इकोलॉजिकल सोसायटी, पुणे, आणि आजचा सुधारक, ह्यांनी एकत्रितपणे साकारलेला शाश्वत भविष्याविषयीचा विशेषांक जुलै महिन्यात प्रकाशित झाला. त्यावेळी मनोगतात म्हटल्याप्रमाणे भविष्याच्या शाश्वततेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातून देण्याचा दावा नाही. उलट, त्याविषयी अधिक व्यापक आणि सखोल संवाद सुरू करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यातील लेख घोषणांपलीकडे जाऊन, आपल्या जीवनशैलीचा, विकासाच्या संकल्पनांचा, आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित करतात .
ह्या विशेषांकातील लेखांवर अभिप्राय म्हणून एक-दोन स्वतंत्र लेख आले. शाश्वत भविष्याविषयक प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे ते अनुभवकथन असल्याने ते पाठोपाठच प्रकाशित व्हावेत असे आवर्जून वाटले. काही विषय सुटून गेले अशी रुखरुख वाटत असतानाच त्या विषयांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचे लेख आले, आणि ती उणीवही पूर्ण झाली.
वाचकांनी आपल्या अन्नाकडे, पाण्याकडे, ऊर्जेकडे, कचऱ्याकडे, परिसराकडे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याकडे, नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली तर ह्या प्रयत्नाचे सार्थक होईल, असे मागील मनोगतात म्हटले होते. तीच ह्यावेळीही अपेक्षा!!
डॉ. श्री. गुरूदास नुलकर आणि केतकी घाटे यांचे अनुक्रमे, “तुम्हाला कोण व्हायचे आहे….” आणि “जागरूकता आहे, सजगता नाही” हे दोन्ही लेख वाचले.
दोन्ही लेख आपली ढासळती प्रशासन व्यवस्था, शहर नियोजन आणि वैयक्तिक मानसिकता यांवर स्पष्ट भाष्य करते. आणि त्यावर उपाय देखील सांगते.
खरं तर प्रकतेक बांधकाम व्यवसायिक आणि सामान्य नागरिक यांनी निसर्ग व परिसराविषयीं योग्य सजगता व संवेदनशीलता ठेवली तर निम्मे प्रश्न कमी जटील होतील.
(माहितीसाठी : पनवेलच्या गाढी नदीकिनारी आम्ही, करोना काळापासून “किनारा संवर्धन अंतर्गत २०० च्या वर झाडे लाऊन ती जोपासली आहेत.)