पुरोगामी महाराष्ट्र : हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा

माझा एक किरायेदार मॉं निर्मलादेवीचा भक्त होता. तो चंदीगढ येथून नागपूरमध्ये माझ्याकडे राहण्यास आल्यावर सहजयोग आध्यामिक लोकांच्या संपर्कात आला. त्याने मला सहजयोगाद्वारे मनुष्याची दु:खे कशी दूर होतात, मनाला कसा आनंद मिळतो, यावरील चित्रपट पाहण्यासाठी मोफत तिकीट दिले होते. मी आणि माझी मोठी मुलगी थिएटरमध्ये तो चित्रपट पाहण्यास गेलो. त्या चित्रपटातील कथानक आणि दृष्ये पाहून आम्हा दोघांवर फारसा परिणाम झाला नाही. मी आधीच बौद्ध धर्मातील सहजयान पंथाबद्दल वाचलेले होते. त्यामुळे सहजयोगावरील चित्रपट पाहणे सुरू असताना मेंदूत बौद्धांच्या सहजयान पंथातील गोष्टीशी तुलना सुरू होती. मेंदूमध्ये बौद्धिकता आणि मानसिकता असे दोन घटक आहेत. बुद्धी म्हणजे तार्किक आणि मन म्हणजे अतार्किक या आधारे मानवाचे व्यवहार चालत असतात. मेंदू मानवाला जन्मजात मिळत असला तरी बुद्धीचा विकास नंतर झाला आहे. आदिमानवामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली होती. उत्क्रांतीमध्ये मेंदूचा आकार वाढत जाऊन बुद्धीचा विकास झाला आहे. सर्वांत आधी माणसाने स्वत:ची बुद्धी विकसित केली. जंगलामधील विविधवन्यप्राण्यांकडून येणारे इशारे त्याच्या बुद्धीपर्यंत पोहोचत होते. ते त्याने डोळे व कानांनी ग्रहण केले. त्यावरून तो त्याच्या टोळीतील इतर माणसांनी पाठविलेले इशारे समजून घेऊ लागला. त्यावरून जंगलात इतर प्राणी किंवा नैसर्गिक संकटांची माहिती इशार्‍याने इतर माणसांना देऊ लागला. या इशार्‍यांच्या माहितीचा स्फोट माणसाच्या मेंदूत होऊ लागला. त्यामुळे मेंदूमध्ये नव्या पेशी निर्माण झाल्या. हीच त्याच्या बुद्धीच्या विकासाची पहिली पायरी होती. मेंदूचा आकार मोठा होत गेला. तसा मेंदू अधिक विचार करू लागला. रशियन मानववंशशास्त्रज्ञ मिखाईल इल्यिन म्हणतात की, ‘माणसाला त्याची बुद्धी निसर्गाकडून मिळालेली देणगी नव्हे. स्वत:च्या हातांनी त्याने तिला प्राप्त केले’. हे खरेच आहे. जंगलात सामूहिक व्यवहारातून आरोळ्यांची भाषा विकसित केली गेली. त्यातून मेंदूत माहितीचे ज्ञान वाढत गेले. माहितीचा अनुभव वाढत जाऊन मानव बोलायला लागला. त्यातून मेंदूमध्ये आणखी विचारांचे चक्र वाढत गेले. त्यातून माणूस तर्क करू लागला. ज्ञानातून तर्क विकसित होतो. ज्ञान अतार्किकेवर मात करण्याचा प्रयत्न करते. 

मेंदूतील मानसिक भागाला तर्क करण्याची गरज नाही. श्रद्धा, प्रेम, आनंद, सुख, भीती या मानसिक गोष्टी आहेत. धर्म, त्यातील अध्यात्म हे सर्व मनाचे खेळ आहेत. गूढ गोष्टींना अध्यात्माचे आच्छादन लावले गेले आहे. गूढतेला तर्काने सिद्ध करणे सोपे नाही. होमो सेपियन्सने आपल्या बौद्धिक विकासासोबत स्वत:चे भौतिक जग व कल्पनाविश्व निर्माण केले आहे. देव, धर्म, अध्यात्म या मानसिक म्हणजे कल्पनाविश्वाचा भाग आहेत. आदिमानव हा कल्पनाविश्वात जीवन जगत होता. तर्काने कल्पनाविश्वाचा आकार लहान करण्याचा प्रयत्न केला. परंतु कल्पनाविश्व संपू शकत नाही. कारण मेंदूमध्येच चेतन आणि अचेतन मन बसलेले आहे. जाणीव व नेणीव मेंदूचा भाग आहेत. तेव्हा मनुष्यामध्ये श्रद्धा असली की अंधश्रद्धादेखील सोबत-सोबत वास करते. ती मेंदूतील अतार्किक घटकातून निर्माण होणारी प्रक्रिया आहे. मेंदूमध्ये अतार्किक असलेली नेणीव कार्यरत असल्याने देव व धर्म होमो सेपियन्समध्ये जन्मजात असावे, असा समज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आदिमानवात धर्म नव्हता, तर त्याच्यात अतार्किक म्हणून दुसरे काही तरी असणारच. जेव्हा धर्म ही संकल्पना मानवामध्ये रुजली नव्हती, तेव्हा टोटेम आणि टॅबूच्या माध्यमातून मानव स्वत:ला व्यक्त करीत होता. याचा अर्थ प्रिमिटिव्ह मानवाला धर्म नव्हता. आज धर्म म्हटल्या जाणार्‍या गोष्टीपेक्षा वेगळ्या गोष्टीवर मानव विश्वास करीत असावा.

अमेरिकन सोशियो-बायोलॉजिस्ट एडवर्ड ओ. विल्सन यांनी ६६ कृषिप्रधान समाजांच्या धार्मिक श्रद्धांचा अभ्यास केलेला आहे. या कृषिप्रधान लोकांच्या धार्मिक श्रद्धा पशुपालनातून मिळणार्‍या निर्वाहाच्या टक्केवारीनुसार कमी-जास्त असल्याचे त्यांना आढळून आले. त्या अभ्यासात पशुपालनातून उदरनिर्वाह करणार्‍या समाजाची देवावर विश्वास ठेवणारी टक्केवारी अधिक असल्याचे आढळून आले. १३ समाजातील पशुपालनावर अवलंबित्व असलेल्या ३६ ते ४५ टक्के लोकांपैकी ९२ टक्के लोक देवावर विश्वास ठेवतात. २८ समाजातील पशुपालनावर अवलंबित्व असलेल्या २६ ते ३५ लोकांपैकी ८२ टक्के तर ५ समाजातील पशुपालनावर अवलंबित्व असलेल्या ६ ते १५ लोकांपैकी केवळ २० टक्के लोक देवावर विश्वास ठेवतात. जीवनयापनाची जेवढी अस्थिरता अधिक, त्याप्रमाणात देवावर विश्वास ठेवणार्‍या लोकांची टक्केवारी अधिक असल्याचे डॉ. विल्सन सांगतात. पशुपालनावर अवंबून नसणार्‍या इतर प्रकारच्या समाजांमध्ये १० टक्के किंवा त्याहून कमी लोकांचा देवांवर विश्वास आढळून आला. त्यात देवावर विश्वास नसणारे लोक अधिक होते. तसेच, एकेश्वरवादी धर्मांचा देव नेहमीच पुरुष असतो. हे मजबूत पितृसत्ताक प्रवृत्तीमध्ये वर्तमानातील अनेक सांस्कृतिक स्रोत दडलेले आहेत.

सिग्मंड फ्राईडने धर्माला ‘मानसिक भ्रम’ म्हटलेले आहे. तो म्हणतो, “जर आपण धार्मिक विचारांच्या मानसिक उत्पत्तीकडे आपले लक्ष वळविले तर हे आढळून येऊ शकते. ज्या गोष्टी शिकवणीच्या रुपात दिल्या जातात, त्या अनुभवाच्या किंवा विचारांचे अंतिम परिणाम नाहीत. ते भ्रम आहेत. मानवजातीच्या सर्वांत जुन्या, सर्वांत मजबूत आणि सर्वांत तीव्र इच्छांची पूर्तता आहेत.” हा भ्रम मेंदूतील मानसिक घटकाच्या प्रभावाचा परिणाम असतो. हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे नास्तिकता होय. नास्तिकता ही जरी देवाला व धर्माला नकार देत असली तरी ती नैतिकता, विवेकशीलता, सदाचार यांवर विश्वास व श्रद्धा ठेवणारी आहे. एक प्रकारे ही विवेकवाद्यांची आस्तिकता आहे.

नास्तिकतावादी देव व धर्माबाबत स्पष्ट भूमिका घेतात. मात्र, अंधश्रद्धाविरोधी लोक ‘आम्ही नास्तिक आहोत’, असे स्पष्टपणे सांगत नाहीत. आम्ही देव व धर्माविरोधात नाही, असे भारतातील अंधश्रद्धाविरोधी लोक सांगतात. हा विरोधाभास आहे. अंधश्रद्धाविरोधी आहेत, याचा अर्थ ते नास्तिक आहेत. फ्राईड जेव्हा देव व धर्माला मानसिक भ्रम असल्याचे म्हणतो, तेव्हा अंधश्रद्धाविरोधी संघटनांचे नेते व कार्यकर्ते आपण धर्मविरोधी नसल्याचे सांगून सर्वसामान्य लोकांना देव व धार्मिकतेत गुरफटून ठेवतात. त्यामुळे धर्मातून आलेल्या मिथकांना सामान्य लोक खरा इतिहास किंवा सत्य घटना मानत असतात. त्यातून अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणासारखे सत्ता मिळविण्याचे आयते कोलीत धर्मांध (राजकीय) पंथाच्या हातात सहज उपलब्ध होते.

१९९०पासून भारतात जागतिकीकरणाचे षडयंत्र सर्वसामान्य लोकांविरोधात उभे करण्यात आले आहे. त्याच कालावधीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे भ्रम निर्माण करणारे माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर विस्तारित करण्यात आला. वास्तविक, कॉम्प्युटर व इंटरनेट हे युद्धामध्ये लष्कराच्या उपयोगात आणण्यासाठी संशोधित केलेले तंत्रज्ञान आहे. तांत्रिक ज्ञान नसलेल्या लोकांना आर्टिफियिअल रिअ‍ॅलिटीचे आमिष आपल्या जाळ्यात ओढते. एखाद्या ग्लोबल कॉर्पोरेट कंपनीचा मालक जगातील एका १०x१०च्या वातानुकूल खोलीत बसून जगाला नाचवत असतो. तो झेनोफोबिया, नार्सिसिझम निर्माण करणार्‍या सत्ताधारी कुलीन वर्गाला आपले तंत्रज्ञान विकतो. हा कुलीन वर्ग भ्रम निर्माण करून सामान्य लोकांना गुलाम बनवितो. या भ्रमाच्या वातावरणात या तंत्रज्ञानाचा मालक, सत्ताधारी कुलीन वर्ग आणि समाजातील पांढरपेशे गुन्हेगार यांचे नेक्सस कार्यरत होऊन समाज पारतंत्र्यात जातो. 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरामुळे मानवाची विचार करण्याची व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची बौद्धिक क्षमता लयास जात आहे, र्‍हास पावत आहे. एआय तंत्रज्ञान कोणतेही बौद्धिक श्रम न करता प्रश्नाचे (रेडीमेड) उत्तर आपल्याला सादर करते. त्यामुळे उत्तर शोधण्याचे परिश्रम घेणे आपण बंद करतो. तर्क गमावलेला माणूस उत्पादन करण्याचा कारखाना उघडण्यात आला आहे. त्यातून अविवेकी व आत्मकेंद्री समाज निर्माण करणे सोपे झाले आहे. अशा आत्मकेंद्री समाजात नास्तिकतेचा प्रसार आणि अंधश्रद्धाविरोधी विचारला जागा शिल्लक राहात नाही. अशा समाजात झेनोफोबिया निर्माण करून त्या समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणे खूप सोपे जाते. झेनोफोबिया म्हणजे स्वधर्माचे अस्तित्व धोक्यात असल्याची भीती आणि अल्पसंख्य व हतबल लोक बहुसंख्याक, शक्तिशाली लोकांवर गुलामी लादणार याचे खोटे भय निर्माण केले जाते.

झेनोफोबिया व नार्सिसिझम यांचा एकत्र वापर करून गुंतागुंतीचा भ्रम निर्माण करता येतो. या दोन्ही गोष्टींमुळे धर्मांध, जात्यांध आणि वंशवादी सत्ता निर्माण करणे अधिक सुलभ आहे. हिंदुत्वाच्या सत्तेचा राजमार्ग झेनोफोबिया व नार्सिसिझमने तयार केला आहे. झेनोफोबिया, नार्सिसिझममध्ये बुडालेला समाज व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमुळे निर्बुद्ध झालेला समाज उजव्या विचारसरणीच्या वंशवादी, राष्ट्रवादी, धर्मांधवादी, जात्यांधवादी हुकूमशहांच्या चरणी लोटांगण घालत असतो. जगात विविध देशांमध्ये हुकूमशहांचे स्तोम माजलेले दिसत आहे. येथेच फ्रान्सिस फुकूयामाचे तत्त्वज्ञान चुकलेले आहे. ‘एण्ड ऑफ हिस्ट्री’मध्ये फुफूयामाने जगातील साम्यवादी राजसत्ता कोसळल्यानंतर फुकूयामाने लोकशाही पद्धतीनेच जगावर राज्यकारभार चालणार असल्याचे सांगितले होते. त्याउलट, १९९० पासून भारतासह जगातील विविध देशांमध्ये निवडणुकीतून सहमतीच्या हुकूमशाह्या जनतेला गुलामासारखी वागणूक देताना दिसत आहेत.

एआयच्या अतिवापरामुळे भारतीय संविधानाने दिलेले खाजगी स्वातंत्र्य संपुष्टात येत चालेले आहे. खाजगी स्वातंत्र्य नसलेल्या समाजात झुंडशाही निर्माण होत असते. अफगाणिस्तानमधील तालिबानी, इराक-सीरियातील इसिसच्या राजवटीत झुंडशाही आणि हिंसाचार ही राजमान्य गोष्ट बनली आहे. इटलीतील मेलोनीचे भक्त, रशियातील पुतीनभक्त, अमेरिकेतील ट्रम्पभक्त, तालिबानी टोळ्या, संस्कृती व गोरक्षकांच्या टोळ्या कोणाचेही स्वातंत्र्य मान्य करीत नाहीत. धर्मांध झुंडशाही अणि हिंसाचाराचे स्तोम माजलेल्या समाजात एखाद्या व्यक्तीने नास्तिक असल्याचे स्वातंत्र्य मागणे आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची मागणी करणे शक्य आहे काय? डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉ.कलबुर्गीच नव्हे तर दररोज दलित व आदिवासींचे झुंडीद्वारे केले जाणारे खून याची साक्ष देतात. समाजात धर्मांधता व झुंडशाही वाढत असताना एका व्यक्तीने किंवा विखुरलेल्या नास्तिकांनी भयमुक्त जीवन जगणे शक्य नाही. परजातीय व परधर्मियांचा द्वेष, आणि त्यातून हिंसाचार-मॉब लिंचिंगच्या घटना घडत असतात. शोषण आणि अत्याचार करण्याला सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. हा मानसिक आजार आहे. ५-६ वर्षांच्या लहानग्याने माठातून पाणी घेतले म्हणून उच्चजातीय शिक्षक त्याचा खून करतो. क्षुल्लक कारणासाठी दलित-आदिवासींच्या अंगावर लघवी केली जाते. त्या हिंसाचारामध्ये स्वधर्मीय नास्तिक, अंधश्रद्धाविरोधी आणि कम्युनिस्ट, नेहरूवादी, आंबेडकरवादी या राजकीय कार्यकर्त्यांनाही सोडले जात नाही. अशा समाजाचा सामना करण्याकरिता नास्तिकांचे पाठीराखे लोकसमूह असणे आवश्यक आहे. परंतु असे समूह कायम पाठीशी उभे राहतील की नाही अशी शंका निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षांत पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा बनविणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठमोठे होर्डिंग्स लावून आणि वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन बाबा-महाराजांचे सत्संग, रामकथा वाचन, शिवकथापुराण आदि आयोजित केले जात आहेत. त्या कथावाचन संमोहनातून धर्मांधतेची गुंगी चढत चालली आहे. या कार्यक्रमांना लाख-लाख महिलांची उपस्थिती असते. नागपूरमध्ये असाच एक ढोंगी बाबा आला होता. त्याच्यासारख्या इतर ढोंगीबाबांनादेखील नागपुरातूनच सुपारी देण्यात आली होती. तो ढोंगी, धामेश्वरशास्त्री महाराष्ट्रातील इतर शहरातही लोकांना गुंगी चढवत गेला. तो नागपूरमध्ये आल्यावर एका संमोहन बाबाने त्याने केलेले दावे सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्याने ढोंगीबाबाविरोधात अंधश्रद्धा पसरवत असल्याची पोलिसांत तक्रार दिली. परंतु त्या तक्रारीवर काहीही कारवाई होणार नव्हती. कारण सुपारी देणारे स्वयंसेवक पोलिसांचे मालक बनलेले आहेत. या सुपारीबाज स्वयंसेवकाविरुद्ध कोणीही काहीही बोलत नव्हते. तो ढोंगीबाबा प्रवचनात हिंदुराष्ट्र झालेच पाहिजे, संविधान हिंदूंचे नसल्याने ते बदलले पाहिजे, अशा आरोळ्या ठोकत होता. एकीकडे तो ढोंगीबाब सर्व राजकीय प्रश्न निर्माण करत होता आणि दुसरीकडे अंधश्रद्धाविरोधी असल्याचा दावा करणारे संमोहनबाबा सामाजिक व धार्मिक आव्हाने देत होते. (त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात संघाचे बौद्धिक प्रमुख मा.गो.वैद्य यांनी मला घडविले, असे सांगितले.) राजकीय समस्यांचा सामना राजकीय पद्धतीनेच केला जाऊ शकतो. तेव्हा आता नास्तिकांनी आपल्या कार्यप्रणालीबाबत पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैववाद, देववादाऐवजी विवेकवाद, नैतिकता, सदाचार ही मूल्ये सांगणारा धर्म अस्तित्वात असेल तर नास्तिकांनी त्या धर्मातील लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वच धर्म सारखे असतात, हे एक मोठे फ्रॉड आहे. नास्तिकतावादी लोक आपला वारसा चार्वाक व बृहस्पतीपर्यंत घेऊन जातात. परंतु चार्वाक व बृहस्पती यांना स्वत:चा लोकसमूह निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे त्यांचे अनुयायी अस्तित्वात नाहीत. भारतातील नास्तिकांनी गौतम बुद्धाकडे केवळ एक धार्मिक पुरुष आणि धर्मसंस्थापक म्हणून पाहिले आहे. बुद्धाच्या समाजशास्त्रीय अंगाकडे प्राच्यविद्यापंडित काशीप्रसाद जयस्वाल, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, शरद पाटील यांनी लक्ष वेधले आहे. शरद पाटील हे बुद्धाला महत्तम क्रांतिपुरुष मानतात. बुद्धाचा धम्म (धर्म नव्हे) कर्मकांड, अंधश्रद्धा, देव व आत्म्याचे अस्तित्व नाकारतो. त्याऐवजी नास्तिकांप्रमाणे नैतिक आचारण, सदाचारावर भर देतो. हे सर्व असले तरी त्याच्या अनुयायांना कोणी हिंदू म्हणून ओळखत नाही. त्यांची अस्मिता वेगळी आहे. या लोकांप्रमाणे नास्तिक आणि अंधश्रद्धाविरोधी लोकदेखील जीवन जगण्यासाठी नैतिक आचरण, सदाचार ही आवश्यक मूल्ये समजत असले तरी अस्मिता स्वतंत्र नाही.

ज्यांना हिंदुधर्मीय म्हणून ओळखले जाते, त्या नास्तिकांचा आदर्श चार्वाक आहे. परंतु त्यांना चार्वाकाचे अनुयायी म्हणून कुणी ओळखत नाही. बुद्ध त्याला अपवाद आहे. बुद्धाचे अनुयायी आपल्या अवतीभवती आहेत. ब्राईट्स सोसायटीने सप्टेंबरमध्ये सांगलीत घेतलेल्या नास्तिक परिषदेचे व्हिडीओ यू-ट्युबर अपलोड केले आहेत. हे सर्व व्हिडीओ यू-ट्युबवर बघणाऱ्यांची २१ डिसेंबर २०२३ पर्यंतची संख्या पाहिली. प्रसिद्ध चित्रपट गीतकार जावेद अख्तर यांच्या १ तासाच्या भाषणाचा व्हिडीओ तब्बल २,८७,४३१ लोकांनी पाहिला. त्यांचाच दुसरा व्हिडीओ ७४ हजार व तिसरा व्हिडीओ ५५ हजार लोकांनी पाहिला. त्यानंतर उज्जवला परांजपे यांचा १७ हजार, तुषार गांधी यांचा ८.५ हजार, ज्योती अदाटे यांचा ८.७ हजार, वैशाली जोग यांचा ६.७ हजार, शारदा साठे यांचा ६.८ हजार, आशिष कोरी यांचा ४.७ हजार, विश्वंभर चौधरी यांचा ३.४ हजार, लोकेश शेवडे यांचा २ हजार, राहुल खरे यांचा २.६ हजार लोकांनी पाहिला. मुस्लिम व्यक्ती ही धर्मांध, कट्टरतावादी असते, ही मीडियातून तयार केलेली प्रतिमा आहे. ते प्रपोगंडाने तयार केलेले मीथ आहे. २०१८मधील कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने मीडिया मॅनेजमेंट, प्रतिमानिर्मिती आणि प्रपोगंडा यामागचे वास्तव उघड केली आहे. जावेद अख्तर हे चित्रपट क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि ते मुसलमान असूनही देव व धर्माबाबत काय बोलतात, हे ऐकण्याकडे सर्वाधिक लोकांचा ओढा असल्याचे व्ह्युवर संख्येने सिद्ध होते. इतरांच्या व्हिडीओला कमी प्रतिसाद आहे. त्या तुलनेत ब्राह्मण असलेल्या महिला देवाबद्दल काय सांगतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता भारतीय लोकांमध्ये अधिक दिसते. भारतीय लोक सार्वजनिक प्रतिमा आणि अस्मितांना अधिक महत्त्व देणारे आहेत. हिंदू धर्माबद्दल युरोपीअन ख्रिश्चन गुणगान गात असेल तर सामान्य हिंदू व्यक्तीला ते अधिक सत्य आणि अभिमानास्पद वाटत असते. कारण हिंदू धर्म शोषण व विषमतेचे आगर आहे, हे ऐकणे त्याला अपमानास्पद वाटत असते. त्याकरिता मी येथे जाती-धर्माची ओळख मुद्दाम उपयोगात आणली आहे. त्याशिवाय प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा परिणाम स्पष्ट करता येत नाही.

तुमची प्रतिमा आणि अस्मिता (ओळख) ही भारतीय समाजात खूप महत्त्व राखते. नास्तिकांना लोक हिंदू धर्माचे पाठीराखे समजतात. त्यांची अस्मिता ‘हिंदू’ या लेबलखाली ओळखली जाते. हिंदू म्हणजे वैदिक धर्म, चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था, देव-धर्म, कर्मकांड मानणारे समजले जातात. त्यातील जातिव्यवस्थेशिवाय हिंदू व्यक्ती राहूच शकत नाही. नास्तिक जर हिंदू नसतील तर त्यांची वेगळी अस्मिता असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून सर्वसामान्य लोकांना बुद्ध अनुयायांप्रमाणे प्रेरणा मिळेल. बौद्ध धर्म हा ईश्वरकेंद्री नाही. बुद्धाचे तत्त्वज्ञान मानवी कल्याण, मनुष्यांचे दु:ख दूर करण्याचे प्रतिपादन करतो. परंतु जे स्वत:ला नास्तिक समजतात, ते बुद्धाबाबत विचार करताना दिसत नाहीत. बुद्धाएवढा विवेकवाद कुणात दिसत नाही. कुणी महापुरुष सांगतो, धर्मग्रंथ सांगतो, खूप लोक विश्वास ठेवतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, असे बुद्ध म्हणतो. बुद्ध सर्वांचे ऐकल्यानंतरही त्याची स्वत: पडताळणी करण्याचा सल्ला देतो. विज्ञानातही हेच केले जाते. वारंवार प्रयोग करून एखादे संशोधन सिद्ध केले जाते. नास्तिक बुद्धापेक्षा काय वेगळे सांगतात? समाजामध्ये नास्तिक असलेल्यांची संख्या वाढावी असे नास्तिकांना वाटत असेल तर त्यांना बौद्धधर्मीय जनतेला कर्मकांडापासून मुक्त करत बुद्धासारखे सदाचारी, विवेकवादी, विज्ञानवादी बनविणे सोपे आहे.

