“मेकॉलेने एका झटक्यात हजारो वर्षांतील आमचे ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, जीवनशैलीला कचराकुंडीत फेकले होते. आपल्या संस्कृती, परंपरेचा आपल्याला गर्व असला पाहिजे. मेकॉलेने १८३५ मध्ये जो गुन्हा केला होता त्यास २०३५ मध्ये दोनशे वर्षे होतील. त्यामुळे, मेकॉलेने भारताला जी मानसिक गुलामी दिली त्यापासून पुढील दहा वर्षांत मुक्ती मिळवायचा संकल्प आपल्याला करायचा आहे.” असे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या रामनाथ गोएंका व्याख्यानात केले. ज्या मेकॉलेने ‘भारतीय दंड संहिते’चा मसुदा तयार केला, त्याच मेकॉलेला गुन्हेगार ठरवण्याची किमया पंतप्रधानांनी करावी, हा विसंगतीचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या भाषणामुळे मेकॉले पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीयांविषयी मेकॉलेच्या मनात आकस होता का? मेकॉलेच्या विचारांचे विकृतीकरण होत आहे का? ह्याविषयी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मेकॉलेने तयार केलेल्या शिक्षणपद्धतीवर, कायद्यावर चर्चा करणे इथे समयोचित ठरले आहे. मेकॉलेच्या निर्णयातील उद्देश, त्याने सुचविलेला पर्याय आणि त्याचे भारतीय समाजमनावर झालेले परिणाम ह्या अनुषंगाने विचारमंथन होणे आवश्यक आहे.
लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मेकॉले ह्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १८०० मध्ये झाला. १८१८ मध्ये केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. एक बुद्धिमान विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी कायद्याची पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांचे नाव झॅकरी होते. काळे आणि गोरे हा वर्णभेद मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गुलामांची बाजू घेत त्यांनी गुलामगिरी प्रथेविरुद्ध लढा दिला. अशा उदारमतवादी संस्कारात थॉमस मेकॉलेचे बालपण गेलेले आहे. लहानपणी त्यांच्या खेळण्यांची जागा पुस्तकांनी घेतली होती. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत होते. १८२३ पासून त्यांनी एडिंबरो रिव्ह्यू ह्या नियतकालिकातून लिहायला सुरुवात केली. स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि जुलूमशाहीचा विरोधक कवी जॉन मिल्टनवर त्यांनी सर्वप्रथम लेखन केले. तर्काधिष्ठित लेखन हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. ह्या नियतकालिकाचे ते एक महत्त्वाचे लेखक होते. इतिहासकार, कवी, राजकारणी, प्रशासक मॅकॉलेची विचारसरणी नेमकी कशी होती, हे आपण समजून घ्यायला हवे.
मेकॉलेवर पुढीलप्रमाणे आरोप केले जातात –
- भारतीय संस्कृती, भाषा, ज्ञानपरंपरा ह्यांचे अवमूल्यन केले.
- भारतीय शिक्षणप्रणालीला पाश्चात्त्य साच्यात बसवून, ‘गुलामी मानसिकता’ निर्माण केली.
- भारतीय समाजाला इंग्रज बनविले.
भारतीयांच्या शिक्षणासाठी इंग्रजी भाषा योग्य आहे, असे मॅकोलेचे मत होते. भारतासारख्या बहुभाषिक देशातील कारभारात एकसूत्रीकरण आणण्यासाठी इंग्रजी भाषा सोयीची आहे, असे इंग्रज राज्यकर्त्यांना वाटू लागले होते. मॅकोलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक ह्यास शिक्षणविषयक अहवाल सादर केला. बेंटिंकने ह्या अहवालास सहमती दर्शविली. त्याआधीच बेंटिंकने १८२९ मध्ये राजा राममोहन रॉय ह्यांच्या मदतीने सती प्रथेवर पूर्णपणे बंदी घातली होती. ह्या प्रथेचा पुरस्कार करणाऱ्या उच्चवर्णियांनी ह्या बंदीला प्रचंड विरोध केला, परंतु न्यायव्यवस्थेपुढे त्यांना हार मानावी लागली. मेकॉलेच्या अहवालावरील बेंटिंकच्या सहमतीनुसार ७ मार्च १८३५ रोजी ठराव प्रसिद्ध झाला. पुन्हा एकदा उच्चवर्णियांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय आणि शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवावेत, संस्कृत व अरबी भाषेतील ग्रंथाच्या अभ्यासापेक्षा इंग्रजी भाषेतील ग्रंथ अभ्यासणे अधिक मोलाचे आहे. संस्कृत व अरबी भाषेतून शिक्षण देणे म्हणजे खऱ्या विज्ञानाच्या प्रसाराला विरोध करण्यासारखे आहे. अरबी व संस्कृत ग्रंथाच्या प्रती अडगळीत पडतात तर इंग्रजी भाषेतील ग्रंथाच्या छपाईचा खर्च निघून वर वीस टक्के नफा मिळतो. अंधश्रद्धा पोसणाऱ्या पारंपरिक ग्रंथछपाईसाठी अधिक पैसे खर्च करू नयेत’, असे मॅकोलेच्या अहवालात म्हटले आहे. वेद, उपनिषदे, पुराण, लोककथा, दंतकथा, देवतांच्या कथा, धर्मशास्त्र हे अंधश्रद्धेला पूरक असून पाश्चिमात्य साहित्यात विज्ञानवादी विचारधारा आहे. त्याकरिता पाश्चात्य साहित्य इंग्रजी भाषेतून भारतीयांना शिकवावे असे मेकॉलेचे मत होते. काल्पनिक कलाकृतीपेक्षा सत्य आणि वास्तव लेखन त्याला महत्त्वाचे वाटत होते. आधुनिक शिक्षणाने अंधश्रद्धा नष्ट होऊन ज्ञानसूर्य उगवण्याची आस त्याने धरली होती. सनातनी विचारसरणीच्या लोकांना ही गोष्ट दुखावणारी असली तरी ज्ञान-विज्ञानाच्या नवविचाराकडे आकृष्ट होणारी मंडळी इंग्रजीतून हे ज्ञान घेण्यास उत्सुक होती. जुन्या परंपरागत शिक्षणपद्धतीपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी शिक्षणपद्धती असावी, असे त्यांना वाटत होते.
खरे पाहता मेकॉलेने इंग्रजी भाषा भारतीयांवर लादली, ह्या आरोपामुळे अनेकजण त्यांना दूषणे देतात. तसे पाहिले तर ह्या आरोपात काही तथ्य नाही. मेकॉलेने त्याचा खलिता लिहिण्यापूर्वीच म्हणजे १८३५ पूर्वीच भाषेच्या आकर्षणातून भारतीयांनी इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य शास्त्रे शिकण्यास सुरुवात केली होती. इंग्रजी भाषा आणि साहित्य ह्याबद्दल अनेकांच्या मनात रुची निर्माण झाली होती. बंगाल, गुजरात, पुणे भागातील उच्चजातीय वर्गाचा कल इंग्रजी शिकण्याकडे अधिक होता. इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी सरकारला अर्ज देण्याचे कामही त्यांनी केले होते. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण आधीच निर्माण झाले असल्याने शिक्षण इंग्रजीतून असावे, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे वैचारिक बदलास सुरुवात झाली होती. त्यातूनच पुढे स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली. ही बाब जर ध्यानात घेतली तर मेकॉलेला विकासाच्या मार्गावरील प्रकाशझोत म्हणावे लागेल.
राजाराम मोहन राय ह्यांनीही संस्कृत भाषेऐवजी इंग्रजी भाषेला समर्थन दिले होते, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ‘संस्कृत भाषेतून शिक्षण देणे म्हणजे देशातील लोकांना अज्ञानाच्या अंधारात ठेवणे आहे,’ असं ते म्हणत. सुधारक असूनही ब्राह्मणी धर्माची चौकट मात्र त्यांना तोडता आली नाही. संस्कृत महाविद्यालयाला विरोध करून १८२५ ला कलकत्ता येथे त्यांनी स्वतःच वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली. मूर्तीपूजेला विरोध करत ईश्वरी तत्त्वज्ञानाचा आणि उपासनापद्धतीचा प्रचारही केला… असो. आजही इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय अनिवार्य असावा ह्या मताविषयी बहुजनसमाज ठाम आहे. ज्ञान-विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, हे त्यांना आता समजले आहे. आज ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताची जी काही प्रगती दिसते त्यामध्ये इंग्रजी भाषेचा मोठा हातभार आहे, हे मान्य करण्यापलीकडे आपणास पर्याय नाही.
