कोलकात्यातील आर.जी.कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील तरुणीमुळे एका अवैध सिंडिकेटविरुद्ध खळबळ माजली. ह्या डॉक्टरने हॉर्नेटचे घरटे ढवळण्याचे धाडस केल्यामुळे तिच्या निषेधाची किंमत तिला चुकवावी लागली. जंगली श्वापदालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने तिच्यावर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. ज्या ठिकाणी तिचा जीव घेतला गेला ते ठिकाण तिच्यासाठी दुसरे घर आणि एक सुरक्षित आश्रयस्थान होते. तिच्यावर अत्याचार होत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू नाही, तर रक्त सांडत होते. तिच्या मारेकऱ्यांना आणि पुरावे नष्ट करणाऱ्या सर्वांना असे वाटले की, गेल्या अनेक दशकांपासून आर.जी.कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्धचा एकमेव आवाज ते बंद करू शकले आहेत. पण ह्या गुन्हेगारांना हे लक्षात आले नाही की, तिच्या डोळ्यातून आलेले रक्ताश्रू हे देशभरातील जनअक्रोशाला जन्म देतील आणि ह्या भ्रष्ट तसेच हुकूमशाही राजवटीच्या भिंतींना तीव्र धक्का बसेल.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते बुद्धदेब भट्टाचार्य ह्यांच्या देहदानादिवशी आर.जी.कार मेडिकल कॉलेजमधील शवागारात घाईघाईने नेणारी व्हॅन थांबवून वामपंथी विचाराच्या तरुणांनी सुरू केलेले निषेध आंदोलन राज्यभरात विजेसारखे पसरले. ह्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा ह्या मागणीसाठी ८ ऑगस्टपासून मोठ्या संख्येने लोक विशेषतः महिला दररोज रस्त्यावर उतरत आहेत.
हा निषेध देशातील सर्व राज्यांमध्ये आणि सर्व घटकांतील स्तरांमध्ये जंगली वणव्यासारखा पसरला. घटनेच्या सुरुवातीपासूनच आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्युनियर डॉक्टर सतत धमक्या मिळत असूनही खंबीरपणे लढा देत आहेत. २०११ मध्ये कारस्थान रचून डाव्या आघाडीचे सरकार पाडल्यानंतर ह्यावेळी पहिल्यांदाच प्रशासनाचा अहंकारी आवाज नष्ट झालेला दिसून येत आहे. दरम्यान, देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वर्गातील लोक, विद्यार्थी, तरुण, महिला, डॉक्टर, कामगार, शिक्षक, फुटबॉल चाहते मोठ्या संख्येने ह्या क्रूर हत्येसाठी न्याय मिळाला पाहिजे, असुरक्षिततेपासून स्त्रियांची मुक्तता झाली पाहिजे आणि विरोधाच्या आवाजाला क्रूरतम पद्धतीने दडपण्यापासून सुटका मिळाली पाहिजे, ह्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्र येत आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या तळमळीने जात आणि धर्माची तमा न बाळगता निषेध व्यक्त करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांच्या आक्रोशाची आग इतकी प्रज्ज्वलित झाली आहे की, केवळ भारतातच नव्हे तर USA, England सारख्या भागांमधील लोकसुद्धा निषेध व्यक्त करत आहेत. व्यवस्थापनाकडून शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी मिळत असूनही आंदोलनाचे नेतृत्व करणारे कनिष्ठ डॉक्टर आपल्या दिनचर्येतून दूर राहून तटस्थपणे निषेध व्यक्त करीत आहेत.
ह्या घटनेने संपूर्ण देशातील महिलांची निर्भयता, सुरक्षितता आणि विनयशीलता ह्यावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. उपरोधिकपणे सांगायचे झाले तर, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे महिला मुख्यमंत्री सत्तेत असूनही सर्वाधिक आहे आणि विरोधाभास म्हणजे अलीकडेच झालेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी मोठ्या मताधिक्याने जिंकल्या असून, त्यांच्या विजयात पश्चिम बंगालमधील महिलांचा सर्वाधिक पाठिंबा आहे, असे सांगितले जात आहे. ज्या राज्यांमध्ये केंद्र सरकारची सत्ता आहे, त्या राज्यांमध्येही महिलांवर नियमितपणे अत्याचार होत आहेत आणि हे अत्यंत दुःखदायक आहे की, आपण निवडून दिलेल्या कित्येक आमदारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि न्यू इलेक्शन वॉच (NEW) ह्यांनी ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, देशातील एकूण १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिलांवरील अत्याचारांशी संबंधित गुन्हे नोंद आहेत, ज्यामध्ये १६ विद्यमान खासदार आणि १३५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. पक्षवार सांगायचे झाले तर, महिलांवरील ५४ गुन्हे उघडकीस आलेले खासदार आणि आमदार सर्वाधिक भाजप पक्षाचे आहेत. त्यानंतर काँग्रेसचे २३, तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) १७ आहेत. राज्यांचा विचार केला तर, पश्चिम बंगाल हे राज्य २५ आमदार आणि खासदारांसह अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. त्याखालोखाल आंध्रप्रदेश (२१) आणि ओडिशा (१७) ह्या राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद असलेले आमदार आणि खासदार आहेत. अशा लोकांना आपली जनता निवडून देऊ शकते, हे समाजातील एक विदारक लाचारीचे लक्षण दिसून येते. महिलांबद्दलचा हा संकुचित दृष्टिकोन केवळ बलात्कार आणि खुनाच्याच बाबतीत नव्हे तर दैनंदिन कामाच्या ठिकाणचा वैधानिक भेदभाव आणि तत्सम छळवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये दिसून येतो. अशा क्रूर आणि प्रतिगामी पितृसत्ताक मानसिकतेचे बळी केवळ महिला डॉक्टरच नाहीत तर महिला विक्री संवर्धन कर्मचारीही आहेत. प्रसूती रजेसारखे कायदेशीर अधिकार नाकारणे हे तर आता सर्वसामान्य झाले आहे. महिला फील्ड वर्कर्सनादेखील पुरुष सहकाऱ्यांप्रमाणेच शारीरिक काम करण्यास भाग पाडले जाते. बहुतेक कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणे नित्याचेच बनले आहे. त्याबरोबरच ह्या व्यवसायात अनेकदा लैंगिक छळाचे प्रकारही ऐकायला मिळतात. FMRAI महिला कामगारांसाठी समानता आणि न्यायाची मागणी करत आहे आणि संघटनेचे सदस्यही कोलकाता घटनेच्या विरोधात देशभरातील सर्व निषेधांमध्ये तत्परतेने सहभागी झाले आहेत.
भेदभाव आणि विकारी तिरस्काराने व्यापलेल्या ह्या समाजातील अशा रानटीपणाचा, देशातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषानी आपल्या सर्व शक्तीनिशी सामना केला तरच आपण आशा करू शकतो की, आपला भारत महिलांसाठी सुरक्षित आणि प्रेरक आश्रयस्थान बनू शकेल.
अनुवाद – FMRAI NEWS September-24 (संपादकीय)