शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (उत्तरार्ध)

मागच्या लेखांकांत अराजकाचे परिणाम काय झाले आहेत, ते स्पष्ट केले आहेत. ह्या अंकांत आपण उपायांकडे लक्ष देणार आहोत.

पहिला उपाय मला सुचतो तो असा की प्रमाणभाषेला प्रत्येकाने परकी भाषा मानून आपले दैनंदिन व्यवहार स्थानिक बोली भाषेत करावे. प्रमाणभाषेचे शिक्षण मातृभाषेचे शिक्षण म्हणून न देतां एक वेगळी, परकी भाषा म्हणून द्यावे. ही संपर्कभाषा आहे हा संपर्क, भूतकाळांत लिहिल्या गेलेल्या वाययाशी आणि निरनिराळ्या बोली जेथें बोलल्या जातात त्या त्या प्रदेशांशी आम्हांला साधावयाचा आहे असा विचार आपण सर्वांनी करावा. प्रमाण लिखित भाषेला मातृभाषा (घरगुती, दैनंदिन व्यवहाराची बोली) करण्याचा प्रमाद गेल्या शतकामध्ये मुख्यतः ब्राह्मणांनी केला ती त्यांची फार मोठी चूक झालेली आहे. ती ताबडतोब दुरुस्त व्हावयाला पाहिजे असे मला येथे प्रतिपादन करावयाचे आहे.

प्रमाणभाषा ही पुष्कळशी कृत्रिम भाषा असते. ती कोणत्याहि जनसमुदायाची मातृभाषा नसते, ती बहुजनसंमुख नसते. ती इतिहासाभिमुख असते. दैनंदिन वापरामध्ये जे विषय कधीच येत नाहीत अशा वेगवेगळ्या विषयांसाठी ती वापरावी लागत असल्यामुळे तिच्यामध्ये आपोआप घडलेले सिद्ध शब्द कमी असतात आणि मुद्दाम घडविलेले साधित शब्दच फार जास्त असतात. भावभावना किंवा गुंतागुंतीचे विचार शब्दांत व्यक्त करण्यासाठी ती मुद्दाम घडविलेली, थोडक्यांत बनावट भाषा असते. प्रत्यक्षात कोणी ‘मला असीम आनंद झाला’, किंवा ‘मला अपार दुःख झाले’, असे सांगत नसतो. आपले भाव तो शरीराने व्यक्त करतो. तो हंसतो, टाळ्या पिटतो, नाचतो, बागडतो, त्याचा चेहरा उजळतो किंवा काळवंडतो. तो रडतो, मटकन खाली बसतो. अशा प्रसंगावर लिहिण्याची गरज पडते ती जे तेथे प्रत्यक्ष हजर नाहीत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी. बोलीमध्ये वृत्तान्तलेखनाची गरज निर्माण झालेली नसते. कारण लेखनच माहीत नसते. एवढ्याच कारणामुळे बोली- भाषेतले शब्द आणि लिखित प्रमाण भाषेतले शब्द ह्यांच्या संख्येमध्ये प्रचंड अंतर असते. प्रमाण भाषा नित्य वर्धिष्णु असते. बोलीचीही वाढ होत असते, पण ती पुष्कळदां प्रमाणभाषेमधून घेतलेल्या आयत्या शब्दांच्या साहाय्याने होते. प्रमाणभाषेमध्ये जसे बोलीभाषेमधले सिद्ध (तयार, आयते) शब्द येतात तसेंच, तिचे व्याकरण झालेले असल्यामुळे, त्या नियमांनुसार घडविलेल्या, प्रत्यय लावलेल्या, धातुसाधित, नामसाधित, उपसर्गघटित, सामासिक अशा शब्दांची तेथें टांकसाळच सुरू होते. बोली वापरणाऱ्यांना साधित शब्द कसे घडतात हे माहीत नसल्यामुळे जे प्रमाण भाषेमधले साधित शब्द तेथे येतात ते सिद्ध शब्दांसारखे वापरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे यशश्री, निस्पृह, इतकंच नाही तर जगमित्र, मुक्तछंद असे शब्द लिहिले जातात. (हे साधित शब्द असून ते यशःश्री, निःस्पृह, जगन्मित्र, मुक्तच्छंद असे पाहिजेत.) असे शब्द वापरतांना त्या त्या शब्दाचे मूळ अवयव कोणते त्याकडे दुर्लक्ष होतें, उच्चाराप्रमाणे लेखन होते. प्रमाण भाषेत किंवा प्रमाणीकृत भाषेमध्ये प्रत्येक शब्द कसा घडला ते डोळ्यांना दाखविण्याची सोय असते कारण प्रमाण किंवा प्रमाणीकृत भाषाच मुळी त्या समाजाला लेखनविद्या अवगत झाल्यानंतर अस्तित्वात येते. शब्दकोश आणि व्याकरण लिहून झाल्यानंतरच प्रमाणीकरणाला प्रारंभ होत असतो. ती प्रमाण भाषा निरनिराळ्या बोलींमधून साधारणतया सामान्य (common) शब्द आधीं स्वीकारते आणि नंतर जसजशी ती स्थिरावते तसतशी ती समृद्ध होत जाऊन एका बोलींतले शब्द दुसऱ्या प्रदेशांत, म्हणजेच दुसऱ्या बोलींत, पोचविते.

