मनुस्मृती दहनाची १०० वर्षे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाला ९८ वर्षे, आणि भारतीय संविधानाच्या घोषणेला ७६ वर्षे झालीत, त्यानिमित्ताने.

मनुस्मृती हे हिंदू धर्मशास्त्र आहे असे म्हटले जाते. “श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः”––श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. वेदांमध्ये मनूचे नाव येत असले तरी वेदांनंतर खूप कालावधी गेल्यानंतर स्मृतिग्रंथांची निर्मिती झाली. मनुस्मृती ही इ. स. पू. २०० ते इ. स. २०० या कालखंडात लिहिली गेली असे मानले जाते. स्मृतिग्रंथ आणि स्मृतिकार अनेक झाले, पण मनुस्मृतीला सर्वाधिक महत्त्व आहे. विष्णू, पराशर, दक्ष, संवर्त, व्यास, हारीत, शातातप, वसिष्ठ, आपस्तंभ, गौतम, देवल, शंख, लिखित, भारद्वाज, उशना, शौनक, याज्ञवल्क्य इत्यादी प्रसिद्ध स्मृतिकारांची नावे व वचने ‘मन्वर्थमुक्तावली’ या टीकाग्रंथात मिळतात. परंतु परंपरेने मनुस्मृतीलाच प्राचीनतेच्या दृष्टीने प्रथम स्थान दिले आहे. ज्याप्रकार अनेक गीता झाल्या पण ‘भगवद्गीता’ अमर झाली, महाभारतानंतर अनेक पुराणे झाली पण ‘महाभारत’ अमर राहिले, त्याचप्रमाणे इतर अनेक स्मृती असूनही ‘मनुस्मृती’चे अग्रस्थान कोणत्याही स्मृतीने हिसकावून घेतले नाही. आजही मनुस्मृती आपल्या देशावर, येथील प्रजेवर आणि येथील जनमानसावर पूर्ण ताकदीनिशी राज्य करत आहे.

मनुस्मृतीचा रचयिता मनूच असावा अशी प्रचलित समजूत आहे. पण खरे तर तिचा रचयिता मनूचा शिष्य भृगू आहे. म्हणजे भृगुऋषी जे काही सांगतील ते मनूकडून सांगितलेलेच समजावे असे मनुस्मृतीच्या प्रथम अध्यायात म्हटले आहे. पहिला अध्याय सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल सांगतो. हिरण्यगर्भापासून विराट, विराटापासून आदिमनू (ज्याला स्वयंभू म्हटले आहे), आदिमनूकडून दहा प्रजापती – त्यांत भृगुऋषीही एक – निर्माण झाले. ह्याच भृगूवर धर्मशास्त्र ऐकवण्याचे किंवा तयार करण्याचे काम सोपवले गेले. मनू स्वतः त्यांच्याकडे जाऊन सर्व महर्षींना म्हणतो, “एतद्वोऽयं भृगुः शास्त्रं श्रावयिष्यत्यशेषतः। एतद्धि मत्तोऽधिजगे सर्वमेषोऽखिलं मुनिः॥” (१.५९) (हे भृगुमहर्षी आता तुम्हां सर्वांना हे शास्त्र पूर्णपणे ऐकवतील. त्यांनी हे शास्त्र माझ्याकडूनच प्राप्त केले आहे.) मनूच्या सर्व कल्पनांना प्रत्यक्ष स्मृतिग्रंथाच्या चौकटीत बसवणारे भृगू असल्यामुळे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी “इति मानवे धर्मशास्त्रे भृगुप्रोक्तायां संहितायां…” हे शब्द येतात.

मग मनू कोण होता? “तो स्वयंभू होता” ह्याचा अर्थ काय? वेदांमध्ये मनूचे नाव येते! तोच मनू हा मनुस्मृतीचा स्वयंभू मनू आहे का? ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातील रुद्रसूक्तात ऋषी म्हणतो, “यानि मनुः अवृणीत पिता नः!” (आमचे पिता मनूही रुद्राच्या ह्या औषधांची इच्छा करत होते.) मनू एकच नव्हता. स्वयंभू मनूपासून आणखी सहा वंशज उत्पन्न झाले. स्वरोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष आणि महातेजस्वी वैवस्वत (१.६२). मनुस्मृती म्हणते, “स्वायंभुवाद्या सप्तैते मनवो भूरितेजसः। स्वे स्वेऽन्तरे सर्वमिदमुत्पाद्यापुश्चराचरम्॥” (१.६२)- (हे सात महातेजस्वी मनू आपापल्या मन्वंतरात संपूर्ण चराचराची उत्पत्ती करून त्याचे संरक्षणही करतात. सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती असलेले कोणते तरी महाशक्तिमान काल्पनिक नाव म्हणजे ‘मनू’), जो आपणां सर्व मानवांचा पूर्वज आहे, असे आपल्याला शिकवले जाते.

कुल्लूकभट्टांनी मनुस्मृतीवर ‘मन्वर्थमुक्तावली’ नावाचे अत्यंत प्रसिद्ध भाष्य लिहिले. ही पुस्तिका त्याच भाष्यासह मनुस्मृतीच्या आधारावर लिहिली आहे. निर्णयसागरसारख्या अत्यंत विख्यात प्रकाशनाने कुल्लूकभट्टांच्या भाष्यासह प्रसिद्ध केलेली मनुस्मृती देशभरातील विद्वानांमध्ये प्रमाण मानली जाते.

प्रा. आ.ह.साळुंखे ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ ह्या त्यांच्या छोट्या पुस्तिकेत म्हणतात ,“मनू हे नाव फार प्राचीन आहे. केवळ भारतीयच नव्हे तर संपूर्ण इंडो-युरोपियन लोकांच्या दृष्टीने असा एखादा पूर्वपुरुष होता ज्याचे नाव मनू किंवा त्यासारखे काही होते. भारतीय भाषांत मानव, मनुष्य असे शब्द आजही वापरले जातात. हे मनुस्मृतीच्या खूप आधीचे नाव आहे. मनुस्मृतीचे वय साधारण दोन हजार वर्षे आहे, तर मनू त्याहूनही किमान तीन-चार हजार वर्षे जुना आहे. तत्कालीन समाजावर प्रचंड प्रभाव असलेल्या, आदरणीय मनूचा मनुस्मृतीशी काहीही संबंध नाही.”

मनूच्या नावाने भृगुवंशातील कोणत्या तरी ब्राह्मण लेखकाने लिहिलेली स्मृती आहे. हा ग्रंथ भारतीय इतिहासाच्या सामाजिक दृष्टीने सर्वांत विकृत ग्रंथ आहे. ह्याच ग्रंथाने बहुजन समाज आणि स्त्रियांच्या किमान शंभर पिढ्या अज्ञानी, अपमानित, तिरस्करणीय, लाचार आणि गुलाम ठेवून त्यांचा सर्वप्रकारे अधःपात केला. “हा अधःपात माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहे, हाच माझा धर्म आहे, हीच नीती आहे” असे विचार शोषितांच्या मेंदूत भरवून शोषकांचा प्रभाव कार्यान्वित झाला. शोषकांचे हितरक्षण करणेच शोषितांचे हित आहे, असे वाटू लागले. भृगूने बहुजन समाजाला कष्ट देण्याची ताकद कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या सर्व पिढ्यांची सेवा करण्याची चतुराई करून ठेवलेली स्मृती म्हणजे मनुस्मृती.

मनुस्मृतीत ब्राह्मणांच्या आक्षेपार्ह हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी बनवलेल्या श्लोकांमुळे ह्यावर खूप टीका झाली आहे. टीका टाळण्यासाठी समर्थक म्हणू लागले की मनू क्षत्रिय होता. पण असे अमानुष ग्रंथ क्षत्रियांनी लिहिले असो की ब्राह्मणांनी, ते न्याय, विवेक व नैतिकतेवर आधारित आहेत का?, हे महत्त्वाचे आहे. सध्याची मनुस्मृती मनूने लिहिलीच नसेल तर मनू क्षत्रिय होता की ब्राह्मण हा प्रश्नच निरर्थक ठरतो. भृगू निश्चितच ब्राह्मण होता. भृगूने मनूकडून काय घेतले आणि स्वतः काय टाकले हे आपल्याला माहीत नाही. पण भृगूने स्वतःहून काही लिहिले आहे हे समर्थकही मान्य करतात. म्हणून सध्याच्या मनुस्मृतीची जबाबदारी भृगूवर म्हणजे ब्राह्मणांवरच येते.

ब्राह्मणांची स्तुती करताना विद्वत्ता, चारित्र्य, गुणवत्ता यांची पर्वा केलेली नाही. फक्त जन्मतःच ब्राह्मण आहे एवढेच पुरेसे मानले आहे. यज्ञ पैशाअभावी अपूर्ण राहणार असल्यास दुसऱ्याची संपत्ती हिसकावून घेण्याची परवानगी ब्राह्मणाला आहे. ब्राह्मणाला दान केल्याने दात्याला दुप्पट फळ मिळते. फक्त जातीने ब्राह्मण झालेला ब्राह्मण राजाला उपदेश देऊ शकतो, शूद्र कधीच नाही. शूद्राने राजाला धर्मोपदेश केला तर ते राष्ट्र चिखलात रुतलेल्या गाईसारखे नष्ट होते. मूर्ख ब्राह्मणाने उपदेश केला तर राष्ट्राची प्रगती, विद्वान शूद्राने केला तर अधोगती – ह्यावरून मनुस्मृतीला धर्म, सद्गुण, विद्वत्ता, गुणवत्तेची काडीचीही पर्वा नाही हे सिद्ध होते.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत संविधान सुपूर्त केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख माधव सदाशिव गोळवलकर म्हणाले होते––“स्पार्टाकस आणि सोलनच्या हजारो वर्षे आधीपासून असलेले मनुस्मृतीसारखे भारतीय संविधान असताना देश-विदेशाच्या संविधानांची नक्कल करून लिहिलेल्या ‘भीमस्मृती’ नावाच्या गुदडीची काय गरज होती? ज्यात आपल्या देशाच्या संस्कृती-परंपरांचा लवलेशही नाही.” (ऑर्गनायझर, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध).

आपल्या महान सांस्कृतिक वारशाच्या हजारो वर्षे जुन्या संविधानात स्त्रियांसंबंधी काय लिहिले आहे? शुद्ध संतती होण्यासाठी स्त्रीची प्रयत्नपूर्वक रक्षा करावी. स्त्रीला स्वतः निर्णयाचा अधिकार दिला तर ती जोडीदार निवडेल आणि वर्णव्यवस्था मोडेल या भीतीपोटी रक्षा आवश्यक ठरवली. “प्रजाविशुद्ध्यर्थ” म्हणजे शुद्ध वंशासाठी, ब्राह्मण जातीचे उच्च स्थान अबाधित राहावे म्हणून स्त्रीला बंधनात ठेवणे हाच उपाय मनुस्मृतीने शोधला. घरकाम, स्वच्छता, जेवण, धार्मिक आचरण, पैशांची बचत-खर्च अशा कामांत तिची नेमणूक करावी. मंत्रांसह संस्कारांचा अधिकार नाही. “नास्ति स्त्रीणां क्रियाः मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः।” (९.१८) विवाह हाच तिचा वैदिक उपनयन संस्कार, पतिसेवा हाच गुरुकुलवास, स्वयंपाकघरातील काम हेच होमहवन.

आठव्या (न्यायनिर्णय) अध्यायात न्यायाधीश नेहमी ब्राह्मणच असावा, शूद्र कधीच नाही. शूद्र न्यायाधीश नेमला तर राष्ट्र चिखलात रुतलेल्या गाईसारखे नष्ट होते. सर्व पाप केले तरी ब्राह्मणाला मृत्युदंड नाही, फक्त देशाबाहेर काढावे आणि संपत्ती सुरक्षित ठेवावी. पण शूद्राने ब्राह्मणाचे नाव-गोत्र घेतले, धर्मोपदेश केला किंवा कठोर शब्द वापरले तर––मुखात दहा बोटांचा गरम लोखंडी कील खुपसणे, कानात उकळते तेल ओतणे, जीभ कापणे अशा शिक्षा आहेत.

अशा २६८६ श्लोकांच्या मनुस्मृतीत जन्मापासून मृत्यूपर्यंत, मृत्यूनंतरही मनूचे नियम माणसाचा पाठलाग सोडत नाहीत. हे नियम कित्येक शतके अंमलात होते आणि आजही संघवाले त्याची अंमलबजावणी करण्याची भाषा करतात. म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व आणि स्त्री-शूद्रांचे शोषण कायम राहावे अशी मानसिकता आहे.

आजपासून ९९ वर्षांपूर्वी, २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या तलावाच्या पाण्याच्या सत्याग्रहादरम्यान संध्याकाळी ४-३० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम सुरू केला. जन्मतः आणि मृत्यूपर्यंत सर्व स्त्री-पुरुष समान आहेत, विषमता व असमानतेचे समर्थन करणाऱ्या सर्व प्राचीन-आधुनिक ग्रंथांचा धिक्कार करा, श्रुती-स्मृती-पुराणे नाकारा, असे घोषवाक्य होते. प्रस्ताव ब्राह्मण सहस्रबुद्धे यांनी मांडला, य. ना. राजभोज यांनी पाठिंबा दिला. रात्री ९ वाजता एका अस्पृश्य बैराग्याच्या हाताने मनुस्मृती जाळली गेली. यापूर्वी १९२६ मध्ये मद्रास राज्यात पेरियारांच्या नेतृत्वात ब्राह्मणेतर दलाने दहन केले होते. पण जातिव्यवस्थेने पिडलेल्या सर्वांत खालच्या थरातील लोकांनी, बाबासाहेबांच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या संख्येने स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत स्त्रीदास्यविरोधी व ब्राह्मणी धर्मग्रंथाचे सामुदायिक दहन घडवले––ह्याचे वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांत ब्राह्मणी समाजव्यवस्था म्हणजे मनुस्मृती––जी चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था आणि स्त्रीदास्य यांचे उघड समर्थन करते.

डॉ. राममनोहर लोहिया म्हणाले होते, “समाजात सर्वांत खालच्या पातळीवर जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे, ती ब्राह्मण असली तरी.” मेहतराची बायको मेहतराच्या घरी आणखी उपेक्षित असते. मनुस्मृतीच्या पानोपानी हीच गोष्ट लिहिली आहे. बाल्यावस्थेत वडील, तरुणावस्थेत पती, वार्धक्यात पुत्र––स्त्रीला आयुष्यभर पुरुषांच्या संरक्षणात राहावे लागते. तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. आजही तिची ओळख फलाण्याची सून, बायको, आई अशीच आहे. घटस्फोटाचा अधिकार नाही, कितीही वाईट पती असला तरी सहन करावे लागते. वेदपाठ तर सोडाच, वेद ऐकण्याचाही अधिकार नाही. संस्कार करताना मंत्रोच्चार निषिद्ध आहे. अशा ग्रंथाला कालबाह्य ठरवून मृत घोषित करायला काय हरकत आहे?

९८ वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी जे दहन केले तो खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ मार्च महिलादिन असला तरी भारतीय संदर्भात २५ डिसेंबर १९२७ पासूनच भारतीय स्त्रियांच्या मुक्तीची खरी सुरुवात झाली. म्हणून पुढील काळात भारतात स्त्रीमुक्ती दिन म्हणून २५ डिसेंबर साजरा करण्यास सुरुवात व्हायला हवी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.