शाश्वत भविष्याच्या दिशेने
****************************************************************
“शाश्वतता म्हणजे नेमके काय?”, पर्यावरणविषयक एका संवादसत्रात, `इकोलॉजिकल सोसायटी, पुणे’चे प्रतिनिधित्व करत असताना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मला हा थेट प्रश्न विचारला. साधा वाटणारा हा प्रश्न प्रत्यक्षात आपल्या काळातील सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे.
क्षणभर माझ्या मनात शाश्वततेच्या (sustainability) पाठ्यपुस्तकांतील व्याख्या तरळून गेल्या – ‘आजच्या पिढीच्या गरजा भागवताना भावी पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही’, किंवा ‘पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था ह्यांचा समतोल साधणे’, वगैरे. पण लगेचच जाणवले, की केवळ व्याख्या पुरेशा नाहीत. शाश्वतता ही फक्त समजून घेण्याची संकल्पना नाही; ती आपल्या जगण्याची, उपभोगाची, उत्पादनाची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची दिशा ठरवणारी विचारपद्धती आहे.
त्या चर्चेनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ‘शाश्वतता’ हा शब्द आज सर्वांच्या परिचयाचा झाला असला, तरी ती संकल्पना अजूनही अनेकांच्या मनात तुकड्या-तुकड्यांनीच उभी आहे. अक्षय ऊर्जा, वृक्षारोपण, पुनर्वापर, इलेक्ट्रिक वाहने, कार्बन फूटप्रिंट ह्यांवर भरभरून बोलत असताना, एक मूलभूत प्रश्न मात्र आपण टाळतो — शाश्वततेची गरज निर्माणच का झाली?
ह्याचे उत्तर आपल्या सभोवताल घडणाऱ्या पर्यावरणीय संकटांमध्ये दडले आहे. हवामानबदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, जमिनीची घटती सुपीकता, प्रदूषण आणि वाढता कचरा — ही वेगवेगळी संकटे नसून एका मूळ समस्येची वेगवेगळी रूपे आहेत. ती समस्या म्हणजे मानव आणि निसर्ग ह्यांच्यातील विस्कटलेले नाते.
कोट्यवधी वर्षांपासून निसर्ग एका परिपूर्ण चक्रावर चालत आला आहे. तिथे काहीही वाया जात नाही. प्रत्येक सजीवाची भूमिका निश्चित असते आणि एका घटकाचा शेवट दुसऱ्या घटकाची सुरुवात ठरतो. जंगले स्वतःचे पुनरुज्जीवन करतात, नद्या असंख्य जीवांना आधार देतात, माती पुन्हा सुपीक होते आणि विविध जीव एकमेकांशी असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यांतून परिसंस्था टिकवून ठेवतात. माणूसही कधीकाळी ह्या नैसर्गिक चक्राचाच एक भाग होता.
मात्र आधुनिक विकासाच्या प्रवासात आपण स्वतःला ह्या परिसंस्थेपासून वेगळे समजू लागलो. निसर्गाकडे जीवनाधार म्हणून नव्हे, तर संसाधनांचा अमर्याद साठा म्हणून पाहू लागलो. जंगले, पाणी, खनिजे, जीवाश्म इंधन (fossil fuel), जमीन — ह्यांचा अमर्याद उपसा करून त्यांचा उपभोग घ्यायचा आणि उरलेले टाकून द्यायचे, अशी रेषीय (Linear) अर्थव्यवस्था आपण उभी केली.
तर शाश्वतता ही काही पर्यावरणपूरक कृतींची यादी नाही. तो सर्वप्रथम विचारांमध्ये घडणारा बदल आहे. माणूस हा निसर्गापासून वेगळा नाही; तर ह्या विशाल जीवसृष्टीतील एक घटक आहे, ही जाणीव म्हणजे शाश्वततेची सुरुवात. म्हणूनच, “अधिक झाडे लावा” असे सांगण्यापूर्वी “झाडाचे परिसंस्थेमधील स्थान काय आहे?” हा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे आहे. झाड म्हणजे केवळ ऑक्सिजन किंवा सावली देणारी गोष्ट नाही. ते जलचक्र नियंत्रित करते, मातीची सुपीकता वाढवते, स्थानिक हवामानावर परिणाम करते, जैवविविधतेला आधार देते, कार्बन साठवून ठेवते आणि असंख्य सजीवांच्या अस्तित्वाचा पाया बनते.
त्याचप्रमाणे, “सर्वांसाठी अक्षय ऊर्जा (solar)” म्हणताना “आपण किती ऊर्जा वापरतो आणि ती किती जबाबदारीने वापरतो?” हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. शाश्वतता म्हणजे केवळ एका तंत्रज्ञानाऐवजी दुसरे तंत्रज्ञान स्वीकारणे नव्हे; तर आपल्या वाढत्या उपभोगाच्या सवयींचाही पुनर्विचार करणे आहे.
अनेकदा शाश्वततेवरील चर्चा एका प्रश्नावर येऊन थांबते — “मग आपण वस्तू वापरणेच बंद करायचे का? विकासच थांबवायचा का? जगणेच थांबवायचे का?”
उत्तर अर्थातच ‘नाही’.
प्रत्येक सजीव निसर्गसंपत्तीचा वापर करतो. संसाधनांचा वापर हा प्रश्न नाही; तर तो कसा, किती आणि कोणत्या परिणामांसह केला जातो, हा खरा प्रश्न आहे.
निसर्गाने लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत परिपूर्ण परिपत्रकता (Circularity) साधली आहे. मात्र माणसाने गरजेपलीकडचा उपभोग, अमर्याद संसाधनांचा उपसा आणि शतकानुशतके अविघटित राहणारा कचरा निर्माण करण्याची क्षमता मिळवली आहे. त्यामुळे आजची खरी गरज विकासाला विरोध करण्याची नाही, तर पृथ्वीच्या मर्यादा ओळखून विकासाची नव्याने व्याख्या करण्याची आहे.
शाश्वतता ही केवळ पर्यावरणाशी संबंधित संकल्पना नाही. ती सामाजिक न्याय, आर्थिक समतोल, लोकांच्या जीवनमानाची गुणवत्ता आणि भावी पिढ्यांच्या हिताशी तितकीच निगडित आहे. पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत; उलट ते एकमेकांवर अवलंबून आहेत. ह्यांपैकी एखादा घटक दुर्लक्षित झाला, तर उर्वरित दोनही टिकू शकत नाहीत.
कदाचित म्हणूनच शाश्वतता हे एखादे अंतिम ध्येय नसून सतत शिकत राहण्याची प्रक्रिया आहे. निसर्गाच्या मर्यादा स्वीकारून, भावी पिढ्यांचा विचार करून आणि प्रत्येक निर्णयाकडे व्यापक परिसंस्थेच्या दृष्टीने पाहण्याची वृत्ती म्हणजे शाश्वतता.
इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि आजचा सुधारक ह्यांनी एकत्रितपणे साकारलेला हा विशेषांक शाश्वततेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा दावा करत नाही. उलट, त्याविषयी अधिक व्यापक आणि सखोल संवाद सुरू करण्याचा हा एक प्रयत्न आहे. घोषणांपलीकडे जाऊन, आपल्या जीवनशैलीचा, विकासाच्या संकल्पनांचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा पुनर्विचार करण्याची संधी ते वाचकांना देतात.
ह्या विशेषांकातील लेखांमुळे वाचकांनी आपल्या अन्नाकडे, पाण्याकडे, ऊर्जेकडे, कचऱ्याकडे, परिसराकडे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तर ह्या प्रयत्नाचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटेल.
शाश्वत भविष्याचा प्रवास एखाद्या धोरणापासून किंवा नव्या तंत्रज्ञानापासून सुरू होत नाही. तो सुरू होतो एका साध्या पण मूलभूत प्रश्नापासून — मर्यादित संसाधने असलेल्या ह्या पृथ्वीवर आपण नेमके कसे जगायचे ठरवतो?
वाचनासाठी शुभेच्छा!
अनूप जयपूरकर
इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे