पुस्तक परीक्षण
विवाह नाकारताना
लेखिका : विनया खडपेकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
एप्रिल २०२४.
पृष्ठ संख्या २८८
किंमत रुपये ४३०
‘विवाह नाकारताना’ हे विनया खडपेकर ह्यांचे आत्मचरित्र प्रकाशित होताच उत्सुकतेने वाचावेसे वाटले. ह्याचे कारण, स्त्री जेव्हा विवाह नाकारते तेव्हा तिचा प्रवास कसा असेल, ह्याची स्वाभाविक उत्सुकता मनात होती. विवाह हा स्त्रीसाठी तरी अनिवार्य आहेच, असा समज सर्वत्र प्रचलित आहे. एकट्या स्त्रीची समाजात अनेकदा अवहेलना होते, हे सतत दृष्टीस पडते. एकट्या राहणाऱ्या स्त्रीची सर्वत्र कोंडी केली जाते. अविवाहित स्त्रीचा स्त्रियाही अपमान करतात, हेही सतत अनुभवास येते.
स्त्रीचा विवाह ठरावीक वयात झालाच पाहिजे, तिला मूल झालेच पाहिजे, एक तरी मुलगा तिने जन्माला घातलाच पाहिजे असे समज पूर्वापार चालत आले आहेत आणि आजही ते कायम आहेत. समाजाची मनोधारणा अद्यापही बदललेली नाही. त्यामुळे विवाह ही स्त्रीच्या आयुष्यात अत्यावश्यक बाब झाली आहे. स्त्रीला वस्तुरूप देणारी ही संस्था आहे. समाजाला आणि स्त्रियांनाही हे जाणवत नाही. विवाह झाला की, त्या स्त्रीची मालकी एका पुरुषाकडे जाते. एकटी स्त्री ही जणू समाजाच्या मालकीची वस्तू ठरते. समाजातील पुरुषांच्या नजरांचे घाव अविवाहित स्त्रीला सहन करावे लागतात आणि विवाहित स्त्रियांचे वाग्बाणही झेलावे लागतात. ह्यामुळे वैवाहिक जीवन कितीही दुःखद असले तरी समाजाच्या भीतीने स्त्रिया ते टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न का करतात हे साऱ्यांना समजावे, ह्यासाठी लेखिकेने स्वतःच्या अनुभवांविषयी लिहावे असे त्यांच्या मैत्रिणीने सुचवले. लेखिकेलाही ते जाणवले असणारच. त्यामुळे अत्यंत प्रांजळपणे त्यांनी हे आत्मकथन लिहिले आहे. अनुभवकथनासोबतच त्यातील चिंतनही मोलाचे आहे आणि अनुभव सांगताना चिंतन सहजपणे आलेले आहे. त्यामुळे पुस्तक वाचनीय आणि विचारप्रवण करणारे झाले आहे. अपमानास्पद अनुभव पचवून वयाच्या एका टप्प्यावर त्याकडे बघण्याचा संयमीत दृष्टिकोन लेखिकेला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कडवटपणा नाही, तर मिश्कीलपणा आहे.
पुस्तक वाचत असताना आपण पाहिलेल्या अनेक स्त्रिया डोळ्यांपुढे उभ्या राहतात. त्यामुळे पुस्तकातील प्रश्न हे केवळ लेखिकेचे वैयक्तिक प्रश्न नसून ते सर्व स्त्रियांचे प्रश्न आहेत, हे स्पष्ट आहे.
ओघवत्या भाषेत अनेक लहान-मोठे प्रसंग येथे येतात. अशा प्रसंगांना तोंड देणे किती अवघड आहे, हे फार विदारकपणे जाणवून देणारे हे पुस्तक आहे. लेखिका कणखर व बुद्धिमान स्त्री असल्याने त्यांनी ह्या प्रसंगांना समर्थपणे तोंड दिले, हे येथे दिसते. अनुभवातून त्या कणखर बनल्या आहेत. त्यांचा हा प्रवास समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. एकट्या स्त्रीने येणाऱ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायला हवे, हेही त्यातून लक्षात घेण्यासारखे आहे. ह्यासाठी हे आत्मकथन फार महत्त्वाचे आहे.
वयाच्या एकोणविसाव्या वर्षी व्यावहारिकदृष्ट्या उत्तम ‘स्थळ’ चालून आले. त्यांच्या आई-वडिलांनाही ते योग्य वाटले. तरीही लेखिकेने ते नाकारण्याचे धैर्य दाखवले. शिक्षण, नोकरी, समाजकार्य करावे असा त्यांचा विचार होता आणि प्रीतीची पूर्तता म्हणून आयुष्यात लग्न व्हावे असे मनात होते. परंतु अचानकपणे ‘दाखवणे’ आणि कोरड्या व्यावहारिक पातळीवर लग्नाचा मुद्दा समोर आल्याने त्यांना ते नकोसे वाटले. ह्या प्रसंगावरून लेखिकेच्या स्वतंत्र मनोवृत्तीची आणि विचारधारणेची कल्पना येते. लहान वयातही त्यांच्यामध्ये निर्णयशक्ती होती, हे ध्यानात येते. लेखिकेला विवाह हवा होता पण तो त्यांच्या अटींवर हवा होता हे स्पष्ट आहे. कसेही करून मुलीचे लग्न झालेच पाहिजे असे त्यांच्या पालकांनीही त्यांना सुचवले नाही, हे विशेष. एकोणविसाव्या वर्षी लग्नाची संधी आली. त्याचप्रमाणे बी.ए.चा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मिशनरी शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्याची संधी मिळाली. एक वर्ष त्यांनी नोकरी केली. त्यानंतर पुढील शिक्षण घेतले. नोकरी मिळविण्यासाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदवले. मनाविरुद्ध कोणत्याही स्थळाला होकार देणे शक्य नाही, हे त्यांनी ओळखले. निर्णयस्वातंत्र्य हवे असल्यास आपल्या पायावर उभे राहायला हवे, हेही त्यांना आपसूक जाणवले. पुढे रिझर्व बँकेत नोकरी केली. उपजीविकेचे साधन मिळाले. वाचन, लेखन ह्यातून आनंद मिळवला, मानसिक समाधान मिळवले. ह्या साऱ्या प्रवासात अविवाहित स्त्री म्हणून समाजाकडून त्यांना कोणते अनुभव आले, हे परखडपणे लेखिकेने लिहिले आहे. त्यांच्या आयुष्यातील तपशील त्यांनी दिले आहेत. स्वतःच्या बदलत्या भावना त्यांनी सूक्ष्मपणे मांडलेल्या आहेत. वयाच्या पंचविसाव्या वर्षी आणि चाळीसाव्या वर्षी त्यांच्या बदललेल्या प्रतिक्रिया त्या येथे नोंदवतात. अविवाहित स्त्रीला समाजातील स्त्री-पुरुषांकडून मिळणारे टोमणे, तिची होणारी कुचेष्टा ह्याबद्दल तर लेखिका लिहितातच; परंतु त्या स्वतःचे अंतर्मन देखील सोलून वाचकांपुढे ठेवतात. ह्याबाबत कोठेही हातचे राखून लिहिलेले किंवा लपवाछपवी अथवा दुटप्पीपणा जाणवत नाही, म्हणून हे लेखन मनाला थेट भिडते.
त्यांचे ‘माणूस’ साप्ताहिकातील लेखन वाचून मुंबईतील ‘मैत्रिणी’ व्यासपीठावर त्यांना बोलावले गेले. तेथे त्या रमल्या. त्यानंतर ‘स्त्री उवाच’ ह्या गटाशी त्यांचे विचार जुळले. हा गट डाव्या चळवळीशी जोडला गेलेला, तर लेखिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनसंघ अशा राजकीय विचारसरणीतील. परंतु त्यांची स्त्री-स्वातंत्र्यविषयक मते ‘स्त्री उवाच’ ह्या गटाशी जुळत होती. आत्मपरीक्षण व विश्लेषण करण्याच्या लेखिकेच्या वृत्तीला ह्या गटातील वातावरण पसंत पडले. तेथील स्त्रीवादी विचार त्यांना पटले. डाव्या संघटना व संघविचार दोन्ही त्यांनी समजून घेतले आहेत. त्यावर नेमकी टिप्पणीही केली आहे. परंतु, त्यांच्या ह्या भूमिकेचे अनेकांना आकलन होत नाही. अनेकांच्या कडव्या वृत्तीचे कटू अनुभव लेखिकेला आले. त्यावरही त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. ‘माणूस’ साप्ताहिकात त्यांचे लेखन नियमितपणे प्रकाशित होत असते. तेथे समाजवादी, कम्युनिस्ट मंडळीही लिहीत असत. त्यामुळे परस्परविरोधी वाटल्या तरी त्या विचारसरणीमधून आपल्याला जे पटते ते स्वीकारावे, असा लेखिकेचा मोकळा दृष्टिकोन दिसतो. तो दृष्टिकोन आज दुर्मीळ होत आहे. ह्याबाबतचा लेखिकेचा विचार आणि अनुभव फार महत्त्वाचे आहेत. त्यावर विचार होणे आवश्यक वाटते. त्यासाठी हे मुळातूनच वाचावयास हवे.
अविवाहित स्त्रीपुढील समस्या पुस्तकात आहेत; पण आत्मचरित्राचा आरंभ लेखिका एकट्या राहू लागल्या ह्या प्रसंगाने होतो. स्वतंत्रपणे,एकटे राहताना त्या अत्यंत आनंदात आहेत. त्यांची वाट वेगळी आहे, ह्याची चाहूल येथेच लागते. अविवाहित मुलगी म्हणून आई-वडिलांच्या घरात त्या राहणार नाही, हे येथे स्पष्ट होते. त्यावेळच्या सूक्ष्म भावना लेखिकेने सांगितल्या आहेत. तरुण, अविवाहित मुलीने आई-वडिलांच्या घरात राहायचे असा संकेत रूढ असताना एकटीने राहण्याचा निर्णय घेणे अवघड होते. पण ह्या गोष्टीतील मुलगी चारचौघींपेक्षा निराळी आहे, हे त्यांनी कथन केलेल्या साध्या साध्या प्रसंगातूनही लक्षात येते. भावांबरोबर संगीत, नाटक, चित्रपट, राजकारण ह्यांवर समरसून बोलणारी, चर्चा करणारी ही मुलगी त्या काळातील केवळ घरकाम, कलाकुसर ह्यात रमणाऱ्या मुलींपेक्षा निराळी आहे. तिची बौद्धिक क्षमता निश्चितच चारचौघीपेक्षा अधिक असणार; परंतु ह्या आत्मकथनात लेखिका कुठेही आत्मप्रौढी मिरवत नाहीत. त्यांच्या आई-वडिलांनी चारचौघींपेक्षा काही बाबतीत त्यांना निराळे वाढवले आहे. आईने स्वतः पोहणे, मुलीला पोहायला शिकवणे हे त्या काळातील स्त्रियांपेक्षा निराळे आहे. स्त्रीला निर्णयस्वातंत्र्य असावे, असे त्यांच्या आईने अनेक प्रसंगी ठामपणे सांगितले आहे. तो संस्कार मुलीवर झाला आहे. मात्र मुलीच्या लग्नाची वेळ येताच आई स्वाभाविकपणे पारंपरिक विचार करू लागते, हेही सत्य आहे. मुलीचे विचार तिच्या वयाला साजेसे स्वप्नाळू आहेत. आईचे व्यवहारी वागणे तिला खटकते. मुलीची पत्रिका करणे इत्यादी तपशील अनेक मुलींना खटकतात. त्या बाबी मुली मनाविरुद्ध स्वीकारतात आणि लेखिका ज्या काळात वावरत आहेत, त्या काळात मुलींनी हे स्वीकारले होतेच. फार कमी मुलींनी ह्याला विरोध करण्याचे धैर्य दाखवले. लेखिकेने ते दाखवले आणि त्यामुळेच त्यांचे जगणे निराळे झाले. मायलेकीमध्ये त्यामुळे संघर्षाचे प्रसंग आले. जिव्हाळा आणि काळजी ह्यामुळे आईची झालेली मनोवस्था मुलगी जाणते; पण आईचे सारेच ती ऐकते असे नाही.
एकटीने राहताना कुटुंबात त्यांना समस्या आल्या. काही अपरिपक्व नातेवाईकांमुळे त्या समस्या वाढल्या. तरीही त्यातून लेखिकेने समंजसपणे वाट काढली हे विशेष. लहान घरात राहताना स्वतःची कुणाला अडचण होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशी दुपारी घरी विश्रांती न घेता ग्रंथालयात जाणे ह्यासारखे बारीकसारीक तपशीलांतून लेखिकेचा धोरणीपणा व समंजस वृत्ती दिसते. तडजोड करण्याची त्यांची वृत्ती येथे दिसते. कोठे तडजोड करायची आणि कोठे करायची नाही ह्याविषयी त्यांची ठाम भूमिका पुस्तकातून स्पष्ट होते. त्यांच्या आई-वडिलांची त्यांना साथ मिळाली. अन्यथा अशा स्थितीत घुसमट सहन करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात. आई-वडील ,भाऊ, वहिनी ह्यांच्या घरात अविवाहित स्त्रीने राहणे, त्यांच्या कुटुंबाकरिता पैसा खर्च करून, कष्ट करूनही अपमानित होणे हेच समाजात सर्वत्र दिसत होते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असूनही अविवाहित स्त्रीला समाजात सन्मान मिळत नाही, ही वस्तुस्थिती होती आणि आहे. अशा काळात लेखिकेने धैर्याने वेगळी वाट चोखाळली. लेखिकेने समाजात स्वतःचे स्थान प्राप्त केले. पुढे अविवाहित मुलगी म्हणून आई-वडिलांची जबाबदारी सोडली नाही. नोकरी करत असताना आई-वडिलांची सर्व जबाबदारी स्वीकारली.
एकटे राहताना, कार्यालयात काम करताना येणाऱ्या अडचणी, स्त्री आणि पुरुष सहकाऱ्यांकडून आलेले नकारात्मक आणि सकारात्मक अनुभव लेखिका नोंदवते. डोळ्यातील दोष किंवा इतरही त्रुटी त्यांनी लपवून ठेवल्या नाहीत. शारीरिक वैगुण्यामुळे आणि अविवाहित असल्याने स्त्रियांमधील आत्मसन्मानाची भावना लोप पावते, असे दिसते. अविवाहित स्त्री आत्मविश्वासाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असली तरी तिच्या मनातून आत्मसन्मानाची भावना नष्ट होते. ‘बिचारी’ किंवा लग्न न झाल्याने तिच्यात काही कमी आहे हे तिला समाज सतत जाणवून देत असतो. त्याने अनेकदा तिला नैराश्य येते. परंतु लेखिकेच्या मनातील आत्मसन्मानाची भावना आणि आत्मविश्वास कायम असल्याने अनेक समस्यांमधून त्या मार्ग काढताना दिसतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्या मनात स्वतःविषयी कोणत्या भावना होत्या, हे लेखिका सांगतात. त्या अजिबात लपवून ठेवल्या नाहीत. पंचवीस ते तीस ह्या वयात लोकांच्या नजरेने त्या अस्वस्थ होत असत. त्यांना दूर पळून जावेसे वाटत असे. चाळिशीत आल्यावर त्या मिश्कीलपणे हसत अशा नजरांना गोंधळून टाकत, त्यांची गंमत बघत असत. त्यांचा हा प्रवास अगदी साध्या शब्दात त्यांनी सांगितला आहे. त्यामुळे तो फार परिणामकारक झाला आहे. अंगभूत गुणांविषयी त्या कुठेही प्रौढी दाखवत नाहीत. स्वतःला चारचौघीप्रमाणेच समजतात; परंतु एकूण जीवनपट पाहिला असता त्यांचे वेगळेपण लक्षात येते. वाचनाच्या ओघात ते जाणवले नाही तरी विचार केल्यावर ते ध्यानात येते. कारण लेखिकेचे वय आता शहात्तर वर्षे आहे. त्यांच्या वयाच्या स्त्रियांकडे पाहिले असता असा निर्णय घेऊन अर्थपूर्ण जीवन जगणाऱ्या स्त्रिया फारच कमी दिसतात. स्त्री-पुरुष मैत्री, विवाहबाह्य संबंध ह्याबाबतीतील लेखिकेची मते त्यांच्या ठाम विचारशक्तीची निदर्शक आहेत. त्याचे आवश्यक तेवढे तपशील त्यांनी नोंदवले आहेत. त्यात कुठेही लपवाछपवी केलेली जाणवत नाही.
निश्चित ध्येय ठरवून अविवाहित राहिलेली स्त्री ह्या नाहीत. विवाह त्यांना त्यांच्या अटींवर हवा होता. तसा तो न झाल्याने त्यांनी तो नाकारला. ह्या निर्णयाचे परिणाम स्वीकारले. विवाहाच्या व्यवहारात स्त्री ही वस्तुरूप ठरते हे लेखिकेला खटकले. त्यानंतरचे अनुभव त्यांनी तटस्थ, प्रांजळपणे, नोंदवले. येथे आत्मसमर्थन नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचकाला नवी दृष्टी देते. विवाहसंस्था, स्त्री-जीवन ह्याविषयी वाचक विचार करू शकतो.
विनया खडपेकर ह्यांनी त्यांच्या आयुष्यात कसे निर्णय घेतले, त्यांचे व्यक्तिगत जीवन कसे आहे, ह्यापेक्षा एकट्या स्त्रीला कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते ह्याचा सूक्ष्म विचार येथे दिसतो. तो महत्त्वाचा आहे. जसे एकटी स्त्री ही तिच्या आजारपणात कोणाची मदत घेते, तिचे मानसिक संतुलन कसे टिकवते, हे लेखिका केवळ अनुभवकथनातून मांडतात; त्यामुळे ते अधिक परिणामकारक झाले आहे.
कौटुंबिक अनुभव, शेजारी, सहकारी, नातेवाईक, मैत्रिणी सर्वांचे आलेले अनुभव परखडपणे मांडले आहेत. मानवी स्वभावाचे खरे स्वरूप त्यातून दिसते. डाव्या, उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसमवेत काम करताना आलेले भलेबुरे अनुभव त्या नोंदवतात. सकारात्मक व नकारात्मक अनुभव त्यांनी स्पष्टपणे नोंदवले आहेत. खुलेपणाने सारे स्वीकारण्याचा त्यांची मनोवृत्ती येथे लक्षात येते.
लेखिका, संपादक म्हणून त्यांना मिळालेल्या यशाचा त्यांनी केलेला उल्लेख अविवाहित स्त्रीच्या अनुभवाच्या संदर्भात त्या करतात. त्यात तिळमात्र अहंकार दिसत नाही. ज्या उद्देशाने त्यांनी हे आत्मकथन लिहिले, त्यापासून त्या जराही ढळत नाहीत.
स्त्रियांनी लिहिलेली आरंभीची आत्मचरित्रे ही पती चरित्रे आहेत असे म्हटले जाते. रमाबाई रानडे ह्यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे एक ठळक उदाहरण, तर ‘स्मृतिचित्रे’मध्ये पतीच्या स्मृतींसोबत लक्ष्मीबाई टिळकांच्या स्वत्वाचेही दर्शन घडते. त्यानंतर स्त्रियांची अनेक आत्मचरित्रे प्रकाशित झाली. वाचकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. परंतु ‘अविवाहित्व’ केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र असावे. ह्यामुळेच ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
विवाहसंस्था, कुटुंबसंस्था त्यातील अनेक त्रुटींसह संपूर्ण जगात अद्याप टिकून आहेत. भारतात ह्या संस्थांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे हे नव्याने सांगायला नको. ‘विवाह हा एक पवित्र संस्कार आहे’, असे कितीही गोडवे गायले गेले तरी तो एक कटू व्यवहार आहे ह्याची जाणीव सर्वांना निश्चितच आहे. हा एक बाजार आहे, हे अनेक स्त्रियांना समजत असते. पण त्यात त्या बदल करू शकत नाहीत.
एखादीने कणखरपणे त्याविरुद्ध पावले उचलली तर त्याचे कसे परिणाम दिसतात, ह्याचे खरेखुरे चित्र ह्या पुस्तकात उमटलेले आहे. ‘रूढ चौकटीच्या उणिवांवर मात करण्यासाठी प्रयोग केला हे महत्त्वाचे, तो अयशस्वी झाला तरीही बिघडत नाही’, असे लेखिका लिहितात.
कोणतेही आत्मकथन वाचताना वाचक त्या लेखकाचे व्यक्तिगत जीवन समजून घेतो. त्याबरोबरच तत्कालीन समाजजीवनही समजून घेत असतो. साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी मुलीचे लग्न जमवताना कोणत्या प्रसंगाना तिला सामोरे जावे लागे हे ह्या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे. ते चित्र आज पूर्णपणे बदलले आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही. आज थोडेफार बदल दिसत आहेत. लैंगिक संबंधाबाबत चौकटी शिथिल झाल्या आहेत. तरुण-तरुणी स्वतः लग्न जमवण्यात पुढाकार घेत आहेत. वधूवरसूचक मंडळे वाढली आहेत. असे काही बदल दिसत असले तरी, ‘मुलीचे लग्न’ ही आजही गंभीर समस्या मानली जाते. (आज एकविसाव्या शतकात ‘मुलाचे’ लग्न जमणे हीदेखील एक समस्या झाली आहे हा भाग निराळा) आर्थिकदृष्ट्या स्त्री स्वतंत्र झाली आहे. सर्व प्रकारचे शिक्षण घेते आहे. तरीही तिच्या लग्नाचा प्रश्न अजूनही गंभीर मानला जातो. तर आजपासून जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी ‘मुलीचे लग्न’ हा प्रश्न किती गंभीर असावा ह्याची सहज कल्पना करता येते.
एकट्या स्त्रीचे जगणे समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदत करते. स्त्री-पुरुषांच्या धारणा ह्या वाचनातून बदलाव्या अशी अपेक्षा नक्कीच करता येते. त्यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल. अनेक स्त्री-आत्मचरित्रांनी समाजाला विचार करायला लावला आहे. तसाच विचार करायला लावणारे हे महत्त्वाचे आत्मकथन आहे.
खरंच प्रेरणादायी आहे. लग्न हा मूलतः दोन व्यक्तींचा संबंध असतो आणि आधुनिक काळात या संबंधाबाबत एका चौकटबाह्य दृष्टिकोनाची अत्यंत गरज आहे. मूलभूत प्रश्नांची उत्तरे सामाजिक आणि धार्मिक नियमांचा आधार न घेता दिली पाहिजेत.
आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य जपणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्त्री असल्याचे दडपण न बाळगता मोकळेपणाने वावरणे अविवाहित स्त्रीला सहज शक्य व्हावे अशी परिस्थिती अजून आपल्याकडे नाही ही उणीवच आहे पण काही काळानंतर ती बदलेल अशी आशा करता येईल.
वृंदा जोगळेकर
स्त्रीला पुरुषा इतकेच स्वाभिमानाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून जगता यायला अजूनही काही काळ जावा लागेल. विनया खडपेकर यांनी विवाह संस्थेला विरोध न करता पण विवाहाचा आधार घेऊन जगण्याऐवजी एक व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या वाटचालीत त्यांना नक्कीच अडचणी आल्या असणार. त्यामुळे हे आत्मचरित्र विचार प्रवर्तक असणारच आहे. लेखिकेचे अभिनंदन.
डॉ. विनिता हिंगे यांनी या आत्मचरित्राचा अतिशय सुंदर आढावा घेतला आहे त्यांचेही अभिनंदन.
आपल्या देशातिल विवाह संस्थेचे संपूर्ण जगात कौतुक होत असले, तरी त्याचे श्रेय सर्वथा स्त्रियांच्या सोशिकतेलाच द्यावे लागेल. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धा पर्यंत स्त्रियांना शिक्षण दिले जात नसल्याने त्या सर्वस्वी परावलंबीच होत्या. त्या शतकाच्या उत्तरार्धात ना. नाना तथा जगन्नाथ शंकरशेट, महर्षि धोंडो केशव कर्वे वगैरे समाजधुरिणांमुळे स्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली आणि स्त्रियांनी त्याचा चांगलाच लाभ उठवला. आजही मुलीचे लग्न झाले की पालकांना एका मोठ्या जबाबदारीतून सुटल्याची भावना असते. अशा परिस्थितीत पन्नास, पंचावन्न वर्षांपूर्वी श्रीमती विनया खडपेकर यांनी मनाविरुध्द लग्न न करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना साथ दिली ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लगेल. आजच्या एकविसाव्या शतकातही एकट्या स्त्रीने रहाणे किती अवघड आहे ते रोजच प्रकाशित होणाय्रा स्त्रियांवरील अत्याचाराच्या वृत्तांवरुन दिसून येते. श्रीमती विनीता हिंगे यांनी केलेल्या पुस्तक फरिक्षणातून खडपेकरांच्या जीवनाची कल्पना येत असली तरी एकाकी जीवन जगणाय्रा स्त्रिया़नी हे पुस्तक मुळातून वाचणे आवश्यक आहे. त्यांना ते नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
खपच छान
आजचा सुधारक आणी लेखिका यांचे आभार.
खूप महत्त्वाचा विषय माहीत झाला.
वेद काळात किंवा नंतरच्या इतिहासात लग्न न करणाऱ्या स्त्रियांचे उल्लेख आहेत काय,?
लग्न म्हणजे एक पुरुष अधिक एक स्त्री असे असे आवश्यक आहे का? 2+१, 1+2, 3+1 असे विवाह असूच नयेत काय? किंवा लिव्ह इन संबंध?
ज्यावेळी काही कारणाने लग्न करू शकणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या विषम होते तेंव्हा?
आपला अभिप्राय छान आहे .आवडला .मी ही एक सर्व सामान्य वाचक म्हणून आमच्या वाचक ग्रुपसाठी याच आत्मकथनाविषयी लिहलेले होते ते पुढीलप्रमाणे
………………………………………………………………………..
‘विवाह नाकारताना ‘ हे विनया खडपेकर यांचे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले अगदी अलीकडील आत्मकथन आहे .
मुखपृष्ठ डायरीच्या पृष्ठांचे म्हणजेच आत्मकथनासाठी सबळ पुष्टी देणारे आहे .याशिवाय विषयासंदर्भातील माहिती मुख आणि मलपृष्ठावर लेखिकेच्या फोटोसह दिली आहे.
लेखिकेचे भाषेवर प्रभुत्व आहे .नेमकेपणाने लेखन केले आहे . वाचायला आवडत जाते . कंटाळा जाणवत नाही . भाषा ओघवती आहे .