भाषेचे व्याकरण लिहून झाले की तिच्यामध्ये नवीन शब्दांची टांकसाळ सुरू होते हे आपण वर पाहिले. साधित शब्द घडविलेले असल्यामुळे ते अगदी नवीन असतात. त्यामुळे ते कोणाच्याहि उच्चाराप्रमाणे नसतात. ह्या टांकसाळीमधले शब्द साहजिकच पहिल्याने विद्वज्जनांच्या लेखनांत येतात किंवा शिष्टजनांच्या सभांमधून जेथे श्रोतेसुद्धां व्याकरण शिकलेले असतात अशा ठिकाणी वापरले जातात. ते व्याकरणसिद्ध असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सार्वकालिक निश्चितार्थता येत असते. तेवढ्यासाठींच, ती निश्चितार्थता टिकविण्यासाठी, ते उच्चारप्रमाणे कधीं लिहावयाचे नसतात.

ह्याउलट देश्य शब्द सिद्ध शब्द. त्यांमध्ये अनुकरणात्मक, किंवा नादानुकारी शब्दसुद्धा असतात. ते उच्चाराप्रमाणेच लिहिले जातात. कांहीं फार थोडे परक्या भाषेमधले शब्द, त्यांना प्रतिष्ठा असल्यामुळे, बोलीमध्ये आधी रुळतात आणि ते तसे रुळल्यानंतर लेखनांत वापरले जातात. असे शब्द जेव्हां उच्चाराप्रमाणे लिहिले जातात तेव्हां त्यांना (म्हणजे मुळापासून उच्चाराने दुरावलेल्यांना) तद्भव म्हणतात. अशा तद्भव शब्दांना विकार होण्यापूर्वी पुन्हां पूर्वीच्या म्हणजे तत्सम रूपास आणावे लागते.

ही प्रमाणीकरणाची प्रक्रिया समजून न घेतां जेव्हां लेखन बहुजनसंमुख असावे असा आग्रह धरला जातो तेव्हां प्रमाणभाषेच्या हासाची सुरुवात होते.

शुद्धलेखनाच्या विवादांतून बाहेर पडण्याचा दुसरा उपाय आतां पाहूं. तो आहे पुष्कळ समांतर प्रमाण भाषा एकाच वेळी वापरण्याचा. सध्या मराठी भाषेमधलीं नवींजुनी पुस्तकें पाहिली तर ती तीन प्रकारच्या नियमांनुसार छापलेली आढळतात. त्यांमध्ये मी आणखी एका प्रकाराची भर घालावी असें म्हणत आहे. हे लेखनाचे नियम बहुजनसंमुख असतील. त्यांत नवापूरपासून सिरोंचा किंवा भामरागड; आणि आमगांवपासून गोव्यापर्यंत जे विविध स्थानिक उच्चार आहेत त्यांचा समन्वय साधून किंवा कोणत्यातरी एका बोलीला इतर बोलीपेक्षा अधिक प्रतिष्ठा देऊन तिच्यांतील उच्चारांप्रमाणे जुन्या, ग्रन्थनिविष्ट, व्याकरणपूत (अथवा शास्त्रपूत) शब्दांचे लेखन कसे करावे ह्याविषयी मार्गदर्शन असेल. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर हा शब्द घ्या. तो उच्चाराप्रमाणे लिहावयाचा असल्यास त्याला ग्यानेश्वर म्हणावयाचें की द्यानेश्वर म्हणावयाचें की न्यानेश्वर करावयाचें की न्यानेस्वर किंवा न्यानेसर ते ठरवून टाकलेलें बरें. तसेंच ‘तो’ हे सर्वनाम त्यो, थो, थ्यो, ह्यांपैकी कोणत्या एका प्रकाराने हेहि. आम्ही मराठी बोलणारे, ळ चा उच्चार कोठे ड करतो, य करतो, तर आणखी कोठे ‘र’ असा करतो. त्यामुळे पेळू पेरू होतो. इतकंच नव्हे तर पेरू हे नाम ; पेरूं हे क्रियापद आणि पेळू हे नाम ह्यांत पूर्वी असलेले वैधर्म्य वा त्यांतली विषमता नष्ट होऊन सर्वत्र साधर्म्य वा समानता येईल. पण ते असो. नवीन पुस्तकें छापली जातील त्यांच्या प्रारंभी तें पुस्तक कोणत्या नियमांप्रमाणे छापलें आहे त्याचा उल्लेख करावा आणि एका पुस्तकांत तरी निरनिराळ्या नियमांची गल्लत करूं नये. पूर्वी जोडाक्षरें छापतांना छापखान्यांवर फार बंधने असत. रक्तस्राव हा शब्द एखाद्या पुस्तकांत पुन्हापुन्हां येऊ लागला तर क्त चा खिळा संपून जाई. मग रक्तस्त्राव असा प्रकार सुरू होई. दोन पानांनंतर स्त्र, संपला की स्त्र खिळा (टाइप) वापरीत. तो संपला की शेवटीं रक्त स्राव किंवा रक्तस्राव असें कांहीतरी छापावे लागे. ज्यांच्याकडे स्वतःची टाईप पाडण्याची व्यवस्था आहे असे छापखाने हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे असत. त्यामुळे जोडाक्षरांच्या रूपांत एकवाक्यता नसे. वस्तुतः हा दोष मुद्रणांत यावयाला नको होता.

इंग्रजीच्या प्रभावामुळे सामासिक शब्द म्हणजे काय हे आम्हां मराठीभाषकांना समजेनासे झाले आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून त्या बाबतींत सर्वत्र आनंदी-आनंद आहे. पाठ्यपुस्तकनिर्मितिमंडळ, महाराष्ट्रराज्यविद्युन्मंडळ असे शब्द आपण लिहावयास पाहिजेत पण तें तर असोच, उद्घाटनसमारंभासारखे साधे शब्दसुद्धां आम्ही तोडून लिहितों. तेव्हां हे असे शब्द तोडून कां लिहावयाचे ह्याविषयीं समर्पक कारणे देऊन त्याविषयी सर्वत्र एकवाक्यता आणावी इतकीच माझी इच्छा आहे.

लिखित भाषेमध्ये एकाच शब्दाची अनेक पर्यायी रूपें होऊ शकतात. उदा.पेळू /पेरू, पळतो/पडतो/परतो, ज्ञानेश्वर/न्यानेस्वर/द्न्यानेश्वर/द्न्यानेश्वर/द्यानेश्वर/ज्ञानेश्वर/ज्ञानेश्वर, अईतीहासीक/एतीहासीक/अइतिहासिक/उद्ध्वस्त/उद्ध्वस्त/उदधवसत/शुद्धवस्त, जगन्नाथ/जगन्नाथ/जगंनाथ वगैरे. असे ते वेगवेगळ्या प्रकारे लिहून अर्थभेद होतोच असे नाही. (मला प्रत्येक शब्दाचे पांचपंधरा प्रकार करता येतात!) हे शब्द असे वेगवेगळ्या पद्धतीने कां लिहावयाचे ते, त्यांऐवजी एकाच प्रकाराने का लिहावयाचे नाहीत तें; आणि एका प्रकारे लिहावयाचे तर जुन्या पद्धतीने कां नाहीं तें, नीट पटवून द्यावें. (आणि तसे करतांना डोळ्यांना दिसणारे जुनें पूर्वपरिचित लवकर समजतें; अपरिचित रूप निरखून पाहावे लागते; त्यामध्ये वेळ जातो; उच्चार करून पाहून अर्थ कानांना समजतो काय ते तपासावे लागतें; ही रूपें शब्दकोषांत आढळत नसल्यामुळे अर्थनिश्चयन अवघड होते. हे ध्यानात घ्यावें.) सर्वांत जुनें तें ‘रूढ’, त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गोवें संमेलनांत संमत झालेले, तत्पश्चात् महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे किंवा आता ‘बहुजनसंमत’ किंवा मध्यन्तरी वसन्त दावतर ह्यांनी आणि अलिकडे सत्त्वशीला सामंत ह्यांनी सुचविलेले लेखनविषयक नियम ह्या साऱ्यांशिवाय विनोबांनी, सावरकरांनी सुचविलेले आणि स्वतः वापरलेले, ह्याशिवाय आणखी पर्याय दरवर्षी निघाले किंवा प्रत्येक लेखकानें वेगळेच नियम पाळले तर वाचकाला त्रासदायक होतात. कोणता तरी एक पर्याय जर सर्वांनी मान्य करावयाचा तर मग तो जुनाच कां करूं नये असे विचार माझ्या मनांत आल्यामुळे मी एक पत्र मुद्दाम काही मंडळींकडे पूर्वी पाठविले होते.

माझी भूमिका बहुतेक पूर्ण मांडून झाली. ह्या माझ्या भूमिकेमुळे कोणा एका गटावर मी अन्याय करीत आहे असे मला वाटत नाही. तसें असल्यास अजून माझ्या ध्यानात आणून द्यावें. मी माझी भूमिका बदलेन.

प्रमाणभाषेविषयी हे सर्व लिहीत असतांना माझ्या डोळ्यांपुढे संस्कृतभाषेचे उदाहरण आहे. उपलब्ध इतिहासांत संस्कृतभाषा कोणालाहि स्वभाषा वा मातृभाषा म्हणून शिकविली गेली असें आढळत नाही. इंग्लिश माध्यमाच्या शाळा फोफावण्याच्या अगोदर ती भाषासुद्धां परकी भाषा म्हणूनच शिकविली गेली आहे. इतकेच नव्हे तर खुद्द इंग्लंडमध्ये घळपसी एपसश्रळीह पेक्षा वेगळ्या बोली आजहि अस्तित्वात आहेत. आम्ही जिला हिंदी म्हणतो ती (खडी बोली) गेल्या एकदीड शतकामध्ये निर्माण झालेली नवी कोरी भाषा आहे अशी माझी माहिती आहे. त्यापूर्वी ती कोणाचीच मातृभाषा नव्हती. त्यामुळे तीदेखील आरंभी परकीय भाषा म्हणूनच शिकविली गेली आहे. तेव्हां मराठीतहि प्रमाणीकृत पाठ (version) सगळ्यांच्याच मुलांना परकी भाषा म्हणून शिकविला जाण्यास हरकत नसावी.

कोणत्याहि परक्या भाषेचे उच्चार सर्वांना करता येत नाहीत. म्हणून प्रत्येकाला प्रमाण-लिखित-भाषेचे तंतोतंत उच्चार करतां आले पाहिजेत हा आग्रह आम्हीं सोडून दिला पाहिजे. पहिल्या चारपांचच नव्हे, तर आठव्या वर्गापर्यंत म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचे शिक्षण बोलीभाषेमधून क्रमाक्रमाने प्रमाणभाषेकडे नेणारे असावें; म्हणजे पाठ्यपुस्तकें प्रमाणभाषेमध्ये असावी पण वर्गांत वापरली जाणारी (संवादाची) भाषा उत्तरोत्तर स्थानिक बोलीकडून प्रमाणभाषेकडे जाणारी असावी. साहजिकच तोपर्यंत प्रमाणभाषेचे श्रवणकौशल्य आणि वाचनकौशल्य वाढविण्यावर भर देणारे शिक्षण असावें.

डॉ. वि.भि. कोलत्यांच्या भोपाळ येथील भाषणांत सुशिक्षितांच्या तोंडी रुळलेली भाषा ती प्रमाणभाषा झाली असे म्हटले आहे. परंतु माझें त्याविषयीचे मत मी सुरुवातीला मांडले आहे. माझ्या स्वतःच्या आज्या दोन्हीकडच्या आईची आई आणि वडिलांची आई प्रमाणबोली बोलत नसत. एक नासिक जिल्ह्यांतली होती, दुसरी अकोल्यांतली. असो. त्याचप्रमाणे बोलीमधले शब्द प्रमाण भाषेत घेणे म्हणजे तत्सम शब्द बोलीच्या उच्चाराप्रमाणे लिहिणे नव्हे. अमेरिकन भाषेमध्ये Psychology सारखे ग्रीक शब्द उच्चाराप्रमाणे लिहीत नाहीत. लिखित भाषा ही परभाषकांनी शिकावी असे वाटत असेल, ती दीर्घकाळपर्यंत सर्वांसाठी सुबोध राहावी अशी आपली इच्छा असेल तर तिच्या ठिकाणी प्रामाण्य (एकरूपता) राखलेच पाहिजे. पुन्हा सांगतों, प्रत्येक शब्द सर्वत्र एकाच प्रकारे लिहिलेला वाचावयाला मिळणे हा वाचकाचा अधिकार आहे. आणि तितके कष्ट म्हणजे त्या शब्दाचे प्रमाणरूप कोणते ते शिकण्याचे कष्ट प्रत्येक लेखकाने घेतले पाहिजेत. ‘साक्षरता वाढवायची असेल तर प्रमाणरूपाचा आग्रह सोडणे भाग आहे’ असें कांही जण म्हणतात. इंग्लिश मातृभाषा असणाऱ्यांमध्ये साक्षर लोक कमी आहेत काय ? ते blue आणि blew, soul आणि sole, write आणि right हे शब्द एकाच्या ऐवजी दुसरा लिहा असे कधीतरी म्हणतील काय? Shorthand मध्ये तसे लिहितात. पण म्हणूनच त्याचें लिप्यन्तर करावे लागते. Shorthand ने काम भागले असते तर सर्वांसाठी त्याच लिपीत त्यांनी पुस्तकें छापली असती.

