्तिकतेच्या दिशेनं आपला प्रवास सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

धन्यवाद!

ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.