विचारपूर्वक विनाशाकडे घेऊन जाणारी (औपहासिक) मार्गदर्शक हस्तपुस्तिका
सर्वसामान्य नागरिकांना संवेदनशील करण्याच्या उद्देशाने…
“खरा प्रश्न, यंत्रे विचार करूशकतात का, हा नसून, माणसे विचार करूशकतात का, हा आहे!”
— बी एफ स्किनर
“ब्रिटिश माणूस, एकटा असला तरीही, एकाच माणसाच्या शिस्तबद्ध रांगेत लागतो/उभा राहतो.”
— जॉर्ज मिकेश, हाऊ टू बी ॲन एलियन
“आधुनिक माणूस, खिशात पैसे नसले तरीही, मॉलमध्ये शिस्तबद्ध रांगेत उभा राहतो.”
— लेखक, हतबलतेच्या एका क्षणी
प्रकरण पहिले : आपली पृथ्वी आपणच कशी गिळंकृत करतो आहोत ते आपल्याला ह्यात दिसेल.
अतिशय मोठ्या प्रमाणावर केलेल्या मानवी मूर्खपणाला एकप्रकारचे महात्म्य प्राप्त होते; गरज नसतानाही एखादी वस्तू खरेदी करणाऱ्या एखाद्या व्यक्तिला आपण निष्काळजी म्हणू शकतो. पण जेव्हा आठ अब्ज लोक एकसमयावच्छेदेकरून असे करतात तेव्हा त्याला संस्कृती म्हटले जाते.
१९७० मध्ये मानवजातीने पृथ्वीतून जवळपास २७०० कोटी मेट्रिक टन खनिजे, धातू, खनिज तेल, जैविक/सेंद्रिय पदार्थ खणून काढले. २०२४ पर्यंत, कौतुकाने आपण जिला अर्थव्यवस्था म्हणतो, तिला पोसण्यासाठी लागणार्या ह्या मालाच्या वजनाचा आकडा फुगून १०४०० कोटी टनांच्या वर गेला. हा मुद्राराक्षसाचा विनोद आहे असे कृपया समजू नका, ही सत्यापित केलेली आकडेवारी आहे. एका आयुष्यभराच्या काळात आपण पृथ्वीची आतडी कुरतडण्याचा वेग चौपट केला आहे. पृथ्वीवरील सर्वसामान्य व्यक्ती सध्या दरवर्षी सरासरी १३.२ टन, म्हणजे जवळजवळ दोन महाकाय हत्तींच्या वजनाइतक्या कच्च्यामालाचा फडशा पाडते. दरवर्षी . . . प्रत्येक व्यक्ती . . ! आता तर हत्तीही नामशेष होत आहेत म्हणा, पण त्याविषयी नंतर कधीतरी.
ह्या १०४०० कोटी टनांपैकी जवळपास ५० टक्के माल, उदा. माती, वाळू, गिट्टी, चुनखडी (विटा, सीमेंट) आणि इतर काही खनिजे, ह्यांचा वापर, घरे, कार्यालये, शॉपिंग मॉल्स आणि अधिकाधिक अशी मोठी गोदामे बांधण्यासाठी केला जातो, जिथून आपण अनेक अनावश्यक वस्तू आपापल्या अश्या घरांत मागवतो जिथे बहुतांश वेळा आपण नसतोच, कारण आपण तर असतो शॉपिंग मॉल्समध्ये! उरलेला ५० टक्के माल, जीवाश्म इंधने साधारण १५ टक्के, धातू १० टक्के, आणि उरलेला २५टक्के – अन्न, वस्त्र, आणि इंधन, ह्यांसाठी घेतली जाणारी पिके, वनस्पती, झाडे, इ.जैविक भारामध्ये विभागला जातो.
तर, वापरून झाल्यावर ह्या सगळ्या मालाचं काय होतं? सर्कल इकोनॉमी फाऊंडेशनच्या मते ह्यांपैकी फक्त ८.६ टक्के मालाचा पुनर्वापर केला जातो. २५ टक्के माल परत पर्यावरणात लोटला जातो. १५ टक्के हरितगृह वायुच्या (Greenhouse Gas) स्वरुपात वातावरणात मिसळतो, आणि उरलेल्याचे वर्गीकरण आपण ‘कचरा’ असे करतो! हा ‘कचरा’, आपण आधी खणून काढलेल्या मालावर खर्चिक प्रक्रिया करून, त्यापासून मेहनतीने वस्तू घडवून, त्या अल्प वापरून अथवा न वापरताच टाकून दिल्याने तयार होतो, जो नंतर जमिनीत गाडून टाकला जातो.
एखादे परग्रहवासी जर आपल्याला अंतराळातून बघत असतील तर, एका खड्ड्यातून घाण उकरून, तिचे अत्यल्पकाळ पूजन करून ती दुसर्या खड्ड्यात भरणे, हाच आपला एकमेव धंदा आहे, असा निष्कर्ष काढतील.
प्रकरण दुसरे : स्मार्टफोन– एक प्रेमकहाणी . . . बासष्ट मूलद्रव्यांची!
आता आपल्या अत्याधुनिक स्मार्टफोनविषयी थोडा विचार करूया. हे एक असे अद्भुत यंत्र आहे ज्यात ११८ ज्ञात मूलद्रव्यांच्या आवर्तन सारणीपैकी ६२, म्हणजे अर्ध्याहून जास्त मूलद्रव्ये, चाॅकलेटच्या वडीहूनही पातळ चपट्या डबीत कोंबून भरलेली असतात.
ह्यात घानाच्या खाणींतून आणलेले सोने, कॉन्गोच्या प्रजासत्ताकातून आणलेले कोबाल्ट (बहुधा बालकामगारांकडून अमानुषपणे काढण्यात आलेले, ‘हो, कारण भावनेच्या आहारी जाऊन प्रगतीची गती मंदावायला नको, नाही का?’), लिथियम चिलीच्या मिठाच्या मैदानांतून, टॅंटॅलम मध्यआफ्रिकेतून, आणि इतर दुर्मिळ मूलद्रव्ये मंगोलियातील प्रदूषित, विशाल चांद्रीय भूप्रदेशातून आणून वापरली जातात.
एका फोनमध्ये वापरण्यात येणारी मूलद्रव्ये मिळविण्यासाठी खाणीतील जवळपास १० ते १२ किलो खडक खणून काढावे लागतात, म्हणजे एखाद्या लहान बाळाच्या वजनाइतके…. ह्या खडकांना कशासाठी विस्थापित करायचे, तर आपल्याला जास्त चांगले सेल्फी काढता यावेत म्हणून!
स्मार्टफोनच्या उत्पादन प्रक्रियेत सुमारे ५७ ते ८५ किलोग्रॅम CO२ चे उत्सर्जन होते. तुमच्या अधीर हाताच्या बोटांना त्याचा स्पर्श होण्यापूर्वीच ५७ ते ८५ टक्के उत्सर्जनाचा पल्ला पार झालेला असतो. ॲप्पल कंपनीच्या स्वतःच्याच आकडेवारीनुसार, आयफोन १३, त्याच्या आयुष्यभरात, जवळपास ६४ किलोग्रॅम CO२ उत्सर्जित करतो. ८१ टक्के उत्पादनादरम्यान, १६ टक्के व्यापारादरम्यान, तर उरलेले टक्के वाहतूक आणि पुनर्वापरादरम्यान.
