अन्नसुरक्षेची चर्चा होताना बहुतेक वेळा उत्पादन, उपलब्धता आणि किंमत ह्या तीन मुद्द्यांभोवती विचार फिरताना दिसतो. एखाद्या देशात पुरेसे धान्यउत्पादन होते का, लोकांना अन्न परवडते का, आणि कुपोषणाची पातळी कितपत आहे, ह्या प्रश्नांच्या आधारे अन्नसुरक्षेचे मूल्यमापन केले जाते. ह्या प्रश्नांचे महत्त्व नाकारता येणार नाही; परंतु अन्नसुरक्षेचा विचार केवळ ह्या चौकटीत मर्यादित राहिल्यास काही मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहतात. आज जगभरात अन्नधान्य उत्पादनाच्या विक्रमी पातळ्या गाठल्या गेल्या असतानाही मातीच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जाते, शेतकऱ्यांचे अर्थकारण अस्थिर राहते, अन्नातील रासायनिक अवशेषांबाबत प्रश्न उपस्थित होतात आणि ग्राहकांचा त्यांच्या अन्नाच्या उगमाशी असलेला संबंध दिवसेंदिवस कमकुवत होत जातो. पण उत्पादन वाढत असताना अशी अस्वस्थता का वाढते आहे?
अन्न ही केवळ बाजारात विकली जाणारी वस्तू नाही. अन्नामध्ये जमीन, पाणी, श्रम, ज्ञान, संस्कृती, पर्यावरण आणि जीवनपद्धती ह्यांचे अनेक स्तर गुंतलेले असतात. एका अर्थाने पाहिले तर प्रत्येक घासामध्ये एका संपूर्ण परिसंस्थेची कथा दडलेली असते. परंतु आधुनिक अन्नव्यवस्थेमध्ये ही कथा ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. अन्न दिसते, पण त्यामागचा शेतकरी दिसत नाही; उत्पादन दिसते, पण मातीची अवस्था दिसत नाही; छापील किंमत दिसते, पण पर्यावरणीय किंमत दिसत नाही. म्हणून मग उत्पादन वाढते असताना देखील अस्वस्थता का वाढते आहे, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
ह्याच कारणामुळे अन्नसुरक्षेकडे नव्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्नसुरक्षेचा प्रश्न केवळ धान्याच्या उपलब्धतेचा किंवा कमतरतेचा प्रश्न म्हणून पाहणे आज पुरेसे ठरत नाही. अन्न कोण पिकवतो, कोणत्या परिस्थितीत पिकवतो, ते कोणापर्यंत पोहोचते, त्या प्रक्रियेत पर्यावरणावर काय परिणाम होतो, आणि समाजातील विविध घटकांमध्ये कोणती नाती निर्माण होतात किंवा तुटतात, ह्या प्रश्नांचाही त्यामध्ये समावेश होणे आवश्यक आहे.
गेल्या काही दशकांत शाश्वत विकासाच्या चर्चेमध्येही हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. अन्नाचा प्रश्न हा केवळ कृषिक्षेत्राचा किंवा बाजारव्यवस्थेचा नसून समाजाच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि भविष्यातील शाश्वततेशी व्यापकपणे जोडलेला आहे. अन्नसुरक्षेचे संकट अनेकदा अन्नधान्याचे नसते; ते नात्यांचे असते. भारतातील हरितक्रांती हा आधुनिक कृषिइतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अन्नधान्याच्या तुटवड्याने ग्रासलेल्या देशाने तुलनेने कमी कालावधीत उत्पादनवाढ साध्य केली आणि अन्नस्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली. उपासमार आणि धान्यटंचाईशी लढण्याची क्षमता वाढवण्यात ह्या परिवर्तनाची भूमिका महत्त्वाची होती. ही निःसंशयपणे मोठी उपलब्धी होती. मात्र कोणतीही विकासप्रक्रिया केवळ तिच्या यशांमधून समजत नाही; ती तिच्या अनपेक्षित परिणामांतूनही समजते.
उत्पादनवाढीच्या प्राररूपाबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाणे, आणि पाण्यावर आधारित शेतीपद्धतींचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. अनेक प्रदेशांमध्ये उत्पादन वाढले; परंतु त्याचवेळी मातीतील सेंद्रिय अंश कमी होणे, भूजल पातळ्यांवर ताण येणे, जैवविविधता घटणे आणि बाह्य निविष्ठांवर शेतीचे अवलंबित्व वाढणे असे परिणामही दिसू लागले. शेतीउत्पादन वाढले असले तरी शेतकऱ्यांचे जीवनमान त्याच प्रमाणात सुधारले का, हा प्रश्नही विचारण्याजोगा आहे. उत्पादनाचा खर्च वाढत असताना बाजारातील अनिश्चितता मात्र कायम राहिली. बहुतांश वेळा शेतकऱ्याला स्वतःच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकारही नसतो. उत्पादनाची जोखीम शेतकऱ्याची, हवामानाची जोखीम शेतकऱ्याची, गुंतवणूक शेतकऱ्याची; परंतु अंतिम किंमत मात्र बाजारातील दलाल ठरवतात. कृषिक्षेत्रात आजही ही विसंगती आहे. दुसरीकडे ग्राहक आणि अन्न ह्यांच्यातील नातेसुद्धा बदलले. शहरांमध्ये राहणाऱ्या मोठ्या लोकसंख्येसाठी अन्न हे सुपरमार्केटमधील उत्पादनमात्र बनले. ते कुठे पिकले, कोणत्या ऋतूत आले, कोणत्या पद्धतीने उत्पादित झाले, त्या प्रक्रियेत शेतकऱ्याला काय मोबदला मिळाला किंवा पर्यावरणावर काय परिणाम झाला, हे प्रश्न दैनंदिन खरेदीतून जवळजवळ अदृश्य झाले.
आज अनेक ग्राहकांना त्यांच्या अन्नाचा उगम माहिती नसतो, तर अनेक शेतकऱ्यांना त्यांचे अन्न कोण खात आहे हे माहिती नसते. उत्पादक आणि ग्राहक ह्यांच्या दरम्यान वाढलेल्या अंतरामुळे अन्न हा सामाजिक आणि सांस्कृतिक दुवा न राहता केवळ बाजारव्यवहार बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. अन्न विपुल झाले, पण अन्नाशी असलेले नाते मात्र दुर्मिळ होत गेले. ह्याचा अर्थ असा नाही की आपण भूतकाळात परत जावे किंवा आधुनिक शेतीतील सर्व बदल नाकारावेत. मुद्दा एवढाच आहे की गेल्या काही दशकांत हरवलेल्या गोष्टींकडे आपण पुन्हा लक्ष देण्यास तयार आहोत का? जसे की शेतकऱ्यांचा सन्मान, अन्नाची गुणवत्ता, मातीचे आरोग्य, पर्यावरणीय परिणाम आणि ग्राहकांची जाणीव! ह्याच टप्प्यावर अन्नसुरक्षेच्या चर्चेचा केंद्रबिंदू हळूहळू उत्पादनापासून मानवी संबंधांकडे सरकताना दिसतो.
गेल्या काही दशकांत अन्नसुरक्षेबरोबरच आणखी एक संकल्पना अधिक चर्चेत आली – अन्नस्वराज्य! प्रत्येक व्यक्तीला पुरेसे, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध असावे ह्या तत्त्वावर अन्नसुरक्षा आधारलेली आहे. परंतु अन्नस्वराज्याचा अर्थ केवळ अन्नाची उपलब्धी एवढाच नसतो तर कोणती पिके घ्यावी, कोणत्या पद्धतीने घ्यावी, स्थानिक समुदायांची भूमिका काय असावी, शेतकऱ्यांचे निर्णयप्रक्रियेत स्थान कसे असावे, अन्नव्यवस्थेवर नियंत्रण कोणाचे असावे आणि ग्राहकांनी केवळ खरेदीदार म्हणून न राहता ह्या प्रक्रियेत सहभागी कसे व्हावे, हे प्रश्न पुढे येतात. ह्या दृष्टीने अन्न ही केवळ वस्तू न राहता एक सामाजिक बांधिलकी होते. त्यामुळे अन्नस्वराज्य ही संकल्पना स्थानिक पिके, जैवविविधता, स्वयंपूर्णता, पारंपरिक ज्ञान, आणि पर्यावरणीय शाश्वतता, ह्यांच्याशी जोडली जाते. तसेच येथे स्वयंपूर्ण असणे म्हणजे संकुचित असणे असे नाही. जागतिक व्यापार, तंत्रज्ञान किंवा आधुनिक व्यवस्थांना येथे स्थान आहे. मात्र अन्नव्यवस्थेतील सर्व निर्णय केवळ बाजाराच्या तर्कावर सोडून देता येणार नाहीत.
विशेषतः शहरी समाज अन्नाचा संबंध शेतीक्षेत्राशी जोडतो. शेतकरी अन्न पिकवतो आणि ग्राहक अन्न विकत घेतो, एवढ्यावरच नाते संपते. परंतु अन्नव्यवस्था घडवण्यात ग्राहकाची काही जबाबदारी आहे का? आणि त्याहीपुढे, समाजाची काय जबाबदारी आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे; कारण अन्नव्यवस्था केवळ शेतकऱ्यांनी किंवा सरकारने घडवलेली नसते. ग्राहकांच्या निवडी, सवयी, अपेक्षा आणि मूल्ये ह्यांचाही तिच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे अन्नसुरक्षेची चर्चा उत्पादनापासून सुरू होत असली, तरी ती शेवटी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचते. आपल्या दैनंदिन निवडींचा व्यापक अन्नव्यवस्थेवर कसा प्रभाव पडतो ह्याविषयीची जाणीव समाजात निर्माण होणे ही शाश्वत अन्नव्यवस्था निर्माण होण्यासाठी एक आवश्यक अट मानता येईल. शाश्वत अन्नव्यवस्थेची उभारणी होताना उत्पादन, बाजारपेठ, आणि तंत्रज्ञान, ह्यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे; परंतु त्याबरोबर काही मानवी, सामाजिक आणि पर्यावरणीय नात्यांचे पुनर्निर्माणही तितकेच आवश्यक आहे. कारण अन्नस्वराज्याची कल्पना केवळ शेतकऱ्यांच्या स्वायत्ततेपुरती मर्यादित नसून त्यात समाजातील इतर घटकांचा सजग सहभाग अपेक्षित आहे.
माझ्या निरीक्षणात, ह्यासंदर्भात चार परस्परसंबंधित धागे वारंवार समोर येतात. त्यांपैकी एखादा दुर्लक्षित झाला, तर उर्वरितांची परिणामकारकताही कमी होत जाते.
पहिला धागा आहे विषमुक्त अन्नाचा. अन्नाविषयीचे चिंतन त्यातील पोषणमूल्यांपासून सुरू होते; परंतु अलीकडे अन्नातील रासायनिक अवशेष, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वाढता वापर, आणि अन्नाची घसरलेली गुणवत्ता, हे मुद्दे अधिक ठळकपणे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक निवड म्हणून विषमुक्त अन्नाचा आग्रह धरताना तो उत्पादनपद्धती, पर्यावरण, पारदर्शकता आणि विश्वास ह्यांच्याशी जोडलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ग्राहकाला केवळ उत्पादन मिळणे पुरेसे नाही; ते कसे, कोणी, कोणत्या उद्देशाने पिकवले ह्याची त्यांना जाण असणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
दुसरा धागा आहे शेतकऱ्यांच्या सन्मानाचा. आधुनिक अन्नव्यवस्थेमध्ये ग्राहक थेट अंतिम उत्पादन पाहतो. त्यात अन्न पिकविणाऱ्याची ओळख, तिचे श्रम, तिचे ज्ञान आणि तिची जोखीम ह्यांना फारसे स्थान मिळत नाही. परिणामी अन्नव्यवस्थेतील केंद्रस्थानी असलेला शेतकरी हा घटक नेहमीच परिघावर ढकलला जातो. गेल्या काही वर्षांतील विविध संवादांतून मला वारंवार असे जाणवले की शेतीविषयक समस्यांची मुळे केवळ अर्थकारणात नसून सामाजिक दृष्टिकोनातही दडलेली आहेत. शेतमालाला योग्य मोबदला आवश्यकच आहे; पण समाजामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित तो सन्मान मिळत नसेल तर त्यांची पुढची पिढी शेतीचा व्यवसाय म्हणून निवड करणे अशक्य आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न केवळ वर्तमानातील नसून भविष्यातील उत्पादकपिढीच्या निर्मितीचाही आहे.
तिसरा धागा आहे सजग ग्राहकाचा. आधुनिक बाजारव्यवस्थेने ग्राहकाला निवडीचे अनेक पर्याय दिले; परंतु निवड वाढली तशी अन्नाविषयीची समजपण वाढली असे नाही. अनेक वेळा ग्राहकाला उत्पादनाची माहिती असते; परंतु उत्पादनप्रक्रियेची माहिती नसते. अन्न कुठून येते, कोणत्या ऋतूत कोणती पिके उपलब्ध होतात, हवामानातील बदलांचा परिणाम काय होतो, स्थानिक अन्नसंस्कृतीचे महत्त्व काय आहे, आणि आपल्या निवडींचा व्यापक परिणाम कसा होतो, ह्याविषयीची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. कारण अन्नव्यवस्था ही शेतकरी, ग्राहक, आणि सरकार, ह्यांची सामूहिक जबाबदारी असते.
चौथा धागा आहे पर्यावरणीय जबाबदारीचा. शेती आणि पर्यावरण ह्यांचे नाते स्वाभाविक असले तरी आधुनिक चर्चांमध्ये हे घटक अनेकदा स्वतंत्रपणे येतात. प्रत्यक्षात मात्र माती, पाणी, जैवविविधता, अन्न, आणि मानवी जीवन, ह्यांचे परस्परसंबंध इतके गुंतलेले आहेत की त्यांना स्वतंत्र चौकटीत पाहणे कठीण आहे. तसेच शाश्वततेचा विषय समजून घेताना उत्पादन, उपभोग, आणि जीवनशैली, ह्या तिन्हीं स्तरांचा ऊहापोह होणे आवश्यक असते.
ह्या चारही घटकांकडे स्वतंत्र विषय म्हणून पाहता येईल; परंतु प्रत्यक्षात ते एकमेकांपासून वेगळे नाहीत. विषमुक्त अन्नाचा प्रश्न शेतकऱ्यांशी जोडलेला आहे; शेतकऱ्यांचा प्रश्न पर्यावरणाशी जोडलेला आहे; आणि पर्यावरणाचा प्रश्न ग्राहकांच्या निवडींशी जोडलेला आहे. ह्यामुळे अन्नसुरक्षेची चर्चा हळूहळू उत्पादनाच्या चौकटीतून बाहेर पडून परस्पर संबंधांच्या चौकटीत प्रवेश करते. माझ्या अनुभवात, ह्याच ठिकाणी अन्नसुरक्षेविषयीच्या चर्चेचे स्वरूप बदलताना दिसते आणि ह्या सर्व स्तरांखाली आणखी एक धागा सतत जाणवत राहतो – नात्यांचा.
शेतकरी आणि ग्राहक ह्यांच्यातील अंतर वाढले, मातीशी असलेले नाते सैल झाले, समुदायाची भूमिका कमी झाली आणि पर्यावरणापासून विकास वेगळा करून पाहिला जाऊ लागला, तेव्हा अन्नाविषयीचे अनेक प्रश्न नव्या स्वरूपात समोर आले. म्हणूनच अन्नसुरक्षेचा प्रश्न केवळ उत्पादनाचा नसून संबंधांचा आहे, असे म्हणणे ही भावनिक भूमिका नसून व्यापक सामाजिक वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात, ह्या प्रश्नांची उत्तरे केवळ सैद्धांतिक चर्चांमधून मिळतीलच असे नाही. अनेकदा स्थानिक प्रयोग, समुदायाधारित उपक्रम, आणि प्रत्यक्ष अनुभव, ह्यांमधून काही वेगळ्या शक्यता समोर येतात.
