मनोगत

स्नेह

जून २०२४ ला निवडून आलेल्या नवीन सरकारचे स्वागत आणि शुभेच्छा!

निवडून आलेल्या सरकारने जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करावे अशी अपेक्षा ठेवावी लागणे म्हणजे खरे तर मतदान करणाऱ्या जनतेप्रति आणि निवडून येणाऱ्या राज्यकर्त्यांप्रति अविश्वास दाखवण्यासारखे आहे. पण इलाज नाही. आपल्या निवडणुकपद्धतीतील पारदर्शिकता कधीच लोप पावली आहे आणि सत्तेच्या उन्मादापुढे आपण लोकशाहीची विटंबना चालवली आहे याचे भान राजकारण्यांना उरलेले नाही.

प्रस्थापित सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकात घ्याव्यात असा आमचा प्रयत्न होता. तसा तो पूर्ण झालाही.

पण सगळ्याच समस्यांसाठी सरकारवर अवलंबून चालत नाही याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक जुन्या झालेल्या समस्यांवरील नवे उपाय शोधण्याचे काम सातत्याने करीत राहावे लागते. तसेच नव्याने उद्भावणाऱ्या समस्यांमागची कारणे समजून घेऊन त्यावरही काम करावे लागते. 

समाजातील बहुतांश समस्या मानवनिर्मित असतात याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. जुलै अंकामधील लेखांमध्ये पर्यावरण, जंगले, वन्यप्राणी, शेती यासंबंधीच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत. आदिवासी समूह, वंचित घटक यांच्यावरील अन्यायाचे बदलते स्वरूप बघता त्यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणव्यवस्थेत सुधारणा, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या या सगळ्यांवरच विचार आणि काम व्हायला हवे आहे. 

देश म्हणून प्रगत व्हायचे तर समाज म्हणून समृद्ध आणि व्यक्ती म्हणून विवेकी व्हावे लागेल. अन्यथा विकासाच्या नावाखाली प्रत्यक्षात विनाशाकडे चाललेली वाटचाल रोखणे कठीण आहे.

अंकातील लेखांवरील आपले अभिप्राय आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा.

समन्वयक,
आजचा सुधारक

अभिप्राय 2

  • अन्क पाठविल्याबद्दल धन्यवाद. आपण आपल्या मनोगतात निवडणुकपध्दतीतिल पारदर्शकता लोप पावली आहे असे विधान केले आहे या मताशी मी सहमत नाही. नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीचे अवलोकन करण्यासाठी या वेळी काही विदेशी राष्ट्रान्चे प्रतिनिधी आले होते, व त्यान्नी आपल्या निवडणुक प्रक्रीयेची तारीफ केल्याची वृत्त प्रकाशित झालेली आहेत ती आपण वाचली असावित. होय निवडणुक प्रचार काळात विपक्षिय पक्षान्नी खालची पातळी गाठली होती. कान्ग्रेस पक्षानेतर निवडून आलोतर मोठी रक्कम देण्याचे हमीपत्र वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. कान्ग्रेस पक्षाने स्वत: आपल्या राज्यघटनेची पायमल्ली केलेली असूनही भाजपचा घटना बदलण्याचा मनोदय असल्याचा खोटा प्रचार केला होता. त्याचा विपरित परिणाम होऊनही देशाच्या सुदैवाने मोदीजिन्ना तिसय्रान्दा पन्तप्रधान होण्याची सन्धी सुजाण मतदारान्नी दिली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही त्रीसुत्री अमलात आणूनही आणि त्याप्रमाणे लाभ मिळूनही काही देशवासियान्नी विश्वासघात केलाच. पण तरीही मोदीजिन्ना तिसय्रान्दा पन्तप्रधानपदाची शपथ घेण्याची सन्धी भारतिय जनतेने दिली. एकीकडे विदेशी राष्ट्रान्चे अध्यक्ष, पन्तप्रधान मोदीजिन्ची तारीफ करत असताना पाठीत खन्जीर खुपसण्याचे राजकारण करत होते. पण भारतिय जनता सज्ञ असल्याने त्यान्ना त्यात यश मिळू शकले नाही. आणि आपल्या अपेक्षे प्रमाणे पुढील पाच वर्षात देशाचा आणखी विकास होईल याची खात्री बाळगावी हीच विनन्ती.

  • सम्पादक महाशय, माझा अभिप्राय प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. काल एक मुद्दा लिहायचा राहून गेला होता, तो लिहीत आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी विपक्षिय मतदान यन्त्राबद्दल खूपच ओरड करत होते. पण निवडणुक निकालानन्तर त्यान्ची बोलती बन्द झाल्याचे दिसते. खरे तर या वरुन मोदीजिन्च्या पारदर्शी कारभाराची जाणीव विपक्षियान्ना होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.