शाश्वत विकासाकरिता आवश्यक मूलभूत परिवर्तनांच्या शोधकार्यातील एक यशस्वी पथदर्शी प्रयोग

साकारकर युक्ताहार पायलट प्रोजेक्ट (SYPP)
शुद्ध आहारासाठी केला जात असलेला एक व्यावहारिक आणि सफल प्रयोग 

साधारण १९६०च्या दशकात लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान लोकप्रिय झालेले “रोटी, कपडा और मकान”, हे घोषवाक्य म्हणजे स्वतंत्र भारताच्या कृषिप्रधान देशाने संपूर्ण भारतवासीयांना समृद्धतेकडे घेऊन जाण्याची कळकळ दर्शवणारी घोषणाच म्हणता येईल. आज ह्याला साधारणतः पासष्ट (६५) वर्षे उलटून गेली; तरी स्वतंत्र भारताच्या बहुतांश सर्वच नागरिकांना त्यांना अपेक्षित शुद्ध “रोटी” (अन्नधान्य) मिळण्याचे स्वातंत्र्य नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही; परंतु ते तोकडे पडले असेच म्हणता येईल. त्यामुळे शुद्ध अन्नधान्य मिळवण्याच्या बाबतीत आपण आजही परतंत्र आहोत, असे नाईलाजाने म्हणावे लागते.

शाश्वत विकासाकरिता आवश्यक मूलभूत परिवर्तनांच्या शोधाअंतर्गत ज्याचा सहज समावेश करता येईल, असे हे SYPP मॉडेल नेमके काय आहे?

आधारभूत किंमतीत, सेंद्रिय पद्धतीने एक अल्पभूधारक शेतीउत्पादक, पाच कुटुंबाच्या उपभोक्त्यांसाठी शेती करण्याची एक प्रतिकृती/एक मॉडेल नागपुरात यशस्वीरीत्या राबवित आहे. श्री.रमेश राजेराम साकारकर (आमचे कौटुंबिक शेतकरी), गाव भिल्ली, ता.धामणगाव रेल्वे. देशी बिजाचे जतन आणि संवर्धन करण्यात आजवरचे आपले आयुष्य खर्ची घातलेले साकारकर ह्यांनी नागपूरच्या आम्हां पाच ग्राहक कुटुंबांच्या ताटात शुद्ध अन्न देण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. आम्हा पाचही कुटुंबांना किराणामालासाठी कुठल्याही दुकानात आणि भाजीसाठी कुठल्याही मंडईत/भाजीबाजारात जावे लागत नाही.

कुठलाही उद्योग सुरू करताना सामान्यतः जो अभ्यास केला जातो, तसा अभ्यास हे मॉडेल सुरू करण्याच्या आरंभी करण्यात आला. जसे की, पाच कुटुंबांची विविध धान्यप्रकारांची वार्षिक मागणी घेण्यात आली, पाच कुटुंबांना आठवड्याला लागणऱ्या भाजीचे प्रमाण निश्चित करण्यात आले. त्या किमान आठवड्यातून एकदा घरपोच देण्यात याव्या, याचेही नियोजन करण्यात आले. शहरी कुटुंबांनी धान्यप्रकारची वार्षिक मागणी देणे सोपे आहे, पण शहरी गृहिणींची ही धान्ये वर्षभर सांभाळण्याची अडचण लक्षात घेऊन त्यांची साठवणूक उत्पादकाच्या ठिकाणीच  करायची असे ठरवले व आठवड्यातून एकदा भाजीसोबत ते घरपोच पोहचवायचे नियोजनही सोबतच केले गेले. त्यानुसार खरीप, अर्धरब्बी व रब्बी आणि उन्हाळी पिकाचे नियोजन उत्पादकाच्या भागात निश्चित झाले. वर्षभराच्या ह्या उत्पादनाचे आर्थिक अंदाजपत्रक ठरवण्यात आले. आर्थिक अंदाजापत्रातील रक्कम पाच कुटुंबांत समप्रमाणात विभागण्यात आली. नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी पाचही कुटुंबांनी घेतली, तर उपभेक्त्यांना शुद्ध अन्नधान्य पुरवण्याची जवाबदारी उत्पादक म्हणजेच साकारकर गुरुजींनी घेतली. पहिल्या वर्षात उपभोक्त्या परिवारांची साधारण ५० ते ६० टक्के शुद्ध अन्नाची परिपूर्ती ह्या प्रयोगातून झाली. एका संपूर्ण वर्षाचे कालचक्र पूर्ण झाल्यावर ह्या दोनही स्तरावरील (उपभोक्ता आणि उत्पादक) नियोजनात अधिक सूक्ष्मता आणि सुसूत्रता अनुभवास आली व आहारातील शुद्धतेच्या प्रमाणात आणि भाज्यांच्या प्रकारात दुसऱ्या वर्षी निश्चित वाढ झाली. आजवर चार वर्षे पूर्ण झाली असून, पाचव्या वर्षीची सुरुवात आहे. आमच्या ताटात आज ९५ टक्क्यांचे वर शुद्ध अन्न येते.

