जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास समाधान नेटवर्कचं एक वार्षिक प्रकाशन आहे. मार्च २०२५ मध्ये, फिनलँड सलग आठव्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो.
राष्ट्रीय आनंदाची क्रमवारी कॅन्ट्रिल लॅडर सर्वेक्षणावर आधारित आहे. यात सहभागींना एक शिडीची कल्पना करायला लावली जाते, ज्यात १० म्हणजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आयुष्य आणि ० म्हणजे सर्वात वाईट आयुष्य. त्यानंतर त्यांना त्यांच्या सध्याच्या आयुष्याला ० ते १० च्या प्रमाणात मोजायला सांगितलं जातं. यात शीर्षस्थानी असलेल्या सर्व देशांमध्ये सहा प्रमुख घटकांचं मूल्य जास्त आहे, जे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत: उत्पन्न, निरोगी आयुष्य, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य.
यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर (७.७४), अमेरिका २३व्या, जपान ५१व्या, चीन ६०व्या, इराक ९२व्या, नेपाळ ९३व्या, नायजेरिया १०२व्या, इराण १००व्या, भारत ११८व्या (४.०५) आणि अफगाणिस्तान सर्वात शेवटी १४३व्या (१.७२) स्थानावर आहे.
भारताच्या खाली कोण आहेत? मलावी, येमेन, रवांडा, बोत्सवाना, टांझानिया, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, झिम्बाब्वे, दक्षिण सुदान आणि अफगाणिस्तान.
भूतानसारख्या एका लहान देशाने विकासाचा मुख्य निर्देशांक म्हणून सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product) ऐवजी सकल राष्ट्रीय आनंद (Gross National Happiness) स्वीकारला आहे. हे सगळं वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि पाकिस्तान कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. काय वाटतं तुम्हाला? तो भारताच्या वरती १०८व्या स्थानावर आहे. यावर विश्वास ठेवणे आणि हे पचवणे किती कठीण आहे ना?
२०२० मध्ये पाकिस्तानला दक्षिण आशियातील सर्वात आनंदी देश म्हणून स्थान मिळालं होतं. यापूर्वी भूतानला हा सन्मान मिळाला होता. जेव्हा आपण पाकिस्तानकडे पाहतो, तेव्हा एक प्रश्न नक्कीच उद्भवतो की धार्मिक कट्टरतावाद, दारिद्र्याने ग्रस्त, सैनिकी कारवाईत अडकलेला आणि जागतिक दहशतवादी कारखाने पोसण्यासाठी ओळखला जाणारा देश “आनंदी” कसा असू शकतो?
आणि मग आपल्या देशासारखा, जो एक मोठी बाजारपेठ म्हणून जगाचे लक्ष वेधून घेत आहे, ज्या देशात लोकशाही मूल्ये खोलवर रुजलेली आहेत, जो सर्व धर्मांमध्ये समभाव मानतो, दरवर्षी एका लहान देशाच्या लोकसंख्येएवढा मध्यमवर्ग निर्माण करत आहे आणि जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तो “आनंदी देश” का असू शकत नाही?
आनंदी देशाच्या निवडीचे निकष वेगवेगळे असू शकतात, तरीही मी तुमचे लक्ष सध्याच्या परिस्थितीत मानवी जीवनात आनंदावर प्रभाव पाडणाऱ्या दोन घटकांकडे वेधून घेऊ इच्छितो. पहिला घटक आहे माध्यमे (Media) आणि दुसरा घटक आहे जीवनातील विनोद (Humour in Life).
