बुद्धिप्रामाण्यवादातील प्रामाण्याचे निकष

नवभारत मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ च्या अंकात प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत अंकासाठी ह्या लेखावरील प्रतिवाद आला तेव्हा, मूळ लेखही सोबतच पुनर्प्रकाशित करावा असे वाटले. असे केल्याने वाचकांची मूळ विचारांशी ओळख होईल आणि ह्या प्रतिवादातील संदर्भदेखील लक्षात येतील.


सर्वप्रथम rationalism ह्या शब्दाने ज्या दोन उपपत्ती संबोधल्या जातात त्याबद्दल लिहिणे इथे संयुक्तिक ठरेल. मनुष्याला इंद्रियांद्वारे झालेले अनुभव फसवे असू शकतात. रात्रीच्यावेळी अंधुक प्रकाशात एखादी दोरीदेखील साप वाटू शकते. अशावेळी इंद्रियांद्वारे होणाऱ्या अनुभवाने तयार झालेल्या ज्ञानावर शंका उपस्थित करणे उचित ठरते. त्यामुळे, अनुभवाने होणारे ज्ञान यथार्थ नसते अशी टीका अनेक तत्त्वज्ञांनी केली आहे. ह्यावर उपाय काय? तर आपण विवेकाच्या (rationality/reason) आधारे यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकतो हे म्हणणे. प्लेटो ह्या मताचा होता. जेव्हा प्रामाण्याचा प्रश्न येतो तेव्हा विवेकवाद विरुद्ध अनुभववाद, म्हणजेच, rationalism विरुद्ध empiricism हा वाद महत्त्वाचा ठरतो. प्लेटोपासून सुरू झालेला हा वाद आजही काही प्रमाणात सुरूच असतो. ह्या वादामुळे पूर्वाधुनिक काळात तत्त्वज्ञान जगतात दुफळी माजली होती. एका बाजूला देकार्त, स्पिनोझा, लायब्निझ तर दुसऱ्या बाजूला लॉक, बर्कली, ह्यूम होते. त्या rationalism ला विवेकवाद म्हणावे असे मी सुचवतो, कारण त्यात विवेकावर भर आहे, विवेक आणि अनुभव ह्यांची तुलना आहे. ही झाली rationalism ची पहिली उपपत्ती. [१]

पण, rationalism ह्या नावाने एक दुसरी उपपत्तीदेखील आहे. प्रा. मे. पुं. रेगे त्याबद्दल लिहितात :

“रॅशनलिझमचा दुसरा अर्थ १८व्या शतकापासून मान्य व्हायला लागून, हळूहळू स्थिर होत आहे. पहिल्या अर्थाने विवेक या शक्तीचा विरोध अनुभवाशी होता. दुसऱ्या अर्थाने या शक्तीचा विरोध श्रद्धेशी, धार्मिक श्रद्धेशी आहे. ही दुसरी विवेकाची कल्पना जेव्हा आपण “रँग्लर परांजपे रॅशनलिस्ट होते”, असे म्हणतो किंवा “इंग्लंडमध्ये रॅशनलिस्ट असोसिएशन होती”, असे म्हणतो, त्या बोलण्यातून व्यक्त होते. ही ‘रीझन’ची संकल्पना प्लेटॉनिक रीझनच्या संकल्पनेहून अत्यंत वेगळी आहे. आम्ही श्रद्धेने कोणतेही तत्त्व स्वीकारणार नाही, अनुभवावर म्हणजे ऐंद्रिय अनुभव आणि सुसंगत तर्क या प्रमाणांवर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू अशीही भूमिका आहे. ह्याला (फारतर) लोकांमध्ये पसरलेले तत्त्वज्ञान असे आपण म्हणू.”

ह्या rationalism ला माझ्यामते बुद्धिप्रामाण्यवाद संबोधावे. कारण येथे जे प्रामाण्याचे द्वंद्व उभे केले आहे ते बुद्धी विरुद्ध देव/धर्म, धर्मग्रंथ, पोथ्या, बाबावाक्य, परंपरा, किंवा प्रेषित असे आहे. प्रा. रेगेंनी आपला ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख दुसऱ्या अर्थाच्या rationalism बद्दल लिहिलेला आहे.[२] त्या लेखात त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल दोन आक्षेप नोंदवले आहेत. प्रस्तुत लेख त्या आक्षेपांना उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे.

साधारणतः बुद्धिप्रामाण्यवादाची जी मांडणी केली जाते ती स्पष्ट करताना प्रा. रेगे लिहितात:

“आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये; अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.”

बुद्धिप्रामाण्यवादाच्या ह्या स्वरूपाशी मी सहमत आहे.

अशा बुद्धिप्रामाण्यवादावर प्रा. रेगे पहिला आक्षेप घेतात तो पुढीलप्रमाणे:

१. बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती असते आणि ती काहीतरी करते किंवा तिच्याद्वारे किंवा तिच्या माध्यमातून काहीतरी घडते, असे मानायला आधार नाही.
२. आपण वस्तू उचलण्यासाठी बहुतांशवेळी आपल्या हातांचा वापर करतो. पण प्रसंगी पायाने किंवा कोपरानेसुद्धा वस्तू उचलली जाऊ शकते. ह्याच न्यायाने बहुतांशवेळी जेव्हा सत्य किंवा योग्य गोष्टी आपल्याला सत्य किंवा योग्य म्हणून पटलेल्या असतात त्या आपल्या बुद्धीमुळे. पण अपवादाने सत्य किंवा योग्य गोष्टी आपल्याला इतरही कोणत्या मनःशक्तीचा वापर केल्याने पटू शकतात.
३. एखादी वस्तू हाताने उचलली की पायाने ह्यावर निर्णय करता येतो. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आली ती त्याला बुद्धीचा वापर करून दिसून आली की आणखी कोणत्या शक्तीचा वापर करून दिसून आली ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता?
४. वस्तू उचलताना हात वापरला गेला की पाय हे आपण निरीक्षणाने ठरवू शकतो. पण बुद्धी ही एक वेगळी शक्ती आहे हे आपण ओळखू शकत नाही आणि तिचा वापर केला गेला आहे, हे निरीक्षणाने ठरवले जाऊ शकत नाही.
५. आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते तेवढेच स्वीकारावे असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.

बुद्धी ही एक विशिष्ट शक्ती असते आणि तिचा वापर करून काहीतरी घडते हा आक्षेप कोणत्याही मनःशक्तीबद्दल घेतला जाऊ शकतो, कारण मनःशक्ती ह्या आपल्या निरीक्षणात सापडणे तितके सोपे नाही. आधी बुद्धीचे स्वरूप कसे असते ते पाहूया. बुद्धी ही अशी एक मनःशक्ती आहे जिचा वापर करून कोणताही मनुष्य मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून आणि संश्लेषणातून ज्ञाननिर्मिती करतो. बुद्धीचे मूळ कामच ज्ञाननिर्मिती आहे. मनुष्याला ज्ञानाचे विविध स्रोत उपलब्ध असतात. इंद्रियांद्वारे होणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान होऊ शकते तसेच विवेकाचा वापर केल्यानेही होऊ शकते. आठवणी आणि स्मृतींमधून ज्ञान होऊ शकते तसेच कोणी दिलेल्या साक्षीमधूनही ज्ञान होऊ शकते. पण ह्या सगळ्या ज्ञानाच्या स्त्रोतांवरती जी शक्ती अंकुश ठेवते ती म्हणजे बुद्धी आहे. बुद्धीविना ज्ञाननिर्मिती शक्य नाही. विवेकासारख्या काही उपशक्ती आहेत ज्या बुद्धीच्या अखत्यारीत राहून काम करतात. समजा उद्या ज्ञाननिर्मिती करण्यामध्ये एखाद्या नवीन मनःशक्तीचा शोध लागला तर तिच्यावरही शेवटचा अंकुश बुद्धीचाच असणार आहे. ‘बुद्धी’ हा शब्द सामान्यपणे ज्या अर्थाने वापरला जातो तो हाच अर्थ आहे. बुद्धीचे असे सामान्यतः मान्य स्वरूप प्रा. रेगेंना का पटत नाही, ह्यासंबंधी ते कोणतीच कारणे देत नाहीत. जर प्रा. रेगेंना बुद्धिविरहित ज्ञाननिर्मिती शक्य वाटते तर त्यांनी अशा शक्तीचे उदाहरण देणे अपेक्षित होते. त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाचा संपूर्ण बोध होणे अवघड होते.

आता प्रश्न उरतो तो माणसाने बुद्धी वापरलेली आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवावे कसे, हा.

फक्त इंद्रियांनी जे नोंदवू शकतो त्यासच निरीक्षणे म्हणावे असे काही नाही. निरीक्षणे कशी नोंदवली जातात त्या पद्धतींमध्ये गेल्या काही शतकात झपाट्याने बदल झालेले आहेत. हल्ली आपण अवकाशसंशोधनात रेडिओ टेलिस्कोप वापरुन जे काम करतो त्यात निरीक्षणे नोंदवणे येतेच. जसे काही ठराविक अवकाशसंशोधन करण्यात आपल्या इंद्रियांचा काहीही उपयोग नाही तसेच आपल्या स्वतःविषयी काही निरीक्षणे नोंदवण्याच्या प्रक्रियेत आपल्या इंद्रियांचा काहीही उपयोग नाही. उदा. ‘मला भूक लागली आहे’ हे विधान तपासताना जे निरीक्षण करावे लागते त्यात आपल्या इंद्रियांचा (म्हणजे, ज्यांना सामान्यतः इंद्रिये म्हटले जाते अशा पंचेंद्रियांचा) कुठेही उपयोग होत नाही. म्हणजेच, निरीक्षणे फक्त इंद्रियांच्या अधीन असतात असे नाही. इंद्रिये न वापरता देखील निरीक्षणे नोंदवली जाऊ शकतात.

‘क्ष’ व्यक्तीने एखादी वस्तू उचलण्यासाठी आपल्या हाताचा वापर केला की पायाचा हे ठरवण्याचे काम जर ‘ज्ञ’ व्यक्तीचे असेल तर तो ते काम आपल्या इंद्रियांनी करू शकेल. उदाहरणार्थ, तो आपले डोळे वापरून किंवा त्वचा वापरून हे निरीक्षण नोंदवू शकतो. पण तेच जर आपण ‘मला भूक लागली आहे’ हे तपासत असू तर त्यात कोणते इंद्रिय वापरून आपल्याला हे तपासता येणार आहे? तर, कोणतेच नाही. कारण ते शक्यच नाही. पण त्याप्रकारचे आकलन आपल्याला होऊच शकत नाही असे नाही. दिवसातून अनेकदा आपल्याला असे आकलन होते. आणि ते कशाचा आधारावर शक्य आहे? तर, आपण आपली बुद्धी वापरूनच ते सत्य आहे की नाही हे ठरवू शकतो. पण आपला मूळ प्रश्न आहे तो म्हणजे बुद्धी वापरली आहे की नाही हे कसे ठरवावे. ‘मी बुद्धी वापरत आहे’ हे विधान सत्य आहे की नाही हे आपण बुद्धी वापरूनच ठरवू शकतो. कारण मुळात बुद्धीचे कामच विधाने तपासून ज्ञाननिर्मिती करणे हे आहे. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होताना बुद्धी त्या क्रियेत काम करणारच. त्यामुळे बुद्धी वापरली आहे की नाही हे आपण निरीक्षणाने बुद्धी वापरूनच ठरवू शकतो. त्यात फार क्लिष्ट असे काही नाही.

आता प्रा. रेगेंच्या दुसऱ्या आक्षेपाकडे वळूया.

१. बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा ह्या म्हणण्यात कदाचित असे अभिप्रेत असेल की, बुद्धीशिवाय इतरही मन:शक्ती आहेत; पण त्यांच्यातील इतर कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय. बुद्धीच्या बाबतीत आपण हा पक्षपात का करतो हा प्रश्न उपस्थित होईल.
२. जर हा पक्षपात करणे योग्य आहे किंवा हा पक्षपातच नाही कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे त्याचे आकलन होऊ शकते असे आपले म्हणणे असेल तर हे आपल्याला कसे समजले हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. ह्याचे उत्तर जर आपण ‘बुद्धीलाच समजले’ असे दिले तर ते वर्तुळात्मक ठरेल.
३. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्विक अधिष्ठान असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.

बुद्धिप्रामाण्यवादासंबंधीचे द्वंद्व हे बुद्धी एकीकडे आणि ग्रंथ, बाबावाक्य, प्रेषित, किंवा परंपरा हे सगळे दावेदार दुसरीकडे असे आहे. ते बुद्धी आणि इतर मनःशक्ती ह्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादावरील हा आक्षेप अप्रस्तुत आहे. पण तरीही तसा आक्षेप घेतला जाऊ शकतो म्हणून त्याला उत्तर देणे गरजेचे ठरते.

बुद्धी ही मनुष्याच्या अनेक मनःशक्तींपैकी एकमेव ज्ञानशक्ती आहे. तिचा इतर अनेक मनःशक्तींवर अंकुश असतो. कोणत्याही वादासंबंधी कारणे (reasoning) देण्यासाठी बुद्धीचाच वापर केला जातो. बुद्धी आपल्याला कारणमीमांसा शोधणे शक्य करते. विवेक हादेखील बुद्धीचाच एक प्रांत आहे. ‘कशाचे प्रामाण्य मानावे?’ ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतानादेखील बुद्धीचाच वापर करावा लागेल, कारण निवड करताना त्याच्या अनुषंगाने कारणे द्यावी लागतील. त्यामुळे तिच्याप्रती पक्षपात करणे उचित आहे. एखादी व्यक्ती जर ग्रंथप्रामाण्यवादी होत असेल तर तीदेखील तो निर्णय आपली बुद्धी वापरूनच घेत असते. “मला अमुक ग्रंथ आवडतो म्हणून मी ग्रंथप्रामाण्यवादी झाले आहे” ह्या निर्णयाप्रत पोहोचण्यातदेखील बुद्धीचाच प्रभाव आहे.

ह्या मांडणीवर एक आक्षेप घेणे शक्य आहे तो पुढीलप्रमाणे : जर ग्रंथप्रामाण्यवादी व्यक्तीदेखील प्रामाण्यासंबंधीचे निर्णय बुद्धी वापरूनच घेत असेल तर त्याही व्यक्तीला बुद्धिप्रामाण्यवादी म्हटले जाऊ शकते. ती व्यक्ती तात्कालिक बुद्धिप्रामाण्यवादी होती, पण जेव्हा तिने ग्रंथप्रामाण्यवादी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ती बुद्धिप्रामाण्यवादी राहिली नाही. कारण त्यानंतर तिने प्रामाण्यासाठी एका विशिष्ट ग्रंथाचा आधार घेतला आहे.

आता प्रा. रेगे ज्या इतर दावेदार मनःशक्तींचा उल्लेख करतात, त्याबद्दल काही निरीक्षणे पाहूया. बुद्धी, प्रतिभा, कल्पना, आणि भावना ह्या सगळ्याच शक्ती एका प्रतलावरच्या नाहीत. प्रतिभा आणि कल्पनेवर बुद्धीचा अंकुश असतो. त्या बुद्धीच्या अखत्यारीत काम करणाऱ्या उपशक्ती आहेत असे आपण म्हणू शकतो. बुद्धीला लागू होतात ते नियम त्यांनादेखील लागू होतात. उदा. कल्पनेच्या जगात काहीही शक्य असते असे नाही. आपण उडत्या घोड्याची कल्पना करू शकतो. पण एका वर्तुळाकार चौकोनाची कल्पना करणे अशक्य आहे. ह्यात बुद्धीची (आणि कल्पनेचीही) मर्यादा अधोरेखित करता येईल. भावनाविश्वासंबंधी काही वेगळे म्हणावे लागेल. कारण ते संपूर्णपणे बुद्धीच्या अखत्यारीत येत नाही. एखादी भावना निर्माण होईल की नाही हे आपल्या बौद्धिक निर्णायकतेवर अवलंबून नसते. भावना ह्या अचानकपणे निर्माण झालेल्या मनःस्थिती असतात. त्यामुळे त्यांच्यावर बुद्धीचे नियम लागू होतील असे म्हटले जाऊ शकत नाही. त्यामुळेही बुद्धिप्रती पक्षपाती होणे साहजिकच आहे.

आता वर्तुळात्मकतेसंबंधी काही गोष्टी पाहूया. प्रतिभेसंबंधी आपली प्रतिभा काहीएक विचार करू शकते. तसेच, कल्पनेसंबंधी आपण कल्पना करू शकतो. एका भावनेचा आधार घेऊन आणखी भावना उद्दिपित होऊ शकता. तसेच, बुद्धीसंबंधी आपली बुद्धी विचार करू शकते ह्यात काही नवल नाही. बुद्धीने ज्ञानशक्ती असण्यात ती विचारशक्तीही असणे गृहीत धरायला हवे. त्यामुळे कशासंबंधीही विचार करण्याचा प्रांत हा बुद्धीचाच आहे. अशी वर्तुळात्मकता आपल्या अनेक मनःशक्तींसंबंधी शक्य आहे. फक्त ती असल्यामुळे बुद्धिप्रामाण्यवाद सदोष ठरत नाही. त्यामुळे तिला सदोष ठरवण्यासाठी आणखी भरीव कारणे गरजेची आहेत.

ज्ञान होण्याच्या प्रक्रियेमध्ये सत्यासत्य तपासून पाहणे फार महत्त्वाचे ठरते. एका झुडपात लपून बसलेला ससा मारून खाऊन जिवंत राहण्याचा विचार असताना त्याच झुडपात वाघ आहे की नाही ह्या प्रश्नाचे उत्तर जीवावर बेतू शकते. अशावेळी ससा पाहून हुरळून न जाणे जसे गरजेचे तसेच वाघाचा विचार करून भयभीत न होणे तेवढेच गरजेचे आहे. भावनाविवश न होता बुद्धी वापरून निर्णय घेणे कधीही इष्ट. सत्यान्वेषण करण्यासाठी बुद्धी हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादाची निवड करण्यास तात्त्विक अधिष्ठान नाही असे म्हणणे अनुचित आहे. प्रतिभा आणि कल्पना ह्यांना बुद्धी कवेत घेते. भावनांबद्दलदेखील विचार करून निर्णयाप्रत पोहोचू शकते. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादाची निवड निरंकुश नसून ती बुद्धीवरच आधारलेली आहे.

प्रा. रेगे पुढे लिहितात की जर बुद्धीशिवाय कोणत्याही मनःशक्तीने सत्य अथवा योग्य गोष्टींचा बोध होत नाही असे म्हणणे असेल, तर बुद्धिप्रामाण्यवादाचे इतक्या जोरकसपणे समर्थन व प्रसार करण्याचे कारण काय? जसे आपण तोंडाने खातो म्हणून “फक्त तोंडानेच खा” असे म्हणण्यात काही हशील नाही, तसेच जर आपण सत्य आणि योग्य गोष्टींचा बोध फक्त बुद्धीने घेत असू तर “फक्त बुद्धी सांगेल तेच सत्य व योग्य” हे म्हणण्यात काय हशील? तर, आपण इतर कोणत्याही अवयवाने खाण्याचा प्रयत्न करत नाही. पण आपण मनुष्य म्हणून सत्य व योग्य काय आहे ह्याच्या शोधात अन्य अनेक गोष्टींचे प्रामाण्य मान्य करू शकतो हे नाकारता येत नाही. त्यामुळे हे ठासून सांगण्याची गरज निर्माण होते की प्रामाण्य मानावे तर ते बुद्धीचेच!

प्रा. रेगे बुद्धिप्रामाण्यवादावर शेवटी एक आरोप करतात. ते लिहितात:

“माणसाच्या जीवनात स्वप्नांना, निरंकुश, मुक्त कल्पनांना, सर्जनशीलतेला स्वाभाविक आणि आदिम असे स्थान आहे आणि ह्या दोन्ही प्रेरणांची – तार्किक विचार आणि मुक्त कल्पना – यांची सांगड माणसाला घालता येते. जेव्हा कृती टाळता येत नाही तेव्हा आणि तेवढ्यापुरता तार्किक विचाराचा आश्रय माणसाला घेता येईल. आणि कृतीचे जोखड जेव्हा झुगारता येईल, तेव्हा तो स्वप्नांत रमू शकेल. हा माणसाचा स्वाभाविक मोह आहे.”
बुद्धिप्रामाण्यवाद ह्या मोहाविरूध्द ठाम भूमिका घेतो. तो स्वप्नांना जागा ठेवीत नाही. तार्किक सत्य हे त्याच्या दृष्टीने केवळ कृतीचे साधन नसते. सत्याला त्याच्या दृष्टीने स्वयंभू आणि केवल मूल्य आहे. जे पुराव्याच्या आधारे सत्य ठरत नाही, ते स्वीकारणे केवळ धोकादायक असते. एवढेच नाही; तर ते स्वीकारणे हा माणसाचा घृणास्पद दुबळेपणा असतो. असे करण्यात माणसाची अप्रतिष्ठा आहे. स्वत:विषयी, विश्वाविषयी जे सत्य असेल ते, ते केवळ सत्य आहे म्हणून स्वीकारण्यात माणसाची महत्ता आहे. बुद्धिप्रामाण्यवाद अखेरीस एका मूल्यावर आधारलेला आहे आणि म्हणून त्याच्यात धार्मिक कठोरपणा आहे आणि धार्मिक आवाहन आहे.
पण एक प्रश्न उरतो. ह्या मूल्याचे प्रामाण्य कशावर आधारलेले आहे?”

जे बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी कधी जोरकसपणे लावून धरलेले नाही ते त्यांच्या नावाने खपवणे उचित नाही. सर्व कला ह्या  बुद्धीचाच आविष्कार असतात. बुद्धिप्रामाण्यवादी लोकदेखील कलेचा आस्वाद घेतात, स्वप्ने पाहतात. तार्किक विचार आणि मुक्त कल्पना ह्या दोहोंच्या आधारे जीवन जगतात. बुद्धिप्रामाण्यवाद्यांसाठी सत्य हे केवळ कृतीचे साधन नसते असे प्रा. रेगे का म्हणतात ते स्पष्ट नाही. उलट सत्य हे कृतीचे सर्वोत्तम साधन असते. सत्याला केवल मूल्य (स्वतोःमूल्य) असते म्हणणारा बुद्धिप्रामाण्यवादी माझ्या पाहण्यात आलेला नाही. बुद्धिप्रामाण्यवाद्यांसाठी सत्य हे ईश्वरप्रणित मूल्याप्रमाणे नाही. स्वतः आळस सोडून मेहनत करून सत्याप्रत पोहोचण्याची तयारी नसताना केलेले स्वप्नरंजन बहुदा ईश्वरालाही मान्य नसावे! सत्य समोर उभे ठाकले असताना स्वप्नरंजनात रममाण होणे हा माणसाचा दुबळेपणाच आहे. त्या सत्याला सामोरे जाण्याने जीवनाला अर्थ प्राप्त होणार असतो.

लेखाच्या शेवटी प्रा. रेगे एका मूल्याचा उल्लेख करतात. ते मूल्य कोणते हे मात्र ते स्पष्ट करत नाहीत. बहुतेक त्यांना सत्य हे मूल्य आहे असे म्हणायचे असावे. प्रा. रेगेंच्या लेखावर आधारित एका लेखातही प्रा. रेगेंना “सत्य हे मूल्य आहे” असे म्हणायचे आहे हा उल्लेख येतो. खरेतर सत्य हे मूल्य आहे हा विचार सर्वस्वी चूक आहे. तार्किक पातळीवर पाहता सत्य हे मूल्य नसून विधानाचा एक गुणधर्म (property) आहे. भाषिक पातळीवर सत्य हे एक मराठी (आणि काही इतर भाषांमधले) विधेय आहे. सत्याची मूल्यात्मक फेरमांडणी करणे जिकिरीचे काम आहे. प्रा. रेगेंनी ते केलेले नाही. त्यामुळे मला सत्याची मूल्य म्हणून कल्पना करणे अवघड जाते आहे. सत्याचा वापर करून जीवन सुखकर करावे हे म्हणण्यात सत्य हे मूल्य आहे हे अध्याहृत नाही. त्यामुळे त्याचे प्रामाण्य कशावर आधारलेले आहे हा प्रश्न अप्रस्तुत आहे. जर प्रा. रेगेंना सत्य हे एक मूल्य वाटत असेल तर त्यांनी त्याचेही स्वरूप स्पष्ट करणे गरजेचे होते. शेवटी, प्रा. रेगेंची बुद्धिप्रामाण्यवादावरील स्वैर टीका प्रभावी ठरत नाही. त्यामुळे, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्या भूमिकेत बदल करावा किंवा त्यांची भूमिका सोडून इतर कोणती भूमिका अंगिकारावी ह्याची गरज उरत नाही.

संदर्भ
[१] प्रा. श्रीनिवास दीक्षित ह्यांनी त्यांच्या ‘भारतीय तत्त्वज्ञान’ ह्या पुस्तकात पहिल्या अर्थाने rationalism असणाऱ्या संकल्पनेसाठी बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द वापरलेला आहे. तो वापर माझ्यामते चूक आहे.
[२] बुद्धिप्रामाण्यवाद, प्रा. मे. पुं. रेगे, पान ५३ ते ५८, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा,’ लोकवाङ्मय गृह, २००९



तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.