एप्रिलचा अंक एका नव्या आवाहनासोबत प्रकाशित करतो आहोत.
शालेय वयापासूनच अनेक व्यक्तींच्या गुणगौरवाचे धडे आपल्याकडून गिरवून घेतले जातात. रामायण-महाभारतातील काल्पनिक पात्रांपासून, मोघल-इंग्रजांच्या विरोधात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत, सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते नाटक-सिनेमावाल्यांपर्यंत! वेगवेगळ्या क्षेत्रात काही भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव समाज करतोच. परंतु, गुणगौरव आणि व्यक्तिपूजा ह्या दोन संपूर्ण वेगळ्या छटा आहेत की एकमेकींत मिसळलेल्या भावना आहेत, हे समजणे तसे कठीणच.
महानतेचे अनेक निकष असतात. कोणत्याही एका क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी व्यक्ती लवकरच सर्वगुणसंपन्न मानली जाऊन तिचे व्यक्तिपूजन सुरू होते. तार्किक दृष्टिकोन मात्र निराळेच काही सुचवतो. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे झाल्यास मात्र इतर निकषांवरील त्या व्यक्तीचे योगदान कसे होते, हे देखील जोखायला हवे.
अश्या निकषांचा कस लावून समाजात काही भरीव, ठोस योगदान देणाऱ्या व्यक्तींची सूची करण्याचे आम्ही योजित आहोत. प्रत्येकाच्या कार्यानुसार क्रमवारी करण्याचा आमचा उद्देश नाही. हे संकलन सध्या महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवतो आहोत. पुढे जाऊन अशाच प्रकारची सूची इतर ठिकाणी बनू शकते. साऱ्याचे एकत्रित संकलनही होऊ शकते. आताची ही सूची आम्ही पुस्तकरूपात प्रकाशित करू इच्छितो. आलेल्यापैकी निवडक लेख आम्ही ‘आजचा सुधारकमध्ये’ प्रकाशित करू.
संकलनाविषयीचे विस्तृत आवाहन आशिष महाबळ ह्यांच्या लेखात आहे. ह्यासाठीचे निकष/मापदंड ठरवताना ते निष्पक्ष, पूर्वग्रहविरहीत, संतुलित असावेत असा आग्रह आम्ही ठेवला आहे. तरीही काही मापदंडांतून भावनिक निष्कर्ष निघू शकतात. तेव्हा, भावनिकतेच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्तीच्या कार्यावरून त्याची निवड ह्या सूचीसाठी करतो आहोत का, हे आपल्याला सातत्याने तपासत राहावे लागेल.
ह्या आवाहनाला तुमचा सक्रिय प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
इतर लेखांवरील आपले अभिप्रायही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पुढील अंकासाठी काही सुचवायचे असेल, तर संपर्क करा.