| | काय बोलू आता? बोलवेना… | |

लवंगांचे हार | वेलचीची माळ
बदामाचे दांडे | डोईवरी
लवंग बदाम | आणि दालचिनी
जणू महाद्वीप | मसाल्याचे

कधी मोतीचारा | कधी मोरपंख
नवनवा वर्ख | दिसामाजी
तुझिया कपाळा | केशराचा टिळा
किसानाचा गळा | लटकला

रंगबिरंगाचे | लागले डोहाळे
नवीन सोहळे | रोजच्याला
भ्रष्टाचाराविना | होत नाही काम
भरा लागे दाम | जागोजाग

जनतेच्या हाती | नाही रोजगार
सुगंधित हार | तुझ्या गळा
राजयाच्या ताटी | मश्रूमाच्या फोडी
शेतकरी झोडी | कपाळासी

काढूनी वेळात | थोडा तरी वेळ
पहावे गा ताट | गरीबाचे
किडके तांदूळ | फुकटचे गहू
खाऊनी जनता | वाया गेली

येऊ दे गा दया | कधीतरी थेट
झोपडीसी भेट | द्यावी माझ्या
काय तुझे पद | पदाची प्रतिष्ठा
काय बोलू आता | बोलवेना

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.