वरील प्रयोगासंबंधी वाचतांना किंवा वाचल्यावर ह्याचे आर्थिक गणित नेमके कसे जोडल्या गेले आणि त्यात काय अडचणी आल्या? त्यात बदल होत गेला का? असे प्रश्न वाचकांच्या मनात नक्कीच येत असेल. ह्याचा स्पष्ट खुलासा केला तर प्रयोगाविषयीच्या लिखाणात पारदर्शकता राहील आणि हे प्रारूप अधिक लोकप्रिय होऊ शकेल. ह्या प्रयोगाच्या पहिल्या वर्षी प्रत्येक परिवाराने रुपये ५००० मासिक योगदान दिले. कारण तो त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रयोग होता. त्यावर्षी आम्हांला ५० ते ६० टक्के शुद्ध स्वरुपात अन्न मिळाले, ह्याचा उल्लेख वर आलेलाच आहे. ज्या गाडीत आपण बसलो आहोत ती अपेक्षित वेग घेणार हे पाचही कुटुंबांतील सदस्यांना दरम्यान जाणवत होते. दरवर्षी एप्रिल महिन्यात एकत्रित बैठक होत गेली. आमच्या कौटुंबिक शेतकऱ्याला आमच्या आवडीनिवडीची माहिती समजत गेली. त्या अनुषंगाने त्याने अचूक नियोजन करून आमची बाजारात न्यायची पिशवी हळूहळू खूपच हलकी करून टाकली. आमच्या प्रत्येक कुटुंबात तीन ते चार सदस्य आहेत. आमच्या कौटुंबिक शेतकऱ्यामार्फत त्या सर्वांचा ९५ टक्केपर्यंतचा आहार शुद्ध आहे. भाजी; ज्यात दर आठवड्यात पालेभाज्या – दोन ते तीन प्रकार, फळभाज्या – दोन ते तीन प्रकार, हिरवा मसाला – पाच ते सहा प्रकार, रानभाज्या – एक ते दोन प्रकार आणि किराणामालासोबतच (अशी एकूण ६० वस्तूंची यादी आहे) काही प्रक्रिया केलेल्या वस्तुंचाही समावेश आहे. आता आम्हांला दर आठवड्यात ऋतुनुसार विषमुक्त फळेही मिळतात. शुद्ध पनीर आणि गाईचे तुप ह्यांचाही समावेश आमच्या घरी येणाऱ्या सामानाच्या यादीत तिसऱ्या वर्षीपासून सुरू झाला. आम्ही प्रत्येक परिवार आमच्या मासिक भाजी आणि किराण्याच्या मागणीसाठी चौथ्या वर्षीपासून रुपये १०,००० मासिक योगदान देत आहोत. आम्हां पाच कुटुंबांच्या म्हणजेच उपभोक्त्यांच्या अंगाने विचार केल्यास, पहिल्या वर्षीच्या मानाने आज चौथ्या/पाचव्या वर्षी देय रकमेत दुप्पट वाढ झाली पण मिळत असलेल्या वस्तुंमधेही तेवढीच वाढ झाली. मागील चार वर्षात महागाईचा नैसर्गिक वाढता घाऊक दर आणि आम्हांला मिळत असलेले उत्पादन ह्याचा विचार करता आमच्यासाठी झालेली दरवाढ नगण्य प्रमाणात आहे, असेच म्हणता येईल. पुढेपुढे असेही होण्याची शक्यता आहे की आम्हांला मिळत असलेली ही सगळी सेंद्रिय उत्पादने बाजारभावापेक्षाही कमी दरात आम्हांला मिळतील. म्हणजेच जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईने महिलांचे आर्थिक बजेट बिघडले, ह्या बातम्या आमच्यासाठी लागू होणारच नाहीत. तसेही मागील ‘तीन वर्षांपासून कांद्याने रडवले’, ‘ऐन सणांच्या दिवसांत भाज्यांचे आणि फुलांचे भाव कडाडले’, ‘भेसळयुक्त पनीर सर्रास विक्रीला’ ह्या बातम्यांचा आमच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. असाच, आर्थिक स्तरावर उत्पादक म्हणजे कौटुंबिक शेतकऱ्याच्या अंगाने विचार केल्यास, कुणाही अल्पभूधारकाला रुपये ५०,००० मासिक उत्पन्न मिळत असल्याचे ऐकिवात नाही. बीज पेरण्याच्या आधीच माल विकला गेला आहे, ही स्थिती अजूनपर्यंत माझ्या माहितीत नाही. शिवाय नोकरी करण्याची वयोमर्यादा ओलांडली तरीही मला दरमहा एक तारखेला पगार मिळतो, असे आमच्या कौटुंबिक शेतकऱ्याचे प्रामाणिक म्हणणे आहे.

ह्यासोबतच परस्परसंबंधामध्ये इतकी जवळीक निर्माण होईल ह्याचा सुरुवातीला अंदाज बांधलाच नव्हता. उत्पादक आणि उपभोक्ते ह्यांच्यात एक अनोखा कौटुंबिक सलोखा निर्माण झाला आणि वर उल्लेख केलेली आर्थिक गणिते खुजी वाटायला लागली. “सबसे बडा रुपैया” म्हणणाऱ्या ह्या जगात भावनेवर आधारीत व्यवसाय/मॉडेल चालू शकते ह्याचा प्रत्यय आला. उत्पादकही संतुष्टीसोबत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे हे मॉडेल नागपुरात तरी अनोखे असेल, असा दावा अतिशयोक्क्तीचा वाटू नये. विकेंद्रित पद्धतीने उत्पादक आणि उपभोक्ते ह्यात सरळ धागा ओवून मूळ उद्देश पूर्ण करणारे आणि शाश्वत्तेकडे जाणारे असे हे प्रारूप आहे. अनेकांनी ह्या प्रारुपाचे अनुसरण केल्यास अन्नाच्या बाबतीत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ, ह्यात शंका नाही.

ह्या प्रारुपामध्ये वर्षोनुवर्षे न सुटलेल्या अनेक कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांची उत्तरेसुद्धा दडलेली आहेत, हे सुज्ञांना लक्षात यावयास अडचण नसावी. ह्या पद्धतीचा स्वीकार करू इच्छिणारे उपभोक्ते आणि उत्पादक ह्यांना सर्वतोपरी मदद करण्याची तयारी सद्यस्थितीत चालू प्रारुपाच्या सर्व सदस्यांनी दर्शवली आहे. अश्या रीतीनेदेखील सामाजिक बांधिलकी जपण्याचा सर्वच सदस्यांचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे, SYPP ह्या शुद्ध आहार शृंखलेला एक वर्षापूर्वी एक नवीन कडी पण जुळली आहे. एक नवीन शेतकरी श्री.रमेश साकारकर ह्यांच्या मार्गदर्शनात असा वैविध्यपूर्ण seasonal & regional शुद्ध आहार (भाजी आणि किराणा सामान) पुरवण्यास तयार होत आहे. त्याच्यासोबत आज दोन सजग ग्राहक कुटुंबे जुळली आहेत. शुद्ध आहारासंबंधी शाश्वत समजल्या जाणाऱ्या प्रयोगाची माहिती देणे आणि सोबतच छांदोग्य उपनिषदात आहारशुद्धौ सत्त्वशुद्धि:, सत्त्वशुद्धौ  ध्रुवा स्मृति:, स्मृतिलम्भे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षा: ह्या सांगितलेल्या श्रुतिवचनासाठी जनजागृती करणे, हासुद्धा लेखनप्रपंच करण्याचा उद्देश आहे. विकासाची भकास अवस्था आपणच केली आहे आणि त्याला शाश्वत दिशेला परिवर्तीत करण्याची ताकदपण आपल्यातच आहे. हाच ह्या अनोख्या प्रयोगाचा निष्कर्ष ठरावा असे आम्हां सर्वांचे मत आहे.

अधिक माहिती हवी असल्यास संपर्क : 9850296082, 9422103769, 9423678901



तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *