नास्तिकता कशासाठी?

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.

आधुनिक कालखंडात भारतातच नव्हे तर जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे माणूस प्रगती करीत आहे. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यासाठी ह्याच विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा आधार तो घेतो आहे. धर्म आणि धार्मिक ग्रंथांमध्ये त्याला आपल्या विश्वनिर्मितीची उत्तरे सापडली नाहीत म्हणून तो त्यांची नव्याने चिकित्सा करू पाहतो आहे. आपल्या तर्काला जे पटेल ते स्वीकारण्याकडे त्याचा कल वाढतो आहे. त्यातूनच तो नास्तिकतेकडे वळत आहे. देवधर्माची चिकित्सा करून तो देवधर्माच्या आधारे निर्माण झालेल्या दांभिक कर्मकांडांना नाकारत आहे. जात, धर्म, पंथ ह्यांच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार करण्याचा प्रयत्न आजचा माणूस करीत आहे. आजची तरुण पिढी ह्यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसते आहे. धर्माने निर्माण केलेल्या चौकटी तोडून नास्तिक म्हणून जगण्यास कोणताही धोका नाही हे तिच्या लक्षात आले आहे. अर्थात, आजही नास्तिकांची संख्या कमी आहे; पण ती दिवसेंदिवस वाढत जाईल ह्यात शंका नाही. नास्तिक-परिषदेच्या माध्यमातून माणसामाणसातील नास्तिकता वाढविण्यावर, नास्तिक ह्या संकल्पनेविषयी असणारे गैरसमज दूर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. तो निश्चितच दखल घेण्याजोगा आहे.

भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला, तरी ह्या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. चार्वाक ऋषींची परंपरा ही एक वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद असं आपल्याला म्हणता येईल. चार्वाकांचा विवेकवाद हा ‘प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान’ ह्या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान ह्याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान ह्यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे अशा पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती.

आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रद्धा, विश्वास, देव-धर्म, रूढी परंपरा, सण-उत्सव ह्या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देवधर्म पाळण्यातले, पूजाअर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून, तसेच ‘हे केल्याने काही नुकसान तर होत नाही ना!’ असे म्हणून आपल्यापैकी अनेक जण बोटचेपी भूमिका घेत ह्या गोष्टी करीत असतात. कारण त्यांना समाजापासून बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची भीती वाटत असते. धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित जास्तच भरेल. पण ते मूक असल्याने, बहुसंख्याक असूनही अल्पसंख्याक भासतात. ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असल्यामुळे भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.

आधुनिक भौतिक प्रगतीला अध्यात्महीन ठरवून ह्या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेत घेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, जपातपांतून, आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार होत नाही की आजारही बरे होत नाहीत. म्हणूनच, कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसले यश येते. तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपण आपला पसारा वाढवत नेला आहे. कारण तर्कशुद्ध विचार करण्याचे वळण लावणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीतून जे बहुतांशी बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होत नाही.

नास्तिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार जगण्याचा एक आयाम आहे याबद्दल दुमत नसले तरी ते आस्तिकांच्या पचनी पडणे कठीण असते. म्हणूनच आस्तिकांना नास्तिकांबद्दल घृणा, राग, द्वेष वगैरे वगैरे असतो. पण याची कारणे वैयक्तिक आहेत का? तर नाही. आस्तिकांना नास्तिकांबद्दल वाटणाऱ्या रागाचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे नास्तिकांकडून होणारी ‘धर्माची चिकित्सा’ आणि त्यांनी धर्माच्या उन्मादाविरोधात घेतलेली भूमिका. म्हणून ‘देवा-धर्माची चिकित्सा करू नये, त्याबद्दल प्रश्न निर्माण करू नये’, अशी शिकवण असणाऱ्या आस्तिकांना नास्तिकांचा राग येणे स्वाभाविक आहे.

मेंदूला एका चौकटीत बंदिस्त करून, कायमचे कुलूप लावून, आंधळेपणाने एखादी गोष्ट धार्मिक प्रवाहपतितांसारखी करत रहाणे नास्तिकांना जमत नाही. कारण बहुतांश नास्तिक हे विज्ञाननिष्ठ असतात. त्यांना सतत प्रश्न पडत असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे आवश्यक वाटते. मग तो धर्म असो, अध्यात्म असो की विज्ञान. (मी ‘बहुतांश नास्तिक’ असा शब्दप्रयोग मुद्दामून केलेला आहे. कारण सगळेच नास्तिक विवेकवादी असतातच असे नाही. नास्तिकता ही विवेकवादाकडे जाण्याची एक पायरी आहे.)

नास्तिकांना आस्तिकांच्या विरोधात उभे राहण्याची गरजच पडली नसती, जर आस्तिकांनी त्यांचे देवधर्म त्यांच्या घरात, उंबराठ्याच्या आत ठेवले असते. त्याचा रस्त्यावर उतरून तमाशा केला नसता. कुणी घरात काय करावे, काय खावे, काय ल्यावे, भगवी चड्डी घालावी की हिरवी की नागडे फिरावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आस्तिकांचे देव रस्त्यावर उतरून धिंगाणा घालणार असतील, तर त्याचा त्रास होणे स्वाभाविक नाही का?

कुणी म्हणते, “जर नास्तिक देव मानतच नाही, तर देवाविरोधात लिहिण्याचा त्यांनी अट्टाहास तरी का करावा?” हा प्रश्न अविचारी नाही का? म्हणजे असे की, ‘जर तुम्ही बलात्कारच करत नसाल, तर मग तुम्हाला बलात्काऱ्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही’ असे म्हणण्यासारखे हास्यास्पद झाले हे! देवा-धर्माविरोधात लिहिले की, आस्तिकांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या भावना नाही, अहंकार दुखावतो. नास्तिकांना संविधानानुसार लोकशाहीतील अभिव्यक्त होण्याचे साधे हक्कही मिळू नयेत?

इथे मुद्दा नीट समजून घ्यायला हवा की, कुणाच्या वैयक्तिक/खाजगी निर्णयात कुणाचाही हस्तक्षेप चुकीचाच असतो. मग त्या वैयक्तिक गोष्टी तुमच्या घरापुरत्या/चार भिंतीपुरत्या मर्यादित का राहत नाहीत? सार्वजनिक जागांवर सगळ्यांचा अधिकार असतो आणि या सगळ्यांत नास्तिकदेखील येतात. असे आहे तर रस्त्यावर मंडप बांधून, पाच/दहा दिवस मोठ्ठाले स्पीकर्स लावून देव देव करण्याचा, विसर्जनाच्या दिवशी रहदारी खोळंबवून, निसर्गाची वाट लावण्याचा अधिकार आस्तिकांना कुणी दिला?

आस्तिक म्हणतात, ‘सार्वजनिक उत्सव’ हे लोकांनी एकत्र येण्यासाठी केलेले आहेत. मग एखादे सभागृह आरक्षित करा, दरवाजे लावून हवे तेवढे एकत्र या! रस्तोरस्ती चालणारा उन्माद कशासाठी? आणि देवाच्याच नावाखाली बरे तुम्हाला एकत्र येण्याची गरज पडते? त्याऐवजी महिन्यातून एक ‘साफसफाई’ नावाचा उत्सव करा ना सुरू! या ना एकत्र!! तसे का जमत नाही? की ‘जेथे असे स्वच्छता घरोघरी, तेथे देव वास करी’ असा फक्त सुविचार भिंतीवर टांगणे यालाच धार्मिकता असणे समजायचे? एकत्र येऊन जर घाणच करणार असाल, तर त्या एकत्र येण्याला तरी काय अर्थ आहे?

आजचे पंचतारांकित आश्रम असणारे बुवा, बलात्कारी बाबा, त्यांचे लाखोंच्या संख्येतील शिष्यगण आणि भक्त, जटा, दाढ्या, जनावरांचे मूत्र पिणारा भारत हे वास्तव पाहिले की, हजारो वर्षांपूर्वी या देशात चार्वाक जन्मावा हे एक आश्चर्यच वाटते. धर्माचा पाया असलेले पोथीनिष्ठ तत्त्वज्ञान, यज्ञासारख्या अनिष्ट परंपरा, रूढी यांच्यावर हा पंथ किंवा विचार प्रहार करणारा होता. त्याचा प्रसार झाला तर धर्माच्या नावावर चालणारे शोषण थांबविण्याची ताकद त्यात आहे, हे धर्मांधांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी चार्वाकांना जिवंत जाळले. त्यांच्या सगळ्या साहित्याचा क्रूरतेने नाश केला. बाकी चार्वाकपंथीय जीवाच्या भीतीने अज्ञातवासात गेले. पण हा विचार विज्ञाधिष्ठित असल्याने कधीच नष्ट झाला नाही. 