विश्वास, सहभाग, आणि तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न
येथे प्रश्न असा आहे की शाश्वत अन्नव्यवस्थेचा विचार करताना उत्पादनाइतकेच नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवण्याची तयारी आपण समाज म्हणून दाखवू शकू का? आणि जर अन्नव्यवस्थेतील अनेक समस्या संबंधांच्या कमतरतेत दडलेल्या असतील, तर ती तुटलेली नाती पुन्हा कशी जोडता येतील ?
गेल्या दशकभरात पुण्यात स्वयंसेवकांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या एका शेतकरी–सदस्य आधारित अन्नव्यवस्था उपक्रमाशी मी जोडले गेले आहे. ह्या दरम्यान अन्नाविषयीच्या अनेक प्रश्नांकडे नव्याने पाहण्याची मला संधी मिळाली. गेली बावीसहून अधिक वर्षे मी तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन करत असून पर्यावरण तत्त्वज्ञान, पर्यावरणीय नीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र हे माझ्या अभ्यासाचे विशेष विषय आहेत. आयुर्वेदाच्या तत्त्वज्ञानावर केलेल्या माझ्या संशोधनातूनही मी मानव आणि निसर्ग ह्यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच काळात ‘खाऊ तसे होऊ’ ह्या विचाराभोवती आरोग्य आणि आहार ह्यांवर आधारित ‘स्वस्थ-अस्वस्थ’ ही लेखमालिका मी ‘सकाळ’मध्ये वर्षभर लिहिली होती. त्या निमित्ताने विषमुक्त अन्नाची गरज अनेक वाचकांपर्यंत पोहोचली; परंतु त्यानंतर अनेकांनी असा प्रश्न विचारला की असे अन्न प्रत्यक्षात कुठे मिळू शकते? विषमुक्त अन्नाच्या माझ्या वैयक्तिक शोधाला आणि शेतीविषयी लहानपणापासून असलेल्या जिव्हाळ्याला ह्या प्रश्नाने अधिक दिशा दिली. त्याच शोधातून वरील उपक्रमाशी माझा परिचय झाला आणि सुरुवातीच्या काळापासूनच, म्हणजे जवळपास गेली नऊ-दहा वर्षे, मी ह्या उपक्रमाशी विविध स्तरांवर जोडले गेले आहे. शेतकऱ्यांशी संवाद, शेतभेटी, स्वयंसेवकांचे कार्य, वितरणव्यवस्था, समुदायातील चर्चा आणि सहभागी कुटुंबांचे अनुभव ह्यांचे जवळून निरीक्षण करताना अन्नसुरक्षा, शेतकरी सन्मान, समुदाय सहभाग आणि पर्यावरणीय जबाबदारी ह्या प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. ह्या लेखातील पुढील अनेक निरीक्षणे ही अशाच प्रत्यक्ष अनुभवातून, संवादांतून आणि आत्मपरीक्षणातून आकाराला आलेली आहेत.
ह्या अनुभवाकडे कोणत्याही आदर्श नमुन्याच्या किंवा अंतिम उपायाच्या स्वरूपात पाहण्याचा येथे प्रयत्न नाही. उलट, स्थानिक पातळीवर उभ्या राहिलेल्या एका स्वयंसेवकाधारित सामाजिक पुढाकारातून अन्नव्यवस्थेविषयी कोणते व्यापक प्रश्न समोर येतात, कोणत्या शक्यता दिसतात, आणि कोणत्या मर्यादा जाणवतात, ह्यांचा विचार करण्याचा हा प्रयत्न आहे.
पुण्यातील स्वयंसेवकाधारित अन्नव्यवस्था : एक संदर्भ
ह्या लेखामध्ये चर्चिलेला अनुभव हा गेल्या दशकभरात पुणे परिसरात विविध नावांनी कार्यरत असलेल्या काही विकेंद्रित शेतकरी–सदस्य समूहांच्या कार्यातून आकाराला आलेला आहे. “नॅचरल फार्मर्स ग्रुप”, “नॅचरल फूड ग्रुप” आणि “हेल्दी फूड बँक” ही त्यांपैकी काही परिचित नावें आहेत. तथापि, ह्या समूहांना एका औपचारिक संस्थेच्या किंवा केंद्रीकृत संरचनेच्या रूपात पाहणे योग्य ठरणार नाही. विविध गट स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे कार्यरत असले तरी विषमुक्त अन्न, शेतकरी सन्मान, स्वयंसेवी सहभाग, पारदर्शकता, आणि पर्यावरणीय जबाबदारी, ही काही समान तत्त्वे त्यांना जोडून ठेवतात. त्यामुळे येथे कोणत्याही एका विशिष्ट गटाचे वर्णन करण्याऐवजी अशा व्यापक स्वयंसेवकाधारित अन्नउपक्रमाच्या अनुभवाचा विचार करण्यात आला आहे. आज ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शंभरहून अधिक शेतकरी, पन्नासहून अधिक स्वयंसेवक आणि सुमारे चार हजार कुटुंबे एका विश्वासाधारित अन्नव्यवस्थेशी जोडली गेली आहेत. तथापि, तिची मूलभूत रचना आजही औपचारिक संस्थेपेक्षा समुदायाच्या सहभागावर अधिक आधारित आहे.
