पर्यावरणीय समस्या : जबाबदार, मानव की विज्ञान?

सर्व ज्ञात ग्रहांपैकी फक्त पृथ्वी हा ग्रह जीवनास आधार देतो कारण ती सूर्यापासून योग्य अंतरावर आहे. ती तिच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे हानिकारक सौर किरणोत्सर्गापासून संरक्षित आहे. तिचे उष्णतारोधक वातावरण तिला उबदार ठेवते आणि तीत पाणी आणि कर्ब ह्यांसह जीवनावश्यक असे इतर रासायनिक घटक आहेत. पण अलीकडे ह्याच पृथ्वीच्या पर्यावरणात घातक असे बदल घडत आहेत, जे पृथ्वीवरील सर्व जीवन संपवू शकतात.

पर्यावरणाच्या संरक्षणाची जागरूकता निर्माण करून तशी कृती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी केली, ज्यामध्ये भारतासह १४३ हून अधिक देशांचा सहभाग आहे. स्थापनेच्या एक वर्षानंतर, १९७३ मध्ये “फक्त एक पृथ्वी” या विषयानुषंगाने पहिला ‘जागतिक पर्यावरण दिन’ आयोजित करण्यात आला. ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त्य विशेषतः सागरी प्रदूषण, वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, शाश्वत उपभोग, आणि वन्यजीव गुन्हेगारी, ह्यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण केली जाते.

ह्या सर्व समस्या जागतिक असल्यामुळे एका देशाने निर्माण केलेली समस्या इतर देशांवरसुद्धा परिणाम करते. त्यामुळे सर्व देश मिळून ह्यावर उपाय काढतात. ह्या समस्यांव्यतिरिक्त प्रत्येक देशाच्या विशिष्ट पर्यावरणविषक समस्या असतात. जसे की वायुप्रदूषण, जलप्रदूषण, भूमिप्रदूषण, ध्वनिप्रदूषण इत्यादी, ज्यावर त्या त्या देशाने उपाय काढणे अपेक्षित असते.

भारताची पर्यावरणीय समस्येबद्दलची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. IQAir च्या २०२५ च्या जागतिक वायू-गुणवत्ता अहवालानुसार, भारत जगातील सहावा सर्वांत प्रदूषित देश आहे.

दिल्ली हे जगातील सर्वांत प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. तसेच ध्वनी, जल, आणि भूमी प्रदूषण भारतात खूपच जास्त प्रमाणात होत आहे. जो देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश असा मान पटकावतो, तो देश स्वतःच्या पर्यावरणीय समस्या का सोडवू शकत नाही?

ह्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात पर्यावरण आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल असलेली उदासीनता. तसेच ह्या मानवनिर्मित समस्या न समजता त्या मानवाच्या आधुनिक प्रगतीने आणि विज्ञानाने निर्माण केल्या आहेत असा आरोप करणे. खरेच ह्या समस्या विज्ञानाने आणि त्यामुळे झालेल्या आधुनिक प्रगतीने निर्माण केल्या आहेत का?

खरेतर विज्ञान काहीही निर्माण करत नाही आणि करू शकत नाही. हा जो विज्ञानाविषयी गैरसमज आहे तो अज्ञानातून आणि सरकार, प्रशासन, भांडवलशहा व धर्ममार्तंडांकडून त्यांचा स्वार्थ जोपासण्यासाठी पसरवला जातो. विज्ञानाविषयीचे गैरसमज आपण विज्ञान आणि त्याविषयीच्या संकल्पना समजून घेऊन दूर करू शकतो. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कसे पर्यावरणवादी आहे हेसुद्धा समजेल.

विज्ञान ही एक कार्यपद्धती आहे ज्यामुळे आपणास सत्य ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान पुराव्यावरती आधारित असते आणि जगातील कोणीही वैज्ञानिकपद्धती अनुसरून हे ज्ञान मिळवू शकतो, किंवा ह्या ज्ञानाची पडताळणी करू शकतो. ज्ञान मिळवण्याची विज्ञानाची एक पूर्वनिर्धारित पद्धत असते तिला वैज्ञानिकपद्धत म्हणतात. ह्यात निरीक्षण किंवा प्रश्न विचारणे, अनुमान किंवा गृहीतक, प्रयोग, प्रचिती किंवा अनुभव, निष्कर्ष आणि अलीकडे दस्तऐवजीकरण ह्यांचा समावेश असतो.

आपण विज्ञानास एका उदाहरणावरून समजून घेऊया. समजा, आपल्याला प्रश्न पडला की खरेच ही पृथ्वी गोल आहे का? आता आपण असे गृहीत धरू की पृथ्वी गोल आहे. पण हे गृहीतक खरे होण्यासाठी आपल्याला काहीतरी पुरावा हवा. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी समुद्रकिनारी जाऊन प्रयोग करण्याचे ठरवले. आपण समुद्रकिनारी पाहिले की लांबून किनाऱ्याकडे येणाऱ्या जहाजांचे वरचे टोक अगोदर दिसते आणि जसेजसे जहाज किनाऱ्याजवळ येते तसेतसे जहाजाचा खालील भाग आपणास दिसतो. ह्या अनुभवावरून आपण आपल्या बुद्धीचा वापर करून असा तर्क लावला की हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा पृथ्वी गोल असेल. त्यामुळे ह्यातून असा निष्कर्ष निघतो की पृथ्वी गोल आहे. आपण आपले हे ज्ञान दस्तऐवजीकरण करून सर्वांना सांगितले आणि त्याची वेगवेगळ्या लोकांनी वारंवार पडताळणी करूनसुद्धा काही विपरीत पुरावा कुणाला मिळाला नाही. त्यामुळे पृथ्वी गोल आहे हे गृहीतक खरे असल्याला पुष्टी मिळाली. ह्या ज्ञानात काही समर्थनीय पुरावे मिळून आणखीन भर पडू शकते. जसे की पृथ्वीची चंद्रावर पडणारी गोलाकार सावली. तसेच जर कोणता विपरीत पुरावा मिळाला तर हे ज्ञान खोटे ठरू शकते. पण लक्षात ठेवा, विज्ञानात असाधारण दाव्यांसाठी असाधारण पुरावे आवश्यक असतात.
विज्ञान हे आपल्याला फक्त सत्य ज्ञान देते पण ते काहीही निर्माण करत नाही. ह्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हा सर्वस्वी आपला म्हणजेच मानवाचा निर्णय असतो. जसे की विज्ञानामुळे आपल्याला समजले की आग कशी लागते. पण ही आग कधी, कुठे आणि किती निर्माण करायची हे आपणच ठरवतो. आपले जीवन सुसह्य, आरामदायी, आणि आनंदी होण्यासाठी मानवाने विज्ञानातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर केला, ज्यातून वेगवेगळी उत्पादने तयार केली गेली, त्यालाच तंत्रज्ञान म्हणतात. ह्याच तंत्रज्ञानातून मानवाने आधुनिक प्रगती साधली.

१९५१ साली जगाची लोकसंख्या २५४ कोटी तसेच, जगाचे सरासरी आयुर्मान ४५ वर्षे होते. भारताची लोकसंख्या ३६ कोटी तसेच, भारताचे सरासरी आयुर्मान तेव्हा ३५ वर्षे होते. आज २०२४ मध्ये जगाची लोकसंख्या ८०० कोटी तसेच, जगाचे सरासरी आयुर्मान ७३ वर्षे झाले आहे. तर भारताची लोकसंख्या १४१ कोटी तसेच, भारताचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे झाले आहे. ह्या वाढलेल्या लोकसंख्येचा पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनावर आणि पर्यावरणावर विपरीत ताण पडत आहे. जगाची लोकसंख्या १.६० टक्के तर भारताची लोकसंख्या १.९५ टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढत आहे. ह्या दराने जगाची लोकसंख्या पुढील १०० वर्षांत ३९१२ कोटी तर भारताची लोकसंख्या ९७२ कोटी होईल. ज्यामुळे नैसर्गिक संसाधनावर आणि पर्यावरणावर विपरीत ताण इतका वाढेल की ही नैसर्गिक व्यवस्था कोलमडून पडेल. मृत्यूदरात घट, वाढलेले आयुर्मान आणि प्रजनन दरात झालेली वाढ ह्यामुळे जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. हे सर्व बदल मानवाने विज्ञानातून मिळालेल्या ज्ञानातून आणि त्याचा वापर करून तयार केलेल्या तंत्रज्ञानातून घडवून आणले. पण ह्यामुळे लोकसंख्यावाढीस विज्ञान जबाबदार आहे का?

नाही. कारण विज्ञानाने फक्त लोकसंख्यावाढीस पूरक असे ज्ञान दिलेले नाही तर ती आटोक्यात ठेवण्याचे आणि तिचे नैसर्गिक संसाधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्याचेसुद्धा ज्ञान दिले. पण अगोदर सांगितल्याप्रमाणे मानवाने आणि त्यांच्या विशिष्ट समूहाने स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या दुसऱ्या ज्ञानाचा प्रचार व वापर होऊ दिला नाही किंवा शक्य तितका टाळला. आधुनिक वैद्यकीय विज्ञान मानवाचे आयुर्मान व प्रजनन दर वाढवण्यास आणि मृत्युदर घटवण्यास मदत करते. तसेच गर्भनिरोधकासारखे प्रजनन रोखण्यास उपयोगी अशी साधने उपलब्ध करून देते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण नापीक जमीनसुद्धा सुपीक करू शकतो, पिण्यायोग्य पाण्याचा साठा वाढवू शकतो, आवश्यक अशा खाद्यपदार्थांचे उत्पादन वाढवू शकतो ज्यामुळे लोकसंख्येचा नैसर्गिक संसाधनावरचा ताण कमी होईल.

स्त्री-पुरुष समानता मानून आणि गर्भनिरोधक वापरून जर प्रत्येकाने एकाच मुलाला जन्म दिला तर जागतिक लोकसंख्यावाढीची समस्या आपण टाळू शकतो. त्यासाठी स्त्री-पुरूष समानता आणि गर्भनिरोधकांचा वापर ह्याबद्दल शासनाने प्रबोधन केले पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सामाजिक सुविधा दिल्या पाहिजे.

सागरी प्रदूषणात सर्वांत मोठे योगदान प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे आहे. दरवर्षी १ कोटी टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिक कचरा समुद्रात प्रवेश करतो. पृष्ठभागावरील पाण्यापासून खोल समुद्रातील गाळांपर्यंत सर्व सागरी मैल्यापैकी ८०% मैला प्लास्टिक बनवते. त्यामुळे समुद्रातील पर्यावरणाची हानी होते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागू शकतात. ह्या सर्व कारणांमुळे प्लॅस्टिक कचरा आणि सागरी प्रदूषण ही जागतिक समस्या निर्माण झाली आहे. आपण लाकूड, काच, कापड अशा प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचा वापर करून तसेच प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून प्लॅस्टिक प्रदूषण कमी करू शकतो.

प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि खराब कचरा हे भारतातील जल आणि भूमी प्रदूषणाचे सर्वांत मोठे स्रोत आहे, ज्यामध्ये घरातील आणि उद्योगांमधील कचरा व सांडपाण्याचा समावेश आहे. ह्या कचऱ्यावर व सांडपाण्यावर सरकारने आणि उद्योगांनी प्रक्रिया केली तर ही समस्या सुटू शकते.

आज जगामध्ये अमेरिका, कॅनडा, आस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर असे कितीतरी देश आहेत ज्यांनी भूमी आणि जलप्रदूषणावर मात केली आहे. ह्या देशांमधील नळाचे पाणीसुद्धा पिण्यायोग्य आहे.

शिकागो विद्यापीठाच्या २०२३ च्या AQLI अहवालानुसार वायुप्रदूषणामुळे दिल्लीतील रहिवाशांचे आयुष्य सुमारे ११.९ वर्षे कमी होत आहे. वायुप्रदूषणाचे सर्वांत मोठे कारण म्हणजे जीवाश्म इंधनाचा ऊर्जानिर्मितीसाठी वापर आणि उद्योगातून होणारे प्रदूषण आहे. बहुतेक ऊर्जा अजूनही कोळसा, तेल, किंवा वायू ह्यांसारखी जीवाश्म इंधने जाळून तयार केली जाते, ज्यामुळे कार्बन डाय-ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड तयार होते. हे वायू पृथ्वीला आच्छादित करतात आणि सूर्याची उष्णता अडकवून पृथ्वीला गरम करतात. ह्यामुळे जागतिक तापमानवाढ होऊन हवामानात बदल घडतो, ज्यामुळे पृथ्वीवरील सजीवांस अनुकूल अशा वातावरणाचा विनाश होतो. जीवाश्म इंधनाऐवजी सौर, पवन किंवा भू-औष्णिक ऊर्जा वापरून तसेच पर्यावरणास पूरक अश्या वृक्षांची लागवड करून आपण वायुप्रदूषण टाळू शकतो.

विज्ञानातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वरीलप्रमाणे ह्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय काढू शकतो. पण हे उपाय आणि लोकसंख्यावाढीस अटकाव आर्थिक प्रगतीच्या आणि भांडवलदारांच्या फायद्याचे नाहीत. ह्या गोष्टी भांडवलदारांचे खर्च वाढवतात आणि नफा कमी करतात. त्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे सरकार, प्रशासन, भांडवलशहा, व धर्ममार्तंडांची युती ह्या सर्व उपाययोजनांवर काम करत नाही. ह्याउलट सर्वसामान्य लोकांना झाडे लावा, पाणी जपून वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, सायकल वापरा अश्या थातुरमातुर गोष्टी करण्यास भाग पाडून वेळ मारून नेली जाते व पर्यावरणाचा आणि त्याद्वारे ह्या विश्वात आपले एकमेव असे घर असलेल्या पृथ्वीचा विनाश करण्यात ज्या मुख्य गोष्टी कारणीभूत आहेत त्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

मोबाईल क्र. 9822120594

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.