इ.स. २०२२ ह्या वर्षभरातच, जगातील सर्व स्मार्टफोन्सनी एकत्रितपणे १४.६ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड निर्माण केला. अनेक देशांच्या वार्षिक उत्सर्जनापेक्षाही हे जास्त आहे; आणि खिशात मावणार्या ह्या जादुई खेळण्याचे सरासरी आयुष्यमान किती? तर सर्वसाधारणपणे दोन ते तीन वर्षे फक्त… त्यानंतर आपण त्याला अपग्रेड करतो, आणि त्याहून उच्चश्रेणीचा असा फोन विकत घेतो, जो सर्वार्थाने आधीच्या फोनसारखाच असतो; फक्त नवीन फोनमधील कॅमेऱ्याच्या मेगापिक्सल्सच्या संख्येत थोडा फरक असतो, जो मानवी डोळ्यांना कळत नाही, आणि त्याच्या कव्हरला निळ्या रंगाची एखादी वेगळी छटा असते.
फोन्सच्या पुनर्वापराचे जागतिक प्रमाण केवळ १५ टक्के आहे. उरलेले फोन्स एकतर ड्राॅवर्समध्ये (खजिना लपवण्याची आपली अत्याधुनिक जागा) साठवले जातात, किंवा उकिरड्यावर फेकले जातात. ज्यातील, सोने, चांदी, तांबे, पॅलेडियम धातू, तसेच औषधीकोशांमध्ये नमूद इतर विषारी पदार्थांचा साठा इत्यादी तेथील मातीत आणि भूजलात जडधातूंचे विष कालवत राहतात.
कोणत्याही मेजवानीस (पार्टीसाठी) वेळेवर हजर होणे हे इंग्रज लोक अत्यंत असभ्यपणाचे मानतात, असे निरीक्षण एकदा जाॅर्ज मिकेशने नोंदवले होते. त्याचप्रमाणे आधुनिक ग्राहक, फोनचे नवीनतम मॉडेल सोबत असल्याशिवाय समारंभास जाणे असभ्यपणाचे समजतात, अगदी समारंभ झूमवर असला आणि फोन कोणालाच दिसणार नसला तरीही!
प्रकरण तिसरे : प्लास्टिकची पाण्याची बाटली…, एक स्मारक, अविश्वासाचे!
भविष्यातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ आपली संस्कृती समजून घेण्यासाठी ज्या वस्तुंचा अभ्यास करतील, त्यात प्लास्टिकची पाण्याची बाटली कदाचित सर्वांत बोलकी ठरेल. पेट्रोलियम-निर्मित ही वस्तू, रोमन साम्राज्याहूनही अधिक काळ टिकू शकते. तसेच, विकसित देशांमध्ये कोणत्याही नळातून जवळपास फुकट मिळणारा द्रव तिच्यात भरून, सीलबंद करून, ती जहाज आणि ट्रकने शेकडो किंवा हजारो किलोमीटर वाहून नेली जात असे व स्वयंपाकघरांतील नळांतून वाहणाऱ्या त्याच द्रवाच्या साधारणपणे २,००० पट किमतीला विकली जात असे.
नेहमीप्रमाणे, आकडे बरेच काही सांगतात. जगात दरवर्षी सुमारे ६०००० कोटी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. यांच्या उत्पादनासाठी एकट्या अमेरिकेत दरवर्षी १.७ कोटी पिंपांहून अधिक तेल लागते. एक लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी अंदाजे ५.६ ते १०.२ मेगाज्यूल ऊर्जा लागते…, तर नळातील पाण्यासाठी फक्त ०.००५ मेगाज्यूल. हा फरक १,००० ते २,००० पटींहून जास्त आहे. ह्या सगळ्या बाटल्या भरण्याच्या प्रक्रियेमुळे वातावरणात दरवर्षी २५ लाख टन CO₂ सोडला जातो. आणि सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ही प्लास्टिकची बाटली तयार करण्यासाठी त्यात मावणाऱ्या पाण्यापेक्षा सुमारे तिप्पट तरी पाणी लागते.
दरवर्षी ६०००० कोटी बाटल्या याचा अर्थ…, आपण फक्त बाटल्यांमध्ये पाणी भरण्यासाठी दरवर्षी सुमारे ३,२०,००० कोटी लिटर पाणी वाया घालवतो. काही अंदाजांनुसार, हे पाणी वाचवल्यास ज्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोयच उपलब्ध नाही, अशा दोनशे कोटी लोकांना आपण प्रत्येकी सुमारे ४.४ लिटर स्वच्छ पाणी दररोज पुरवू शकतो.
हे करण्याऐवजी, आपण ते पाणी वापरून ४५० वर्षे उकिरड्यात पडून राहून हळूहळू सूक्ष्म-प्लास्टिक कणांमध्ये विघटित होणाऱ्या बाटल्या तयार करतो, ज्यांचे कण नंतर नळांतील पाण्यातून आपल्याच पोटात जातील…! असे हे विसंगतीचे एक इतके परिपूर्ण चक्र की ते फ्रेम करून नक्कीच एखाद्या कलादालनात लावता येईल!
बाटलीबंद पाण्यातील सूक्ष्म-प्लास्टिकचे प्रमाण नळाच्या पाण्यातील प्रमाणापेक्षा सुमारे सात पट जास्त असते असे निरीक्षण आहे. आपला नळाच्या पाण्यावर विश्वास नाही म्हणून ज्या उत्पादनावर विश्वास ठेवून आपण ते विकत घेतो, त्यातच आपण टाळू पाहत असलेल्या प्रदूषकांचे प्रमाण अधिक असते. यदाकदाचित् विरोधाभास हे जर नूतनीकरणीय संसाधन असते, तर आपली ऊर्जा समस्या कधीच सुटली असती!
प्रकरण चौथे : फास्ट फॅशन… नव्याचे नऊ दिवस!
कोणें एकेकाळी नव्हें, तर अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत, कपडे चैनीच्या वस्तूंत गणले जात असत. ते अत्यंत काळजीपूर्वक शिवले जात, वारंवार दुरुस्त केले जात; परंपरागत किंवा एकमेकांचे वापरले जात. चांगला कोट शिवणे हे मोठे गंभीर प्रकरण असे. लग्नच जणू! पण, लग्नाहूनही जास्त टिकाऊ!
आणि आजकाल…? कपडे फेकण्यापूर्वी सरासरी फक्त नऊ वेळा वापरलेले असतात. ह्या सरासरीत ३५ टक्क्यांहून अधिक घट गेल्या केवळ पंधरा वर्षांत झालेली आहे. सध्या आपण कपड्यांना ठेवणीतल्या, टिकाऊ वस्तुऐवजी मानवी देहासाठीच्या तात्पुरत्या वेष्टणात रूपांतरित केले आहे.
जागतिक स्तरावर ८ ते १० टक्के कार्बन उत्सर्जन हे फॅशन उद्योगामुळे होते; आंतरराष्ट्रीय हवाई आणि सागरी वाहतूक ह्यांच्या एकत्रित परिणामापेक्षाही जास्त. हा उद्योग दरवर्षी सुमारे १२० कोटी टन हरितगृह वायू (greenhouse gases) निर्माण करतो. ह्यासाठी दरवर्षी ९३०० कोटी घनमीटर पाणी वापरले जाते…. पन्नास लाख लोकांची वर्षभराची पाण्याची गरज भागवू शकेल इतके पाणी… ह्यातून दरवर्षी ९.२ कोटी टन कापडीकचरा निर्माण होतो, ज्यांपैकी ८५ टक्के उकिरड्यांत फेकला जातो. फक्त कापडरंगाई प्रक्रियेत १७ लाख टन रसायने वापरली जातात, ज्यांपैकी बहुतांश आरोग्यास अपायकारक असतात. पृथ्वीवरील पाण्याच्या प्रदूषणाचे, शेती खालोखाल, दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारण कापडरंगाई हे आहे.
कृत्रिम धाग्यापासून बनलेले कपडे धुताना प्रत्येक वेळी त्यातून सूक्ष्म प्लास्टिक तंतू बाहेर पडत असतात. ह्यामुळे दरवर्षी एकत्रितपणे सुमारे ५ लाख टन सूक्ष्म-तंतू महासागरांतील पाण्यात मिसळतात, ज्यांचे आकारमान सुमारे ५००० कोटी प्लास्टिक बाटल्यांएवढे आहे. हे अतिसूक्ष्म तंतू, आर्क्टिकच्या बर्फात, मरियानाच्या खंदकांत, माशांच्या पोटात, तसेच मानवी रक्तात आढळले आहेत. आपण जणू आपलेच कपडे लेऊन अन्नसाखळीत शिरण्यास सज्ज आहोत!
फास्ट फॅशन प्रारूप कसे काम करते?- शीन (Shein) सारखी कंपनी कपडे डिझाइन करून, उत्पादित करून (बेतून व शिवून), दहा दिवसांत रवानाही करते. एका हंगामात (Season) असे अनेक ट्रेंड्स तयार केले, विकले, सोशल मीडियासाठी छायाचित्रित केले जाऊ शकतात; आणि हे कपडे एकदा घालून, हे प्रकरण वाचण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्यात फेकूनही दिले जाऊ शकतात. पृथ्वीवरील सर्वांत शुष्क ठिकाणांपैकी एक, चिलीच्या अटाकामा वाळवंटात, युरोप आणि उत्तर अमेरिकेतून आणून टाकल्या गेलेल्या कपड्यांचे डोंगर आता अंतराळातूनही दिसू लागले आहेत. हे पुन्हा एकदा नीट समजून घ्या: आपले जुने टी-शर्ट्स आता आपण अंतराळातूनही बघू शकतो.
अटाकामा हे जगातील एक प्रमुख खगोल (अवकाश) निरीक्षण केंद्रही आहे. म्हणजे एके ठिकाणी एक अत्यंत महागडी दुर्बीण विश्वातील बुद्धिमान जीवांचे संकेत शोधत बसली आहे आणि तिच्या अगदी शेजारीच मागच्या हंगामातील क्रॉप टॉप्सचा डोंगर पडलेला आहे. आपल्या आजच्या संस्कृतीचे ह्यापेक्षा बोलके चित्र दुसरे कोणते असू शकते?
प्रकरण पाचवे : उष्टी मेजवानी …. अर्ध्या ताटावरून उठलेली!
इ.स. २०२२ मध्ये जगाने जवळपास १०५ कोटी टन अन्नाची नासाडी केली. म्हणजे, प्रति व्यक्ती जवळपास १३२ किलोग्रॅम किंवा ग्राहकांना उपलब्ध असलेल्या एकूण अन्नाच्या सुमारे एक-पंचमांश भागाची. UNEP च्या अंदाजानुसार, सर्व खंडांतील कुटुंबांनी मिळून दररोज १०० कोटीहून अधिक जेवणे वाया घालवली, त्याचवेळी ७८.३ कोटी लोक भुकेले,अर्धपोटी होते. हे पुन्हा एकदा वाचा: दररोज १०० कोटी जेवणे वाया गेली, आणि त्याचवेळी जवळजवळ ८० कोटी लोक उपाशी राहिले.
हरितगृह वायुंच्या (Green house gases) जागतिक उत्सर्जनापैकी ८ ते १० टक्के उत्सर्जनाला अन्नाचा असा अपव्यय कारणीभूत आहे, संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्राच्या उत्सर्जनापेक्षा सुमारे दुप्पट… दरवर्षी शेतात पिकवलेल्या पण खाल्ल्या न गेल्यामुळे वाया जाणार्या अन्नासाठी १.४ अब्ज हेक्टर शेतजमीन (म्हणजे जगातील एकूण शेतीयोग्य क्षेत्राच्या २८ टक्के), आणि रशियाच्या व्होल्गा नदीच्या वार्षिक प्रवाहाएवढे पाणी वापरले जाते. त्यातून दरवर्षी ३३० कोटी टन CO₂ निर्माण होतो. जागतिक अर्थव्यवस्थेला ह्या अपव्ययामुळे दरवर्षी सुमारे ९४०० कोटी डॉलरचा फटका बसतो. अशा विनाकारण नष्ट होणाऱ्या किंवा वाया जाणाऱ्या अन्नाच्या उत्पादनासाठी जागतिक अन्नप्रणालीतील एकूण ऊर्जा वापराच्या सुमारे ३८ टक्के ऊर्जा वापरली जाते
आपण जर ह्या अन्नाच्या अपव्ययाचा आवाका एक देशाच्या स्वरूपात कल्पिला, तर तो देश चीनच्या आणि अमेरिकेच्या खालोखाल, हरितगृह वायुंचा तिसरा सर्वांत मोठा उत्सर्जक ठरेल. अर्थात तो जगातील सर्वांत हास्यास्पद व खुळचट देशही ठरेल; कारण, अन्न पिकवणे, दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे, फ्रिजमध्ये टिकवून ठेवणे, काचेच्या पेटीत आकर्षक मांडणी करून प्रदर्शित करणे इत्यादी सगळे करून झाल्यावर शेवटी उरलेले अन्न जमिनीत खड्डा करून त्यात फेकणे, (जिथे ते कुजून त्यातून मिथेन निर्माण होईल), असा रांधा वाढा अन् उष्टी काढा त्या देशाचा एककलमी कार्यक्रम असेल., . .
एकट्या भारतात दरवर्षी ७.८१ कोटी टन अन्न वाया जाते आणि अमेरिकेत २.४७ कोटी टन… दरम्यान, आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागांतील लोकांना, शेतातील पिकांना द्यायला पाणी आणण्यासाठी तासन्-तास पायी भटकावे लागते, जी पिके जागतिक तापमानवाढीमुळे हाती न लागण्याचीच शक्यता अधिक असते. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता नाही तर नैतिक दिवाळखोरी आहे; मात्र रुपडे बदलून तिचे वर्गीकरण पुरवठासाखळी समस्येच्या नावाखाली करण्यात येत आहे.
प्रकरण सहावे : एक फुटकळ यादी; . . खुळचट उत्पादनांची!
फोन, बाटल्या, कपडे, आणि अन्न ह्यांची चिकित्सा झाल्यावर, आता विवेकबुद्धी वापरून घेतल्या जाणार्या उपभोगाच्या जादुई दुनियेचा एक छोटा फेरफटका मारूया. इथे मानवी कुशाग्रता वापरण्याचा उत्साह नक्कीच कौतुकास्पद ठरला असता जर तो इतका घोर विनाशकारी नसता…
स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV)
ह्या गाडीचे (SUV) सरासरी वजन सुमारे २,००० किलोग्रॅम असते आणि तिचा वापर मुख्यतः ७० किलोग्रॅम वजनाचा एक माणूस, तीन किलोमीटर अंतरावरील दुकानातून एक किलोग्रॅम वजनाचे एक लिटर दूध आणण्यासाठी करतो. ह्या व्यवस्थेची ऊर्जा-कार्यक्षमता लक्षात घेता हे साधारणपणे एक चित्र भिंतीवर लावण्यासाठी क्रेन भाड्याने घेण्यासारखे आहे. गेल्या दहा वर्षांत जागतिक CO₂ उत्सर्जनातील वाढीचे SUV हे, ऊर्जा क्षेत्राखालोखाल, दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. सगळ्या SUV-चालकांचा मिळून जर एक देश बनविला, तर तो जगातील सहाव्या क्रमांकाचा कर्बद्विप्रणिल वायू उत्सर्जक देश होईल.
एकदाच वापरले जाणारे कॉफी पॉड
दरवर्षी सुमारे ५६० कोटी कॉफी पॉड्स तयार होतात. ते बहुधा प्लास्टिक किंवा अॅल्युमिनियमचे असतात, आणि बहुतेकांचा पुनर्वापर होत नाही. क्यूरिग K-कप चे जनक जॉन सिल्व्हन यांनी जाहीरपणे सांगितले आहे की त्यांना हा शोध लावल्याचा पश्चात्ताप होत आहे. ‘मी हे केले याचे कधी कधी मला वाईट वाटते,’ असे त्यांनी २०१५ साली ‘द अटलांटिक’ ला सांगितले. एका वर्षभरातच वापरून फेकलेले पॉड्स एकामागे एक रांगेत लावले तर ते पृथ्वीला दहाहून अधिक वेळा प्रदक्षिणा घालतील. चंद्रावर माणूस उतरवणाऱ्या आपल्या हुशार प्रजातीला भांड्यात कॉफी बनवणे मात्र फारच जास्त जिकिरीचे वाटत असावे असे दिसते.
ॲमेझॉनचे पार्सल
एकट्या अमेरिकेत जागतिक ई-कॉमर्स बाजारपेठ दरवर्षी सुमारे २१० कोटी पार्सल्स निर्माण करते. परंतु ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तुंपैकी बरीच पार्सले परत केली जातात…, काही प्रकारात तर जवळपास ३० टक्क्यांपर्यंत. यांपैकी बराच परतीचा माल पुन्हा विकायला ठेवला जात नाही, तर नष्ट केला जातो किंवा जमिनीत गाडला जातो…, कारण परत आलेली बुटांची जोडी, चांगली असली तरीही, पुनर्विक्रीसाठी बाजारात पुन्हा मांडून ठेवण्यापेक्षा जाळून नष्ट करणे परवडते. एकट्या अमेरिकेत २०२० मध्ये परत केल्या गेलेल्या वस्तूंमुळे अंदाजे १.६ कोटी टन CO₂ निर्माण झाला…, ज्याची बरोबरी एक वर्षभर रस्त्यावर ३५ लाख गाड्या चालवल्यावर होणाऱ्या उत्सर्जनाशीच होऊ शकते.
एकदा वापरून फेकण्याचा रेझर
एकट्या अमेरिकेत दरवर्षी सुमारे दोनशे कोटी एकदाच वापरण्याचे रेझर कचऱ्यात फेकले जातात. प्रत्येकात पोलाद, प्लास्टिक आणि रबर असते. तुमच्या आजोबांनी एकच सुरक्षा-रेझर अनेक दशके वापरला. तुम्ही मात्र सुमारे सहा दाढ्यांसाठी आता पाच पाती आणि एक मॉइश्चरायझिंग पट्टी असलेले प्लास्टिकचे हँडल वापरता आणि फेकून देता. ह्याचाच अर्थ, प्रगती म्हणजे रेझरला अधिकाधिक पाती जोडत राहणे, नाही का?
प्रकरण सातवे : डोके का चाले असे . . ? हे कोडे एक आहे!
ज्या प्रजातीने जनुकसंच उलगडला, अणू फोडला, आणि कृष्णविवराचे छायाचित्र काढले, तीच प्रजाती, पृथ्वी उकरून, आपल्याला गरज नसलेल्या वस्तू बनवून, त्या अल्पकाळ वापरून, पुन्हा कचरा म्हणून जमिनीत पुरण्याची वायफळ उरस्फोड का करत राहते, हाच खरा तर मध्यवर्ती प्रश्न आहे.
त्याची उत्तरे अनेक असू शकतात, पण त्यांपैकी एकही आपल्याला गौरवान्वित करणारे नाही.
उत्तर पहिले, अर्थशास्त्र.
आपली जागतिक अर्थव्यवस्था संततवाढीच्या गृहीतकावर रचली आहे. राष्ट्रे ज्या मापदंडावर आपले यश ठरवतात तो GDP…, सगळ्याच उत्पादनांना ‘चांगले उत्पादन’ म्हणूनच मोजतो. एखादा टिकाऊ बूट बनवणारा कारखाना आणि एखादा सहा महिन्यांतच मोडीत निघतील असे बूट बनवणारा कारखाना…, दोघेही GDP मध्ये समान योगदान देतात. खरेतर दुसरा अधिक देतो, कारण तुम्हाला बूट दोनदा घ्यावे लागतात. GDP साठी सुरक्षित प्रवासापेक्षा अपघात होणे जास्त चांगले आहे, कारण त्यामुळे वैद्यकीय बिले, टोइंगचे शुल्क आणि नवी गाडी विकत घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण होते. समुद्राचे पाणी शांत, स्वच्छ, राहण्यापेक्षा त्यात तेलगळती झाल्यास, त्याची साफसफाई करण्यासाठी लोकांना रोजगार मिळतो, ज्यामुळे GDP वाढतो. थोडक्यात, GDP आधारित अर्थव्यवस्था, संपत्ती आणि कचरा यांच्यात फरक करू शकत नाही. ती दोहोंनाही सारखेच महत्त्व देते, किंबहुना, बरेचदा कचर्यालाच झुकते माप देते.
दुसरे, जाहिरात…
जाहिरात हा एक ७५०० कोटी डॉलर्सचा जागतिक उद्योग आहे आणि तुमच्याकडे जे आहे ते अपुरे आहे, तुमच्याकडे जे नाही ते अत्यावश्यक आहे, असा तुमच्यात गंड निर्माण करणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे. अठरा महिन्यांपूर्वी विकत घेतलेला तुमचा स्मार्टफोन उत्तम चालत होता. नंतर एका कंपनीने लाखो डॉलर्स खर्च करून तुम्हाला हे पटवून दिले की, जुन्या फोनची स्क्रीन नव्या फोनपेक्षा २ इंचाने लहान असल्यामुळे आणि अँड्रोमेडा दीर्घिकेचा फोटो काढू शकेल (जो काढण्याचा तुमचा अजिबात विचार नाही) असा कॅमेरा फोनमध्ये नसल्यामुळे, तुमचा फोन आता कुचकामी झाला आहे.
तिसरे, प्रतिष्ठा…,
सामाजिक उतरंडीत आपले स्थान उच्च असल्याचे दाखवण्याची मानवाची गूढ पाशवी गरज; जसे निसर्गात, मोर शेपटी वाढवतो, तर सभ्य समाजातील माणूस एखादी पर्स अश्या किंमतीला विकत घेण्यास तयार असतो, जी ती पर्स शिवणाऱ्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाहूनही अधिक असते. मोराची शेपटी निदान जैव-विघटनशील तरी असते.
चौथे, आणि सर्वांत कावेबाज कारण…, सोयीस्कर असणे. एकदाच वापरून फेकून देण्याची बाटली अस्तित्वात आहे, कारण काचेचा ग्लास धुण्यास बारा सेकंद लागतात. फास्ट फॅशनचे कपडे अस्तित्वात आहेत कारण एक बटण शिवायला तीन मिनिटे लागतात. कॉफी पॉड अस्तित्वात आहे कारण पॉटमध्ये कॉफी उकळायला चार मिनिटे लागतात. कॉफी ९० सेकंद लवकर मिळण्यासाठी पृथ्वीचा बळी देणे ही किंमत तर अगदी रास्तच आहे, असे आपण ठरवून टाकले आहे.
पाचवे आणि शेवटचे…, आणि खरा वैतागवाडा हाच आहे…, आपल्या अतिउपभोगापायी आपण समस्या निर्माण करतो आणि मग त्या अधिकाधिक उपभोगातून सोडवू पाहतो. आपण जीवाश्म इंधन जाळतो, ज्यामुळे आपली पृथ्वी तापते, ती तापल्यामुळे आपल्याला एअर कंडिशनिंग करावे लागते, ज्यासाठी आणखी जीवाश्म इंधन लागते. आपण मच्छिमारी क्षेत्रांना संपवतो, त्यामुळे मासे कमी होतात, ते कमी झाल्याने त्यांची किंमत वाढते, त्यामुळे फॅक्टरी फार्मिंगला उत्तेजन मिळते, ज्यामुळे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे अधिक मासे मरतात. आपण इतका कचरा निर्माण करतो की त्यावर उपाय म्हणून गुंतागुंतीचा कचरा-व्यवस्थापन उद्योग उभारावा लागतो…, जो स्वतः आणखी कचरा निर्माण करतो. म्हणजे साप स्वतःचीच शेपटी गिळतोय, आणि ते बघण्यासाठी तिकीट लावून पैसे घेतोय.
प्रकरण आठवे : पृथ्वीच्या देयकाचा हिशेब चुकता करावाच लागणार . . !
क्षणभर थांबून आपण पृथ्वीच्या आपल्यावरील ऋणाचा एक ठोकताळा मांडून पाहू.
जागतिक उत्खनन १९७० मधील २७०० कोटी टनांवरून २०२४ मध्ये १०४०० कोटी टनांवर पोहोचले आहे आणि सध्याचा कल असाच राहिला तर २०६० पर्यंत ते १९००० कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. श्रीमंत देश गरीब देशांच्या सहापट अधिक वेगाने हे साहित्य वापरतात. जागतिक उत्खनन साहित्याची सुमारे ९० टक्के मागणी घरबांधणी, वाहतूक, अन्न, आणि ऊर्जा ह्या घटकांसाठी असते.
दरवर्षी सुमारे २५४० कोटी टन घन व द्रवरूप कचरा फेकला जातो. एकट्या नागरी घनकचऱ्याचे प्रमाण दरवर्षी २३० कोटी टन आहे, जे २०५० पर्यंत ३८० कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी सुमारे ४० कोटी टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. आजवर निर्माण झालेल्या एकूण प्लास्टिकपैकी फक्त ९ टक्क्यांची पुनर्निर्मिती झाली आहे.
फॅशन उद्योग दरवर्षी ९.२ कोटी टन कापडीकचरा आणि १२० कोटी टन हरितगृह वायू निर्माण करतो. अन्नाच्या अपव्ययामुळे १०५ कोटी टन कचरा आणि ३३० कोटी टन CO₂ निर्माण होतो. स्मार्टफोन्स १४.६ कोटी टन CO₂ निर्माण करतात. बाटलीबंद पाण्याचा उद्योग दरवर्षी १.७ कोटी पिंपे तेल पितो आणि ३२०००० कोटी लिटर पाणी वाया घालवतो.
जैवविविधता नाहीशी होत आहे. लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्सच्या अहवालानुसार १९७० नंतर देखरेखीखालील क्षेत्रातील वन्यजीव लोकसंख्येत ६९ टक्के घट झाली आहे. दहा लाख प्रजाती नष्टप्राय होण्याच्या स्थितीत आहेत. प्रवाळ बेटांचे रंग विटत चालले आहेत. जंगले जळत आहेत. हिमनग वितळत आहेत. एकेकाळी जगातील चौथे सर्वांत मोठे सरोवर असलेला अरल समुद्र, कापसाच्या शेतीसाठी जवळ-जवळ पूर्णपणे आटवला गेला आहे. अटाकामा वाळवंटात टाकल्या गेलेल्या कपड्यांचे ढिगारे आता अंतराळातूनही दिसू लागले आहेत.
आणि, हे सगळे घडत असताना, आपण मध्यरात्री नवीन फोनसाठी रांगेत लागतो. आठवड्याभरातच ज्या वस्तू आपण कदाचित परत करू, अश्या वस्तू आपल्याला आज, आत्ता, ताबडतोब, घरपोच हव्या असतात. विकत घेतलेल्या अन्नाचा पाचवा हिस्सा आपण कचऱ्यात फेकतो. स्व-नाश करून घेण्याच्या आपल्या क्षमतेत होत असलेला विकास खरोखरच रोमहर्षक आहे!
प्रकरण नववे : मार्ग . . . रुग्ण वाचवण्याचा!
पण एक चांगली बातमी अशी की आपल्याकडे उपायांची कमतरता नाही; आणि ही खरोखरच चांगली बातमी आहे; कारण पृथ्वीला निराशेची चैन परवडणारी नाही. आपल्या मूर्खपणामुळे होणारे नुकसान थांबवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच धोरणे कशी आखावीत आणि वर्तन कसे असायला हवे, ह्याचेही ज्ञान आहे. पण आपल्याकडे कमतरता आहे ती इच्छाशक्तीची!
ह्याच्या पुढील भागात जे उपाय किंवा बदल करण्यास सांगितले आहेत ते निव्वळ कल्पनाविश्व किंवा दिवास्वप्न नसून, दशकानुदशके आपल्या कानीकपाळी ओरडून सावध करणाऱ्या शेकडो धोरणकर्त्यांच्या, संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या कामावर आधारित असलेला व्यावहारिक मार्गदर्शक नकाशा आहे.
१. गुणफलक बदला..
पहिला आणि सर्वांत मूलभूत बदल म्हणजे प्रगती मोजताना केवळ GDP वर अवलंबून राहणे थांबवणे… बॉम्बचे उत्पादन आणि एखाद्या लशीचे उत्पादन GDP च्या एकाच तराजूत तोलले जाते. त्यामुळे खरी समृद्धी आणि निव्वळ उलाढाल ह्यातील फरक समजू शकतील अशा मापदंडांची आपल्याला गरज आहे. भूतानचा ‘राष्ट्रीय आनंदांक’, संयुक्त राष्ट्रांचा ‘मानव विकास निर्देशांक’ आणि केट रॉवर्थचे ‘डोनट इकॉनॉमिक्स’, हे सगळे पर्यावरणीय मर्यादा आणि सामाजिक पाया लक्षात घेणारे पर्याय देऊ करतात. त्यांचा आधार घेऊन सगळ्यांचे कल्याण साधणाऱ्या अशा उन्नतीचे ध्येय ठेवूया की जेथे आरोग्य, शिक्षण, माणसामाणसांमधील दुवा ह्यांचे आधिक्य असेल व पिळवणूक, अपव्यय, विषमता उणावतील. यालाच खऱ्या अर्थाने आपण ‘विकास’ म्हणूया.
२. उत्पादनांची दीर्घायुषी,पर्यावरणस्नेही चक्रीय रचना करावी:
वस्तुंच्या घडणीत कच्चा माल व ऊर्जेचा वापर निगुतीने होईल ह्याकडे लक्ष पुरविले जावे. तसेच त्या टिकाऊ, पुनर्वापरक्षम, दुरुस्त करण्याजोग्या आणि विघटनसुलभ होतील अशी त्यांची रचना केली जावी. जेणेकरून त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांचे भाग सुटे करून किंवा त्यांचे विघटन करून त्यातील साहित्य परत मिळवता यावे. युरोपियन युनियनचा ‘दुरुस्तीचा हक्क’ कायदा’ आणि ‘इको-डिझाइन नियम’ ही सुरुवातीची पावले आहेत. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्राची जबाबदारी घेण्यास बाध्य करणारे EPR म्हणजे ‘विस्तारित उत्पादक जबाबदारी’ कायदे एक योग्य प्रकारचे प्रोत्साहनच ठरेल. एक फोन दहा वर्षे टिकला पाहिजे, केवळ दोन वर्षे नाही. तसेच, वॉशिंग मशीनचा बिघाड एखादा भाग बदलून किंवा सुधारून दुरुस्त करता यायला हवा. ठराविक काळात ते संपूर्ण सीलबंद मशीन कालबाह्य ठरवले जाऊन टाकाऊ व्हायला नको.
३. आपल्या कमाईवर नव्हे, तर आपल्या खर्चावर कर आकारला जावा…,
थेट वापराच्या ठिकाणी लागू केलेला आणि कर्बउत्सर्जनाच्या वस्तुनिष्ठ सामाजिक किंमतीची खरी मोजदाद करणारा कार्बन कर लागू करण्याचे ठरवले तरच संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. एखादी वस्तू पृथ्वीला कितीत पडली ह्यावर त्या वस्तुची किंवा उत्पादनाची किंमत ठरेल.असे केल्याने टिकाऊ वस्तू टाकाऊ वस्तूंच्या तुलनेत स्वस्त होतील. ह्या करामार्फत गोळा झालेला महसूल, ज्यांची हा बदल किंवा कर सोसण्याची क्षमता सर्वांत कमी असेल, अशा नागरिकांना लाभांश म्हणून परत देता येईल, जेणेकरून अशा लोकांवरील भार थोडा कमी होऊ शकेल.
४. चक्रीय अर्थव्यवस्था उभारणे:
सध्याची अर्थव्यवस्था रेषीय आहे: उत्खनन, निर्मिती, वापर, विल्हेवाट. चक्रीय अर्थव्यवस्थेत मात्र हे वर्तूळ पूर्ण होते: टाकलेल्या वस्तुंमधून कच्चा माल परत मिळवणे, त्यांतून वस्तुंची पुनर्निर्मिती आणि त्यांचा पुनर्वापर. ह्या पुनर्वापरासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक, नवीन व्यावसायिक प्रारूपे (मालकीऐवजी भाडेपट्टी, खरेदी करण्याच्या ऐवजी वाटून घेणे), आणि मालकीऐवजी एकमेकांची गरज भागवण्याचे सांस्कृतिक वळण इत्यादींची गरज असते. तुम्हाला ड्रिलमशीन हवी असते तेव्हा तुमची खरी गरज ड्रिलमशीन नसते… तुम्हाला छिद्र करून हवे असते. (ते झाल्यावर तुमच्यासाठी ड्रिलमशीन निरुपयोगी होते) साधन-भाडे अर्थव्यवस्था ही एक ‘छिद्र-वितरण (किंवा ड्रिल वितरण) सेवा’ आहे, जी पैसे आणि कच्चा माल दोन्हीं वाचवते.
५. आवश्यक तेथे विद्युतीकरण व शक्य तेथे डिकार्बनायझेशन:
ऊर्जा संक्रमण प्रक्रिया वास्तवात घडते आहे आणि तिचा वेगही वाढतो आहे. आज जगातील बहुतेक भागांत सौर आणि पवन ऊर्जा विजेचा सर्वांत स्वस्त स्रोत आहेत. विद्युत वाहने, औष्णिक पंप, आणि हरित हायड्रोजन ह्यामुळे बांधकाम, वाहतूक आणि अवजड उद्योगांचे डिकार्बनाइझेशन होऊ शकते. परंतु, आता त्याची गती वाढवण्याची गरज आहे. कारण एक एक वर्षाच्या विलंबने त्यात अब्जावधी टन CO₂ उत्सर्जनाची भर पडते आणि तो CO₂ एका दशकात कालबाह्य होतील अश्या पायाभूत सुविधांत बद्ध होतो.
६. पृथ्वीला खाऊ नका . . , जगाला खाऊ घाला:
अन्नाचा अपव्यय SDG (Sustainable Development Goal) च्या १२.३ ह्या लक्ष्याच्या फक्त निम्म्याने कमी केला तरीही, १६५ कोटी टन अन्न वाचेल, हरितगृह वायू उत्सर्जन अनेक गिगा-टनांनी कमी होईल आणि पुनर्वनीकरणासाठी लाखो हेक्टर शेतजमीन मोकळी होऊ शकेल. ह्यासाठी विकसनशील देशांत चांगल्या शीतगृह-साखळ्या निर्माण होणे, किरकोळ विक्रेत्यांकडे नेटके साठा-व्यवस्थापन असणे, उपहारगृहात खाद्यपदार्थांचे, ग्राहकांद्वारे टाकून दिले जाणार नाहीत असे, नेमके वाटे उपलब्ध असणे गरजेचे आहे आणि ह्याबरोबरच ‘use by/expiry’ तारखां बाबत मूलभूत पुनर्विचार केला जाणे देखील आवश्यक आहे…, कारण ह्या तारखांमुळे (उलटून गेल्यास) उत्तम स्थितीतील अन्नाची देखील सक्तीने विल्हेवाट लावावी लागते. .
७. ‘पर्याप्तता’ पुन्हा स्वीकारा:
‘अधिक म्हणजे नेहमीच अधिक चांगले’ ह्यासारख्या भ्रामक कल्पनांमुळे हा बदल सर्वांत कठीण आहे. ‘अधिकस्य अधिकं फलम्’, अश्या कथनकांनाच येथे आव्हान द्यावे लागते. ह्याबाबतीतलल्या संशोधनात अगदी स्पष्टपणे दिसते की: भौतिक सुखोपभोगाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर अधिक उपभोगाने आनंद वाढत नाही. डेन्मार्कचे लोक अमेरिकनांपेक्षा अधिक उपभोग घेतात म्हणून अधिक आनंदी आहेत असे नाही; तर, त्यांच्याकडे मजबूत सामाजिक स्थैर्यसुरक्षा-व्यवस्था आहेत, त्यांचा कामाच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा वेळ कमी असल्याने त्यांना मोकळा वेळ अधिक मिळतो, तसेच त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसेवांबद्दल ते चिंतामुक्त आहेत, म्हणून ते अधिक आनंदी आहेत. ‘पर्याप्तता’ म्हणजे वंचना नव्हे. ‘पुरेसे’ हे खरोखरच ‘पुरेसे’ असू शकते हा एक मूलगामी विचार आहे.
८. अंत्योदय … व्हावे कल्याण सर्वांचे…!
पृथ्वीवरील सुमारे तीनशे कोटी लोकांना अद्यापही पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्यसेवा आणि शिक्षण उपलब्ध नाही हे सध्या सगळ्यात मोठे नैतिक आव्हान आहे. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक उत्पादनाची आवश्यकता आहेच. त्यांचा विकास नाकारणे हा त्यावरील उपाय नाही, तर हा विकास रचनात्मक मार्गाने कसा होईल ह्याची निश्चिती करणे हा मार्ग आहे. त्यासाठी, तंत्रज्ञान हस्तांतरण, हवामानबदल नियंत्रणासाठी वित्त पुरवठा, विकेंद्रित पुनर्नवीनीकरणक्षम ऊर्जानिर्मिती, त्याबरोबरच, ‘ग्लोबल नॉर्थ’ ने ‘ग्लोबल साउथ’ला केवळ आपल्या उपभोगासाठी असलेली ‘खनिजांची खाण’ गृहीत धरून न वागणे अशी जागतिक अर्थव्यवस्था, इत्यादी होणे अपेक्षित आहे. तसेच, आपल्यापैकी जे उच्च-उपभोगवर्गात आहेत, मग ते उत्तरेत असोत वा दक्षिणेत, त्यांनी इतरांना चांगले जगता यावे म्हणून आर्थिक आणि पर्यावरणीय जागा करून द्यायलाच हवी.
९. नैसर्गिक जैववैविध्याचे संरक्षण, संवर्धन, व पुनर्स्थापना:
जैवविविधता ही चैन नाही, तर ती जैवमंडलाची कार्यपद्धती आहे. परागीकरण, पाण्याचे शुद्धीकरण, कार्बन साठवणूक, मातीची सुपीकता, रोगनियंत्रण, ह्या सर्व ‘सेवा’ (ecosystem services) पृथ्वीवरील परिसंस्था विनामूल्य पुरवतात; ज्यांची आपण पद्धतशीरपणे तोडफोड करीत आहोत. २०३० पर्यंत पृथ्वीच्या ३० टक्के जमीनीचे व महासागरांचे संरक्षण करणे (‘३०x३०’ लक्ष्य) हे आपले किमान लक्ष्य आहे. उजाड झालेल्या परिसंस्था, जसे- कांदळवने, पाणथळ जागा, जंगले, सैंद्रभूमी (Peatland),इत्यादींचे पुनर्स्थापन आणि संवर्धन करणे, हा उपलब्ध हवामान-उपायांपैकी सर्वांत कमी खर्चिक आणि प्रभावी उपाय आहे.
प्रकरण दहावे : अंतिमतः…, मानवप्रजातीला एक पत्र
प्रिय होमो सेपियन्स,
कोणत्याही वस्तुनिष्ठ निकषावर जोखलं तरी ह्या ग्रहावर उत्क्रांत झालेल्या प्रजातींपैकी सर्वांत उल्लेखनीय प्रजाती तुझीच आहे. तू सिम्फनी रचल्या, देवळे बांधली, देवीचा रोग बरा केला आणि मंगळावर रोबो पाठवले. काही हजार वर्षांच्या अवधीत तू गुहेच्या भिंतींवर प्राणी चितारण्यापासून ते सिस्टीन चॅपेल रंगवण्यापर्यंत, आणि तेथून पुढे न्याहरी करता करता स्वतःचे फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास केला आहेस.
तसेच, गेल्या काही दशकांत तू पृथ्वीवरील सर्व जीवनाचा आधारस्तंभ असलेली हवामानप्रणाली अस्थिर करण्यात यश मिळवलेस, महासागरातील मासे नष्टप्राय केले आणि तो प्लास्टिकने भरला, जंगले उद्ध्वस्त केली, नद्या विषारी केल्यास, जवळपास दहा लाख प्रजाती नामशेष केल्यास, आणि दरम्यान तक्रार ही करत राहिलास की तुझा वाय-फाय फार मंदगतीने चालत आहे.
तुझे विरोधाभासी रूप हे असे आहे. तू नेमके काय करतो आहेस हे कळण्याइतका तू बुद्धिमान आहेस, पण तरीही ते तसेच करत राहण्याइतका मूर्खही. तू एका जीन्सपॅण्टचा कार्बन फूटप्रिंट शेवटच्या ग्रॅमपर्यंत मोजू शकतोस आणि नंतर लगेचच सेलमध्ये ४० टक्के सूट मिळते आहे म्हणून तीन पँट्स विकतही घेतोस. तू बाटलीबंद पाण्याच्या पर्यावरणीय परिणामावर पीएच्.डी. प्रबंध लिहू शकतोस, आणि त्यावर व्याख्यान देऊन बाहेर पडताना तहान लागली म्हणून लगेच एक बाटली उचलतोस.
