परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

समविचारी लोक आजूबाजूला हवेत

मी उज्ज्वला परांजपे. मुद्दाम सांगते. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहे. सदाशिवपेठी, पुणेकर, टीपिकल टीपिकल टीपिकल! त्यामुळे घरामध्ये कर्मठ वातावरण. सर्व सण, उत्सव, समारंभ, व्रत-वैकल्य याच्यामध्ये मी लहानपणापासून आहे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिकले. या शाळा अतिशय कर्मठ असतात. या शाळांच्या ‘अ’ आणि ‘ब’ तुकड्या अशा झापड लावून घडवल्या जातात की, तुम्हाला साधी दुसऱ्या जातीतील मैत्रीणसुद्धा करायची संधी मिळू नये. अशा कडक आणि स्ट्राँग वातावरणात मी वाढले. पण त्याच वयात प्रत्येक गोष्टीला आपण ‘का?’ हा प्रश्न विचारायला हवा हे मला माझ्या शाळेमध्येच शिकवलं गेलं. ‘का?’ हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि तिथेच माझ्या नास्तिकतेची सुरुवात झाली. 

मी हरतालिकेची व्रत-वैकल्ये करत होते. निर्जळी हरतालिका करणं म्हणजे आमच्याकडे फार मोठा इश्यू असायचा. त्या प्रकारचे सगळे उपवास मी केलेले आहे. पण हे करत असतानाच साधारण सहावी-सातवीमध्येच मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे, मूर्खपणाचं आहे. असं जाणवण्याचा पहिला प्रत्यय आला तो परीक्षेच्या वेळी. आमच्याकडे पद्धत होती की परीक्षेला जाताना सगळ्यांना नमस्कार करून जायचं. एक दिवस परीक्षेला बसले आणि मला काही सुचेना, लिहिता येईना. अर्थात, ते नमस्कार करणं वगैरे काही कामी आलं नाही. मी नंतर विचार केला, ‘अभ्यास मी करणार, पेपर मी लिहिणार, मी का नमस्कार करायचा त्यांना? ते काही मला पाठबळ देत नाहीत कुठल्याही प्रकारचं.’ अशा प्रकारे माझी विचार करण्याची सुरुवात झाली.

मग नंतर शास्त्र शिकताना लक्षात आलं की निरीक्षण, अनुमान आणि त्यापुढे निष्कर्ष; या एका त्रिसूत्रीने मी पुढे गेले. आणि जसजशी पुढे गेले तसतसे त्याला दोन जोड आणखी लागले. ते म्हणजे तर्क आणि सदसद्विवेकबुद्धी. तर या पाच सूत्रींवर माझं जगणं मी आखलं.

दुसरी समजूत होती पाळीविषयी. आमच्याकडे मी बंडखोर म्हणून हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागले होते. आमचे संयुक्त कुटूंब होते. एकाच वाड्यामध्ये आमचेच वेगवेगळे परिवार राहत होते. मग माझ्या सगळया वहिन्यांना खात्रीच होती की मी उगाचच्या उगाच काहीही पाळणार नाही. तर तो प्रसंग आला आणि मी अजिबात बाजूला बसले नाही. मी तर कोणाच्यातरी जवळ जायचे आणि स्पर्श करून “शिवले! शिवले!!” असं ओरडायचे. या उठाठेवी मी १३ वर्षांची असतानाच सुरू केल्या. माझ्या एका वहिनीच्या अंगात यायचं आणि मला हेही कळायला लागलं की हे अंगात येणं वगैरेमध्ये काहीही तथ्य नाहीये.

मला वाटतं माणूस आपल्यासारखी माणसं शोधत असतो. आमच्या इथं एक व्याख्यानमाला सुरू झाली. तेथे डॉ. दाभोळकर आले. डॉ. दाभोळकर, विद्याताई बाळ, निर्मलाताई पुरंदरे… यांच्यासोबत तर मी अनेक वर्षं काम केलं आणि मला एक मुक्त वातावरण अनुभवायला मिळालं. मी त्यादरम्यान खूप मज्जा केली, खूप मज्जा घेतली.

शेवटी काही उल्लेख करते, जिथं मला तडजोडीच्या परिस्थितीला सामोर जावं लागलं. भावनांच्या आधारे जेव्हा तुमचं शोषण होतं, तेव्हा तुम्ही हतबल होता. मी जवळजवळ २० ते २२ वर्षं अनाथ मुलांसाठी एक child care center चालवले. त्या सेंटर मधून दत्तकप्रक्रिया होत असे.  तेथील मुलांसाठी मला खूप तडजोडी कराव्या लागल्या, ज्या माझ्या विवेकवादी, रॅशनल किंवा नास्तिक बुद्धीला पटत नसत. एकदा दत्तक घ्यायला आलेला एक परिवार मला म्हणाला, “आम्ही १५ ऑगस्टला मूल दत्तक घेणार.” मी म्हटलं, “छान!” १५ ऑगस्टला मी त्यांच्याकडे गेले. एक गृहस्थ तिथं बसले होते. मी म्हटलं, “घ्या ना बाळ. तयार आहे. तुमच्या मांडीवर देते.” ते आपले घड्याळाकडे पाहात बसले. “पाच मिनिटं थांबा ताई. पाचच मिनिटं थांबा.’ मी म्हटलं, “अहो चाललं काय आहे तुमचं? तुम्हाला बेळगावपर्यंत जायचं आहे, मग आटपा आणि जा लवकर.” तर म्हणाल, “नाही ताई. मुहूर्त व्हायचा आहे.” ते मुहूर्ताने बाळ दत्तक घेणार होते. या प्रकारच्या अनेक घटनांना मला तोंड द्यावं लागलं. आम्ही जेव्हा वास्तू बांधली, तेव्हासुद्धा हीच परिस्थिती होती. अनेकजण म्हणायचे, “आता आपण इथं वास्तुशांती घालायची.” I was against it. पण काही वेळेला तुम्ही नाही करू शकत काही. जेव्हा ९० टक्के लोक तसे असतात तेव्हा, तुम्ही एकटे काही नाही करू शकत. आपण बाहेर उभं राहतो. कन्स्ट्रक्शनचं उभं राहण्याचं पूर्ण काम मी पाहिलं असलं तरी आतमध्ये जेव्हा वास्तुशांती सुरू होती तेव्हा मी बाहेरच उभी राहिले. म्हणजे जेव्हा तुम्हाला असे अनुभव येतात, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला समविचारी लोक असावेत असं सतत वाटत जातं. 

तर माझा नास्तिकतेचा प्रवास हा असा होत गेला.

धन्यवाद.

ह्या परिसंवादाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.