चार्वाकांच्या हत्या करूनही जर तो विचार मारता येत नसेल तर तो आमचाच, असे म्हणत चार्वाकांच्या विचारांना षट् दर्शनापैकी एका दर्शनात स्थान दिले गेले. जसे की हिंदुधर्माचा प्रसार करताना शंकराचार्यांच्या निर्देशानुसार बौद्ध भिक्खूंच्या हत्या केल्या गेल्या; पण बुद्ध विचार मारता आला नाही आणि बुद्ध विचार जगभर खूप वाढला. तेव्हा हिंदूंनी बुद्ध हा आमचाच म्हणून त्याला नववा अवतार बहाल केला. ही जशी मखलाशी होती तशीच चार्वाक दर्शनाला आपलेसे करण्याची आस्तिकांची मखलाशी झाली. कारण विषय अंगाशी आला की, सावाचा आव आणून तत्त्वज्ञ बनण्याचा आस्तिकांचा कातडीबचावू अंगभूत गुणधर्म राहिला आहे.

दुसऱ्या बाजूला सध्या तुकारामांना वैकुंठला पाठवून गौरवीकारण करण्याचा हिडीस खेळ खेळला जात आहे. कारण सदेह वैकुंठाला पाठवले, म्हणजे मृतदेह शोधण्याचा कुणी प्रयत्न करत नाही वा प्रश्न विचारत नाही. त्यामुळे सामान्य माणूस तुकारामांची हत्या विसरून गेला आहे. अशाप्रकारे त्यांच्यामागे चमत्काराचे लचांड लावून संत तुकाराम वैकुंठाला गेले या खोट्या भ्रमात तो आनंद मानू लागला, मानीत आहे.‌ म्हणूनच सामान्य धार्मिक माणसाला आजतागायत प्रश्न पडला नाही की फक्त तुकाराम महाराजांनाच सदेह वैकुंठाला न्यायला विमान कसे आले? बाकीचे इतर संत एवढे मोठे होऊन गेले, त्यातील एकालाही विमान घ्यायला का येऊ नये? म्हणजे संत तुकाराम महाराजांपेक्षासुद्धा ते कमी प्रतीचे होते की काय? अशा मखलाश्या करून सामान्य जनांचा बुद्धिभेद करणे हा सर्व काळातील धर्ममार्तंडांचा हातखंडा खेळ होता आणि राहिला आहे. 

म्हणूनच अजूनही अनेक अनिष्ट रूढी-परंपरांवर आघात करणारे आधुनिक चार्वाक निर्माण होत आहेत आणि त्यांचे आजही खून पडतच आहेत. या संघर्षाला अशी हजारो वर्षांची परंपरा आहे आणि तो चालूच राहणार. युरोपात प्राचीन काळी अशा अनेक विचारवंतांचे बळी गेले होते, पण त्यानंतर युरोपात विज्ञानवादी विचाराचे प्राबल्य वाढले आणि तो विचार रुजला. आपल्याकडे मात्र प्राचीन काळातील आर्यभट्ट, कणाद, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त इत्यादी विचारवंतांच्या वैज्ञानिक विचारांना तिलांजली देऊन धार्मिक अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड, व्रतवैकल्ये, मोक्ष अशा पारलौकिक गोष्टींना महत्त्व प्राप्त करून देण्यात धर्ममार्तंड यशस्वी झाले आणि कर्मविपाकाच्या सिद्धांताचा अंगीकार करून ‘ब्रह्मम् सत्य जगन्मिथ्या’ या विचाराला रुजवत इहलोकासंबंधीचा विचार दुय्यम ठरवले गेला. परिणामी आपण हे पूर्वजन्मीचे पाप असे म्हणत या जन्मीचे दुःख सोसत राहिलो आणि दैववादी झालो. म्हणूनच आपण मागास राहिलो. सामान्य जनांचे तसे राहणे सदा सर्वकाळ राज्यकर्त्यांच्या फायद्याचे असल्यामुळे त्यांनीही धर्मसत्तेला मदतच केली. आजही राज्यकर्त्यांनी सामान्य जनांत धार्मिक पुनरुज्जीवनवाद मोठ्या प्रमाणात वाढवत नेण्याचे षडयंत्र अवलंबलेले आहे. म्हणून भारतात मात्र संविधानातील ५१(ज) या अनुच्छेदात सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होण्यास अजून बराच कालावधी जावा लागणार आहे. त्यासाठी समाजसुधारकांना सातत्याने प्रबोधन करावे लागणार आहे.

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, भारतीय मानसिकता ही अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी आहे. सणवार-उत्सवातील कर्मकांड करणे हा तिचा विरंगुळा आहे. कारण माणसे पोकळीत राहू शकत नाहीत. तेव्हा त्यांना पर्याय दिला पाहिजे. माझ्या मते सुरुवात अगदी लहानपणापासून केली पाहिजे. मूल वाढवताना, मोठ्या माणसांना जे धार्मिक संस्कार वाटतात ते त्याच्यावर न करता त्याला खुल्या वातावरणात वाढवणे, त्याला वाचनाची गोडी लावणे, विचार करायला शिकवणे, प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, निर्णयप्रक्रियेत सहभागी करणे, अभ्यास म्हणजे निव्वळ चांगले गुण असे न शिकवता, प्रश्न समजून घेण्यासाठी (विश्लेषक विचारशैली विकसित करण्यासाठी) अभ्यास करायला लावणे, आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधून काढणारा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, अशा प्रकारे पालकत्वाची भूमिका जर प्रत्येक सुशिक्षित पालकाने पार पाडली तर पुढच्या पिढीत अंधश्रद्धा बऱ्याच कमी झालेल्या दिसतील. तसेच, माणूस निसर्गाच्या परिवर्तनशीलतेला अनुसरून स्वत:ही काळानुसार परिवर्तनशील बनेल. आणि ही एक दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे हे त्याला कळू लागेल.

हे पर्याय दीर्घ मुदतीचे असल्यामुळे आपण आळशी आहोत की भित्रे असा प्रश्न मला कधीकधी पडतो. कारण ह्या जगात अनेक देशांतून तसेच आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेक पटींनी वाढलेली असताना आपल्याभोवती देवधर्मोद्भव असा, जो अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत? नुसतेच छद्मी हसणार? की खाजगीत टर उडवणार? आणि मग ‘आपण हे बदलू शकत नाही. अहो, शतकानुशतकांच्या परंपरा आहेत ह्या, कशा बदलणार! जाऊ द्या’ असे म्हणून गप्प बसणार? ह्यावर मला एक उपाय सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटना असतात, पंथसंघटना असतात, देवळे-मशिदी-चर्च-मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही फुटकळ महाराज-बाबा-बापू-माँ-अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात. मग आपल्यासारख्या नास्तिक लोकांचे एक तरी संघटन असायला नको का? म्हणूनच नास्तिकांचीही चळवळ उभी राहिली पाहिजे. हे काम आजचे शिक्षित तरुण निश्चितपणे करू शकतील असा माझा आशावाद आहे. विवेकनिष्ठेचा अंतराग्नि फुंकर घालताच फुलू शकतो. कोणत्याही राजकीय तत्त्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता हे करणे आवश्यक आहे. भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रद्धानिर्मूलनाचाच नव्हे तर श्रद्धानिर्मूलनाची गरज आहे. कारण ज्या ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. म्हणून श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धाच असते हे मत मान्य असलेल्या सर्वांचे एक व्यासपीठ व्हावे. आता कृती करण्याची वेळ आलेली आहे. 

आस्तिक जर त्यांची आस्तिकता धार्मिक कर्मकांड करून जाहीरपणे मिरवण्यात भूषण मानत असतील तर नास्तिकांनी ‘ते नास्तिक आहेत’ असे जाहीरपणे सांगण्यास का लाजावे? जेवढा अस्तिकाला मिरवण्याचा अधिकार आहे तेवढाच तो नास्तिकांनाही असला पाहिजे ना? थोडक्यात काय तर नास्तिकतेची ठाम भूमिका घेऊन जाण्याच्या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत, याची जाणीव करून देण्यासाठी ‘ब्राईट्स सोसायटी’ नावाचा मुक्तचिंतकाचा समूह कार्यरत झाला आहे. या समूहात विवेकवादी, नास्तिक, बुद्धिप्रमाण्यवादी, अशा अनेक विचारधारांचे लोक एकत्र येऊन समाज परिवर्तनाची आकांक्षा बाळगून आहेत. शेवटी एकच सांगणे आहे की, ‘आम्ही ‘बि’घडलो तुम्ही ‘बि’घडाना!’

jetjagdish@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.