नास्तिकांसह सर्वच विज्ञानवादी, विवेकवादी, सदाचारी लोकांपुढे सहमतीच्या हुकूमशाहीने नवे आव्हान उभे केले आहे. जगाची कूस बदलते आहे, त्याप्रमाणे भारताचाही चेहरा बदलतो आहे. एआय तंत्रज्ञानाचा रेटाच खूप शक्तिशाली आहे. तो कुलीनवर्गाचा श्वास आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मायाजलातून कुलीनांना सामान्य लोकांवर राज्य करायचे आहे. एकेकाळी महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटले जात होते. परंतु आता ती परिस्थिती कायम असल्याचे सांगणे धारिष्ट्याचे होईल. हिंदुराष्ट्राची औपचारिक घोषणा होणे तेवढे बाकी आहे. ती कधीही होऊ शकते. या परिस्थितीत नास्तिकांचा आवाज किती ऐकला जाईल? त्यांना स्वत:चा आवाज मोठा करावा लागेल. जेवढ्या मोठ्या आवाजात सांगितले जाते, चलचित्र जेवढ्या मोठ्या पडद्यावर दाखवले जाते, तेवढा त्याचा परिणाम जास्त होतो. हिंदू जनजागृती समितीचे साधक, बोलबजरंगी, संभाजी भिडेंचे धारकरी, बुल्डोजर न्यायाचे चालक-मालक अत्यंत आक्रमकपणे आणि मोठ्या आवाजात दरडावत आहेत. झुंडशाही अधिक हिंसक होण्यापूर्वीच सावध झालेले बरे.

(लेखक नागपूरस्थित वरिष्ठ पत्रकार असून त्यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही’ (खंड-२) हे पुस्तक लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबईने नुकतेच प्रकाशित केले आहे.)
मोबाईल : ९४०५३२५०४८

अभिप्राय 1

  • मिलिंदबेटा, तूं या लेखात केलेली कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अनेक गहन प्रश्नांची उत्तरं अनायसे मिळत असल्याने लोकांची विचार करण्याची वृत्ती लोप पावत असल्याने त्यांच्यावर धार्मिक पगडा बसवणे सहजशक्य झाले आहे ही मिमांसा मनाला पटत नाही. कृत्रिम बुध्दीमत्तेचा उदय अलीकडेच झाला आहे. पण आध्यात्म, धार्मिक भावना पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. गौतम बुध्दाने अंधश्रध्देला विरोध करुन बुध्दीप्रामाण्यवाद रुजवण्याचा प्रयत्न केला असला; तरी त्याच्या अनुयायांच्या तो पचनी पडल्याचे दिसत नाही. बौध्दधर्माचा विस्तार जगातिल अनेक देशात झाला असला, तरी त्या त्या देशात बुध्दाची मंदिरं अस्तित्वात आहेत. म्हणजे सनातन हिदूधर्माातिल मूर्तीपूजा अस्तित्वात आहच. इस्लाम धर्मियांत सुध्दा पिराची पूजा केली जाते, म्हणजे एकप्रकारे ती मूर्तीपूजाच म्हणावी लागेल. तुला तुमच्या परिषदेतिल जावेद अख्तर यांची उपस्थिती लक्षणीय वाटते. पण दुसय्रा एका लेखावरील माझ्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे त्यांनी सुध्दा क्रांती कानडेंच्या प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं देण्याचे टाळले आहे. हा अंक प्रकाशित होउन तीन महिने झाले असूनही त्यांतिल लेखांची दखल घेतलेली दिसत नाही. तेव्हा नास्तिक लोकांनी उगाचच धर्मांमध्ये ढवळाढवळ करणे टाळणेच योग्य.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.