आशयाबरोबर अभिव्यक्तीच्या संदर्भात शुद्ध आणि परिष्कृत लिखित रूपें ह्यांबाबत ग्रामीण आणि दलित साहित्यप्रकार मुक्त ठेवावेत असे एक मत आहे. त्याविषयीं खुलासा करणे आवश्यक आहे. बोलीभाषेत लिहूंच नये असें माझें मत नाही. पण ते लेखन कोणासाठी लिहिले जात आहे ह्याची जाणीव गमावू नये. बोलीभाषेत लेखन केल्याने ते समजणाऱ्यांची संख्या सीमित होते. जें मोठ्या संख्येसाठी लिहिलेले आहे व जें भविष्यकाळांतहि समजावें असें लेखकाला वाटतें तें प्रमाणभाषेत लिहिलेलें बरें. त्याचप्रमाणे परभाषक (परप्रांतीय आणि परदेशीय) अभ्यासकांना समजण्यासाठींहि लेखन प्रमाणीकृत भाषेतच करणे इष्ट आहे. नाहीतर तळटीपा देऊन तें सर्वांसाठी सुबोध करावें. बोलीमधून प्रमाणभाषेत शब्दांची आवक होतच राहणार झालीच पाहिजे. तशी आवक करतांना नवीन आलेल्या शब्दांना लिंग, वचन, विभक्तीचे विकार कसे होतील ते ठरवून टाकावे आणि नेहमी तसेंच लिहावें. प्रत्येक देशांतले आणि काळांतलें इंग्रजी वेगळे आहे हे आपण मान्य केले तरी त्यांनी एकदां नियम ठरविल्यानंतर आपले spelling बदललें नाहीं, लश्रशु चे ली असें केले नाही. आम्ही संस्कृतमधून घेतलेले गति, मति, कृति, भीति, असे सगळे शब्द साधित शब्द आहेत (गम्+क्तिन्, मत्+क्तिन्, कृ+क्तिन्, भी+क्तिन्) ह्याची आठवण ठेवलेली नाही. मराठीत घेतांना आम्ही त्यांना आमच्या भाषेचे विकार कसे होतील तेवढे एकदां ठरवून टाकलें, ते पुन्हा पुन्हां बदलणे अनिष्ट आहे. असो. प्रत्येक देशाचे इंग्रजी वेगळे ह्याचा अर्थ असा की Marriedt ऐवजी आम्ही Married with असे लिहूं लागलो आणि अशांसारखे आमच्या मातृभाषेच्या घडणीशी सुसंगत असलेले बदल आम्हाला खुपेनासे झाले. (पण ते ब्रिटिशांना खुपतात !) अशा शब्दांची लेखनपद्धति बदलू नये.

मराठीच्या लेखनविषयक विवादांतून आतां आपण कायमचे बाहेर पडू या. त्यासाठी प्रत्येक बोलीला मानाचे स्थान प्राप्त व्हावे म्हणून (१) बोलीमधून संभाषण चालू ठेवावें. आठवीनववीपर्यन्त शाळांमधून बोलीचा वापर करीत राहावें. (२) प्रमाणभाषेचा उपयोग फक्त छापील मजकुरासाठी करावा. बोलीभाषेत छापावयाचे असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करावा. अपरिचित शब्दांचे अर्थ तळटीपांत किंवा पुस्तकाच्या शेवटी द्यावे. तसेच त्या शब्दांचे लिंगवचनविभक्तीचे नियम करावे. (३)प्रमाणभाषेत किंवा बोलीभाषेत छापतांना तत्सम आणि साधित शब्द वापरण्याचा प्रसंग आल्यास ते सर्वत्र मुळाबरहुकूम छापावें. ‘नैर्ऋत्य’ चे नैऋत्य /नैरुत्य/नइरुत्य करूं नये, कारण तोहि साधित शब्द आहे. (४)आजवरची प्रमाणभाषा मान्य नसल्यास नवीन प्रमाणभाषा घडवावी. पण तसे करतांना पूर्वीच्या नियमांप्रमाणे लिहिलेले किंवा छापलेलें दंडार्ह मानूं नये. (५) लेखनविषयक नियम शिकविण्याची सोय ठिकठिकाणी करावी आणि त्यासाठी स्वस्त व लहान आकाराच्या पुस्तिका वर्णमालेच्या पटा(तक्त्या) सारख्या सुलभतेनें प्राप्य ठेवाव्या. मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपुर ४४० ०१०. पायवा आजचा सुधारकच्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची “विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’ मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील. आजच्या सुधारकच्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *