कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

आपल्या ब्राईट्स संस्थेच्या उद्दिष्टांचा जो छापील, कायदेशीर असा एक कागद माझ्याकडे आहे, त्याच्यात साधारण दहा बारा उद्दिष्टं लिहिलेली आहेत. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की, आपण ज्या समाजात राहतो तिथे काहीतरी लोकशिक्षण आपण केलं पाहिजे. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यावेळेला विचारांची जी एक घुसळण झाली त्या घुसळणीतून ब्राईट्स संस्थेची स्थापना झाली. आज त्याला दहा वर्षं झाली. त्यावेळी एक उद्दिष्ट असंही होतं की, कुठल्याही नास्तिक माणसाला मी “नास्तिक” आहे याची लाज न बाळगता सांगता आलं पाहिजे. 

खूप वर्षांपूर्वी मी एक सर्व्हे घेतला होता. समाजातल्या विविध स्तरातील जवळपास सव्वाशे लोकांचा तो सर्व्हे होता. त्या सर्व्हेत असे प्रश्न विचारले होते की ज्यातून लोकांचा कल लक्षात यावा. सर्व्हे निनावी असल्यामुळे आम्ही कुणाची नावं बाहेर येऊ दिली नाहीत. माझ्या आठवणीत असं आहे की साधारण पंधरा टक्के लोक नास्तिक्याशी सहमत आहेत. म्हणजे पंधरा टक्के लोक नास्तिकतेच्या मार्गावरचे आहेत. पण हे जाहीरपणे सांगणारे की ते नास्तिक आहेत किंवा ते आस्तिक विचारांशी सहमत नाहीत, असे सांगणारे कदाचित एखाद-दुसरा टक्काच सापडतील. आणि उरलेले दहा बारा टक्के हे लपून राहिलेले नास्तिक असावेत अशी एक माझी त्यांनतर समजूत झाली. 

आजही रेल्वेमधून प्रवास करताना सहप्रवाश्यांशी गप्पा करण्याची संधी मिळाली तर माझ्या लक्षात येते की ही दहा पंधरा टक्के संख्या साधारण ठीक असावी. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा येईल आणि आपण त्याचा सर्व्हेपण करू शकतो. 

तर एकंदरीत आपले हे लोकशिक्षणाचं अधिकृत उद्दिष्ट जरी असले तरीदेखील, आज सकाळी तुषार गांधी आणि लोकेश शेवडे यांचेसोबत चहा आणि त्यांची कडक कॉफी पिताना गप्पा मारत होतो तेव्हा लोकेश शेवडेंनी मुद्दा काढला की, एकंदरीत सर्वसामान्य माणसाचं जीवनात काय उद्दिष्ट असतं? ते काय म्हणून जगतात? काय झाल्यावर, केल्यावर त्यांना समाधान लाभतं? की चला, आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. तर त्यांचा एक मुद्दा होता की, सगळ्यांना खूप श्रीमंत व्हायचं असतं. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचं उद्दिष्ट सांगतो. आपण खूप श्रीमंत व्हावं आणि आपली श्रीमंती लोकांना दाखवता येईल अशी संधी आपल्याला कुठेतरी मिळावी. हे उद्दिष्ट घेऊन खूपसे लोक आयुष्य मार्गक्रमण करीत असतात. यावरून मला प्रश्न पडला की आपल्या ब्राईट्स संस्थेचं काय उद्दिष्ट असणार? आपण कागदावरची उद्दिष्टं तर पाहिली. आता याच्यापुढे ब्राईट्सच आणखी काय उद्दिष्टं असायला पाहिजे, ते बघू. 

त्याच्यापूर्वी एक आठवण सांगतो. आम्ही जावेद सरांच्या घरी गेलो होतो. त्यांनी एक फार गंभीर मुद्दा मांडला. तसे तर त्यांनी बरेच गंभीर मुद्दे मांडले आणि खूप विनोदही झाले. पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की, आपल्याकडे एक मोठा वाद सुरू आहे, अगदी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येदेखील सुरू आहे की, आपण नास्तिक असलो तरी आपण आपलं कल्चर टाकू शकतो का? कधी कधी समाजाने आपल्यावर लादलेलं असतं ते, पण असतं. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला तो असा होता की आपण आपलं नाव टाकू शकत नाही. कदाचित लहानपणापासून दिलेल्या नावाने आपण सुरुवात केली, तरीदेखील आपल्याला नाव सोडवत नाही. लहान बाळाला नाव निवडण्याचं स्वातंत्र्य नाहीये. जे नाव दिलेलं असतं तेच घ्यावं लागतं. त्या नावाने आपल्या अंगावर एक कल्चर थोपवलेलं असतं. आणि या पद्धतीनं जे कल्चर आपल्याकडे आलेलं आहे त्या कल्चरमधून आपली मुक्तता नाही. मी जेव्हा व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे बघतो तेव्हा ते म्हणतात की, “तुम्ही तुमचं सगळं कल्चर, तुमच्या आईवडिलांपासून ते तुमच्या स्वतःच्या नावापर्यंत सर्व त्याग करा.” पण त्याग करून जाऊ कुठे? हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. मी माझ्या नावाचा त्याग करेनही. पण मग मी असं कुठलं नाव घेऊ की ज्याने माझं कल्चर शून्य होईल? सध्यातरी आपल्याला हा मार्ग सापडलेला नाही. कदाचित काही वर्षांनी आपल्याला हा मार्ग सापडेल की आपल्याला कुठलंतरी कल्चर आहे किंवा कुठलंही कल्चर नाही.

त्याचदिवशी आम्ही नंदू माधव ह्या सिनेकलाकराकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनीही एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सेपियन्स पुस्तक वाचलं. त्यांचाही प्रश्न तोच होता की मानव जमातीचं उद्दिष्ट काय आहे? जसं लोकेशने सांगितलं की, ‘आताच्या मानव जमातीचं उद्दिष्ट आहे की, आपण एवढी श्रीमंती कमवावी की ती लोकांना अचंबित करेल.’ हे जे उद्दिष्ट आहे तसंच मानव जमातीचं काय उद्दिष्ट आहे? नंदू माधवना हा मोठा प्रश्न पडला होता की, या पुस्तकातून जे कथित होतंय त्याला काउंटर कसं करायचं? आणि म्हणून हा उद्दिष्टांचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. तेव्हा सध्या फक्त एवढंच एक सांगतो की, आपली संस्था पूर्णतः लोकशाहीवादी आहे. त्यामुळे जे काही आपले मतदार ठरवतील ते आपलं काही तात्पुरतं उद्दिष्ट असेल. हे ठीक. पण काही लाँग टर्म उद्दिष्ट आहे का नाही? त्यासाठी मी शेवटी त्यावर बोलणार आहे.

दोन-तीन मिनिटं थोडं विषयांतर होईल, पण थोडं आपल्या चित्रकला स्पर्धेबद्दल सांगतो. मी स्वतः चित्रकार आहे, मी चित्र काढतो. तर आमचं असं ठरलं की आपण चित्रकला स्पर्धा घेऊया. स्पर्धेचा विषयदेखील ठरला – नास्तिकता! आम्हाला असं वाटलं की किती चित्रकार असतील जे या स्पर्धेत भाग घेतील? आम्ही स्पर्धकांना हेही सांगितलं होतं की, तुमच्या चित्राबद्दल थोडं काही लिहूनदेखील पाठवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास अडीचशे लोकांनी त्यासाठी नोंदणी केली. मी धरून चालतो की, त्यातल्या काही लोकांनी ‘काहीतरी स्पर्धा आहे, आपल्याला काहीतरी बक्षीस मिळेल’ या कारणाने या स्पर्धेत भाग घेतलाही असेल. पण १२० लोकांनी चित्रं पाठवली आणि त्यातल्या बहुसंख्याकांनी त्यांच्या चित्राबद्दल त्यांच्या नास्तिकतेच्या कल्पनादेखील पाठवल्या. आता आपला हा जो गट आहे त्यातले या संस्थेचे सदस्य असलेले माझ्या समजुतीने तीन लोक आहेत. उरलेले जे ११७ लोक आहेत ते काही आपल्या संस्थेचे सदस्य नाहीत. ते आपल्यासोबत कधी जोडले गेलेलेही नाही. त्यामुळे माझा जो १५ टक्क्यांपर्यंतचा आत्मविश्वास आहे तो यामुळे द्विगुणित झाला. आम्हाला यातून जवळजवळ २०० चित्रं मिळालेली आहेत. आपल्या मतदारांना ते बघण्यासाठी ॲक्सेस दिला गेलेला आहे. त्यांना आपल्या वेबसाईटवर ती चित्रं बघायला मिळतील आणि मी आग्रह करतो की, त्यांनी ती चित्रं बघावी. 

खूपदा चित्रकाराची किंवा कुठल्याही कलाकाराची व्यथा एकच असते. सर्वसाधारण लोक म्हणतात, “तुम्हा कलाकारांचं आम्हाला काय ते समजत नाही.” आता तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकायला गेलात तर, ते आपल्याला समजतं का? का नाही समजत? कारण त्यात शब्द फार कमी असतात. पण आपल्याला त्याचा एक अनुभव येतो. खूपश्या लोकांना तो अनुभव येतो. चित्रकार किंवा कलाकाराचं एकच म्हणणं असतं की, त्याचं जे चित्र तुम्ही पाहिलं त्याबद्दल किंवा त्याचं जे गाणं तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुम्हाला जे काही बरंवाईट वाटलं, ते सांगा. तुम्ही वाईट जरी कॉमेंट दिली तरी ती एक महत्त्वाची कॉमेंट असते. कारण तिच्यापासून नवीन काही शिकायला मिळणार असतं. वाईट कॉमेंट दिल्याचा अर्थ असा होतो की कोणीतरी आपल्या चित्रावर किंवा गाण्यावर एवढा विचार केला आहे.” मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही चित्र विकत घ्या. फार महाग नसतात. तुम्हाला चित्रं विकत जरी नाही घेता आली तरी, निदान प्रदर्शनाला प्रतिसाद द्या. ऑक्टोबरमध्ये हे चित्रकला प्रदर्शन आहे, त्याला तुम्ही प्रतिसाद द्यावा. 

आता मी आपल्या उद्दिष्टांकडे परत येतो. तर आपल्याकडे जगातली पहिली, म्हणजे प्रत्यक्ष होऊन गेलेली नास्तिक व्यक्ती म्हणजे अजित केसकंबळी. तर अजित केसकंबळीची गोष्ट अशी आहे की, ते नेहमी केसांचं कांबळं पांघरून असायचे. म्हणून त्यांचं नाव केसकंबळी होतं. वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की हा अजित केसकंबळी जो होता तो संगीतकार होता. जेव्हा त्याचं बुद्धाच्या कथेतील चरित्र वाचलं तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं होतं की हा माणूस एक तपस्वी होता. म्हणजे ऋषी, मुनी, सर्व संघ परित्याग केलेला. पण कदाचित तसं नसावं. त्याला भरपूर अनुयायी होते, त्याला चारशे अनुयायी होते त्याकाळी. आणि माझ्या मते चार्वाकांचं जे जुनं तत्त्वज्ञान आहे,

यावज्जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत…

हा त्याच्यातला भेद मानला जातो. पण म्हणजे आपल्याला जेवढं जगायचं आहे, तेवढं सुखाने जगावं. आपलं जे उद्दिष्ट आहे माझ्या मते ते म्हणजे आपलं जगणं आपण समृद्धतेने, सुखाने, जे काही आपल्याला नवीन ज्ञान मिळतं ते ग्रहण करून, जे आपल्याला कळतं त्याची दुसऱ्यांना अनुभूती देऊन मार्गक्रमण करणं. माझ्या दृष्टीने असंच काहीतरी ब्राईट्स सोसायटीचं एक उद्दिष्ट असावं. इथे जी घुसळण होते, त्या घुसळणीसाठी लोक इतक्या दुरून दुरून एकत्र येतात. आपल्यासारखे बोलणारे दुसरे आपल्याला पटकन सापडत नाहीत. आहेत ते, आपल्या समाजात, आपल्या आसपास आहेत. पण ते आपापल्या घरात लपून बसलेले आहेत, दडून बसलेले आहेत, त्यांचीही कुचंबणा होत असेल त्यांना बाहेर आणणं.

आता एक छोट्या प्रोजेक्टबद्दल सांगतो आणि थांबतो.  मी एक प्रोजेक्ट करतोय, त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं, ज्यांना जमेल त्यांनी सहभागी व्हावं. तो प्रोजेक्ट असा आहे की, भारतात जे नास्तिक होऊन गेले त्यांची एक यादी केलेली आहे. २०-२५ लोकांची ती यादी आहे. तुम्ही त्यात भर टाकू शकता. त्या होऊन गेलेल्या नास्तिक लोकांच्या आयुष्याबद्दल प्रत्येकाने पाचशे, सहाशे शब्दांत लिहावे आणि सोबतच तुम्ही त्यांना नास्तिक का मानता हेही लिहावे. ही अशी माणसं होती की त्यांची नास्तिक म्हणून फारशी ओळख नव्हती. आजही मला बोलता बोलता काही नास्तिक मंडळींची नावं माहीत झाली. त्यात व.पु. काळे हे नावदेखील आहे. व.पु. काळे नास्तिक होते की नाही हे मला माहीत नाही. पण ज्याअर्थी कोणीतरी लिहिलं आहे तर मी धरून चालतो की ते नास्तिक होते. मला यात जे आढळले ते म्हणजे केशवसुत! जर केशवसुतांना तुम्ही पाहिलं तर, त्यांच्या लिहिण्यात बऱ्याच वेळा प्रकृती-पुरुष असा उल्लेख येतो. पण त्यांची एक कविता खूप सुंदर आहे आणि “यावज्जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः” याच्या बरोबरीची ती कविता मला वाटते. त्यांची एक कविता अशी आहे, 

काठोकाठ भरू द्या प्याला,
फेस भराभर उसळू द्या. 

आपलं आयुष्य जे आहे ते आपण पूर्णपणे जगूया. त्यातल्या मधल्या खूप ओळी आहेत, त्या काही मला पाठ नाहीत. पण त्यातलं एक वाक्य आहे 

देव दानवा नरे निर्मिले
हे पण त्यांना कळू द्या,
काठोकाठ भरू द्या प्याला,
फेस भराभर उसळू द्या 

नमस्कार.

ह्या भाषणाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.