पण विरोधाभासांबद्दलची एक गोष्ट मात्र खरी आहे: त्यांचे निराकरण होऊ शकते, हे कदाचित सोप्या, झटपट पद्धतीने होणार नाही, ह्यासाठी विचारशक्ती पणाला लावावी लागेल किंवा मानसिक अस्वस्थता अनुभवण्याची तयारी ठेवावी लागेल…, पण त्यांचे निराकरण नक्कीच होईल. तू ह्यापेक्षा कठीण गोष्टी साध्य केल्या आहेस. तू स्मॉलपॉक्सचे उच्चाटन केले आहेस. तू गुलामगिरी बहुतांशी नष्ट केली आहेस. ज्या फोनवर तू हे वाचत असशील त्याहून कमी शक्तिशाली संगणकाच्या मदतीने तू चंद्रावर गेला आहेस…, (आणि हो, तो फोन तू आणखीन निदान तीन वर्षे तरी वापरायला हवास).
पृथ्वीला वाचवण्याची खरेतर गरजच नाही. तिने आजवर कैक लघुग्रहांचे आघात, हिमयुगे आणि महाज्वालामुखी सोसले आहेत. ती तुझ्यानंतरही अब्जावधी वर्षे टिकेल. वाचवण्याची गरज आहे ती येथील तापमान व रासायनिक आणि जैविक घटकांची मिळून तयार होणारी विशिष्ट व्यवस्था …, ज्यामुळे तुझे अस्तित्व टिकून आहे. ह्या व्यवस्थेची काही शाश्वती नाही. ती अपरिहार्यही नाही. तुला मिळालेली ही एक देणगी आहे… आणि ही देणगी तू उधळून टाकूच शकतो.
तुझ्याकडे ज्ञान आहे. तंत्रज्ञान आहे. संसाधने आहेत…, किंवा खरेतर, ती तू अशा वेगाने उपसत आहेस, जणूकाही तुझ्या गॅरेज मध्ये दुसरा एखादा अतिरिक्त ग्रह ठेवलेला आहे. पण असं काही नक्कीच नाहीये.
आज तुला एकमेव गोष्टीची गरज आहे, जी कारखान्यात बनत नाही, खाणीतून काढता येत नाही, ड्रोनने पोहोचवता येत नाही; ती म्हणजे स्वतःला बदलण्याचे धैर्य.
ते शहाणपणाने वापर. कारण, बाकी सगळेच आता संपत चालले आहे.
— तुझ्याविषयीच्या प्रेमातून आणि प्रक्षोभातूनही…!
लेखक
संदर्भ आणि स्रोत:
लेखातील आकडेवारी, तथ्ये आणि माहिती खालील स्रोतांमधून घेतली आहे. कथन, विनोद आणि निराशा मात्र लेखकाची स्वतःची आहे…, जी हंगेरियन वंशाच्या आणि यू. के. मध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध लेखक जॉर्ज मिकेश यांच्या लेखनाने प्रेरित आहे. संशोधनासाठी Claude.ai (http://claude.ai) चे समर्थ साहाय्य मिळाले आहे.
१. Schandl, H. et al. (२०२४). ‘Global Material Flows and Resource Productivity: The २०२४ Update.’ Journal of Industrial Ecology. Wiley Online Library.
२. MaterialFlows.net…, Global Trends of Material Use. UNEP International Resource Panel. https://www.materialflows.net
३. Circle Economy Foundation (२०२०). The Circularity Gap Report. Presented at the World Economic Forum, Davos.
४. UNEP International Resource Panel (२०२४). Global Material Flows Database. https://www.resourcepanel.org
५. United Nations SDG Indicators…, Goal १२: Material Footprint. https://unstats.un.org/sdgs/report/२०१९/goal-१२/
६. Ericsson Research (२०२३). ‘Life Cycle Assessment of a Smartphone.’ Ericsson Reports and Papers.
७. Deloitte Insights (२०२२). ‘Environmental Impact of Smartphones.’ TMT Predictions २०२२.
८. Planète Énergies (२०२३). ‘Life Cycle Assessment (LCA) of a Smartphone.’ TotalEnergies Foundation.
९. Apple Inc. (२०२२). iPhone १३ Product Environmental Report.
१०. Compare and Recycle (२०२५). ‘The Environmental Impact of Your Smartphone.’ https://www.compareandrecycle.co.uk
११. EACR Inc. (२०२५). ‘Environmental Impact of Cell Phones.’ https://samrinc.com
१२. IBWA (२०२४). Environmental Footprint…, Bottled Water. https://bottledwater.org
१३. Doria, M.F. et al. (२०२०). ‘Tendencies Towards Bottled Drinking Water Consumption.’ PMC / National Library of Medicine.
१४. Food and Water Watch (२०२३). ‘The Untapped Truth About Bottled Water.’ Washington, D.C.
१५. Shop Without Plastic (२०२४). ‘The Dirty Truth: How Much Plastic Bottles Really Contribute to Pollution.’
१६. NIH Environmental Management System (२०२३). ‘Life Cycle Environmental Impacts of PET Plastic Water Bottles.’
१७. Earth.Org (२०२६). ‘Fast Fashion and Its Environmental Impact.’ https://earth.org
१८. Fair Planet (२०२४). ‘How the Fashion Industry Pollutes Our Water.’ https://www.fairplanet.org
१९. Carbon Trail (२०२५). ‘Fast Fashion and Its Environmental Impact in २०२५.’ https://carbontrail.net
२०. Greenpeace International (२०२५). ‘४ Reasons Why Fast Fashion Will Never Be Green.’
२१. David Suzuki Foundation (२०२५). ‘The Environmental Costs of Fast Fashion.’ https://davidsuzuki.org
२२. UNEP (२०२४). Food Waste Index Report २०२४. United Nations Environment Programme.
२३. UNEP (२०२१). Food Waste Index Report २०२१. United Nations Environment Programme.
२४. FAO (२०१३). ‘Food Wastage Footprint: Impacts on Natural Resources.’ Food and Agriculture Organization of the United Nations.
२५. WWF/Tesco (२०२१). ‘Driven to Waste: Global Food Loss on Farms.’ World Wildlife Fund.
२६. World Bank (२०२३). ‘Global Food Loss and Waste.’ https://datatopics.worldbank.org
२७. IEA (२०२४). ‘SUVs and Climate Change.’ International Energy Agency, Paris.
२८. The Atlantic (२०१५). ‘The Inventor of the Keurig K-Cup Regrets That He Ever Did It.’ Interview with John Sylvan.
२९. Optoro (२०२०). ‘Impact of E-commerce Returns.’ Washington, D.C.
३०. Raworth, K. (२०१७). Doughnut Economics: Seven Ways to Think Like a २१st-Century Economist. Random House Business.
३१. Ellen MacArthur Foundation (२०१९). ‘Completing the Picture: How the Circular Economy Tackles Climate Change.’
३२. IPCC (२०२३). Sixth Assessment Report, Working Group III: Mitigation of Climate Change.
३३. WWF (२०२२). Living Planet Report २०२२. World Wildlife Fund.
३४. UNEP (२०२४). Global Waste Management Outlook २०२४. Nairobi.
३५. Mikes, G. (१९४६). How to Be an Alien. André Deutsch Ltd., London.
३६. OECD (२०२४). Global Plastics Outlook. Organisation for Economic Co-operation and Development.
३७. European Environment Agency (२०२३). Textiles and the Environment. EEA Report.