बुद्धिप्रामाण्यवादाचा आवेशाने प्रचार करण्याची उत्कट आवश्यकता अनेकांना जी भासते, तिचे कारण काय? अनेकजण बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे असे मानताना आढळतात. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तरी काय?
बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, “आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये; अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.”
बुद्धिप्रामाण्यवादाच्या ह्या व्याख्येत असे अभिप्रेत आहे की, बुद्धी अशी एक विशिष्ट ओळखता येण्याजोगी मन:शक्ती आहे आणि तिला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत असे दिसून येते. ज्या गोष्टी तिला सत्य किंवा योग्य म्हणून दिसून येतात किंवा आलेल्या असतात, तेवढ्याच सत्य किंवा योग्य म्हणून जो स्वीकारतो तो बुद्धिप्रामाण्यवादी असतो. बुद्धिप्रामाण्यवादाच्या ह्या मांडणीवर दोन आक्षेप घेता येतील.
पहिला, बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती काहीतरी करते किंवा तिच्या द्वारे, तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला आधार नाही. माणसे वस्तू उचलतात त्या सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा ‘ही वस्तू येथून कुणी उचलली असेल?’ ह्या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ ‘ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल?’ असा असतो. गुप्त पोलीस ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर उमटलेले बोटांचे ठसे न्याहाळीत बसतात हे सर्वांना माहीत आहेच. अर्थात चाणाक्ष गुप्त पोलीस ती वस्तू पायांनी किंवा कोपरांनी उचलता येण्याजोगी असली, तर त्या प्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.
आता, ह्याच न्यायाने आपल्याला असे म्हणावे लागेल की, वस्तू ज्याप्रमाणे माणसे उचलतात त्याप्रमाणे गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत हे माणसांना पटते. आणि माणसे वस्तू उचलतात, ती ज्याप्रमाणे सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात, त्याप्रमाणे ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात, त्या सामान्यपणे (किंवा अनेकदा किंवा कित्येकदा ) आपल्या बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे सत्य किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात. पण अपवादभूत प्रसंगी (किंवा अन्य प्रसंगी) दुसऱ्या एखाद्या मन:शक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात. आता, बुद्धिप्रामाण्यवादी तो, की जो बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारतो; अन्य शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारीत नाही.
आता, ‘ही वस्तू ह्या माणसाने उचलली असेल, तर ती त्याने कशी उचलली, आपल्या हातांचा उपयोग करून, की कोपरांचा की पायांचा?’ ह्या प्रश्नाचा निर्णय करता येतो. पण, ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता? आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता, ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवू शकत नाही. तेव्हा, ‘आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते, तेवढेच स्वीकारणे योग्य असते’ असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले, तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.
बुद्धिप्रामाण्यवादाच्या वरील मांडणीवर घेता येण्याजोगा दुसरा आक्षेप असा – बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत असेल की, ‘बुद्धीशिवाय इतरही मन:शक्ती आहेत, पण त्यांच्यातील कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय.’ मग बुद्धीच्या बाबतीत आपण असा पक्षपात का करतो, हा प्रश्न उपस्थित होईल आणि ‘हा पक्षपात करणे योग्य आहे, किंबहुना हा पक्षपातच नाही, कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन होऊ शकते, इतर शक्तींना होऊ शकत नाही,’ असे त्याचे उत्तर असेल, तर हे आपल्याला कसे समजले हा पुढील प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आणि हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन भागणार नाही; कारण ते वर्तुळात्मक ठरेल. इतर शक्तींच्या बाजूनेही असाच दावा करता येईल. बुद्धिप्रामाण्यवाद हा अनेक पंथांमधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्त्विक अधिष्ठान असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.
किंवा आपली भूमिका अशी असेल ‘बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की, बुद्धीशिवाय इतरही ज्ञानशक्ती किंवा मन:शक्ती आहेत, त्याही सत्य म्हणून कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. बुद्धी हीच केवळ ज्ञानशक्ती आहे आणि केवळ तीच सत्य ग्रहण करू शकते. पण अशी जर आपली भूमिका असेल, तर ‘जें बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात स्वारस्य तरी काय? आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. म्हणून, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खा’ असा सल्ला डॉक्टर देईल; पण ‘तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा’ असा सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणता येईल; पण तुमच्या बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणण्याचे कारण नाही. पण ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय? जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; दिसलेले, जाणवलेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय? हा अनावश्यक सल्ला तर नव्हे?
तेव्हा बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. आपली कोणतीही समजूत किंवा विश्वास घेतला, तर त्याचा आशय म्हणजे एक विधान असते. उदाहरणार्थ, ‘माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे’ ह्या म्हणण्याचा अर्थ असा की, ‘सर्व माणसे स्वाभाविकपणे वागतात तेव्हा ती चांगल्या प्रकारे वागतात’ हे विधान सत्य आहे असे मी मानतो. आता विधानाचे स्वरूपच असे असते की, ते सत्य तरी असते किंवा असत्य तरी असते. दुसरी गोष्ट अशी की, कोणतेही विधान त्याच्या पलीकडच्या कोणत्यातरी गोष्टींमुळे सत्य किंवा असत्य ठरते. उदाहरणार्थ, ‘उद्या पाऊस पडेल’ हे विधान ‘उद्या’ ह्या अव्ययाने ज्या दिवसाचा निर्देश होतो त्या दिवशी पाऊस पडण्याची घटना जर घडली तर सत्य ठरते; ही घटना जर घडली नाही तर असत्य ठरते. म्हणजे हे विधान त्याच्याहून भिन्न असलेल्या ह्या घटनेमुळे सत्य किंवा असत्य ठरते. ज्या गोष्टीमुळे एखादे विधान सत्य ठरते, तिला ते विधान सिद्ध करणारा पुरावा किंवा त्या विधानाचा साधक पुरावा असे म्हणूया.
आता बुद्धिप्रामाण्यवादाचे स्पष्टीकरण असे करता येईल : बुद्धिप्रामाण्यवादी माणूस जेव्हा एखादे विधान सत्य म्हणून स्वीकारतो, तेव्हा ते विधान सत्य ठरविणारा साधक पुरावा त्याला अवगत असतो म्हणून आणि म्हणूनच केवळ तो ते स्वीकारतो. विधान सत्य ठरण्यासाठी जो पुरावा आवश्यक असतो तो सर्व जर उपलब्ध नसेल, तर बुद्धिप्रामाण्यवादी माणूस ते विधान सत्य म्हणून स्वीकारीत नाही. थोडक्यात, बुद्धिमाण्यवादी माणूस पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून स्वीकारीत नाही, किंवा असत्य म्हणून नाकारीत नाही. विधान सत्य (किंवा असत्य) ठरविणारा निर्णायक पुरावा उपलब्ध नसेल, तर बुद्धिप्रामाण्यवादी माणूस ते सत्य (किंवा असत्य) आहे असे मानणार नाही; ते अनिर्णित आहे असे तो मानेल.
विधाने वेगवेगळ्या प्रकारांची आणि म्हणून त्यांचे साधक पुरावे वेगवेगळ्या प्रकारांचे असतात. उदाहरणार्थ, ‘पुणे इथून ४ कि.मी. दूर आहे.’ व ‘उद्या पाऊस पडण्याचा दाट संभव आहे’ ही भिन्न प्रकारची विधाने आहेत आणि त्यांना सत्य किंवा असत्य ठरविण्यासाठी ज्या पुराव्याचा आधार घ्यावा लागेल तो भिन्न प्रकारचा असेल. गणितातील विधाने हा विधानांचा आणखी एक वेगळा प्रकार आहे. गणिती विधानांची सत्यता वेगळ्याच प्रकारच्या पुराव्यावर आधारलेली असते. पण विधान कोणत्याही प्रकारचे असो; ते ज्या प्रकारचे असेल, त्याला अनुसरून योग्य त्या प्रकारच्या पुरेशा पुराव्याचा पाठिंबा जर त्याला असला, तरच ते सत्य ठरते आणि असा पुरावा जर आपल्याला अवगत असला, तरच ते सत्य म्हणून स्वीकारण्याचा आपल्याला अधिकार असतो ह्या म्हणण्यात बुद्धिप्रामाण्यवादाचे सार आहे.
आता एक प्रश्न उपस्थित होतो. विधान सत्य (किंवा असत्य) ठरविणारा पुरावा अवगत असेल तरच ते सत्य (किंवा असत्य) आहे असे माना, असा पुरावा नसेल तर ते अनिर्णित आहे असे माना एवढेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल, तर बुद्धिप्रामाण्यवादाचा इतक्या ठामपणे, आग्रहाने, अभिनिवेशाने उद्घोष करण्याचे, प्रसार करण्याचे कारणच काय? ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ ह्या काहीशा लांब आणि संस्कृत शब्दाचे जे म्हणणे आहे, ते सरळ आणि साधे आहे त्याला कुणी विरोध करीत असेल किंवा त्याच्याविरुद्ध कुणी वर्तन करीत असेल हे शक्य आहे काय? ज्या विधानाला पाठिंबा देणारा पुरेसा पुरावा आपल्यापाशी नाही अशा विधानावर कुणी विश्वास ठेवीत असेल काय? असे विधान कुणी सत्य म्हणून स्वीकारीत असेल काय?
ह्या प्रश्नांचे उत्तर ठामपणे ‘होय’ असे द्यावे लागेल. माणसांच्या समजुती, त्यांचे विश्वास केवळ पुराव्यावर आधारलेले नसतात. तसे असते, तर माणसे तार्किक यंत्रे झाली असती, माणसाला भावना असतात आणि त्यांची छाप त्याच्या समजुतीवर उमटलेली असते. क्रुद्ध माणसाला, संशयग्रस्त माणसाला, भयभीत माणसाला तोच परिसर, त्याच हालचाली वेगळ्या दिसतात. ह्या भिन्न मनोवस्थांतील माणसांना एकाच वस्तूची होणारी दर्शने भिन्न असतात, म्हणजे, एकाच वस्तूच्या स्वरूपाविषयीच्या त्यांच्या समजुती भिन्न असतात. ही सर्वांच्या परिचयाची गोष्ट आहे. पण तिच्यापुढे जाऊन मनोवैज्ञानिक आपल्याला सांगतात की, माणसाच्या खोल अंतर्मनात ज्या अबोध इच्छा आणि प्रेरणा असतात, त्यांच्यामधून त्याच्या अनेक समजुती उद्भवत असतात. ह्या प्रेरणांचे समाधान कल्पनेच्या विचातच होऊ शकते; स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या स्वरूपातच झा प्रेरणा सफल होऊ शकतात. पण ही स्वप्ने आणि पुराव्याच्या आधारे सत्य ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस अलग ठेवू शकत नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतींचे विषय असलेल्या वस्तुस्थिती (फॅक्ट्स) आणि ही स्वप्रे ह्यांचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस जगत असतो. अशा जगात जगण्याची माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. माणूस ह्या प्रकारचा प्राणी आहे.
स्वप्न उत्कट समाधान देऊ शकते; सुखात आपल्याला चिंब भिजवू शकते; पण हे समाधान आणि सुख क्षणिक असते. आपल्या इच्छांचे वास्तव, खरेखुरे समाधान वास्तव जगात बदल घडवून आणूनच आपल्याला करावे लागते आणि आपल्याला कृती करूनच बदल घडवून आणावे लागतात. इच्छामात्रेकरून बदल घडवून आणता येत नाहीत. स्वप्नावर कृती आधारता येत नाही. वस्तूंचे स्वरूप पारखून घेऊन त्यांना साजेशी कृती केली तरच ती यशस्वी होण्याची शक्यता असते आणि म्हणून माणसाला केवळ स्वप्नांत रमता येत नाही. त्याला पुराव्यांवर आधारलेल्या तार्किक समजुतींचा, वस्तूंच्या स्वरूपाशी इमान राखणाऱ्या समजुतींचा संग्रहही करावा लागतो. तेव्हा, माणसाच्या जीवनात चिकित्सक, तार्किक विचाराला अनिवार्य असे स्थान आहे.
पण ह्याबरोबरच माणसाच्या जीवनात स्वप्नांना, निरंकुश, मुक्त कल्पनेला स्वाभाविक आणि आदिम असे स्थान आहे आणि ह्या दोन्ही प्रेरणांची- तार्किक विचार आणि मुक्त कल्पना यांची सांगड माणसाला घालता येईल. जेव्हा कृती टाळता येत नाही तेव्हा आणि तेवढ्यापुरता तार्किक विचाराचा आश्रय माणसाला घेता येईल. आणि कृतीचे जोखड जेव्हा झुगारता येईल, तेव्हा तो स्वप्नांत रमू शकेल. हा माणसाचा स्वाभाविक मोह आहे.
बुद्धिप्रामाण्यवाद ह्या मोहाविरुद्ध ठाम भूमिका घेतो. तो स्वप्नांना जागा ठेवीत नाही. तार्किक सत्य हे त्याच्या दृष्टीने केवळ कृतीचे साधन नसते. सत्याला त्याच्या दृष्टीने स्वयंभू आणि केवल मूल्य आहे. जे पुराव्याच्या आधारे सत्य ठरत नाही, ते स्वीकारणे केवळ धोकादायक असते एवढेच नाही; ते स्वीकारणे हा माणसाचा घृणास्पद दुबळेपणा असतो. असे करण्यात माणसाची अप्रतिष्ठा आहे. स्वत: विषयी, विश्वाविषयी जे सत्य असेल ते, ते सत्य आहे म्हणून केवळ स्वीकारण्यात माणसाची महत्ता आहे. बुद्धिप्रामाण्यवाद अखेरीस एका मूल्यावर आधारलेला आहे आणि म्हणून त्याच्यात धार्मिक कठोरपणा आहे आणि धार्मिक आवाहन आहे.
पण एक प्रश्न उरतो. ह्या मूल्याचे प्रामाण्य कशावर आधारलेले आहे?
पुनर्प्रकाशित : नवभारत, अंक नोव्हेंबर १९८२