अन्नाच्या निमित्ताने…

आपण रोज अन्न विकत घेतो.

भाजीपाला, फळे, धान्य, दूध, तेल… आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत आपल्याला माहीत असते. कुठे स्वस्त मिळेल, कुठे चांगल्या दर्जाचे मिळेल, कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा—हेही आपण ठरवतो.

पण एक साधा प्रश्न आपण स्वतःला फारसा विचारत नाही.

आपण जे खातो, ते पिकवणारा माणूस कोण आहे?

आणि त्याहून एक वेगळा प्रश्न…

ज्याने हे अन्न पिकवले, त्याला माहीत आहे का की ते कोणाच्या ताटात जाणार आहे?

ह्या दोन प्रश्नांमध्येच आधुनिक बाजारव्यवस्थेची एक विलक्षण गोष्ट दडलेली आहे. आज बाजार अत्यंत कार्यक्षम झाला आहे. हजारो किलोमीटरवरचे फळ दुसऱ्या दिवशी आपल्या घरी पोहोचते. मोबाईलवर काही बटणे दाबली की किराणा दारात उभा राहतो. दर्जा तपासण्यासाठी प्रमाणपत्रे आहेत, परताव्यासाठी नियम आहेत, पैसे देण्यासाठी डिजिटल व्यवस्था आहे.

सगळं आहे.

फक्त ह्या संपूर्ण व्यवस्थेत दोन माणसे एकमेकांना ओळखत नाहीत.

ज्याने अन्न पिकवले आणि ज्याने ते खाल्ले, त्यांच्यामध्ये व्यवहार आहे; पण संबंध नाही.

काही दिवसांपूर्वी एका ग्राहकांना फोन केला.

“काकू, कशा आहात? तब्येत आता बरी आहे ना?”
त्या म्हणाल्या, “हो… आता बरी आहे.”
मी म्हणालो, “छान! आणि हो, संत्री आली आहेत. म्हणून सांगावंसं वाटलं.”
मग पुढे संत्री, भाज्या आणि पुढच्या आठवड्याच्या ऑर्डरबद्दल गप्पा सुरू झाल्या.

तुम्ही विचार करत असाल…

हा संवाद फक्त ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात झाला होता?
की आपुलकीने जोडलेल्या दोन माणसांमध्ये?

अशा प्रसंगांची आता सवय झाली आहे.

“यावेळी द्राक्ष  म्हणावी तशी गोड नाहीयेत, उन अजून तापायचे आहे .”
“केळी पुढच्या आठवड्यात मिळणार नाहीत. उत्पादनच कमी झालं.”
“भेंडी सगळ्यांना थोडी थोडीच देतोय. शेतात अपेक्षेपेक्षा कमी निघाली.”
“मागच्या वेळी पपई खराब गेली होती. ह्यावेळी नवीन पाठवतो. त्याचे पैसे घेणार नाही.”
“तुमच्याकडून जास्त पैसे आले होते. खात्यात जमा केले आहेत.”

हे संवाद एखाद्या कॉल सेंटरमध्ये तयार केलेल्या स्क्रिप्टचा भाग नाहीत. गेल्या पाच वर्षांत नागपुरात आमच्या दैनंदिन कामाचा ते एक नैसर्गिक भाग बनले आहेत.

कधी कधी मला वाटतं, आमच्या कार्यालयात फोनवर भाजीपाल्यापेक्षा माणसांबद्दल जास्त बोललं जातं.

हे असं का घडतं?

याचं उत्तर शोधण्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल.

सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी काही मित्रांसोबत सेंद्रिय शेती, नैसर्गिक अन्न आणि गाव-शहर ह्यांना जोडणाऱ्या व्यवस्थेवर चर्चा सुरू होती. अनेक शेतकरी भेटले. अनेक प्रयोग पाहिले. काही स्वयंसेवी प्रयत्नांत सहभागी होण्याची संधी मिळाली.

ह्या प्रवासात एक गोष्ट सतत जाणवत राहिली.

शहरात चांगलं अन्न हवं असलेली माणसं होती.
गावात प्रामाणिकपणे शेती करणारे शेतकरीही होते.
तरीही दोघे एकमेकांपर्यंत सहज पोहोचत नव्हते.

मध्ये अनेक अदृश्य भिंती होत्या.

विश्वासाची.
माहितीची.
व्यवस्थेची.
आणि कधी कधी मानसिकतेचीही.

स्वयंसेवी उपक्रम काही काळ उत्साहाने चालत. पण नंतर दमायला लागत. तसेच, आर्थिक शाश्वततेचा प्रश्नही समोर उभा राहत असे.

तेव्हा मनात एक वेगळाच प्रश्न जन्माला आला.

व्यवसाय आणि सामाजिक उद्देश ह्यांची सांगड घालता येईल का?

व्यवसाय करायचा.
पण केवळ वस्तू विकण्याचा नाही.
काहीतरी वेगळं घडवण्याचा.

कोरोनानंतर हा विचार अधिक ठाम झाला.
त्यातून युक्ताहारचा जन्म झाला.

आज अनेकजण युक्ताहारला ऑनलाइन अन्नवितरण सेवा म्हणून ओळखतात.

ते चुकीचं नाही.
पण ते पूर्णही नाही.

कारण युक्ताहारची सुरुवात एका वेगळ्या प्रश्नातून झाली होती.

अन्नाच्या निमित्ताने माणसं जोडता येतील का?

ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हालाही माहीत नव्हतं.

त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही स्वतःला “व्यवसाय” उभारत आहोत असं कमी, आणि “प्रयोग” करत आहोत असं जास्त मानत आलो.

प्रयोग म्हणजे यशाची हमी नसते.
प्रयोग म्हणजे शोध.

ह्या शोधात आम्ही काही साध्या गोष्टी केल्या.
आज त्या साध्या वाटतात.
पण त्यामागचा विचार वेगळा होता.

उदाहरणार्थ, आमच्या बिलावर उत्पादनाबरोबर उत्पादकाचं नाव लिहायला सुरुवात केली.

तांदूळ कोणत्या शेतकऱ्याचा?
मध कोणी तयार केला?
गूळ कोणत्या कुटुंबाने बनवला?
गुलकंद कोणत्या शेतातून आला?

पहिल्यांदा हे केलं तेव्हा काही जणांनी विचारलं,
“ग्राहकांना ह्याचं काय करायचं आहे?”

प्रश्न योग्यच होता.

कारण आपल्याला वस्तू महत्त्वाच्या वाटतात. माणसं नाही.

पण आम्हाला उलट वाटत होतं.

वस्तू महत्त्वाच्या आहेतच. पण त्या वस्तूंच्या मागचा माणूस दिसू लागला, की वस्तूकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

एका बाटलीतला मध फक्त मध राहत नाही.

तो एखाद्या कुटुंबाच्या श्रमांचा, कौशल्याचा आणि प्रामाणिकपणाचा परिचय बनतो.

त्या क्षणी व्यवहाराला चेहरा मिळतो .

आणखी एक गोष्ट आम्ही जाणूनबुजून केली.

शेतात जे घडतं, त्याबद्दल सदस्यांना सांगायचे.

पाऊस जास्त झाला तर सांगायचं.
उत्पादन कमी आलं तर सांगायचं.
फळांची चव अपेक्षेप्रमाणे नाही आली, तरी सांगायचं.
वाहतुकीत माल खराब झाला, तरी सांगायचं.

हे ऐकून काही जण म्हणायचे,
“इतकं सगळं सांगण्याची गरज काय?”

असेलही.

व्यवहारासाठी कदाचित गरज नसेल. पण संबंधासाठी असते.

कारण नात्यांमध्ये माणसं एकमेकांना फक्त चांगल्या बातम्या सांगत नाहीत. अडचणीही सांगतात.

आणि कदाचित तिथूनच विश्वासाची सुरुवात होत असावी…

…हळूहळू एक वेगळीच गोष्ट घडू लागली.

सुरुवातीला आमच्याकडे येणारी माणसं “ग्राहक” होती.  त्यांना चांगला माल, योग्य किंमत आणि वेळेवर सेवा अपेक्षित होती. ती अपेक्षा योग्यच होती. पण, आमच्या लक्षात आलं की संवादाचा सूर बदलत आहे.

फोनवर ऑर्डर देताना कुणी विचारत असे,
“त्या केळीच्या शेतात पावसामुळे नुकसान झालं होतं ना… आता केळी पुन्हा लागायला सुरुवात झाली का?”

तर कुणी सहजच म्हणे,
“यावेळी त्याला थोडा जास्त भाव मिळाला तरी चालेल.”

आणि एखादा सदस्य तर म्हणे,
“जेवढी टरबूजं उरतील, ती माझ्या ऑफिसला पाठवा. आम्ही वाटून घेऊ.”

अर्थात, सगळेच संवाद असे नसतात. काही वेळा योग्य तक्रारीही येतात—”हे फळ आतून खराब निघालं. कृपया बदलून द्या.” आणि ती अपेक्षाही रास्तच असते. 

पण त्याचबरोबर काही सदस्य असेही भेटतात, जे केवळ ठरावीक शेतकऱ्याकडून वस्तू येईपर्यंत वाट पाहतात.

हे प्रसंग मोठे नव्हते.

पण अशाच छोट्या छोट्या घटनांमधून आम्हाला हल्ली जाणवू लागलं की व्यवहाराचं काहीतरी नात्यात रूपांतर होण्याची सुरुवात आहे. 

शेतकऱ्यांमध्येही बदल दिसू लागला.
सुरुवातीला ते विचारायचे, “किती किलो पाठवू?”
नंतर प्रश्न बदलला.
“यावेळी ग्राहकांना आधीच सांगाल ना, की पाऊस जास्त झाल्यामुळे फळांची चव थोडी वेगळी असेल?”
किंवा असेही,
“माझे नाव उत्पादनावर असते, त्यामुळे किंमत ह्यावेळी आपण दोघेही मिळून ठरवू, लोकांना उगीच वाटायला नको की मी अवाजवी किंमत घेतो आहे.”

एका बाजूला शहरातील कुटुंब.
दुसऱ्या बाजूला गावातील शेतकरी.
दोघेही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले नाहीत.
तरीही त्यांच्यामध्ये एक अदृश्य ओळख निर्माण होत होती.
बहुतेक अन्नाची खरी चव इथेच दडलेली असावी.

यातून आम्हालाही अनेक गोष्टी नव्याने समजल्या.

उदाहरणार्थ, निसर्गात साचेबद्धपणा नसते.
एका झाडावरची सगळी संत्री सारख्या आकाराची नसतात.
प्रत्येक पेरू सारखा गोड नसतो.
कधी टोमॅटो लहान येतात.
कधी आंबे डागाळलेले असतात.
कधी भेंडी कमी निघते.

निसर्गाला एकसारखेपणाचा  सोस  नसतो.
पण बाजाराला असतो.

आमची भूमिका मात्र आम्ही स्पष्ट ठेवली ..आपल्याला निसर्ग जसा आहे तसा दाखवायचाय. त्याला बाजाराच्या साच्यात बसवायचा प्रयत्न करायचा नाही.

जे आहे ते तसंच सांगायचं.

त्यामुळे कधी नाराजीही झाली.
कधी आमच्या चुका झाल्या.
कधी माल वेळेवर पोहोचला नाही.
कधी आमच्याकडून अंदाज चुकले.

पण एक गोष्ट आम्ही पाळण्याचा प्रयत्न केला.

चूक झाली तर ती मान्य करायची.
ज्याचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी घ्यायची.
आणि पुढच्या वेळी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा.

व्यवसायात ही फार मोठी गोष्ट नसावी.
पण नात्यांमध्ये ती अत्यंत महत्त्वाची असते.

लोक अनेकदा विचारतात,
“युक्ताहारचं वेगळेपण नेमकं काय आहे?”

ह्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या उत्पादनात नाही.
आमच्याकडे तीनशेहून अधिक उत्पादने आहेत.
उद्या ती पाचशेही होतील.

पण युक्ताहारचं वेगळेपण उत्पादनांच्या संख्येत नाही. ते संवादाच्या पद्धतीत आहे.

आमच्यासाठी बिल हा केवळ हिशेब नसतो. तो दोन माणसांना जोडणारा कागद असतो.

फोन हा केवळ ऑर्डर घेण्याचं साधन नसतो. तो चौकशी करण्याचा, समजावून सांगण्याचा, कधी दिलगिरी व्यक्त करण्याचा, तर कधी आनंद वाटून घेण्याचा मार्ग असतो.

डिलिव्हरी ही केवळ माल पोहोचवण्याची प्रक्रिया नसते. ती विश्वास पोहोचवण्याची संधी असते.

कदाचित म्हणूनच आमच्या कार्यालयात “ग्राहक सेवा” हा शब्द फारसा वापरला जात नाही.

मनात मात्र एक वेगळाच शब्द असतो—संबंध.

ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की युक्ताहार ही एखादी सामाजिक संस्था आहे.

आम्ही व्यवसायच करतो.

शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यायचा असेल, कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा असेल, वाहतूक व्यवस्था उभी करायची असेल, तर आर्थिक शिस्त अपरिहार्य आहे.

सेवा आणि शिस्त ह्यांमध्ये विरोध नाही.

उलट, दीर्घकाळ सेवा करायची असेल तर शिस्त आवश्यकच असते.

म्हणूनच आम्ही नफा कमावण्याला विरोध करत नाही.

नफा तर हवाच, पण मार्केटमध्ये तो अवाजवी असतो आणि त्यामुळे शोषण होते, ते इथे टाळले जाते.

आज ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक ₹१०० पैकी सरासरी ₹ ७०-७५ थेट उत्पादकांकडे जातात.

प्रश्न नफ्याचा नाही.
प्रश्न एवढाच आहे की नफा मिळवताना आपण माणसं हरवतो की जोडतो?

काही मित्र विचारतात,
“हे सगळं करण्यामागची प्रेरणा काय?”

ह्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही.

गेली अनेक वर्षे “मध्यस्थ दर्शन – सहअस्तित्ववाद” ह्या दर्शनाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्या अभ्यासातून एक साधी, पण जीवन बदलून टाकणारी जाणीव मनात खोलवर रुजली.

माणूस केवळ उपभोगाने सुखी होत नाही; तो संबंधांमध्ये जगतो आणि दीर्घकाळ टिकणारं समाधानही त्यातूनच मिळतं.

अन्न शरीराला पोषण देतं. पण विश्वास, आत्मीयता आणि परस्परपूरकता मनाला पोषण देतात.

मग एक प्रश्न मनात आला.
जर कुटुंबात नात्यांवर जीवन उभं राहू शकतं, तर व्यवसायात का नाही?

त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पुस्तकात मिळालं नाही. म्हणून आम्ही प्रयोग सुरू केला.

युक्ताहार म्हणजे त्या प्रयोगाचं नाव.

पाच वर्षापूर्वी सुरू झालेल्या ह्या प्रवासात आज सुमारे १०० उत्पादक, ६०० उपभोक्ता कुटुंबे आणि ६ सहकारी सहभागी आहेत. आकडे महत्त्वाचे म्हणून नाही, तर एक विचार प्रत्यक्ष व्यवहारात जगता येतो,याची ते एक छोटीशी साक्ष देतात.

हा प्रयोग अजून पूर्ण झालेला नाही.
आजही चुका होतात.
नवीन प्रश्न उभे राहतात.
कधी व्यवस्था कमी पडते.
कधी आमची समजही कमी पडते.

हे ही जाणवतं, की व्यावहारिक जगात, माणुसकीची /भावनांची अपेक्षा तर आहे, पण अजूनही वस्तू किंवा पैसा जास्त महत्त्वाचा आहे. पण प्रत्येक दिवसाच्या शेवटी एक समाधान असतं.

आज काही किलो भाजी विकली म्हणून नाही. तर आज पुन्हा एक व्यवहार थोडासा अधिक मानवी झाला म्हणून. 

कदाचित भविष्यात अशा प्रयोगांची अनेक रूपं दिसतील.
कदाचित ती युक्ताहारपेक्षा अधिक चांगली असतील.
तसं व्हावं, अशीच इच्छा आहे.

कारण शेवटी प्रश्न एका संस्थेचा नाही.

प्रश्न एवढाच आहे — अन्नाच्या निमित्ताने पुन्हा माणसं जोडता येतील का?

गेली पाच वर्षे आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहोत.

आम्हाला वाटतं — शोध अजून सुरू आहे.

संदर्भ / तळटीप : 

  1. लेखक मध्यस्थ दर्शन – सह अस्तित्ववाद (प्रणेता: श्री ए नागराज- १९२०-२०१६)  ह्या दर्शनाचे अभ्यासक असून, “युक्ताहार” हा प्रयोग  ह्यातील काही सूत्रांना जगण्यात उतरवण्याच्या दृष्टीने सुरू केलेला  एक प्रयत्न आहे. 
  2. मागील “आजचा सुधारक” मध्ये अन्नसुरक्षा, अन्नस्वराज्य आणि तुटलेली नाती ह्या विषयावर डॉक्टर अनुराधा भोसले दिवाण ह्यांचा लेख आला होता. त्यात त्यांनी निष्कर्षामध्ये  लिहिलेय “अन्नव्यवस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची रचना नसून सामाजिक संबंधांचीही रचना असते.युक्ताहार ह्याचे एक जिवंत उदाहरण आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *