सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने

“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम हे ऐहिक सुखाशी निगडित आहेत, पण त्यांना धर्म हा नियंत्रक घटक व मोक्ष हा अंतिम परिपाक आहे. म्हणजेच सुखाचा शोध वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीशी बांधलेला आहे.

भारतीय तत्त्वज्ञानाची नऊ प्रमुख दर्शने मानली जातात; त्यांत लोकायत किंवा चार्वाक हे सर्वात वेगळे. इतर सर्व दर्शने आत्मा, पुनर्जन्म, परलोक यावर कमीजास्त भर देतात; लोकायत मात्र प्रत्यक्ष अनुभवालाच प्रमाण मानतात. त्यांचे सुप्रसिद्ध वचन आहे : “यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्ति मृत्योरगोचरः। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥” अर्थात, जोवर जीवन आहे, तोवर सुखाने जगावे. मृत्यू झाल्यावर परत येणे नाही; राख झालेल्या देहाला पुनर्जन्म कसा मिळणार? थोडक्यात चार्वाकांनी वेद व धार्मिक विधी नाकारले, आत्मा व परलोक कल्पना नाकारली, ऐहिक सुख हाच जीवनाचा केंद्रबिंदू मानला. त्यांच्या ह्या विचारांवर “भोगवादी” किंवा “नीतिहीन” अशी टीका झाली, पण दुसरीकडे पाहता अनुभवाधारित दृष्टी ही आधुनिक वैज्ञानिक पद्धतीशी जवळची आहे. “जे प्रत्यक्ष अनुभवले नाही, ते मानू नका” ही त्यांची भूमिका आजच्या वैज्ञानिक विचारवादाच्या पायावर उभी आहे.

बौद्धमतानुसार जीवन दुःखमय आहे, परंतु आर्य अष्टांगिक मार्गाने दुःखाचा नाश करून निर्वाणप्राप्ती साधता येते. खरे सुख म्हणजे दुःखनिवारण. जैनमत अहिंसा, अपरिग्रह, सत्य आचरणातून आत्मशुद्धीचा मार्ग दाखवतो. भौतिक सुख क्षणभंगुर; खरे समाधान आत्मसंयमात आहे. वेदांत आत्मसाक्षात्कारालाच परमसुख मानतो; इहलोकीचे सुख मायिक/मायावी(?) असून आत्म्याची अद्वैत अनुभूतीच खरी शांतता आहे. भक्तिसंप्रदायात भगवंतभक्तीतून आत्मिक आनंद प्राप्त होतो; नामस्मरण, कीर्तन, सेवा यातून सुखाची अनुभूती होते. यातून दिसते की चार्वाक हे एक टोक, तर मोक्षप्रधान दर्शने हे दुसरे टोक; पण सर्वांनी सुखाच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवले आहे.

पाश्चिमात्य विचारवंत जेरमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडलेला उपयोगितावाद सांगतो की समाजातील जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळेल असे निर्णय योग्य. हा दृष्टिकोन लोकशाही, सार्वजनिक धोरणे व अर्थनीती यांमध्ये महत्त्वाचा ठरला. मात्र, त्यावर टीका झाली की यामुळे अल्पसंख्यांचा हक्क पायदळी तुडवला जाऊ शकतो.

२०११ पासून World Happiness Index प्रसिद्ध होत आहे. यात देशांची सहा निकषांवर क्रमवारी लावली जाते – प्रति व्यक्ती उत्पन्न, सामाजिक आधार, निरामय आयुर्मान, जीवननिवडीचे स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराचा अभाव. ह्या निर्देशांकात भारताची स्थिती चिंताजनक आहे : २०१३ मध्ये १५६ देशांत १११ वा क्रमांक, तर २०२४ मध्ये १३७ देशांत १२६ वा क्रमांक. फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन यांसारखे देश कायम शीर्षस्थानी असतात. भूतानने GDP ऐवजी Gross National Happiness हे मोजमाप स्वीकारले आहे. त्यात शाश्वत विकास, सांस्कृतिक जतन, पर्यावरण संरक्षण आणि चांगले प्रशासन हे चार स्तंभ आहेत. ही कल्पना जागतिक पातळीवर आदर्श मानली जाते.

वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा असला तरी सुखाचे मापन केवळ ह्या सहा घटकांपुरते मर्यादित करता येणार नाही. मानसिक आरोग्य, सामाजिक विषमता कमी करणे, सांस्कृतिक जीवनाचे संवर्धन, पर्यावरणीय संतुलन आणि सामुदायिक नाती ह्या परिमाणांचाही विचार आवश्यक आहे. ऐहिक सुखवृद्धीसाठी व्यक्ती, समाज आणि शासन ह्या तिन्हीं पातळ्यांवर प्रयत्न हवेत. व्यक्ती पातळीवर निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक नाती आणि सहानुभूती महत्त्वाची आहेत. समाज पातळीवर समान शिक्षण व रोजगार संधी, स्त्री-पुरुष समानता, लोककला व परंपरेचे संवर्धन आणि सामाजिक सुरक्षा जाळे आवश्यक आहे. शासन पातळीवर पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, भ्रष्टाचारावरील कठोर नियंत्रण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरणातील गुंतवणूक, ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यासाठी योजनाबद्ध विकास आणि पर्यावरणपूरक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन यावर भर द्यावा लागेल.
भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असला तरी विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, प्रदूषण, अतिरेकी शहरीकरण/नागरीकरण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या यांमुळे आनंद निर्देशांक घसरतो आहे. GDP वाढत आहे पण मानवसुख त्याच गतीने वाढत नाही. हेच सर्वात मोठे आव्हान आहे.

वस्तुतः शाश्वत विकास, सांस्कृतिक जीवनाचे जतन व संवर्धन, पर्यावरणीय संतुलन आणि सामुदायिक नाती ह्या बाबी “सर्वेपि सुखिनः संतु” ह्या संकल्पनेच्या परमावश्यक घटक ठरतात. शाश्वत विकास ह्या संकल्पनेत ‘परिसर वैशिष्ट्यांचा विकास’ हा घटक अग्रेसरच नव्हे तर परमावश्यक ठरतो, याशिवायचा विकास हा तकलादू ठरण्याचीच सर्वाधिक शक्यता असते. तथापि, ह्या सर्व बाबी आजच्या ह्या आधुनिकोत्तर व सत्योत्तर युगात आचरणासाठी दुष्कर ठरत आहेत. अशा परिस्थितीत, विशेष म्हणजे, निसर्गावर मात नव्हे तर निसर्गाची साथ ही सवय अनिवार्यपणे अंगीकारल्याशिवाय मानवाला वर नमूद परमावश्यक विकास-बाबी प्राप्य ठरणे अवघड आहे. त्यासाठी महात्मा गांधी, विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबासारख्या विचारकांच्या शाश्वत विचारांत डुबकी मारून ग्रामसंस्कृती, ग्रामीण समाज व परस्परावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे काही मोती पुन्हा ‘प्राप्त’ करावे लागतील. शिवाय हे मोती एकूणच (ग्रामीण व नागरी) समाजजीवनात पुनर्स्थापित करण्याची मानवी-वृत्ती जोपासत तिला समर्थन देणे क्रमप्राप्त ठरेल. एकंदरीत विनाशकारी ठरत असलेल्या अतिरेकी नागरीकरणाच्या व औद्योगिकीकरणाच्या लोलुपतेला आळा घालून सध्याची भकास ग्रामीण व्यवस्था कशी जतन, समृद्ध व वृद्धिंगत करता येईल ह्या विचाराला प्राथमिकता द्यावी लागेल.

ह्या सर्वाचा संक्षिप्त निष्कर्ष असा – सुखाचा शोध सामूहिक प्रयत्नांत अंतर्निहित असतो. “सर्वेपि सुखिनः संतु” ही प्रार्थना आणि पाश्चिमात्य उपयोगितावाद ह्या दोन्ही तत्त्वज्ञानांचा गाभा काहीसा समान भासत असला तरी त्यासाठी सर्वांच्या कल्याणासाठी संयम व करुणेसह सर्वांनीच प्रयत्नरत राहणे परमावश्यक ठरते. चार्वाकांनी ऐहिक सुखावर भर दिला; बौद्ध-जैनांनी संयम व करुणा; वेदांताने आत्मज्ञान; भक्तिसंप्रदायाने परमेश्वरभक्ती. ह्या सर्वांचा सुयोग्य संगम साधता आला तर सुखाचे अधिक सर्वंकष चित्र दिसते. आजच्या काळात सुखाचे मापन केवळ आर्थिक उत्पन्नावर न करता त्यात मानसिक आरोग्य, सांस्कृतिक जीवन, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आवश्यक आहे.

एकंदरीत व्यक्ती, समाज आणि शासन ह्या तिन्हीं पातळ्यांवर एकत्रित व समन्वित प्रयत्न झाले तरच “सर्वेपि सुखिनः संतु” ही प्रार्थना प्रत्यक्षात उतरू शकेल. अखेरीस, सुख हा केवळ व्यक्तिनिष्ठ अनुभव नाही, तर तो एक सामाजिक करार आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा घटकही सुरक्षित, निरोगी, समाधानी आणि आशावादी होणार नाही, तोपर्यंत आपल्या प्रगतीचे व विकासाचे मोजमाप अपूर्णच राहील. आणि म्हणूनच आजच्या अनिर्बंध अशा अतिरेकी वैयक्तिकतेला संयम, करुणा व सामूहिकतेच्या विशाल प्रवाहात स्वतःला झोकून देऊन त्यातूनच प्रवाहित व्हावे लागेल. तसेच व्यक्ती -> कुटुंब -> समाज -> ग्राम -> राज्य -> राष्ट्र हा चढत्या घटकत्वाचा निसर्गाधारित सिद्धांत पुनर्स्थापित करावा लागेल.

(हा लेख लिहिताना आंतरजालावरील कृत्रिम बुद्धिमत्तामय माहितीचा संदर्भ म्हणून वापर करण्यात आला आहे.)
बोरकन्हार-441902, ता.आमगांव,

जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र),
चलभाष : +91 7066968350

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.