दुष्काळ – चांगल्या कामांचाही

दुष्काळ, राजस्थान, पारंपरिक जलव्यवस्थापन
—————————————————————————–
कमी पाऊस म्हणजे दुष्काळ हे समीकरण खोडून काढणारा, सामूहिकता, पारंपरिक शहाणपण व बंधुभाव म्हणजे काय हे समजावून सांगणारा स्वानुभव.
—————————————————————————–

आज टेलिव्हिजन कुठे नाही? आमच्याकडेही आहे. आमच्याकडे म्हणजे जैसलमेरपासून सुमारे शंभर किमी पश्चिमेला पाकिस्तानच्या सीमेवर. आता हेही सांगून टाकतो की आमच्याकडे देशातील सर्वात कमी पाऊस पडतो. कधीकधी तर पडतच नाही. तशी लोकसंख्या कमी आहे म्हणा, पण तेवढ्या लोकांनाही जरूरीपुरते पाणी तर लागतेच. त्यातूनही येथे शेती कमी व पशुपालन अधिक आहे. येथील लाखो बकऱ्या, गाई, उंटांसाठीही पाणी पाहिजे.

तर, ह्या टेलिव्हिजनमधून आम्ही गेल्या कोणजाणे किती काळापासून, देशातील काही राज्यांत पसरलेल्या दुष्काळाच्या भयानक बातम्या पाहत आहोत. गेल्या काही दिवसांत तर ह्याच्याबरोबर क्रिकेटचाही नवा वाद जुळला आहे. त्यावर लवकरच कोणी विवेकी न्यायाधीश त्यावर योग्य निवाडाही देतील.

तुमच्याकडे किती पाऊस पडतो, ते तुम्हालाच माहीत. आमच्याकडे गेल्या दोन वर्षांत पडलेल्या पावसाची माहिती तुम्हाला द्यायची आहे आम्हाला. जुलै २०१४ मध्ये ४ मिमी व ऑगस्टमध्ये ७ मिमी म्हणजे एकूण ११ मिमी पाऊस पडला होता. तेव्हाही आमचे हे रामगढ गाव दुष्काळग्रस्त म्हणून बातम्यांमध्ये आले नाही. आम्ही बातमीत झळकण्याची वेळच येऊ दिली नाही. त्यानंतर मागच्या वर्षी २३ जुलैला ३५ मिमी, ११ ऑगस्टला ७ मिमी व २१ सप्टेंबरला ६ मिमी पाऊस पडला. इतका कमी पाऊस पडूनही आम्ही आमचा पाचशे वर्षे जुना विप्रासर नावाच्या तलाव भरून टाकला. हा विशेष तलाव आहे. लाखो वर्षांपूर्वी निसर्गात झालेल्या प्रचंड घडामोडीमुळे ह्या तलावाखाली माती, खडे, जिप्सम ह्यांचा एक थर जमला होता. ह्या थरामुळे पावसाचे पाणी वाळवंटाच्या खालून वाहून जाऊन समुद्राच्या खाऱ्या पाण्याला मिळत नव्हते. ते रेतीत ओलाव्याच्या रूपात सुरक्षित राहत असे. ह्या ओलाव्यालाच आम्ही रेजवानी पाणी असे म्हणतो.

तलावात वरच्या भागात भरलेले पाणी काही महिनेपर्यंत गावाच्या उपयोगी पडते. ह्याला आम्ही पालर पाणी म्हणतो. त्याच्या वैज्ञानिक तपशिलांमध्ये आताच जायला नको, परंतु तलाव वरून सुकल्यानंतर रेतीतल्या ह्या ओलाव्याला आमचे पूर्वज कोण जाणे कधीपासून, बेरी, कुई नावाचा एक ढाचा बनवून त्याचा वापर करतात. आता एप्रिलच्या तिसऱ्या महिन्यातही आमच्या तलावात वर पाणी भरलेले आहे. ते सुकल्यावर रेजवानी पाणी ह्याच्या बेऱ्यामध्ये येईल आणि पुढील पावसाळ्यापर्यंत आम्ही पाण्याच्या बाबतीत अगदी स्वावलंबी राहू.
ह्या विशेष विप्रासरप्रमाणे आमच्या जैसलमेरमध्ये काही विशेष शेतेही आहेत. तसे पाहिले तर हा सारा दुष्काळी प्रदेशच आहे. पाऊस पडला, तर एखादे पीक हाती लागते. पण कुठे कुठे खडी किंवा जिप्समचा थर शेतांतही सापडतो. समाजाने शतकानुशतके ही शेते कुणा एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या हातात जाऊ दिलेली नाहीत. ह्या विशेष शेतांना समाजाने सगळ्यांचे बनवून ठेवले. ज्या ज्या गोष्टी तुम्ही कदाचित फक्त घोषणांमध्ये ऐकता, त्या सर्वांना जमिनीवर उतरवले आहे आमच्या समंजस पूर्वजांनी. ह्या विशेष शेतांमध्ये आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळातही सामूहिक शेती होते. दुष्काळातही उत्तम पीक घेतले जाते.

