जिज्ञासा म्हणजे नेमके काय?

जिज्ञासा ही मानवी मेंदूची सर्वांत मूलभूत, परंतु अत्यंत गुंतागुंतीची आणि उत्क्रांतीदृष्ट्या अत्यावश्यक अशी प्रवृत्ती मानली जाते. माणूस हा केवळ जगण्यासाठी लढणारा प्राणी नाही तर स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यासाठी सतत धडपडणारा जीव आहे. ‘जिज्ञासा’ ह्या शब्दाचा अर्थ जरी भाषिक पातळीवर जिद्द, ज्ञान आणि साहस ह्यांची एकत्रित अभिव्यक्ति वाटत असला, तरी मेंदूविज्ञान, संज्ञानशास्त्र, उत्क्रांतिविज्ञान आणि मानसशास्त्र ह्यांच्या चौकटीतून पाहिल्यास ती एक बहुआयामी, जैविक, सामाजिक, आणि सांस्कृतिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा मेंदूच्या रचनेशी, माहितीप्रक्रियेशी, बक्षीसप्रणालीशी आणि जगण्याच्या रणनीतीशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. जरी व्युत्पत्तीशास्त्रीयदृष्ट्या हा शब्द जिज्ञा (ज्ञात करू इच्छितो) ह्या धातूपासून निर्माण झाला असला, तरी त्यात जिद्दीचा आग्रह, ज्ञानाची भूक आणि साहसाची तयारी हे तीनही भावार्थ अंतर्भूत होतात. जिज्ञासा म्हणजे केवळ नवे ज्ञान मिळवणे इतकेच नव्हे, तर अनभिज्ञ असलेल्या गोष्टींच्या दिशेने मानसिक पावले उचलण्याचे धाडस, अज्ञाताचा शोध घेण्याची तयारी व त्यातून निर्माण होणारी समज ह्या सर्व प्रक्रियांचा एकत्र परिणाम आहे. मानवजातीच्या सांस्कृतिक इतिहासात पाहिले तर वैज्ञानिकक्रांतीपासून कृषिक्रांतीपर्यंत, संगणकयुगापासून अवकाशसंशोधनापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यामागे माणसाच्या मेंदूतील ही शोधक वृत्ती मुख्य प्रेरणास्थान राहिली आहे. म्हणूनच जिज्ञासा ही माणसाची एक मूळ जैव-मानसिक प्रेरणा मानली जाते. ती नसती तर ज्ञानार्जनाची गती, तंत्रज्ञानाची निर्मिती किंवा समस्या सोडवण्याची मानवी क्षमता इतकी विकसित झाली नसती. जिज्ञासा म्हणजे नवे काही जाणून घेण्यासाठी तत्पर असलेली एक उत्स्फूर्त प्रेरक शक्ती आहे. ही व्यक्तीला साचेलपण (stagnancy), अस्पष्टता (ambiguity), अनिश्चितता (uncertainty) आणि ज्ञान-अभाव (information gap) ह्यांमुळे आलेल्या रिक्ततेची पूर्तता करण्यासाठी सतत अन्वेषण करण्यास उद्युक्त करते. जिज्ञासेच्या ह्या सततच्या धडपडीमुळे केवळ तंत्रज्ञानात वा विज्ञानात शोध लागले नाहीत; तर मानवी संस्कृती, भाषा, समाजरचना, धर्म, कला आणि तत्त्वज्ञान ह्यांचीही वाढ होत गेली.

मानवी जिज्ञासेची वैज्ञानिक चर्चा प्रथम संज्ञानात्मक मानसशास्त्रात झाली आणि नंतर तिचे विश्लेषण मेंदूविज्ञानामध्ये विस्तारले. मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टीचे अवलोकन करतो तेव्हा त्याच्या मेंदूतील संवेदनेंद्रिय प्रणाली बाहेरील उत्तेजनांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करते. पण अवलोकन निष्क्रिय कार्य न राहता, जिज्ञासेमुळे ते सक्रिय अन्वेषणात रूपांतरित होते. नव्या गोष्टी, नव्या घटना, नवे आवाज, नव्या समस्या, नव्या परिस्थिती ह्यांविषयी मेंदूला मूलभूत आकर्षण वाटते. कारण जीवशास्त्रीय पातळीवर नवीन माहिती म्हणजे संभाव्य उपयोगी माहिती भविष्यात जगण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे मेंदूला वाटते. उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितले तर आदिमानवाला आपले पर्यावरण समजणे, अन्नस्रोत शोधणे, धोके ओळखणे, वातावरणातील बदलांची जाणीव ठेवणे आवश्यक होते. म्हणूनच जिज्ञासा ही मेंदूत अंतर्भूत असलेली मूलभूत प्रेरणा (survival mechanism) बनली. प्राण्यांतही जिज्ञासेची चिह्ने आढळतात; परंतु मनुष्याची जिज्ञासा संकल्पनात्मक (conceptual), प्रतीकात्मक (symbolic) आणि पद्धतशीर (systematic) स्वरूपात विकसित झालेली आहे. विज्ञान-तत्त्वज्ञानातील कार्ल पॉपर ह्यांच्या ’अनुमान आणि खंडन’ ह्या वैज्ञानिक चौकशीच्या सिद्धांतातून मनुष्य अनुमान मांडतो, त्याची पडताळणी करतो, आणि अनुभवांद्वारे ज्ञान वृद्धिंगत करतो असे दिसते.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जिज्ञासेचे विश्लेषण केल्यास ती अन्वेषणात्मक प्रेरणा (exploratory drive) ह्या संकल्पनेशी जोडली जाते. लहान मूल जन्माला येताच आपल्या भोवतालच्या जगाकडे डोळे मोठे करून बघते, वस्तू हातात घेते, चव घेते, आवाज ओळखू लागते, ही संपूर्ण प्रक्रिया सैद्धांतिकदृष्ट्या जिज्ञासेची जैविक अभिव्यक्ती आहे. ह्या प्रत्येक कृतीत मूल काहीतरी नवे शिकत असते, त्याच्या न्यूरल नेटवर्कमध्ये नवीन सायनॅप्स तयार होत असतात. मेंदूविज्ञान सांगते की, नवीन ज्ञान मिळताना मानवी मेंदूत डोपामिन नावाचे रसायन – जे आनंद, अपेक्षा आणि प्रेरणावर्धक असते – उच्च प्रमाणात स्त्रवते. म्हणजेच नवीन माहिती किंवा अनुभव मिळवणे हे मानवी मेंदूसाठी अंतःप्रेरित आनंदाचा स्रोत आहे. मनुष्याला जिज्ञासा बाळगण्यासाठी प्रलोभनाची आवश्यकता नसते; ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया हीच त्याच्यासाठी उपयुक्त आणि सुखकारक असते. म्हणून शतकानुशतके वैज्ञानिक, तत्त्ववेत्ते, शोधक, कलाकार इत्यादींना प्रचंड अडचणी, विरोध व संघर्ष सहन करूनही शोधकार्य करण्याची शक्ती मिळाली, कारण जिज्ञासेचा अंतर्गत स्रोत त्यांना सतत पुढे ढकलत राहिला.

जिज्ञासेचा मेंदूतील तात्त्विक पाया बघितला तर दोन महत्त्वाचे भाग आढळतात—डोपामिनर्जिक बक्षीसप्रणाली आणि हिप्पोकॅम्पस.

डोपामिनर्जिक बक्षीसप्रणाली – जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरुवात करतो, तेव्हा मेंदूत डोपामिन ह्या रसायनाचा स्त्राव वाढतो. ह्यामुळे उत्साह, आनंद आणि ‘नवीन माहिती मिळवण्याची’ अंतर्गत प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे माहिती मिळाल्यावर नाही; तर माहिती मिळणार आहे ह्या अपेक्षेनेच डोपामिन सक्रिय होते. म्हणूनच आपण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा, त्याचे उत्तर मिळेपर्यंत एक वेगळीच बेचैनी, ताण आणि त्याचवेळी आनंदाची अनुभूती आपल्यात निर्माण होत असते.

हिप्पोकॅम्पस – हा मेंदूचा भाग स्मरणशक्ती आणि अनुभवांचे संघटीकरण करतो. जिज्ञासा वाढली की हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय होतो, म्हणजेच जिज्ञासा स्मरणशक्ती सुधारते. ह्याचा अर्थ असा की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला उत्सुकता असते, त्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. म्हणूनच शिक्षणशास्त्रात ’कुतूहलप्रेरीत शिक्षण’ हा सिद्धांत प्रभावी मानला जातो. विद्यार्थी जेव्हा केवळ परीक्षेच्या किंवा अन्य कुठल्या धाकाने शिकत नाही, तर जिज्ञासेने शिकतो, तेव्हा शिकलेले ज्ञान खोलवर टिकते आणि त्याची सर्जनशीलता वाढते.
जिज्ञासा केवळ ज्ञानसंकलनापुरती मर्यादित नसून जाणिवेच्या (cognition) विकासाशी तिचा थेट संबंध आहे. जीन पियागेट ह्यांच्या संज्ञानविकास सिद्धांतात जिज्ञासेला मुलांच्या बौद्धिक वृद्धीचे मूळ मानले गेले आहे. मूल जन्मजात काही प्रतीक्षिप्त क्रिया घेऊन जन्माला येते, परंतु त्याचे संज्ञानात्मक जग अन्वेषणाने विस्तारित होते. सतत वस्तूंना स्पर्श करणे, मोडणे, उघडणे, प्रश्न विचारणे, पुनर्परीक्षण करणे, ही सर्व वर्तने लहान मुलाच्या जिज्ञासेचे प्रकटीकरण आहे. ह्या प्रक्रियेत आत्मसात करणे, समायोजन शिकणे आणि बौद्धिक संरचना विकसित होणे, हे घडते.. म्हणूनच जिज्ञासा नसती तर कल्पनाशक्ती नसती, कल्पनाशक्ती नसती तर विज्ञान, कला, साहित्य काहीही जन्मास आले नसते. मानवी विचारप्रक्रियेतील प्रश्न विचारणे (inquiry) ही जिज्ञासेची सर्वात महत्त्वाची रूपरेषा आहे. “का?”, “कसे?”, “काय?”, “कशासाठी?” ह्या चार प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात मानवाने पृथ्वीपासून अंतराळापर्यंतचा प्रवास केला. अणूची रचना, उत्क्रांती, गुरुत्व, प्रकाश, चेतना, रोगनिर्मिती, औषधशास्त्र, अवकाश तंत्रज्ञान, ह्या सर्व क्षेत्रांचे मूळ प्रश्नांमध्ये आहे, आणि प्रश्नांचे मूळ जिज्ञासेत आहे.

उत्क्रांतीशास्त्रीय दृष्टीने पाहता जिज्ञासा फक्त मानसिक सौख्य नसून जीवनसंरक्षणाशी निगडित अशी एक अत्यावश्यक जैविक यंत्रणा आहे. प्राचीन मानवाला जंगलात, गुहेत, अनोळखी प्रदेशात जगण्यासाठी पर्यावरणाचे नीट निरीक्षण करावे लागत असे. कोणती वनस्पती खाद्य आहे? कोणता आवाज धोका दर्शवतो? पाण्याचा स्रोत कुठे मिळेल? प्राण्यांच्या पाऊलखुणांचा अर्थ काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता ही जगण्याची अट होती. जो जास्त निरीक्षक, जास्त प्रश्न विचारणारा, जास्त प्रयोग करणारा तोच सुरक्षित राहायचा. त्यामुळे उत्क्रांतीने जिज्ञासू प्रवृत्ती असलेल्या मानवसमूहांचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणूनच डार्विनची वैज्ञानिक उत्क्रांती मान्यता दाखवते की, जगण्याची क्षमता वाढवणारी विविधता नैसर्गिकरीत्या निवडली जाते. म्हणजेच जिज्ञासा ही एक प्रकारची उत्क्रांतिजन्य ‘सिलेक्टेड ट्रेट’ आहे. निसर्गाने ती मानवाला फक्त देणगी म्हणून दिली नाही, तर जगण्याची आवश्यकता म्हणून ती मानवात विकसित केली. पुढे हीच जिज्ञासा मानवाला गुहेच्या जीवनातून बाहेर काढून शेतीकडे, शेतीतून वस्ती व समाजव्यवस्थेकडे, आणि अखेरीस तंत्रज्ञानकेंद्रित आधुनिक जगाकडे घेऊन आली.

मानसशास्त्रात जिज्ञासेचे अनेक प्रकार सांगितले जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे प्रकार म्हणजे आकलनीय कुतूहल, ज्ञानरचनावादी कुतूहल आणि वैविध्यपूर्ण कुतूहल. ज्ञानेंद्रियाधारीत कुतूहल म्हणजे नवीन आवाज, वास, दृश्य, स्पर्श किंवा अचानक बदललेली परिस्थिती ह्यांविषयी आकर्षण/भय निर्माण होणे. हे बाल्यावस्थेत भरपूर दिसते. ज्ञानरचनावादी कुतूहल म्हणजे ज्ञानसंकलनासाठी प्रश्न विचारणे, सिद्धांत तपासणे, तर्कशास्त्रीय चौकशी करणे. ही जिज्ञासा माणसाला संशोधनाच्या दिशेने नेते. वैविध्यपूर्ण कुतूहल म्हणजे एकसुरीपणा मोडून नवीन अनुभव शोधण्याची क्रिया. ह्या क्रियेमुळे जिज्ञासा उत्क्रांतीच्या पातळीवर मेंदूला सक्रिय ठेवते आणि व्यक्तीला नवीन पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. ह्या सर्व प्रकारांना मेंदूत वेगवेगळे रिवॉर्ड सिग्नल्स मिळतात, परंतु त्यांचा अंतिम परिणाम ज्ञानवृद्धी आणि अनुकूलन (adaptation) हाच असतो.

जिज्ञासेमुळेच ज्ञान व्यवहारात उतरते. विज्ञान म्हणजे केवळ सिद्धांतांचे संग्रहालय नाही. कोणतेही शास्त्र तेव्हाच व्यवहारोपयोगी ठरते जेव्हा त्याला निरीक्षण, आणि प्रयोगांची जोड मिळते. हे पद्धतशीरपणे घडण्यामागे माणसाच्याठायी असलेली जिज्ञासा ही प्रेरकशक्ती आहे. अंधश्रद्धा, मिथक आणि परंपरा ह्यांच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारणे म्हणजे जिज्ञासा. विज्ञानाची सुरुवात संशय (skepticism) आणि चौकशी (inquiry) ह्यातून होते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी ही जिज्ञासेचे सर्वाधिक प्रगत रूप आहे. वैज्ञानिक पद्धतीत निरीक्षण, अनुमान, प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्ष ही पाच पायऱ्यांची प्रक्रिया आहे, परंतु ह्या सर्वांची बीजे जिज्ञासेत आहेत. एखादी घटना पाहून “हे असे का झाले?” हा पहिला प्रश्न निर्माण होतो; तोच प्रश्न पुढे संशोधनाचे रूप घेतो. म्हणूनच ज्ञानेच्छा ही मानवाच्या बौद्धिक उत्क्रांतीची जननी मानली जाते.

भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र वा गणित, कोणतेही विज्ञान घ्या, त्याचा पाया म्हणून ‘का?’ ‘कसे?’ ‘काय?’ ‘कशासाठी?’ ह्या प्रश्नांनीच ज्ञानाची इमारत उभी केली आहे. विज्ञान स्वतः प्रश्नांच्या प्रणालीगत तपासणीने उभे राहिले आहे. उदाहरणार्थ, आकाशातील तारे का चमकतात, दिवस-रात्र कसे होतात, पदार्थांचे गुणधर्म कसे बदलतात, रोगांची उत्पत्ती कशी होते, ह्या प्रश्नांनीच वैज्ञानिक पद्धतीची सुरुवात केली. विज्ञानाच्या दृष्टीने विश्व हे एक समस्यांचे जटिल जाळे आहे आणि जिज्ञासा ही ती समस्या उलगडण्यासाठीची मूलभूत ऊर्जा आहे. वैज्ञानिक पद्धतीचा चार मुख्य टप्पे – निरीक्षण, प्रश्ननिर्मिती, गृहीतक, प्रयोग आणि पडताळणी – ह्यांपैकी पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे निरीक्षण. निरीक्षण करण्याची प्रेरणा जिज्ञासेमुळेच तयार होते. जर एखाद्या व्यक्तीत जिज्ञासा नसेल तर तो नवीन समस्या शोधणार नाही, शोधलेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यामुळे ज्ञानप्रक्रिया ठप्प होईल. म्हणूनच वैज्ञानिकांच्या भाषेत जिज्ञासेला शोधाची जननी असे संबोधले जाते.

मानवनिर्मित तंत्रज्ञानातील प्रगतीही जिज्ञासेशीच संलग्न आहे. अग्नीचे नियंत्रण, चाकाचा शोध, धातूंच्या तंत्रज्ञानाचा विकास, वैद्यकशास्त्राची उभारणी, अभियांत्रिकीच्या सर्व शाखा, अंतराळ संशोधन, संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्या सर्व निर्मितींमागे प्रथम ‘ही गोष्ट नेमकी कशी कार्य करते?’ हा शोधक प्रश्न येतो. उदाहरणार्थ, विजेची प्रकृती काय आहे, ह्या प्रश्नाने फॅरडेपासून मॅक्सवेलपर्यंतच्या संशोधकांना प्रेरणा दिली आणि त्यातून आजचे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक विश्व तयार झाले. रॉकेट अवकाशात का आणि कसे जातात, गुरुत्वाकर्षण कसे कार्य करते, शरीरातील पेशी कशा वाढतात, मेंदू स्मृती कशी तयार करतो, ह्या प्रत्येक प्रश्नाने मानवाला शोध घेण्यास उद्युक्त केले. जिज्ञासा नसती तर प्रयोग करण्यासाठी अंगी धाडस आले नसते; प्रयोगांशिवाय नवकल्पना शक्य झाली नसती. म्हणूनच तंत्रज्ञान ही जिज्ञासेची स्पृष्ट फलश्रुती आहे.

मानवी संस्कृतीच्या विकासातही जिज्ञासेची भूमिका तितकीच प्रभावी आहे. भाषेचा विकास हा जिज्ञासेचा पहिला सांस्कृतिक परिणाम मानता येईल. माहिती पुढे नेण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, स्पष्टीकरणे देण्यासाठी भाषा अत्यावश्यक होती. पुढे समाजरचनेचा विकास, भटके-शिकारी-शेतकरी समाज ह्यांचे रूपांतर, अग्नीचा शोध, धातूंचा वापर, शेती, व्यापार, राज्यव्यवस्था, कायदे, धर्म, तत्त्वज्ञान, हे सर्व जिज्ञासेचे परिणाम आहेत. प्रश्न विचारणारा समाज पुढे जातो, तर प्रश्न विचारणे टाळणारा समाज अंधश्रद्धा आणि धर्ममार्तंडाच्या शोषणाला बळी पडतो. जिज्ञासा ही केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक उर्जाही आहे. एखाद्या समाजात जितकी अधिक बौद्धिक जिज्ञासा असेल तितका त्या समाजाचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होतो.

जिज्ञासेचा संबंध सर्जनशीलतेशी थेट आहे. संशोधक, लेखक, चित्रकार, संगीतकार, अभियंते, संश्लेषक, ह्या सर्व क्षेत्रातील लोकांमध्ये ‘विचारांचा विस्तार’ (cognitive flexibility) हे गुणवैशिष्ट्य जास्त आढळते, आणि ही लवचिकता जिज्ञासेतून येते. जिज्ञासू मन जुनी चौकट मोडून नवी चौकट निर्माण करते. दोन असंबंधित कल्पनांमध्ये नवीन संबंध शोधणे, म्हणजेच सहयोगी सर्जनशीलता जिज्ञासेमुळेच शक्य होते. आधुनिक न्यूरोइमेजिंग तंत्रज्ञानातून दिसते की सर्जनशील विचारांच्या वेळी ‘डीफॉल्ट मोड नेटवर्क’, ‘सेलिन्स नेटवर्क’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह कंट्रोल नेटवर्क’ एकत्र सक्रिय होतात. ह्या तीन प्रणाली एकत्रितपणे कार्यरत राहू शकतात. कारण जिज्ञासा मेंदूला बहुस्तरीय प्रक्रियांसाठी सज्ज ठेवते.

जिज्ञासा ही केवळ बौद्धिक आणि वैज्ञानिक घटक नसून नैतिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. जगातील विविध संस्कृती, विचारधारा, मानवी अनुभव, वेगवेगळ्या लोकांच्या कथा जाणून घेण्याची इच्छा सामाजिक सलोखा वाढवते. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल “का झाले?” व “कसे टाळता येईल?” असे विचार करणे म्हणजे सामाजिक जिज्ञासा. हीच जिज्ञासा न्याय, समता, मानवी हक्क, आणि संवेदनशीलता ह्यांच्या विचारांना जन्म देते. म्हणूनच समाजशास्त्रात म्हणतात की जिज्ञासाशून्य समाज हा हिंसक, असहिष्णु आणि बंदिस्त होऊ शकतो, तर जिज्ञासू समाज हा पारदर्शी, प्रगत आणि मानवी मूल्यनिष्ठ असतो. जिज्ञासेचे सामाजिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केल्यास ती समाजाच्या ज्ञानसंवर्धनात महत्त्वाचा घटक म्हणून दिसते. प्रत्येक समाजातील वैज्ञानिक मनोवृत्ती ही त्या समाजाने जिज्ञासेला किती प्रोत्साहन दिले ह्यावर ठरते. ज्या संस्कृती प्रश्न विचारण्याला महत्त्व देतात, तिथे संशोधनाची पातळी उंचावते. ज्या समाजात प्रश्न विचारणे हे धाडस किंवा अपराध समजले जाते, तिथे जिज्ञासेची घुसमट होते आणि ते समाज विज्ञान, तंत्रज्ञान, चिकित्सा, कला ह्या सर्व क्षेत्रांत मागे पडतात. म्हणून आधुनिक शिक्षणपद्धतीत कुतूहल जागवणारे प्रश्न विचारणारे शिक्षण ही संकल्पना तयार झाली. विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी प्रश्न विचारावेत, त्यांना शोधमूलक क्रिया करायला प्रवृत्त करावे, हे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. कारण शेवटी ज्ञानाची शक्ती ही माहितीच्या गुणाकारात नसून प्रश्नांच्या गुणवत्तेत असते. समाजाच्या प्रगतीसाठी जिज्ञासेचे वातावरण निर्माण करणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे.

जिज्ञासा आणि सर्जनशीलता ह्यांचा परस्परसंबंध विज्ञानात विशेषत्वाने चर्चिला जातो. सर्जनशील मन नेहमीच “…तर काय?” ह्या प्रश्नाने झपाटलेले असते. म्हणजेच “हे असे झाले तर काय?” “याच्या उलटे घडले तर काय?” “या जुन्या संकल्पनेत नवीन संकल्पना मिसळली तर काय?” अशा काल्पनिक, पर्यायी शक्यतांचा विचार करण्याची क्षमता जिज्ञासेच्या आधारे निर्माण होते. म्हणूनच विज्ञानात ‘कल्पनाशक्ती’ आणि ‘जिज्ञासा’ एकमेकांच्या साहाय्यक मानल्या जातात. आइनस्टाईनने अनेक ठिकाणी म्हटले आहे, “I have no special talent. I am only passionately curious.” हे वाक्य जिज्ञासेची सर्जनशीलता निर्माण करणारी क्षमता दाखवते. जिज्ञासा विचाराला बंदिस्त ठेवत नाही; ती विचाराला सतत विस्तारित, पुनर्भाषित आणि पुनर्रचित करते. ती जुन्या सिद्धांतांवर प्रश्न उपस्थित करते, नव्या सिद्धांतांना जन्म देते आणि मानवी ज्ञानाच्या सीमा पुढे नेत राहते.

मानवाच्या भावनिक-संज्ञात्मक विकासातही जिज्ञासेची भूमिका महत्त्वाची आहे. जिज्ञासा व्यक्तीला अनिश्चितता झेलण्याची क्षमता देते. सामान्यतः माणूस अनिश्चितता आणि बदलाला घाबरत असतो. कारण बदल हे भीती, जोखीम आणि असुविधा निर्माण करतात. परंतु जिज्ञासू मनुष्य ह्या अनिश्चिततेकडे धोक्यापेक्षा आव्हान म्हणून पाहतो. मानसशास्त्रीय संशोधन सांगते की, जिज्ञासू लोकांची समस्या सोडवण्याची क्षमता जास्त असते, तणाव व्यवस्थापन कुशल असते, त्यांनी घेतलेले निर्णय अधिक सुजाण असतात, आणि त्यांची मानसिक लवचिकता (cognitive flexibility) इतरांपेक्षा जास्त असते. कारण ते अवघड परिस्थितीत “हे का झाले?” “यात दुसरा मार्ग कोणता?” “मी ह्याबद्दल अजून काय जाणू शकतो?” असे प्रश्न विचारतात. म्हणूनच जिज्ञासा ही व्यक्तिमत्वाचा एक असा गुण आहे की जो मानसिक आरोग्याशीही सकारात्मकपणे जोडला जातो.

जिज्ञासेचे वैज्ञानिक विश्लेषण करताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिज्ञासा आणि धोका ह्यांचे समीकरण लक्षात घेणे आवश्यक ठरते. जिज्ञासा अनेकदा प्रगती घडवते, परंतु अति जिज्ञासा काही वेळा जोखमीची स्थिती निर्माण करू शकते. उत्क्रांतीशास्त्रात ह्याला ‘रिस्क ट्रेड-ऑफ’ असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, अति जिज्ञासा असलेले प्राणी शत्रूच्या सापळ्यात लवकर अडकू शकतात, तर फार कमी जिज्ञासा असलेले प्राणी खाद्य, साथीदार किंवा आश्रय शोधण्यात मागे राहतात. मानवासाठीही हेच समीकरण लागू पडते. म्हणूनच समाज आणि शिक्षणव्यवस्थेने जिज्ञासेला दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे, पण प्रश्नांची वैज्ञानिक पडताळणी अधिक महत्त्वाची. अंधश्रद्धा, अफवा, चुकीची माहिती ह्यांची मुळेही दिशाहीन जिज्ञासेत असतात. म्हणजेच जिज्ञासा योग्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण झाली तर ती ज्ञानवृद्धी घडवते, पण अनियंत्रित आणि अवैज्ञानिक पद्धतीने वाढल्यास भ्रम निर्माण करू शकते. म्हणूनच वैज्ञानिक पद्धत ही जिज्ञासेचा शिस्तबद्ध वापर करण्यासाठीची सुरक्षित चौकट आहे.

‘सैद्धांतिक ज्ञान’ आणि ‘उपायोजन’ ह्यांचे परस्पर नातेही जिज्ञासेच्या अभ्यासात महत्त्वाचे ठरते. मानवनिर्मित कोणतेही शास्त्र सैद्धांतिकदृष्ट्या जितके परिपूर्ण असते, तितके ते व्यवहारात उतरणे आवश्यक असते. एखादा सिद्धांत प्रयोगातून पडताळला गेला, तरच त्याची उपयुक्तता वाढते. आणि ही उपयुक्तता तपासण्यामागेही जिज्ञासाच असते. त्यामुळे सिद्धांतातून तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून उद्योग, उद्योगातून सामाजिक बदल अशी शृंखला तयार होते. आजच्या विज्ञानशाखा – अभियांत्रिकी, वैद्यक, जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र – ह्यांची मुळे शुद्ध विज्ञानाच्या जिज्ञासेतच होती.

मानवाच्या प्रगतीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक युगात प्रगतीकडे घेऊन जाणारा प्रेरणास्त्रोत म्हणजे जिज्ञासाच होती. कृषिक्रांतीपासून औद्योगिक क्रांतीपर्यंत, वाफेच्या इंजिनपासून संगणकांपर्यंत, अनुवंशशास्त्राच्या आरंभापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासापर्यंत, ह्या सर्व गोष्टींना सुरुवात झाली ती “आणखी काय शक्य आहे?” ह्या शोधक प्रश्नातूनच. जिज्ञासेमुळेच मानवाने पृथ्वीबाहेर पावले ठेवली. चंद्रावर जाण्याचा विचार हा वैज्ञानिक तर्कापूर्वी जिज्ञासेचा विचार होता. “तिथे काय आहे?” ह्या प्रश्नानेच अवकाश विज्ञानाला जन्म दिला. कोविडसारख्या महामारींच्या काळातही जिज्ञासेनेच वैज्ञानिकांना व्हायरसची रचना समजून घेण्यास, लसी संशोधित करण्यास आणि वैद्यकशास्त्रात क्रांती घडवण्यास मदत केली.

शेवटी, जिज्ञासा ह्या मानवी प्रवृत्तीचा अभ्यास वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानिक अशा सर्व अंगांनी केला तर असे दिसते की, ती केवळ ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया नाही, तर जीवन जगण्याची आणि मानवता जागवण्याची एक मूलभूत शक्ती आहे. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की, माणसाच्या इतिहासात कोणतीही प्रगती मग ती भौतिक असो किंवा बौद्धिक, जिज्ञासेशिवाय घडलेली नाही. जिज्ञासा हीच विज्ञानाची प्राथमिक आधारशिला, तंत्रज्ञानाची बीजाक्षरे, समाजाच्या प्रगतीची प्रेरणा आणि मानवाच्या विचारजगताची अखंड गतिशील शक्ती आहे. मानव जितका जिज्ञासू तितका प्रगत, आणि जितका प्रगत तितकी जिज्ञासेची नवी क्षितिजे त्याच्यासमोर उलगडत जातात. जिज्ञासा ही माणसाची केवळ मानसिक गरज नाही, तर ती मानवी अस्तित्वाचे तत्त्व आहे. नव्या वस्तू, नव्या कल्पना, नव्या जगांचे दार उघडण्यासाठी जिज्ञासा हीच किल्ली आहे. ज्ञानेंद्रिये, मेंदूची प्रक्रिया, न्यूरोकेमिकल्स, सामाजिक चौकटी, सांस्कृतिक प्रक्रिया, ह्या सगळ्यांचा संगम म्हणजे जिज्ञासा. तिच्यामुळेच मानवी प्रगती शक्य झाली, तिच्यामुळेच शास्त्र निर्माण झाले, तिच्यामुळेच आपण पृथ्वीकेंद्री कल्पनेतून बाहेर पडून विश्वाचे वैज्ञानिक स्वरूप समजू शकलो. जिज्ञासेमुळेच असंभव वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडली; आणि अजूनही जिज्ञासेमुळेच नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार पुढे येत आहेत. जिज्ञासेला माणसाची मूलभूत प्रेरणा म्हणतात; कारण तीच मनुष्याला ‘जगणे’ शिकवते, माणसात कुतूहल जागवते आणि ‘समजणे’ही शिकवते.

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.