आपल्या देशात संस्कृतीच्या नावाखाली अनिष्ट परंपरांचे प्राबल्य होते. सती प्रथा, केशवपन ह्यांसारख्या अनिष्ट गोष्टी संस्कृती आणि परंपरेवरचे प्रेम म्हणून चालूच होत्या. जातिव्यवस्थेमुळे खालच्या जातीवरील लोकांवर अन्याय करण्याचा जणू परवानाच मिळालेला होता. चार्टर कायदा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कायदा. चार्टर कायद्यानुसार केवळ धर्मावरून नोकरीची संधी नाकारणे बेकायदेशीर ठरविले. १८३३ च्या चार्टर कायद्याअंतर्गत १८३४ मध्ये मेकॉलेच्या अध्यक्षतेखालील भारतीय दंड संहितेचा मसुदा पहिल्या कायदा आयोगाने तयार केला होता. ही संहिता (इंडियन पिनल कोड) १ जानेवारी १८६२ रोजी लागू झाली. भारतीय दंड संहितेनुसार सर्व जातिधर्मासाठी समान कायदा झाला. धर्म आणि परंपरेचा दुजाभाव ठेवणारा न्याय निकालात निघाला. आपली संस्कृती आणि परंपरा गाणाऱ्या लोकांना भानावर आणण्याचे काम कायद्याच्या चौकटीने केले. कायदा हा सर्वांसाठी समान असतो हा समतामूलक विचार इथल्या मनुवादी व्यवस्थेला हादरा देणारा होता. कायद्यानुसार अमानवीय व्यवहाराला खीळ बसली. मनुस्मृतीनुसार उच्चवर्णियांना शिक्षेतून सूट मिळायची. इंग्रजांनी आणलेल्या कायद्यामुळे उच्चवर्णियांनाही शिक्षा होऊ लागली होती, ही गोष्ट इथल्या सनातनी विचारांच्या लोकांना मुळीच भावली नाही. त्यामुळे इंग्रज हे आपले विरोधक आहेत, ही भावना प्रबळ होऊ लागली.
मेकॉलेने भारतीयांवर मानसिक गुलामगिरी लादली का?
राज्य चालवण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान असलेले बुद्धिजीवी, नोकरशहा असे मनुष्यबळ आवश्यक होते. कार्यकुशलतेने प्रशासन चालवणे हा ह्यामागचा उद्देश होता. इंग्रज येण्यापूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धती अस्तित्वात होती. ह्यात उच्चवर्णीय विद्यार्थीच शिकू शकत होते. पण मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे पुढे सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या. १८५३ मध्ये भारतातील शिक्षणाचे सर्वसमावेशक सर्वेक्षण होण्याच्या दृष्टीने ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ समिती नेमली गेली. संचालकमंडळाने ह्याचा अहवाल १९ जुलै १८५४ मध्ये पाठवला. ह्या अहवालास ‘वूडचा अहवाल’ असे म्हणतात. चार्ल्स वूड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’चे अध्यक्ष होते. त्यांच्या आग्रहावरून हा अहवाल लिहिला गेला. ह्यात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे ह्यावर जोर दिला आहे. ह्या अहवालानुसार काही चांगले बदलही भारतीयांना अनुभवता आले. गावपातळीवर प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आल्या. पाच प्रांतात शिक्षणखात्यांची स्थापना झाली. १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाली. हुशार व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू लागला. खालच्या वर्गासाठीही शिक्षणाचा खर्च आणि संसाधने वाढल्याने मेकॉलेचा ‘पाझर सिद्धांत’ आपोआप संपुष्टात आला. १८३५ च्या दरम्यान ब्रिटिशांनी सैन्यावर जास्त खर्च न करता शिक्षणावर केला असता तर, कदाचित मेकॉलेने पाझरचा सिद्धांत मांडला नसता.
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शिष्यवृत्तीचा विचार वूडच्या अहवालात होता. ह्यामुळे मनुवादी विचाराच्या लोकांचे पोट दुखणे साहजिक होते. शिक्षणाच्या बाबतीत इंग्रजांनी समतावादी धोरण लावून धरण्याचे काम केले. त्यांनी वसाहतवादी धोरणाला पूरक असलेले शिक्षण देण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी शिक्षणात क्रांतीची बीजे असतात हे आपण समजून घ्यायला हवे. उदारमतवादी विचार, लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्याचा विचार हा त्यांनी दिलेल्या शिक्षणातूनच आलेला आहे. नाहीतर बहुजन समाजाला मनुस्मृतीच्या बंधनात जगणे भाग पडले असते. पुराणातील अंधश्रद्धा सोडून विज्ञानाकडे झेप घेणे हे मुक्तीचे साधन आहे व सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग इंग्रजी भाषेमुळे मिळू लागला आहे, ह्याची जाणीव बहुजनवर्गाला झाली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे हे इंग्रजी भाषेमुळे झाले आहे. त्यामुळे मेकॉलेने गुलामी मानसिकता तयार केली, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. भारतीय समाजमन मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याने आपल्या पंतप्रधानांना त्याची काळजी वाटत असावी. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांनी अनेकदा अवैज्ञानिक टिप्पणी केलेली आहे, जी समाजमाध्यमांवर आजही पाहता येईल. अंधश्रद्धेला तिलांजली देत विज्ञानवाटेकडे निघालेला मेकॉले पचनी न पडणे, हे विकसित भारताच्या स्वप्नासाठी अत्यंत घातक आहे!
लेखक चंद्रभान प्रसाद ह्यांनी उत्तरेत इंग्रजी देवीचे मंदिर बांधले असून ते मेकॉले ह्यांचा ‘दलितांचा भाग्यविधाता’ असा गौरवपूर्ण उल्लेख करतात. दरवर्षी मॅकोलेचा वाढदिवस कृतज्ञतापूर्वक साजरा करतात. इंग्रजी भाषा ही दलितांची देवी आहे कारण ह्या देवतेमुळेच शिक्षणापासून आणि प्रगतीपासून शतकानुशतके वंचित राहिलेल्या लाखो दलितांना ज्ञानसंपादनाची आणि विकासाची समान संधी मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे. दलितांना शिक्षण, नोकऱ्यांची संधी, प्रगतीच्या खुल्या वाटा, आधुनिकतेचे फायदे आणि एकूणच वरच्या सामाजिक स्तरात प्रवेश व प्रगती करण्याची प्रेरणा आणि संधी ह्या साऱ्या गोष्टी इंग्रजीमुळे मिळाल्या असे ते अभिमानाने सांगतात. हिंदू धर्मातील अस्पृशतेने मानवी मूल्यांची राख केली. हिंदू धर्मात दलितांना प्रतिष्ठा नव्हती. मात्र इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्यात अस्पृश्यता आड येत नव्हती. नोकरीमुळे प्रतिष्ठा मिळत गेली.
मेकॉलेने भारतीयांना इंग्रज बनवले का? म्हणजे त्यांना शरीराने भारतीय आणि विचाराने इंग्रज बनवायचे होते का? हे लोक रक्ताने आणि वर्णाने भारतीय असले तरी त्यांची अभिरुची, मते, विचारपद्धती इंग्रजी असेल अशी त्याची अपेक्षा होती. ह्याचा अर्थ प्राचीन भारतीय वाङ्मयातील अवास्तव कल्पना, तर्कहीन गोष्टी, अंधश्रद्धा सोडून भारतीयांनी ब्रिटिशांसारखा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा असे त्याचे म्हणणे होते, हे समजून घ्यायला हवं. मॅकोलेबद्दल पूर्वग्रहदूषित विचार असलेल्या सनातनी विचारांच्या लोकांनी त्याची नेहमीच उपेक्षा केली आहे.
ऑगस्ट २००६ च्या ‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ ह्या नियतकालिकात ‘राष्ट्र गुलाम कशामुळे होते?’ ह्या शीर्षकाखाली मेकॉले ह्यांचा मजकूर दिला आहे. तो पुढीलप्रमाणे – ‘मी भारतात खूप फिरलो. ह्या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा ह्या देशाचा कणा आहे. आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की, परदेशी आणि विशेषतः इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीपेक्षा उच्च थोर आहे, तरच ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते जसे आपल्याला हवे आहेत तसे बनतील. एक गुलाम राष्ट्र!’ असाच मजकूर इतरही नियतकालिकात येत होता. हा मजकूर खोटा असल्याने त्याचा प्रतिवाद करण्यासाठी, मेकॉलेचे सत्यस्वरूप दाखविण्यासाठी जनार्दन वाटवे आणि विजय आजगावकर ह्यांनी ‘मेकॉले – काल आणि आज’ हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकात म्हटले आहे की, ‘मेकॉले ही केवळ व्यक्ती नसून एक आधुनिक विचारपद्धती आहे व मेकॉलेला विरोध करणारे परंपरावादी, मॅक्समुलर, मार्क्स व संपूर्ण मुस्लिम समाज ह्यांना विरोध करतात. दुसऱ्या शब्दात मेकॉलेचे विरोधक अद्यापही पूर्वीएवढेच व पूर्वीप्रमाणेच असत्यवादी आहेत.’ म्हणजे मेकॉलेला केवळ आजच विरोध होतो आहे असं नव्हे; तर हा विरोध हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेल्या संघटना पहिल्यापासूनच करत आहे. शिक्षण ही फक्त ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी होती. शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, असे ही व्यवस्था सांगत होती. मेकॉलेने निदान त्यापुढची पायरी सांगितली. मर्यादित संसाधने असल्यामुळे शिक्षण हे उच्चवर्गाकडून कनिष्ठवर्गापर्यंत झिरपत जाईल, असे त्याने सांगितले. त्याकाळाच्या चौकटीत राहून हे विचार मांडले आहेत. वूडच्या अहवालानुसार प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे स्थापन केल्यानंतर शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु शिक्षणाची प्रगती अपेक्षेप्रमाणे झाली नाही. महात्मा फुले ह्यांनी पुढची पायरी सांगितली. शिक्षण हे अस्पृश्य, उपेक्षित आणि स्त्रिया ह्या सर्वांना दिले पाहिजे, अशी भूमिका ते १८८२ मध्ये स्थापन झालेल्या ‘हंटर शिक्षण आयोगा’पुढे सादर करतात. एकंदरीत, प्रत्येक टप्प्यावर शिक्षणाबाबत वेगळा विचार पुढे आला आहे. ह्यात शिक्षण हे केवळ उच्चवर्णियांपुरतेच मर्यादित असावे, ही भूमिका सगळ्यांत मागासलेपणाची ठरते.
शिक्षण नाकारलेल्या जातींना व स्त्रियांना मेकॉलेच्या धोरणाने काहीसा फायदा झाला. मात्र त्यातूनच पुढील काळात मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून येते. ब्राह्मणी व्यवस्थेने शिक्षणबंदी करणे आणि अत्यंत विषमतावादी तसेच अंधश्रद्धा पोसणाऱ्या पोथ्यांचे कथन ज्ञान म्हणून पुढे रेटणे ह्या दुष्ट प्रक्रियेला आधुनिक सार्वजनिक शिक्षणाच्या मेकॉलेप्रणित वसाहतवादी धोरणाने मोठा छेद दिला. त्यातून आधुनिक भारतातील मूलगामी परिवर्तन गतिमान झाले, सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याबद्दल आशादायी राहता आले. मेकॉलेला नाकारणे म्हणजे विज्ञानाऐवजी पोथ्या पुराणांना कवटाळून अन्यायी, विषमतावादी व्यवस्था निर्माण करणे होय.
मनुस्मृतीवर आधारित संविधान निर्माण केले पाहिजे असे हिंदुत्ववादी संघटना सातत्याने मांडत असतात. ज्यांनी डार्विनला अभ्यासक्रमातून हद्दपार केले, त्यांनाच मेकॉले नकोसा झाला आहे. स्वतःच्या वर्चस्वासाठी प्रस्थापित वर्ग शिक्षणाचा उपयोग करत आहे. सामाजिक न्यायाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पना केवळ बेगडी असून प्राचीन परंपरेचे गोडवे गात अध:पतनाकडे नेणारा हा प्रवास आहे. तोंडाने वसुधैव कुटुंबकम् म्हणणाऱ्या सनातनी परंपरेला आपले एक वेगळे सांस्कृतिक वर्चस्व ठेवायचे आहे. मराठी शाळा बंद पाडून हजारो विद्यार्थ्यांना अज्ञानाचा अंधकारात ढकलायचे आहे. शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या सरकारी नीतीविरुद्ध संविधानाच्या मार्गाने संघर्ष करण्याशिवाय आपल्याकडे सध्या तरी कुठलाही पर्याय नाही!
संदर्भ:
1. मराठी विश्वकोश (आंतरजाल),
2. मेकॉले काल आणि आज, डॉ. जनार्दन वाटवे, डॉ. विजय आजगावकर
3. मैकाले बनाम मनू, डॉ. विजयकुमार त्रिशरण, सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली
4. लॉर्ड मैकाले नायक अथवा खलनायक?, डॉ. विद्यासागर उपाध्याय, इंकसाइट पब्लिशिंग, बिलासपूर
5. महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपादक श्री धनंजय कीर, डॉ. स. गं. मालशे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
लेखक जि. प. नाशिक गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते असून उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
मो. 9423071112
Email ID- Pramodahire95@gmail.com