मागच्या वर्षात पडलेल्या एकूण पावसाचे आकडे तर आपण पाहिलेच आहेत. आता त्यांना पुढे मांडून ह्या विशाल देशाच्या कोणाही कृषितज्ज्ञाला विचारा, की एवढ्या पावसात गहू, मोहरी, तारामिरा, हरबरा ह्यासारखी पिके घेता येतात का, तर त्या सर्व तज्ज्ञांचे उत्तर ह्यावर नकारार्थी येते की नाही पाहा. तुम्ही आमच्या रामगढला आलात तर येथील खडीनांमध्ये ही सर्व पिके इतक्या कमी पाण्यात खूप चांगल्या रीतीने काढून सर्व सदस्यांच्या खळ्यांमध्ये ठेवलेली तुम्हाला दिसतील. सांगायचे तात्पर्य असे की सगळ्यात कमी पाऊस पडणाऱ्या ह्या रूक्ष वाळवंटात आजही भरपूर पाणी आहे, धान्य आहे आणि पशूंसाठी भरपूर चारा आहे. इतकेच नव्हे तर काहीशा संकोचाने आम्ही हे सांगतो की इतक्या कमी पावसात आम्ही काढलेले पीक केवळ आमच्याच उपयोगी पडते असे नाही, तर पीक कापणीसाठी दूरदुरून लोक येतात. ह्यांच्यात बिहार, पंजाब, मध्यप्रदेशातील माळवा इत्यादी प्रांतामधल्या लोकांचा समावेश आहे. म्हणजे आमच्यापेक्षा खूप अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील लोकांनाही येथे काम मिळाले आहे.

मराठवाडा, लातूर येथील बातम्या टीव्हीवर पाहूनही मन अत्यंत दुःखीकष्टी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जलस्रोतांवर कलम १४४ लागू केले आहे. पाण्यावरून माणसे भांडत आहेत. आमच्या गावांमध्ये मात्र इतका कमी पाऊस पडूनही गावकऱ्यांमध्ये परस्पर प्रेमाचे नाते अबाधित आहे. तुम्ही आलेल्या पाहुण्याला जेवताना आग्रह करणे ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आमच्याकडेही पाहुण्याला अत्यंत प्रेमाने जेवण वाढले जाते. इतकेच नाही तर आमच्याकडील तलाव, विहिरी व कुई यांच्यावर पाणी उपसतानाही आज परस्परांना आग्रह केला जातो- प्रथम आपण पाणी घ्या, नंतर आम्ही घेतो. पाण्याने आमच्याकडील समाज बांधून ठेवला आहे. म्हणून, देशाच्या इतर भागांमध्ये जेव्हा आम्ही पाण्यावरून संबंध बिघडताना पाहतो, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटते.

ह्याच्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण अंथरूण पाहून पाय पसरत नाही. आता हेच पहा ना, मराठवाड्याला निसर्गाकडून पाणी थोडे कमी मिळाले, तर त्याने उसाची शेती करून आपले सर्व भूजल त्यालाच देऊन टाकले. आता किती संकटात पडलाय तो प्रदेश. विहिरीच्या तळाला लागलेले पाण्याचे चार थेंब आणि त्यावर लटकलेल्या शेकडो बादल्या हे दुर्दैवी चित्र तेथे दिसते.

कोणे एके काळी संपूर्ण देशात पाण्याबाबत एक समभाव होता. आज नवी शेती, नव्या तहानेची नवी पिके, कारखाने, तलाव बुजवून केलेली आणि वेगाने वाढणारी शहरे ह्या सर्वांमध्ये तो संयम केव्हाच संपला आहे. म्हणूनच तर आम्हाला एक तर चेन्नईसारखा भयानक पूर दिसतो, किंवा लातूरसारखा भीषण दुष्काळ. चेन्नईच्या पुरात तिथला विमानतळ बुडून जातो, तर लातूरमध्ये रेल्वेने पाणी आणावे लागते.
कोठे किती पाऊस पडेल हे निसर्गाने हजारो वर्षांपूर्वीच निश्चित केले आहे. कोकणात, चेरापुंजीत खूप जास्त, तर जैसलमेरमध्ये अतिशय कमी. परंतु जेथे जेथे तो जसजसा आहे, तेथे तेथे निसर्गाचा स्वभाव ओळखून जर त्याने योजना केली असेल, त्याबाबतीत सरकारचे ऐकले नसेल, पैशाचा मोह आवरला असेल, तर तो समाज, तेथे पाणी कमी असो की अधिक, टिकून राहतो, मजेत राहतो. हे तगणे, मजेत राहणे आम्ही सोडले नाही. आमच्याकडील काही गावांमध्येही वातावरण बिघडले होते, परंतु गेल्या १०-१५ वर्षांत पुन्हा सुधारले आहे. ह्या सत्रात आमच्या समाजाने सुमारे २०० नव्या बेरया, १०० नव्या खडीन, पाताळी गोड्या पाण्याच्या ५ विहिरी, २०० ते १५० तलाई, नाडिया व टोपे आपल्या साधनांनी व आपल्या हिम्मतीने बांधले आहेत. त्यांपैकी कशावरही तुम्हाला सरकारी वा कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचे नाव, बोर्ड वा पाटी लावलेली आढळणार नाही. हे सर्व आम्ही आमच्यासाठी बनवले आहेत, त्यामुळे ते सर्व पाण्याने काठोकाठ भरले आहेत.

वास्तविक आपल्या देशातील एकही असा प्रदेश नाही, जेथे जैसलमेरपेक्षा कमी पाऊस पडत असेल. म्हणूनच, तेथील दुष्काळी वृत्ती पाहून आम्हाला विलक्षण खेद होतो. आमचे दुःख तेव्हाच कमी होईल, जेव्हा आम्ही आमच्याबरोबरच इतर प्रदेशांतही असे विचार व अशी कामे पोहोचवू शकू.

…आमचे एक मित्र म्हणतात, की दुष्काळ एकटा कधीच येत नाही. त्यापूर्वी चांगल्या कामांचा, चांगल्या विचारांचा दुष्काळ पडतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.