झुंडशाही – एक गहन समस्या

अलिकडे झुंडीच्या हिंसेने आपल्या देशात कहर मांडला आहे आणि हिंसेला विरोध करणारा आवाज क्षीण झाला आहे. आज हिंसेच्या विरोधात समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, “वैराने वैर संपत नाही आणि हिंसेने हिंसा संपत नाही.” महात्मा गांधींच्या जीवनाचे तर अहिंसा हे सार होते. ‘Eye for an eye will make the world blind’ हे प्रसिद्ध वचन गांधीजींचेच आहे. चौरीचौरा आंदोलनात तेथील आंदोलक हिंसक बनले आणि पोलिसांवर हल्ला करते झाले तेंव्हा महात्मा गांधींनी आपले देशभरातील असहकाराचे आंदोलन स्थगित करून लोकांचा रोष ओढवून घेतला, असे आपला इतिहास सांगतो.

एकाएकी झुंडीच्या हिंसेचा कहर होण्यामागची प्रमुख कारणे काय आहेत? केवळ माध्यमांना ह्याबाबत दोषी ठरवून चालणार नाही. लोकांचे धार्मिक आणि सामाजिक आकलन याला कारणीभूत आहे. एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी “आपला धर्म धोक्यात आहे” अशी आवई उठविण्यात येत आहे. माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून हे विष भडकलेल्या वणव्याप्रमाणे पसरविले जात आहे. सर्वांत भयचकित करणारी गोष्ट म्हणजे जेंव्हा हे झुंडशाहीवाले गट कायदा हातात घेऊन अल्पसंख्याक आणि दलित समाजातील व्यक्तींचा भरदिवसा उघड्यावर मारपीट करून जीव घेत असतात तेंव्हा बहुसंख्य अलिप्तपणे हे पाहत असतात. सत्ताधारी ह्या घटनांबाबत मौन बाळगून त्याला एकप्रकारे मूक पाठिंबा देतात. झुंडशाहीच्या हत्येसाठी अटक झालेल्यांची जामिनावर सुटका झाल्यावर लोकप्रतिनिधी त्यांचा हार घालून सत्कार काय करतात! तर काही झुंडहत्येच्या गुन्हेगाराचा मृतदेह राष्ट्रध्वजाने सजवितात. “गोहत्येला आळा घाला. मग आपोआप झुंडहत्या थांबतील” अशी बेजबाबदार विधाने लोकप्रतिनिधींना सररास करू दिली जातात. एकदा गोहत्येच्या नावावर हे सर्व माफ होत आहे असे दिसले की मूल पळवणारी टोळी म्हणून ठोकून मारायला काय हरकत आहे अशी मानसिकता पण बनते, आणि हिंसाचार बळावतो. या सर्वांवर कडी म्हणजे अलीकडे कर्नाटकातले आमदार बसनगौडा पाटील यांनी “या बुद्धिजीवी, पुरोगामी प्रज्ञावंतांना आणि उदारमतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत” असे उघडउघड चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. अशा प्रसंगी, आपल्या देशात मतभिन्नता आणि गोडीगुलाबी एकत्र नांदूच शकत नाही की काय अशी सार्थ भीती वाटू लागते.

ह्याला आळा घालण्यासाठी तीन गोष्टी करता येतील.

  • पहिली गोष्ट, मते मिळविण्यासाठी असे खोटे बागुलबुवा उभे करणे थांबले पाहिजे. त्यासाठी मारा-झोडा नीती पाळणारे, द्वेषाची भावना पसरविणारे ह्यांना नाकारून सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्यांना आपण आपली पसंती दिली पाहिजे.
  • दुसरी गोष्ट, निवडणूकआयोगाने कडक भूमिका घेऊन द्वेष आणि हिंसेची उघडपणे भलामण करणाऱ्यांना कडक समज दिली पाहिजे. आणि
  • तिसरी गोष्ट, मीडियाचा उघडपणे गैरवापर करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा केली पाहिजे.

भारत हा सर्वसमान नागरिकांचा देश आहे आणि येथे भिन्न जात, धर्म, वंश, लिंग वा जन्मस्थान असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क भारतीय घटनेने दिला आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मनाई आहे. समाजातील वेगवेगळ्या दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदी करणारे कायदे ह्याला अपवाद आहेत. भारतीय घटनेतील कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे पालन तसेच प्रचार करण्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु ह्या हक्काचे पालन करताना सार्वजनिक शांतता, सार्वजनिक आरोग्य तसेच सामान्य नीतितत्त्वे ह्यांना बाधा येता कामा नये असेही त्यात म्हटले आहे. ह्या विरोधात जाणाऱ्या धार्मिक आचरणाविरोधात तसेच धर्मपालनाशी निगडित आर्थिक, राजनैतिक बाबींवर निर्बंध घालण्यासाठी शासनाला कायदा करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. म्हणूनच सतीप्रथेविरोधी कायदा, जल्लीकुट्टीविरोधातील कायदा किंवा अंनिसच्या पुढाकाराने कार्यान्वित झालेला जादूटोणा आणि इतर अघोरी प्रथांविरोधी कायदा ह्या तरतुदीअंतर्गत करता आला.

परंतु व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे ठरत नाहीत. व्यक्तिगत स्वातंत्र्याची जपणूक करणे आणि सर्व व्यक्ती समान आहेत यावर समाजमनाचा विश्वास असणे गरजेचे आहे. असे असेल तरच समान हक्कांचे उद्दिष्ट साध्य होणे शक्य आहे असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते. जर समाजमन विद्वेषभावनेने कलुषित असेल तर कायदे करून फारसे साध्य होणार नाही. ह्या द्वेषपूर्ण, संशयग्रस्त मनातील जळमटे साफ करण्यासाठी लोकशिक्षण हा एकच उपाय आहे. आजची तरुणाई ही देशाची आशा आहे. घटनेतील उद्दिष्टे ते चांगल्या तऱ्हेने समजू शकतात. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ साली आणलेल्या भारतीय संविधानातील ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी आणि सुधारणावाद ह्यांचा अंगीकार व प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. आणि हिंसेला आळा घालण्यासाठी ह्या मूलभूत कर्तव्याची जाण निर्माण करणे हे लोकशिक्षणाचे महत्त्वाचे अंग असले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.