चर्चा

संपादक, आजचा सुधारक
ऑक्टोबर ९७ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. विवेक गोखले ह्यांचा ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ हा लेख वाचला. या लेखातील जगात अशिव असले तरी ते ईश्वराचे अस्तित्व असिद्ध करण्यापेक्षा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारेच वाटते’ ह्या विधानाविषयी थोडेसे.
हा युक्तिवाद भासतो तसा नवा नाही. ‘देव करतो ते भल्यासाठीच’हाच त्याचा अर्थ. (Euphemism for a cliche.)
माझे एक अतिशय विद्वान मित्र श्री. धनेश पटेल यांनीदेखील ‘शिव’ हा शब्द ‘शंकर’ आणि ‘मंगल’ ह्या दोन्ही अर्थांनी वापरून दुसर्या महायुद्धानंतर वसाहतवाद कसा संपुष्टात आला याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे म्हणणे होते की दुसन्यांच्या प्रदेशांवर चढाई करून ते काबीज करणार्याी राजांचा पूर्वी उदोउदो होत असे. परंतु दुसर्याो महायुद्धाच्या तांडवानंतर परप्रांतावर कब्जा करणार्याा सत्ताधीशांना मात्र नामुष्कीची पाळी आली. उदा. सद्दाम हुसेन. याचा अर्थ असा की जरी दुसर्या‍ महायुद्धात लक्षावधी लोक मृत्यू पावले तरी त्यानंतर वसाहतवाद नष्ट झाल्यामुळे दुसर्याा महायुद्धात भावी प्रगतीची बीजे रोवली गेली. ह्या युक्तिवादाला morbid हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते.
प्रा. गोखले ह्यांचा युक्तिवादही असाच आहे.
ह्या युक्तिवादाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. वसाहतवाद संपुष्टात येण्याचे दुसरे महायुद्ध हे एकमेव कारण आहे का?आपल्या देशापुरतेच म्हणायचे झाले तर ह्या देशात आधुनिक शिक्षणाचा पाया घालणारा लॉर्ड मेकॉले यांची भविष्यवाणी आठवते. … “one day these young men will demand western political institutions …’ तसेच घडले. अनेक भारतीय तरुण पाश्चात्त्य विद्यापीठात शिकताना स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ह्या तीन तत्त्वांचे बाळकडू घेऊन भारतात परत आले. पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे.
तेव्हा फार तर दुसर्याि महायुद्धामुळे वसाहतवाद वेगाने संपुष्टात आला एवढेच आपण म्हणू शकतो.
हिरोशिमावरील बॉम्बची पुनरावृत्ती टळण्यासाठी अनेकांना दुःखात लोटण्याची अजिबात गरज नव्हती. एखाद्या निर्जन बेटावर अणुस्फोट करूनही भागले असते. जर्मनीजपान आपोआप शरण आले असते. हिरोशिमानंतर नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचाअट्टाहास हा मानवी की ईश्वरी? की एक प्रयोग सफल झाल्यावर लागलीच दुसराही करून पाहू हे अशिवातून निर्माण झालेले शिव?
अनेक वर्षांपूर्वी एक जपानी शास्त्रज्ञ डॉ. तनाका (हिरोशिमा हे त्यांचे गाव) आणि मी एका समारंभात गेलो असताना काही वात्रट पाहुण्यांनी तनाका धिप्पाड आहे (जमलेले इतर सर्व जपानी शास्त्रज्ञ बुटके होते) आणि तो हिरोशिमात जन्मला ह्याची सांगड घालून, अणुस्फोटाचे दुष्परिणाम असा निष्कर्ष काढला. त्यानंतर ते चक्क हसू लागले. तनाका मला हळूच म्हणाला, “They do not understand the trauma”.
अशिवातून शिव शोधण्याचा हा अट्टाहास का? ‘कितीही माणसे मरोत, स्त्रियांवर अत्याचार होवोत, बालके अनाथ होवोत किंवा मानवी श्रम आणि संपत्ती खर्चुन उभारलेले कारखाने, इमारती, वसाहती बेचिराख होवोत, तरीही देव करतो ते भल्यासाठी ही अंधश्रद्धा आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही तत्त्वज्ञानाची गरज नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.