माध्यमे खरंच कधी स्वतंत्र होती का, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते. माध्यमांचा एक मोठा हिस्सा सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आहे. आजच्या काळात त्यांची नैतिकता पूर्णपणे खालावली आहे. हे त्याचे सर्वात सोपे स्पष्टीकरण आहे! माध्यमे आणि सरकारने एकत्र येऊन राष्ट्रवादाची एक नवीन संकल्पना जन्माला घातली आहे आणि माध्यमे आपल्या नेहमीच्या, उच्च आवाजात आजचा राष्ट्रवादी कोण आहे, याची सतत चर्चा करत आहेत. गेल्या काही वर्षातील टीव्हीवरील बातम्या पाहिल्या तर, स्थलांतरित कामगारांच्या स्थलांतराच्या चर्चेव्यतिरिक्त, जवळजवळ सर्व चर्चा भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम, काश्मीर इत्यादींवर केंद्रित होत्या. आज राष्ट्रीय स्तरावर एकही पत्रकार असा नाही, ज्याला निःपक्षपाती म्हणता येईल. पत्रकारांचे साध्या भाषेत वर्गीकरण करायचे झाल्यास, फक्त दोन श्रेणी शिल्लक आहेत, मोदींवर प्रेम करणारे पत्रकार आणि मोदींचा तिरस्कार करणारे पत्रकार. दररोज द्वेष ओकणाऱ्या आणि उन्मादाच्या अवस्थेत असलेल्या माध्यमांनी भारतीय जनतेकडून खूप आनंद हिरावून घेतला आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी माध्यमांनी खूप स्वातंत्र्य उपभोगले (त्यांची सत्ता घालवण्यात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती). अल्लाह, सैन्य आणि भारत (मुख्यतः काश्मीर) या विषयांव्यतिरिक्त पाकिस्तानी माध्यमे भारतीय माध्यमांपेक्षा चांगल्या बातम्या देतात. बहुतेक वेळा, पाकिस्तानी माध्यमे देशांतर्गत मुद्दे जसे की अर्थव्यवस्था, बेरोजगारी, गरिबी आणि सरकारच्या धोरणात्मक अपयशांवर भर देणाऱ्या चर्चांवर लक्ष केंद्रित करतात. पाकिस्तानी माध्यमांमधील चर्चा शांत आणि संयमित असतात, पॅनल चर्चेसाठी जास्तीत जास्त चार सदस्य बोलावले जातात आणि बहुतेक चॅनेल राजकीय प्रवक्त्यांना आमंत्रित करत नाहीत. बातम्यांची अतिशयोक्ती केली जात नाही. सरकारला दररोज प्रश्न विचारले जातात. हसन निसार, कामरान शाहिद, आफ्रिन उल नूर, हामिद मीर, नसीम झायरा, नजम सेठी, कमर चीमा, मोना आलम आणि इतर अनेक पत्रकार आहेत, जे देशांतर्गत मुद्द्यांवर खूप चांगले बोलतात.
भारतासोबतचे शत्रुत्व परवडणारे नाही, काश्मीरवरील हक्क सोडून देणे इत्यादींसारख्या मुद्द्यांवरही ही माध्यमे चर्चा करतात. ओर्या जान मकबूल आणि झायेद हमीद यांसारखे कट्टर मूलतत्त्ववादी माध्यमांमध्ये येतात, परंतु त्यांचा समाजात फारसा प्रभाव नाही. मारवी सरमद आणि परवेझ हुडभॉय यांसारखे विचारवंतही आहेत, जे हिंदूंच्या हक्कांसाठी लढतात. तुम्ही कधीतरी यूट्यूबवर पाकिस्तानी माध्यमे नक्की पहा आणि त्यांचा अभ्यास करा. ते नक्कीच आपल्या माध्यमांसारखे उन्मादी होत नाहीत.
दुसरा घटक म्हणजे रोजच्या जीवनात विनोदाची भूमिका. विनोदाच्या बाबतीत पाकिस्तान आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. तिथला विनोद खूप सभ्य आणि उच्च दर्जाचा असतो. पाकिस्तानी माध्यमांमधील विनोदाचा दर्जा किती उच्च आहे, याची मी दोन उदाहरणे देत आहे. ‘दुनिया न्यूज’ वाहिनीवर सलीम जुनैद नावाचे एक पत्रकार “हसब-ए-हाल” नावाचा एक कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की, अझीज नावाचा एक कलाकार दररोज एका सेलिब्रिटीच्या वेशात येतो आणि त्याला विचारलेल्या प्रश्नांना विनोदी पद्धतीने उत्तरे देतो. दुसरा कार्यक्रम “लूज टॉक” अनवर मसूद आणि मोईन अख्तर यांचा आहे. हे दोन्ही कार्यक्रम एकदा तरी पाहण्याचा प्रयत्न करा, या कार्यक्रमातील विनोदाचा दर्जा अत्यंत उच्च आहे आणि तरीही त्यात एकही शब्द अश्लील किंवा आक्षेपार्ह आढळणार नाही.
याउलट, भारतातील लोक अनावश्यकपणे गंभीर चेहरा धारण करतात. आपल्यामध्ये एक गैरसमज आहे की जे लोक गंभीर चेहऱ्याने बोलतात ते अत्यंत जबाबदार लोक असतात आणि त्यामुळेच भारतीयांची सरासरी विनोदबुद्धी खूप, खूप कमी आहे. आपल्या स्टँड-अप कॉमेडियन्सकडे पहा; त्यांच्यापैकी कोणाचेही सादरीकरण अश्लीलता किंवा शिव्याशाप दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, आणि त्या सर्वांची बोलण्याची पद्धत सारखीच आहे. जेव्हा कुणाल कामरा, झाकीर खान, वरुण ग्रोवर यांसारखे चांगले लेखकही शिव्या आणि शाप देऊन विनोद करतात, तेव्हा विनोदाचा दर्जा घसरत असल्याचे स्पष्ट होते. त्यात भर म्हणजे, आपला समाज कोणत्याही गोष्टीमुळे सहज भावना दुखावून घेणारा आहे आणि म्हणूनच आपण आनंदाच्या सर्वात स्वस्त स्त्रोतापासून म्हणजेच विनोदापासून दूर जात आहोत. एखादी खरोखरच चांगली विनोदी पोस्ट पाहून स्मायली इमोजी पाठवतानाही लोक कद्रूपणा करतात किंवा निरुत्साही असतात.
आज भारतातील शहरी मानवी जीवन इतक्या तणावाखाली आहे की, मेट्रो शहरांमधील प्रत्येक सातव्या नागरिकाला मानसोपचार तज्ज्ञांची मदत लागते. आयुष्य एका अंतहीन भौतिक आनंदाचा पाठलाग करण्यात घालवले जाते. अशा परिस्थितीत, आपल्या आयुष्याला थोडे अधिक आनंदी बनवण्यासाठी, आपण विनोदाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले पाहिजे.
पण आनंद म्हणजे काय?
आपण हा शब्द इतक्या सहज वापरतो, तो नेहमी काहीतरी मिळवणे, प्राप्त करणे किंवा साध्य करणे याच्याशी जोडलेला असतो. पण आनंद तर त्यापेक्षा खूप व्यापक आणि परिपूर्णतेचा अर्थ दर्शवणारा आहे.
मग आपल्याला विचार करायला हवा – भारतातील बहुसंख्य लोक दुःखी का आहेत? मी नेहमीच पाहिले आहे की, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक नेहमी रागावलेले असतात. त्यांना कशाने राग येतो हे त्यांना देखील कळत नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की या सगळ्याचे मूळ आपल्या राजकीय आणि न्यायिक व्यवस्थेत आहे. लोक पाहतात की कुठलेही राजकारणी काहीही केले तरी सहजी सुटतात. परंतु हा राग, जर चांगल्या प्रकारे हाताळला नाही, तर थोड्याशा चिथावणीने देखील भडकू शकतो.
त्यात भर म्हणजे सामाजिक व्यवस्था, जी लोकांना लहानपणापासूनच ढोंगी आणि दांभिक जीवन जगायला लावते.
आपला जन्म लैंगिक संबंधातून होतो, पण आपण लैंगिकतेला नकार देतो.
अनेक लोक दावा करतात की त्यांचा देवावर विश्वास नाही, पण संकटाच्या वेळी, ‘माझ्यासोबतच का?’ असा मोठा प्रश्न विचारत ते सर्वात आधी त्याच्या पाया पडायला धावतात.
एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे हे मोठे पाप मानले जाते. परंतु आपण शारीरिकदृष्ट्या प्रामाणिक राहिलो तरी देखील मानसिक व्यभिचार करण्यात तत्पर असतो. त्यातून मग पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या नियमावली झाल्या आहेत.
कोणतेही काम करताना, ते योग्य (पुण्य) आहे की अयोग्य (पाप) या विचारात आपण नेहमी अडकतो आणि अपरिहार्यपणे आपण अपराधाच्या भावनेत जखडत जातो.
ही सर्व कसरत प्रचंड गोंधळ निर्माण करते आणि म्हणूनच आपण नेहमी दुःखी असतो.
शिवाय, आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी नाही, परंतु आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी आपण सर्वजण तणावात आणि दुःखी असतो. तुमच्याकडे सँट्रो आहे, पण तुम्हाला सिटी हवी आहे; तुमच्याकडे सिटी आहे, पण तुम्हाला स्कोडा हवी आहे. मर्सिडीझ घेतली तरी दुसऱ्याची ऑडी बघून आपण कष्टी होतो, नवीन फोन खरेदी केल्यानंतर लगेच आपल्याला दुसरा फोन हवा असतो. चांगला लॅपटॉप, मोठा टीव्ही, वेगवान कार, मोठे घर, अधिक पैसे.. ही उदाहरणे अंतहीन आहेत. मुद्दा असा आहे की, हे खरोखरच महत्त्वाचे आहे का? आपल्याला त्या गोष्टी हव्या असण्यापूर्वी आपल्याला त्यांची खरोखर गरज आहे का, याचा आपण कधी विचार करतो का?
नीट विचार केला तर लक्षात येते की एक गोष्ट आपल्याला कायम तणावात ठेवते ती म्हणजे “कनेक्टेड असण्याचा” सिंड्रोम. आपल्या घरातही आपण मेसेंजरवर लॉग इन असतो, ईमेल तपासत असतो, सोशल नेटवर्क्स वापरत असतो आणि आपलाच मोबाइल आपल्यालाच डिस्कनेक्ट होऊ देत नाही. मला जाणवले की आपण जे कमावतो त्यापेक्षा खूप कमी खर्च करत असलो तरी सुद्धा आपण आणखीन पैशाबद्दल कायम चिंतेत असतो. आपल्याला कधीही गरज भासेल त्यापेक्षा कदाचित जास्त पैसे आपण वाचवत असतो, तरीही आपण उत्पन्न आणि खर्चाबद्दल सतत तणावात असतो.
मग प्रश्न असा आहे की ‘आनंदी कसे रहावे?’
आपल्या आधीची पिढी इतक्या कमी गोष्टीत खूप आनंदी असण्यामागे मूळ कारण हे आहे की, त्यांना जीवन आलिशान करणार्या गोष्टींची गरज नव्हती, तर त्यांना फक्त त्यांचे जीवन सोपे करणार्या गोष्टी हव्या होत्या. या दोन्हींमध्ये एक खूप बारीक रेषा आहे, माझ्या वडिलांच्या जीवनशैलीची आठवण करता मला जाणवते की त्यांना सेल फोनची गरज होती, पण आयफोनची नाही. त्यांना टीव्हीची गरज होती, पण ५२” प्लाझ्माची नाही. त्यांना कारची गरज होती, पण महागडी असण्याची आकांक्षा नव्हती.
खरं तर आयुष्य एकच आहे, एक दिवस गेला म्हणजे कायमचा गेला. मला खात्री आहे की जर मी आज रात्री आनंदी नसेन, तर मी उद्या सकाळी कसा आनंदी असेन? शक्यच नाही. मला जाणवते की मित्रांना भेटणे, आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवणे आणि स्वतःसोबत वेळ घालवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःला एकटेपणा छळत असेल अथवा तुमच्याशी बोलण्यासाठी कोणीही नसेल, तर ते सर्व आलिशान जीवन, ते सर्व पैसे वाया गेले आहेत. आपल्या आयुष्यात आनंद आणि पैसा यात कशाला प्राधान्य द्यायचं हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.
मी कुठेतरी खुशवंत सिंग यांचा आनंदाबद्दलचा एक लेख वाचला होता.
ते म्हणाले होते – ‘मी एक समाधानी जीवन जगलो आहे, आणि एखाद्या व्यक्तीने आनंदी होण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे, यावर विचार करत होतो. मी काही अत्यावश्यक गोष्टींची एक यादी तयार केली, जी मी वाचकांनी विचार करावा म्हणून मांडत आहे.’
आनंदासाठी आठ सूचना (EIGHT CLUES TO HAPPINESS)
१. सर्वात आधी म्हणजे चांगले आरोग्य (GOOD HEALTH).
२. दुसरे, बँक शिल्लक (HEALTHY BANK BALANCE).
३. तिसरे, स्वतःचे घर (HOME OF YOUR OWN).
४. चौथे, समजूतदार साथीदार (AN UNDERSTANDING COMPANION).
५. पाचवे, ज्यांनी आयुष्यात तुमच्यापेक्षा चांगली प्रगती केली आहे, त्यांच्याबद्दल मत्सराचा अभाव (LACK OF ENVY).
६. सहावे, गप्पांसाठी लोकांना तुमच्याबद्दल बोलण्याची वेळ आणू नका (DO NOT ALLOW OTHER PEOPLE to descend on you for gup-shup).
७. सातवे, काहीतरी छंद जोपासा (CULTIVATE SOME HOBBIES).
८. आठवे, दररोज सकाळी आणि संध्याकाळी, १५ मिनिटे आत्मचिंतन (INTROSPECTION) करा.
शेवटी, आनंदी लोकांकडे नेहमीच सर्वकाही सर्वोत्तम असते असे नाही; त्यांच्याकडे जे काही आहे, त्यातून ते सर्वोत्तम बनवतात.
हे सगळं वाचून मला जाणवले की शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे, आपण ‘वर्तमानात जगायला’ शिकले पाहिजे. आपण भूतकाळाचे ओझे किंवा भविष्याच्या चिंता न बाळगता क्षणोक्षणी जगले पाहिजे. एकदा आपण प्रत्येक क्षण अशा प्रकारे जगलो, की आपल्याला कोणालाही “आनंदी कसे रहावे?” असे विचारावे लागणार नाही. आपण शाश्वत आनंदात असू.
‘आयुष्य, वादळाला कसे सामोरे जावे, याबद्दल नाही, तर पावसात कसे नाचावे, यासाठी आहे.’
आनंदी रहा (BE HAPPY)