या विषयावर प्रथमच मराठी साहित्यात लेखन झालेले आहेअसे वाटते .
विवाह संदर्भात स्त्रीच्या भावना ,इच्छा,आकांक्षा काय असतात,काय असू शकतात हे समजण्यासाठी हे आत्मकथन मदत करते . मुलगी उपवर होणे. वरसंशोधनामध्ये विचित्रपणे नको त्या विषयाला महत्त्व देणारे लोक व त्याचे बाजारू स्वरूप हे सर्व कसे उबग आणणारे आहे याविषयीचे चिंतनशील अनुभवकथन वाचकाला अंतर्मुख करायला लावते . एखाद्या मुलीच्या लांबलेल्या वरसंशोधन प्रक्रियेबाबत मुलगी व तिच्या कुटुंबाला कोणकोणत्या प्रसंगावर सामोरे जावे लागते व सोसावे लागते याची प्रचिती क्वचितच पुरुष वर्गाला होत असावी असे वाटते . नातेवाईकांना तर याविषयाशिवाय दुसरा बोलायला विषयच नसतो.सर्वत्र लोक जे अपुऱ्या माहितीवर बोलत असतात किवा टोमणे मारतात त्याची बोचणी स्त्रीला किती होत असते हे या कथनात वेळोवेळी जाणवते ,ती समाजमनाने घेऊन सुधारणा करण्यासारखे आहे . नोकरी करताना तर असे लुबरे लोक काही कमी नसतात इत्यादी बाबत सांगोपांग चिंतनशील विश्लेषण केलेले आहे .वैचारिक स्पष्टतेसह सर्व लेखन प्रांजळ आहे . आपला मार्ग व वर्तन सरळ व सभ्य असल्यास परिणामाची तमा बाळगण्याची गरज नसते .ही फार मोठी शिकवण हे आत्मकथन देते. सर्व काही प्रकरणानुसार लिहले आहे .ते अगदी निश्चितपणे तसेच घडलेले आहे ,असेच वाटते. सर्व प्रसंग हुबेहूब लेखनातून उभे केले आहेत. प्रसंगानुसार दिलेल्या अनुषंगिक संदर्भावरून लेखिकेच्या विस्तृतस्वरुपाच्या वाचनाची ग्वाही मिळते .हातचे राखून काही लिहले आहे असे कुठेही वाटत नाही .स्त्री-पुरुष संदर्भात काही स्पष्ट मुद्दे किंवा विचार हे आत्मचरित्र वाचकापुढे ठेवते .लेखिकीचे आकलन उच्च दर्जाचे आहे .स्त्रीमुक्ती संदर्भातील स्त्रीच्या अस्मितेविषयीचे आणखी काही वेगळे मुद्दे या आत्मकथनात वाचायला मिळतात. नातेसंदर्भात उपवर मुलगी कमवती असूनही नात्यात उद्भवणारे ताणतणाव याविषयीचे विचार फार बोलके आहेत .प्रसंगाचे वर्णन करताना योजलेले अचूक शब्दरचना भाषेवर प्रेम करणाऱ्याला फार भावतात .( उदा.हबका, सटपटले ,गचडीची,सरबरीत, खताडखाना,पकपक,बलाबला,धबकला, सणसण इ.)
महिमकर व्यक्तिमत्व निरागसपणे कुणासही विनाअट मदत कारायला तयार असते ते वाचकाला फार भावणारे आहे .. स्त्रीउवाच व वळून पाहते तेव्हा .. या दोन प्रकरणात वास्तवावर टोकाचे परखड विचार मांडले आहेत .
एकंदरीत एक चांगले वैचारिक आत्मचरित्र वाचनीय असे आहे .
स्त्रीमुक्ती संदर्भात मागेपुढे हे आत्मकथन ऐतिहासिक ऐवज ठरेल.
दस्तगीर शिकलगार .कराड .