ह्या लेखामध्ये काही ठिकाणी व्यापक वाचकांच्या सोयीसाठी “ग्राहक” ही सर्वपरिचित संज्ञा वापरली आहे. प्रत्यक्ष अनुभवात मात्र ह्या व्यवस्थेशी जोडलेली कुटुंबे स्वतःला “सदस्य” म्हणून ओळखतात. ग्राहक ही संज्ञा व्यवहाराची आठवण करून देते; सदस्य ही संज्ञा सहभागाची. त्याचप्रमाणे शेतकरी हा केवळ पुरवठादार नसून अनेकांच्या दृष्टीने “अन्नदाता” असतो. संवादामध्ये एकमेकांना “ताई”, “दादा”, “भैय्या” अशा सन्मानपूर्वक संबोधनांनी हाक मारण्याची पद्धतही सहजपणे दिसून येते. ही संबोधने कालांतराने निर्माण झालेल्या परस्पर आदराच्या संस्कृतीतून विकसित झालेली आहेत. अशा छोट्या भाषिक बदलांमधूनही व्यवहार हळूहळू नात्यामध्ये रूपांतरित होत असल्याचे जाणवते.
विश्वासाची अर्थव्यवस्था : अन्नव्यवस्थेतील अदृश्य पायाभूत संरचना
आधुनिक अर्थव्यवस्थेची चर्चा होताना भांडवल, बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा ह्यांचा उल्लेख वारंवार होतो. परंतु काही सामाजिक व्यवस्थांमध्ये आणखी एक प्रकारचे भांडवल महत्त्वाची भूमिका बजावत असते—विश्वास. तो आर्थिक ताळेबंदात दिसत नाही; परंतु अनेक व्यवहारांच्या पायाभूत स्तरावर असतो. ग्राहक जे अन्न विकत घेतात, त्याची गुणवत्ता, उत्पादनपद्धती इत्यादींची प्रत्यक्ष पडताळणी करणे त्यांना बहुतेक वेळा शक्य नसते. त्यामुळे बहुतांश अन्नव्यवस्था प्रमाणपत्रे, ब्रँड्स, जाहिराती, किंवा नियामकयंत्रणांवर (AGMARK etc)अवलंबून राहतात. त्या महत्त्वाच्या असल्या तरी विश्वासाचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही. पुण्यातील ह्या अनुभवात विश्वास हा केवळ घोषणांवर किंवा विपणनावर आधारित नाही; तो सततच्या संवादातून, परस्पर ओळखीतून आणि दीर्घकालीन संबंधांतून निर्माण होतो.
ह्यामध्ये शेतभेटींना विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शेतकऱ्याला ह्या व्यवस्थेत सहभागी करून घेताना त्याच्याकडे शेतभेट दिली जाते. तेथे प्रत्यक्ष संवादातून शेतीपद्धतींची माहिती, स्थानिक परिस्थितीची समज इत्यादी माहिती घेतली जाते. ही केवळ तांत्रिक पडताळणी नसून व्यक्ती आणि समुदाय ह्यांच्यातील विश्वासाच्या पायाची निर्मिती असते. माझ्या निरीक्षणात, शेतभेटींचे सर्वात महत्त्वाचे फलित तांत्रिक माहितीपेक्षा मानवी समज वाढण्यात दिसून आले आहे. शहरात राहणाऱ्या अनेक सदस्यांसाठी शेती ही एक संकल्पना असते; परंतु शेतावर जाऊन अन्नदात्यांशी संवाद साधल्यानंतर ती एक जिवंत वास्तव बनते. हवामानातील अनिश्चितता, पाण्याचे प्रश्न, मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील जोखीम, आणि बाजारातील अस्थिरता, ह्यांविषयीची समज अधिक स्पष्ट होते. शेतकऱ्यांनाही त्यांचे अन्न स्वीकारणाऱ्या सदस्यांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळते. आधुनिक अन्नव्यवस्थेमध्ये उत्पादक आणि ग्राहक ह्यांच्यातील दरी अन्नाला बाजारव्यवहारामध्ये रूपांतरित करते; प्रत्यक्ष संवाद त्या दरीवर पूल उभारण्याचे काम करतो. येथे पेरणी, हवामान, रोगराई, काढणी, उपलब्धता, उत्पादनातील चढउतार, स्थानिक परिस्थिती, अन्नाची गुणवत्ता आणि शेतीशी संबंधित व्यापक प्रश्न ह्यांवर नियमित संवाद करणारे चर्चागटही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ह्या चर्चा अन्नसाक्षरता वाढवण्याचे, गैरसमज दूर करण्याचे आणि अन्नव्यवस्थेकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याचे माध्यम बनतात.
अर्थात, विश्वास म्हणजे अंधस्वीकार नव्हे. गेल्या दशकभरातील अनुभवातून काही वेळा चुकीची / खोटी माहिती देणारे, अपेक्षित तत्त्वांचे पालन न करणारे शेतकरीही आढळले आहेत. त्यामुळे विश्वास हा कायमस्वरूपी नसून संवाद, पडताळणी आणि उत्तरदायित्व ह्याद्वारे सतत जागरूक राहण्याची प्रक्रिया आहे. कोणतीही समुदायाधारित व्यवस्था पूर्णपणे विश्वासावर उभी राहू शकत नाही; तसेच पूर्णपणे नियंत्रण आणि संशयावरही चालू शकत नाही. दीर्घकालीन टिकाऊपणा ह्या दोन्हींच्या संतुलनातूनच निर्माण होतो. विश्वास आणि पडताळणी ह्यांना परस्परविरोधी न मानता परस्परपूरक मानणे आवश्यक ठरते. ह्या अनुभवातून मला वारंवार जाणवलेली गोष्ट अशी की विश्वास केवळ नैतिक नसून ते सामाजिक भांडवलाचेही एक स्वरूप आहे.
संवाद, अन्नसाक्षरता आणि समुदायनिर्मिती
जर विश्वासामुळे संवाद वाढत असेल, व्यवहार अधिक पारदर्शक होत असतील, गैरसमज कमी होत असतील, आणि उत्पादक–सदस्य संबंध अधिक स्थिर होत असतील, तर त्याचे मूल्य केवळ भावनिक राहत नाही. बाजारपेठ अन्न विकू शकते; परंतु विश्वास निर्माण करण्यासाठी समुदायाची आवश्यकता असते. विश्वास हा कोणत्याही समुदायाधारित अन्नव्यवस्थेचा पाया असू शकतो; अन्नाभोवती सतत संवाद घडत राहणे हे ह्या व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. आधुनिक शहरी जीवनात अन्न हे अंतिम उत्पादनाच्या स्वरूपातच ग्राहकासमोर येते. त्यामुळे एखाद्या पिकाची उपलब्धता का कमी झाली, एखाद्या ऋतूमध्ये काही भाज्यांचे उत्पादन का घटले किंवा हवामानातील बदलांचा परिणाम कसा झाला, ह्याबाबत संवाद घडला तर ग्राहकाला केवळ माहितीच मिळत नाही तर अन्नव्यवस्थेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनही बदलू लागतो.
अन्नसाक्षरता हा ह्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा परिणाम आहे. अन्न कुठून येते, कोणत्या ऋतूमध्ये काय उपलब्ध असते, स्थानिक पिकांचे महत्त्व काय आहे, उत्पादनातील विविधता का आवश्यक आहे, ह्या प्रश्नांविषयीची जाणीव वाढताना दिसते. अनेक कुटुंबांसाठी हा अनुभव अन्नाशी पुन्हा परिचय करून देणारा ठरतो. काही सदस्यांशी झालेल्या संवादांमध्ये बालपणीच्या खाद्यसंस्कृतींच्या आठवणी वारंवार पुढे येताना दिसल्या. काही धान्ये, कडधान्ये किंवा स्थानिक अन्नघटक जे हळूहळू दैनंदिन आहारातून कमी झाले होते, ते पुन्हा चर्चेचा विषय बनले. अशा संवादांमधून अन्न हे केवळ पोषणाचे साधन नसून सांस्कृतिक स्मृती आणि सामाजिक ओळख ह्यांचाही भाग आहे, हे अधिक स्पष्टपणे जाणवते. ह्यामुळे समुदायनिर्मितीची एक वेगळी प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला अन्नाच्या माध्यमातून जोडले गेलेले लोक हळूहळू शेती, पर्यावरण, आरोग्य, स्थानिक अर्थव्यवस्था, आणि शाश्वतता, ह्यांसारख्या व्यापक प्रश्नांवर चर्चा करू लागतात. अन्न हा ह्या समुदायाचा विषय असतो; पण तोच एकमेव विषय राहत नाही.
ग्राहकापासून सदस्यापर्यंत
ह्या अनुभवातील एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे सहभागी कुटुंबांच्या भूमिकेत घडणारा बदल. सुरुवातीला बहुतेक लोक ह्या व्यवस्थेशी ग्राहक म्हणून जोडले जातात. त्यांचे प्रश्न स्वाभाविकपणे किंमत, गुणवत्ता, उपलब्धता आणि सोयीभोवती फिरत असतात. परंतु कालांतराने काहींच्या भूमिकेत सूक्ष्म बदल घडताना दिसतो. ते केवळ उत्पादन घेणारे ग्राहक राहत नाहीत; तर अन्नव्यवस्थेविषयी प्रश्न विचारणारे, शिकणारे आणि काही प्रमाणात तिच्यात सहभागी होणारे सदस्य बनतात. हा बदल एका दिवसात घडत नाही. तो संवाद, अनुभव आणि परस्पर संबंधांच्या प्रक्रियेतून विकसित होतो. काही सदस्य शेतभेटींमध्ये सहभागी होतात. काही स्वयंसेवक म्हणून काम करतात. काही नवीन सदस्यांना मार्गदर्शन करतात. काही अन्नसाक्षरतेशी संबंधित उपक्रमांमध्ये योगदान देतात. ह्याच ठिकाणी “ग्राहक” आणि “सदस्य” ह्या दोन संकल्पनांमधील फरक अधिक स्पष्ट होतो. ग्राहक हा व्यवहाराचा भाग असतो; सदस्य हा समुदायाचा भाग असतो. व्यवहार संपला तरी समुदाय टिकून राहतो. अर्थात, ह्या व्यवस्थेशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे सक्रिय सहभागी होतेच असे नाही. परंतु काही प्रमाणात जरी हा बदल घडत असेल तरी तो नागरी सहभागाच्या व्यापक प्रश्नाशी जोडला जातो.
स्वयंसेवक : सामाजिक भांडवलाचे अदृश्य शिल्पकार
ह्या अनुभवातील सर्वांत कमी चर्चिला जाणारा, पण कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे स्वयंसेवक. शेतकरी आणि सदस्य हे कोणत्याही अन्नव्यवस्थेतील दृश्यमान घटक असतात. परंतु ह्या दोघांना जोडणारे, संवाद सुलभ करणारे, विश्वास टिकवून ठेवणारे आणि समुदाय जिवंत ठेवणारे अनेक स्वयंसेवक पडद्यामागे कार्यरत असतात. विकासाविषयीच्या चर्चांमध्ये आपण अनेकदा भांडवल, तंत्रज्ञान, धोरणे आणि पायाभूत सुविधा ह्यांविषयी बोलतो. परंतु समुदायांना आधार देणाऱ्या स्वयंसेवी श्रमांविषयी तुलनेने कमी चर्चा होते. हे स्वयंसेवक केवळ सहाय्यक घटक नसून सामाजिक पायाभूत संरचनेचा भाग असतात. शेतकऱ्यांशी संपर्क ठेवणे, नवीन सदस्यांना माहिती देणे, वितरण व्यवस्थेतील अडचणी सोडवणे, गुणवत्तेबाबतचे प्रश्न हाताळणे, चर्चागट चालवणे, शेतभेटी आयोजित करणे, कार्यक्रमांचे समन्वयन करणे आणि विविध घटकांमध्ये संवाद टिकवून ठेवणे—या सर्व कामांमध्ये स्वयंसेवकांची भूमिका असते.
ह्या कामाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अदृश्य स्वरूप. बाजारव्यवस्थेमध्ये बहुतेक गोष्टींची किंमत मोजता येते; परंतु समुदायासाठी दिलेला वेळ, संवादासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक नातेसंबंध जपण्यासाठी दिलेले श्रम ह्यांचे मूल्य मोजणे कठीण असते. ते लोकांना जोडतात, गैरसमज कमी करतात, संवादाचे मार्ग खुले ठेवतात आणि सहभागासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. त्यामुळे स्वयंसेवकांचे कार्य हे केवळ व्यवस्थापकीय नसून सामाजिक आणि नागरिकत्वाशी देखील संबंधित आहे. शाश्वत विकासाविषयी चर्चा करताना आपण स्वयंसेवी सहभागाला किती महत्त्व देतो? समाजातील अनेक सकारात्मक बदल हे केवळ संस्थात्मक संरचनांमुळे नव्हे, तर नागरिकांनी स्वेच्छेने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांमुळेही घडत असतात हे ह्यामुळे लक्षात येते.
शेतकरी : उत्पादकापासून समुदायातील मान्यवर घटकापर्यंत
अन्नव्यवस्थेतील बहुतांश चर्चांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आर्थिक दृष्टिकोनातून मांडला जातो. तो महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या दशकभरातील अनुभवातून मला असे वाटू लागले आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ उत्पन्नाचा नाही; तो सन्मानाचाही आहे.
आधुनिक अन्नव्यवस्थेमध्ये ग्राहक थेट अंतिम उत्पादन पाहतो; उत्पादक मात्र अनेकदा अदृश्य राहतो. ह्या अनुभवात शेतकरी हा केवळ पुरवठादार नसून समुदायाचा सक्रिय घटक म्हणून समोर येतो. सदस्यांशी थेट संवाद, शेतभेटी आणि विविध कार्यक्रमांमधील सहभाग ह्यांमधून त्यांची भूमिका अधिक दृश्यमान होते. काही अन्नदात्यांशी संवाद साधताना एक गोष्ट वारंवार जाणवली. योग्य मोबदला महत्त्वाचा असतोच; परंतु त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणे, त्यांना आदराने ऐकले जाणे आणि त्यांच्या ज्ञानाला महत्त्व दिले जाणे ह्यालाही तेवढेच महत्त्व असते.
शेती ही केवळ उत्पादन प्रक्रिया नाही. त्यामध्ये स्थानिक पर्यावरणाचे ज्ञान, ऋतुचक्राची समज, पिकांच्या विविधतेचा अनुभव आणि दीर्घकालीन निरीक्षणे ह्यांचा समावेश असतो. शेतकरी हा केवळ उत्पादक नसून ज्ञानवाहकही असतो. ह्या संदर्भात एक व्यापक प्रश्न निर्माण होतो. जर समाजामध्ये शेतीला सन्मानाचे स्थान मिळत नसेल, तर पुढील पिढ्या शेतीकडे कशा पाहतील? अन्नसुरक्षेचा प्रश्न केवळ वर्तमानातील उत्पादनाचा नसून भविष्यातील उत्पादकांच्या निर्मितीचाही आहे. त्यामुळे शेतकरी सन्मानाचा प्रश्न शेतीच्या भवितव्याशीही जोडलेला आहे.
अन्नाच्या पलीकडे
ह्या अनुभवाचे परिणाम केवळ अन्नपुरते मर्यादित राहत नाहीत. सहभागी कुटुंबांमध्ये आरोग्य, पर्यावरण आणि स्थानिक अर्थव्यवस्था ह्यांविषयीची जागरूकता वाढताना दिसते. काही सदस्यांनी कालांतराने आरोग्याशी संबंधित सकारात्मक अनुभव व्यक्त केले आहेत. काहींनी खाद्यसवयींमध्ये बदल झाल्याचे सांगितले. ह्या अनुभवांकडे वैज्ञानिक निष्कर्ष म्हणून नव्हे, तर सहभागींची निरीक्षणे म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. तथापि, ह्या अनुभवातून अन्न आणि आरोग्य, अन्न आणि पर्यावरण, तसेच अन्न आणि स्थानिक अर्थव्यवस्था ह्यांच्यातील परस्परसंबंधांविषयीची जाणीव अधिक स्पष्ट होताना दिसते. त्यामुळे अन्नाचा प्रश्न केवळ ताटातील अन्नाचा राहत नाही; तो व्यापक जीवनपद्धतीशी जोडला जातो.
अनेक सदस्यांसाठी ही प्रक्रिया केवळ बाजारापेक्षा वेगळे विषमुक्त अन्न मिळण्यापुरती मर्यादित राहिली नाही. अन्नाविषयी विचार करताना माती, पाणी, स्थानिक शेती, ऋतुचक्र, जैवविविधता आणि उपभोगाच्या सवयी ह्यांविषयीही विचार सुरू झाला. माझ्या निरीक्षणात, ह्या बदलांचे महत्त्व केवळ वैयक्तिक पातळीवर नसून सामाजिक पातळीवर अधिक आहे. अन्नाभोवती सुरू झालेला संवाद अनेकदा पर्यावरण, आरोग्य, आणि स्थानिक अर्थव्यवस्था, ह्यांना एकत्र पाहण्याची दृष्टी निर्माण करतो.
आव्हाने, मर्यादा आणि आत्मपरीक्षण
कोणताही सामाजिक प्रयोग समजून घेताना त्याच्या मर्यादांचाही विचार करणे आवश्यक असते. ह्या अनुभवातील पहिले आव्हान म्हणजे विश्वास आणि पडताळणी ह्यांच्यातील संतुलन. विश्वास आवश्यक असला तरी सततची जागरूकता आणि उत्तरदायित्व ह्यांची गरज कायम राहते. दुसरे आव्हान म्हणजे स्वयंसेवकांवरील अवलंबित्व. स्वयंसेवी व्यवस्थांचा पाया मानवी ऊर्जा, वेळ आणि बांधिलकीवर उभा असतो. त्यामुळे सातत्य टिकवणे आणि नवीन स्वयंसेवक तयार करणे हे महत्त्वाचे प्रश्न ठरतात.
तिसरा प्रश्न म्हणजे अशा उपक्रमांची सर्वसमावेशकता. विषमुक्त अन्न आणि सजग सदस्य ह्या संकल्पना व्यापक समाजापर्यंत कशा पोहोचतील, हा प्रश्न अद्याप आहेच. काही वेळा अशा उपक्रमांवर मर्यादित सामाजिक गटांपुरते राहण्याची टीकाही केली जाते. ह्या टीकेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. ह्या मर्यादा मान्य केल्याशिवाय अशा प्रयोगांचे वास्तववादी मूल्यमापन होऊ शकत नाही.
विस्तार नव्हे, विकेंद्रीकरण
ह्या अनुभवातून समोर आलेला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विस्तार आणि विकेंद्रीकरण ह्यांमधील फरक. एखादा प्रयोग यशस्वी ठरला की त्याचा विस्तार करण्यावर भर दिला जातो. परंतु समुदाय, विश्वास आणि प्रत्यक्ष संबंध ह्यांवर आधारित व्यवस्थांच्या बाबतीत विस्तार योग्य ठरेलच असे नाही. अशा व्यवस्थांची ताकद त्यांच्या आकारमानात नसून त्यांच्या संबंधक्षमतेत असते. आकार वाढत गेला की प्रत्यक्ष संवाद, उत्तरदायित्व, समुदायभावना आणि विश्वास टिकवून ठेवणे कठीण होत जाते. म्हणूनच एका मोठ्या व्यवस्थेचा विस्तार करण्यापेक्षा विविध ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार त्याच तत्त्वांवर आधारित नव्या उपक्रमांना प्रेरणा देणे अधिक परिणामकारक ठरू शकते. प्रत्येक समुदाय आपली स्वतंत्र रचना विकसित करू शकतो; त्यात विश्वास, सहभाग, शेतकरी सन्मान आणि पर्यावरणीय जबाबदारी ही मूलभूत तत्त्वे समान राहू शकतात.
निष्कर्ष
अन्नाविषयीची चर्चा उत्पादनापासून सुरू होते ती शेवटी संबंधांवर येऊन थांबते. ह्या अनुभवातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात असा दावा करता येणार नाही. त्यामध्ये मर्यादा आहेत, आव्हाने आहेत आणि काही प्रश्न अद्याप अनुत्तरितही आहेत. तरीही त्यातून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते —अन्नव्यवस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची रचना नसून सामाजिक संबंधांचीही रचना असते.
विश्वास, संवाद, सहभाग, स्वयंसेवी योगदान आणि शेतकरी सन्मान ह्यांसारख्या घटकांकडे अनेकदा अन्नसुरक्षेच्या चर्चेत दुय्यम म्हणून पाहिले जाते. पण हे घटक दुय्यम नसून अन्नव्यवस्थेच्या टिकाऊपणाशी थेट संबंधित असतात. आज शाश्वत विकासाविषयी चर्चा करताना तंत्रज्ञान, धोरणे आणि बाजारव्यवस्था ह्यांच्याबरोबरच समुदाय, विश्वास आणि सहभाग ह्यांविषयीही बोलण्याची गरज आहे. कारण शाश्वत अन्नव्यवस्थेचा पाया केवळ संसाधनांवर उभा राहत नाही; तो माणसांमधील नात्यांवरही उभा राहतो.
ह्या अनुभवाकडे अंतिम उत्तर म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. मात्र त्याकडे एक प्रश्न अधिक स्पष्ट करणारा अनुभव म्हणून नक्कीच पाहता येईल. जर विश्वास, संवाद, स्वयंसेवी सहभाग आणि परस्पर आदर ह्यांच्या आधारावर अन्नाभोवती नवी नाती निर्माण होऊ शकत असतील, तर कदाचित शाश्वत विकासाच्या चर्चेत त्यांनाही पायाभूत संरचनेचा भाग मानण्याची वेळ आता आली आहे.
लेखिका तत्त्वज्ञानाच्या अध्यापिका व संशोधक असून गेली अनेक वर्षे विषमुक्त अन्न आणि शाश्वत शेतीच्या क्षेत्राशी निगडित आहेत.