विक्रम आणि वेताळ – ॲप्पलातून

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत तो खांद्यावर टाकणार इतक्यात . . 

“Hello, राजन्!”

“ऑं? हे कोण बोललं?”

“मीच राजन्, हाच प्रेतात्मा, वेताळ!”

“आज तुला खांद्यावर टाकून स्मशानाच्या दिशेने चालू लागण्यापूर्वीच?”

“हो, म्हटलं तुला गोष्ट सांगून मग त्यावर प्रश्न विचारून तुझं मौनव्रत तोडण्यापेक्षा, तुला surprise देऊन आधीच तुझ्या मौनव्रताचा भंग करावा! आपल्याला आपली Free will वापरता येते का ह्याचा एक प्रयोग करून बघावा!

आता एवीतेवी तुझ्या मौनव्रताचा भंग झालाच आहे, तर सांग तुझंही मत. Free will असते की नाही आपल्याला?”

“पण वेताळा, तुझं असं वागणंच नियत नव्हतं कशावरून?”

“अरे मी सांगतो ना, मी वापरली माझी Free will. मनात आलं ते करून मोकळा झालो बघ. म्हणजे Free will नेच वागलो ना?”

“मग नुसतीच will म्हण ना, इच्छा, इच्छाशक्ती, आत्मबळ, वगैरे. त्यासोबत Free कशाला?”

“असे उलट प्रश्न नको करूस. सरळ सरळ उत्तर दे!”

“Ok, त्याचं काय आहे वेताळा, की हे Free will प्रकरण ना थोडं misnomer आहे.”

“म्हणजे काय?”

“Will च्या आधी हा Free शब्द टाकल्यानेच सगळा गोंधळ होतो आहे बघ. खरंतर इच्छा जर स्वतंत्र नसली तर ती इच्छाच कशी? पण असो, Free willकडे आपल्याला दोन बाजूंनी बघता येऊ शकेल –
पहिली: मूलभूत अंतःप्रेरणेनुसार आपल्याला वागता येणे, आणि
दुसरी: अंत:प्रेरणेचा आपल्या इच्छेनुसार निरोध करता येणे.”

“म्हणजे engine आणि brake म्हणावं का राजन?”

“हम्, तशाच सारखं. आणि इच्छाशक्ती जर फलद्रूप व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी ह्या दोन्हींचा उपयोग सारासार विचार करूनच करावा लागतो, तो आपला विवेक!”

“म्हणजे इंद्रियांचा लगाम बुद्धीच्या हाती असंच ना?”

“होय वेताळा. पण ह्या Willच्या आधी Free लावलं की मूलभूत अंत:प्रेरणेनी होणारी इच्छा व त्यानुसार वर्तन, आणि त्यावरील बुद्धीचे नियंत्रण, हे दोन्हीं खरोखर Free म्हणजे Random आहेत, की नियत म्हणजे Deterministic, ह्याविषयी हवा तेवढा काथ्याकूट करत बसता येतो. ह्याचं कारण असं, की नियत काय असेल? ह्याचा आपण केवळ अंदाजच वर्तवू शकतो, आणि ते तसं न घडल्यास, जे घडलं तेच नियत होतं, असा claim करू शकतो!”

“पण मग जर Willचा अर्थच जी Free असते ती, असा असेल, तर त्याच्या आधी मुद्दाम आणखीन Free लावण्याचे कारणच काय राजन्?”

“आत्ता कुठे आलास बघ मुद्द्यावर. इथेच तर ती खरी अद्भुत कलात्मक कलाटणी आहे वेताळा. त्या Free शब्दातच एका अदृश्य अतूट बंधनाचं गूढ दडलेलं आहे बघ.”

“झाला बाबा हा परत सुरू!”

“काय म्हणालास?”

“काही नाही, पुढे बोल.”

“बरं, मला एक सांग वेताळा, माया म्हणजे काय रे?”

“राजन्, खरंच चुकलो रे मी तुला प्रश्न विचारून! उगीच हात दाखवून अवलक्षण केलं. उत्तर देण्याऐवजी मलाच भलभलते असंबद्ध प्रश्न विचारून भंडावून सोडतोस तू. खरा भटकता आत्मा तूच आहेस बाबा, मी नाही.”

“श्रद्धा आणि सबुरी ठेव वेताळा! मिळतील तुझ्या सगळ्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे तुला. पण दरम्यान मला सांग माया म्हणजे काय?”

“त्यात काय राजन्, माया म्हणजे प्रेम, पण प्रियकर प्रेयसीचं असतं तसं नव्हें, आईचं बाळाविषयी असावं तसं, ममत्व म्हण हवं तर.”

“चुकलास बघ तू, माया म्हणजे जे फसवं, मायावी, मायाजाल असतं ते. एक नेहमी लक्षात ठेव दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. 

जर तुला कोणास फशी पाडायचं असेल ना, तर असं घटोत्कचीय मायाजाल विणावं लागतं, कळलं? बरं आता मला सांग, Free म्हणजे काय?”

“तुला काय माहीत नाही का राजन् Free चा अर्थ? पण जाऊ दे, फ्री म्हणजे स्वतंत्र, मुक्त, बरोबर ना?”

“परत चुकलास!”

“मग?”

“Free म्हणजे स्वैर, बेलगाम! आता मला सांग अशी बेलगाम इच्छा म्हणजे will योग्य की अयोग्य?”

“अर्थातच अयोग्य राजन्, इच्छा बेलगाम तर नकोच! तिला हद्दपार करता आलं नाही तरी तीवर लगाम तर कसता यायलाच हवा ना? नाहीतर मग सफरचंद खाल्लं जायचं!”

“शाबास वेताळा, पडलं वाटतं एकदाचं सफरचंद तुझ्या डोक्यावर!”

“काय म्हणालास राजन्?”

“काही नाही, म्हटलं You are getting the hang of it now! आणि आता तू सफरचंदाचा विषय काढलास त्यावरून गोष्ट आठवली एक, सांगू?”

“सांग ना राजन्!”

“ऐक तर मग, 

एक माणूस देशाटनाला निघालेला असतो. तुला माहीतच असेल ना . .  केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार! तर असा हा वाटसरू चातुर्याच्या शोधात देशाटनाला निघालेला होता. जाता जाता रस्त्यात त्याची आणखीन एका वाटसरूशी गाठ पडली. दोघे एकाच दिशेने जात होते त्यामुळे मग एकमेकांशी गप्पा मारू लागले. हा दुसरा वाटसरू मात्र गप्पा मारता मारता सारखा काहीतरी तोंडात टाकत होता. न राहवून शेवटी पहिल्या वाटसरूने त्याला तो काय खातो आहे हे विचारलेच. त्यावर दुसरा म्हणाला की तो सफरचंदाच्या बिया खातो आहे. पण कशाला? पाहिल्याने विचारले.

कारण त्याने ज्ञान येते, बुद्धी तल्लख होते, अक्कल येते.

पहिल्याचे डोळे एकदम चमकले, अरे वा! मग मलाही दे ना!

दिल्या असत्या पण त्या अश्या तश्या नाहीत, फार महाग आहेत, दुसरा म्हणाला.

कितीच्या?

शंभर रुपयाला एक.

ओह्, पण ठीक आहे, दे मला दहा बिया, आणि हे घे हजार रुपये.

आता पहिला वाटसरूही एक एक करून बी तोंडात टाकू लागला. आठ नऊ बिया खाऊनही जेव्हा त्याला काहीच फरक वाटला नाही तेव्हा तो दुसऱ्या वाटसरूवर जोरात ओरडला, फसवलंस तू मला!

का? काय झालं? दुसरा म्हणाला.

अरे हजार रुपयांत तर मी पाच सहा डझन सफरचंद घेतली असती. 

मग?

मग काय, सफरचंदही खाता आली असती आणि त्यातून शेकडो बियाही मिळाल्या असत्या.

पण मी तुला काय सांगितलं होतं? 

बिया खाल्ल्यानी ज्ञान होईल, अक्कल येईल.

बघ ना मग, आली ना तुला आता अक्कल!”

“वाह् राजन्, छान!”

“तर मग आता तुलाही अक्कल आली असेल तर झाडावर जाऊन परत लोम्बकळू लाग कसा आणि विचार कर, Free will चा उपयोग बंधनात अडकवण्यासाठी कसा करायचा ह्यावर, आपली परत भेट होईपर्यंत! Till then…. !”

क्रमशः

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.