एप्रिलचा अंक एका नव्या आवाहनासोबत प्रकाशित करतो आहोत.
शालेय वयापासूनच अनेक व्यक्तींच्या गुणगौरवाचे धडे आपल्याकडून गिरवून घेतले जातात. रामायण-महाभारतातील काल्पनिक पात्रांपासून, मोघल-इंग्रजांच्या विरोधात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत, सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते नाटक-सिनेमावाल्यांपर्यंत! वेगवेगळ्या क्षेत्रात काही भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव समाज करतोच. परंतु, गुणगौरव आणि व्यक्तिपूजा ह्या दोन संपूर्ण वेगळ्या छटा आहेत की एकमेकींत मिसळलेल्या भावना आहेत, हे समजणे तसे कठीणच.
महानतेचे अनेक निकष असतात. कोणत्याही एका क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी व्यक्ती लवकरच सर्वगुणसंपन्न मानली जाऊन तिचे व्यक्तिपूजन सुरू होते. तार्किक दृष्टिकोन मात्र निराळेच काही सुचवतो. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे झाल्यास मात्र इतर निकषांवरील त्या व्यक्तीचे योगदान कसे होते, हे देखील जोखायला हवे.
अश्या निकषांचा कस लावून समाजात काही भरीव, ठोस योगदान देणाऱ्या व्यक्तींची सूची करण्याचे आम्ही योजित आहोत. प्रत्येकाच्या कार्यानुसार क्रमवारी करण्याचा आमचा उद्देश नाही. हे संकलन सध्या महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवतो आहोत. पुढे जाऊन अशाच प्रकारची सूची इतर ठिकाणी बनू शकते. साऱ्याचे एकत्रित संकलनही होऊ शकते. आताची ही सूची आम्ही पुस्तकरूपात प्रकाशित करू इच्छितो. आलेल्यापैकी निवडक लेख आम्ही ‘आजचा सुधारकमध्ये’ प्रकाशित करू.
संकलनाविषयीचे विस्तृत आवाहन आशिष महाबळ ह्यांच्या लेखात आहे. ह्यासाठीचे निकष/मापदंड ठरवताना ते निष्पक्ष, पूर्वग्रहविरहीत, संतुलित असावेत असा आग्रह आम्ही ठेवला आहे. तरीही काही मापदंडांतून भावनिक निष्कर्ष निघू शकतात. तेव्हा, भावनिकतेच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्तीच्या कार्यावरून त्याची निवड ह्या सूचीसाठी करतो आहोत का, हे आपल्याला सातत्याने तपासत राहावे लागेल.
ह्या आवाहनाला तुमचा सक्रिय प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
इतर लेखांवरील आपले अभिप्रायही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पुढील अंकासाठी काही सुचवायचे असेल, तर संपर्क करा.
श्री.दि.य.देशपांडे हे नाव मी सुचवितो.
त्यांवर लिहिलेला ‘DY : The forgotten philosopher’ हा लेखही मी आपल्याला पाठविला होता. पण , त्या लेखाचा दर्जा फारच सुमार आणि निकृष्ट असेल , म्हणून आजच्या सुधारकात त्याला स्थान मिळाले नाही.
दियंचे नाव या सूचित घ्यावे , ही विनंती.
स्वागत!
आपल्या सहयोगाची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा असते. आमच्या ह्यावेळेच्या आवाहनाला आपण त्वरित प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आभार.
आपण सुचवलेल्या दि.य.देशपांडे ह्यांच्या नावाची आम्ही नोंद घेतो. सोबतच आपण पूर्वी पाठवलेली फेसबुक पोस्ट दि.यं.विषयीची अधिक विस्तृत माहिती म्हणून नक्कीच उपयुक्त ठरते.
ती पोस्ट लेखस्वरूपात न घेण्यामागे दर्जा हे एकमेव कारण आपण समजलात, ह्याचा खेद वाटतो. धोरणात्मक इतर अनेक कारणे असतात. तेव्हा गैरसमज नसावा.
ह्यापुढेही आपला सहयोग मिळत राहील, ही अपेक्षा.
मग काहीही हरकत नाही.
दियंवर काही काम करायचे असेल तर निसंकोचपणे कळवावे… आपल्याला सहयोग करण्यात नेहमीच आनंद आहे...धोरणात्मक कारण असेल , तर मग हरकत नाही.
उलट , ते योग्यच आहे.