परिसंवाद निसर्ग आणि मानव -६

निसर्गामधल्या उत्क्रांतीचा आजमितीला शेवटचा टप्पा म्हणजे मानव; त्यास्तव तो देखील निसर्गाचा एक घटकच मानावा लागेल. मानव विरुद्ध निसर्गामधील इतर घटक ही लढाई आदिमानवाच्या काळापासून चालू आहे. निसर्गामधल्या इतर घटकांमध्ये देखील लढाई चालू असते. उदा. हिंस्र पशू इतरांना खातात. पण ही लढाई मर्यादित स्वरूपाची असते. परंतु मानवाची लढाई उग्रस्वरूपी झाली आहे, याची कारणे म्हणजे मानवाचा बुद्धिविकास, त्याचे कार्यकौशल्य, विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली अनेक साधने आणि लोकसंख्येची अफाट वाढ ही होत. या सर्वांचा परिणाम म्हणून मानव निसर्गातल्या इतर सर्व घटकांचे आपल्या सुखसोयीसाठी शोषण करीत आहे. मानवाच्या विवेकबुद्धीला या समस्येचा भयानकपणा जाणवला आहे. विज्ञानाच्या साह्यानेच या आपत्तीचे निराकरण होणार आहे.
जीवसृष्टी
गेल्या अर्धशतकात विज्ञानाची जेवढी प्रगती झाली आहे तेवढी मानवाच्या इतर कोणत्याही सृजनशील उद्योगामध्ये (activity) झाली नाही. या प्रगतीचे कारण म्हणजे विज्ञानाची विशिष्ट कार्यपद्धती. तीत वर्गीकरण, विश्लेषण, अवकर्षण (abstraction), निरीक्षण, पडताळा यांचा अंतर्भाव आहे. विज्ञानाला पुढेही प्रगती करण्यासाठी या पद्धतीचा त्याग करून चालणार नाही. पदार्थांचे घन, द्रव आणि वायू असे आपण वर्गीकरण करतो त्याचप्रमाणे निर्जीव आणि सजीव (जड आणि चेतन) अशी विभागणी करण्यात काहीही गैर नाही. सजीव पदार्थ हे (१) बाह्य चेतका (stimulus) ला प्रतिसाद देतात, (२) चयापचयामुळे (metabolism) त्यांची वाढ आणि क्षय होतो, (३) त्यांच्यात प्रजनन (reproduction) आणि उत्परिवर्तन (mutation) यांची क्षमता असते. निर्जीव वस्तूत हे गुणधर्म आढळत नाहीत. विषाणूंमध्ये (virus) मात्र काही गुण सजीव पदार्थांचे तर काही निर्जीव पदार्थांचे आढळतात. त्यामुळे ते सजीव आणि निर्जीव यांमधल्या सीमाक्षेत्रात आहेत. हे वगळले तर दगड (निर्जीव), कीटक (सजीव) अशी विभागणी करणे सर्वथैव योग्यच आहे.
निर्जीवापासून सजीवांची उत्पत्ती कशी झाली यासंबंधी प्रथम प्रयोग हॅरॉल्ड उरे यांचे विद्यार्थी मिलर यांनी १९५३-५५ मध्ये केले. पृथ्वीच्या संकल्पित आदिम वातावरणासारखी परिस्थिती (मीथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि पाणी यांचे मिश्रण) एका नळीत तयार करून त्यातून विद्युत्-प्रवाह पाठविला. त्यामुळे नळीमध्ये अमायनो आम्ले तयार झाली. सजीवांना आवश्यक अशा प्रथिनांचे ही आम्ले आवश्यक घटक आहेत. अमायनो आम्ल ते जीवांचे रेणू (molecules) हा टप्पा मोठा आहे. पण गेल्या ४० वर्षांत मोठ्या आकाराचे रेणू प्रयोगशाळेत बनविता आले आहेत. तेव्हा जीव-रेण कृत्रिमरीत्या तयार करण्याच्या दृष्टीने बरीच वाटचाल झाली आहे. शिवाय ज्या प्रयोगांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यास पूर्वी महिने लागत ते काम आज नव्या साधनांच्या साह्याने काही तासांत होते. डॉ. खोराना यांना काही वर्षांपूर्वी कृत्रिम जीन (gene) बनविण्यात यश मिळाले, आणि गेल्या आठवड्यातच एका गुणसूत्रावरील जीन काढून ते दुसऱ्या गुणसूत्रावर (chromosome) बसविणे शक्य झाल्याची बातमी पाहता १९५९ सालचा मॉस्को परिषदेचा निर्णय कालबाह्य ठरला आहे. अजून तरी निर्जीवापासून सजीवाची प्रयोगशाळेत निर्मिती करता आलेली नाही हे मात्र मान्य करायला हवे.
डार्विन-प्रतिपादित उत्क्रांतिवादात आता थोडी सुधारणा झाली आहे. त्याचे कारण म्हणजे उत्परिवर्तनाचा (mutations) शोध, जीनच्या संरचनेत आयनकारी प्रारणे (उदा. क्ष-किरण, किरणोत्सारण, विश्वकिरण इ.) व काही रसायने यांच्या क्रियेमुळे बदल होतात. म्युलर या शास्त्रज्ञाने ड्रोसोफिला माशीवर क्ष-किरण टाकून तिच्यात उत्परिवर्तने घडवून आणली व ती नंतरच्या पिढ्यांत उतरली. निसर्गातदेखील अशी उत्परिवर्तने घडत असतात. परंतु तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येत नाही, तसेच कोणत्या जीनमध्ये कोणता बदल होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून अपघात’, ‘योगायोग’ (chance) म्हणायचे.
क्वांटम भौतिकी
रेणू आणि अणू (atom)यांच्या आणि त्यापेक्षा सूक्ष्म पातळीवरच्या भौतिक घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी क्वांटम यांत्रिकीचा उपयोग करतात. स्थूल पातळीवर (macro-level) अभिजात भौतिकी (classical physics) वापरता येते. जीव-सृष्टीच्या सक्ष्म पातळीवरचे. म्हणजे रेण्विक जीवशास्त्रातील (molecular biology), DNA, RNA हे मोठाले रेणू आहेत. त्यांचे आणि जीनचे आचरण समजून घेण्यासाठी क्वांटम यांत्रिकी वापरावी लागते. या अर्थाने क्वांटम यांत्रिकीला सजीव-निर्जीव अशा भेदाचे वावडे आहे आणि अशी विभागणी कृत्रिम म्हणता येते. EPR विरोधाभास (paradox) हा रेणूमधल्या इलेक्ट्रॉनच्या घटनेबद्दलचा (phenomenon) प्रयोग आहे. सूक्ष्म पातळीवरील (micro-level) प्रयोगांचे निष्कर्ष जसेच्या तसे स्थूल पातळीवर वापरणे सुसंबद्ध नाही. स्थूल पातळीवर लक्षावधी, कोट्यवधी रेणूंचा, अणूंचा किंवा कणांचा विचार करावा लागतो. त्या प्रसंगी क्वांटम यांत्रिकीला सांख्यिकीच्या चौकटीत बसवावे लागते. मग त्याचे निष्कर्ष अभिजात भौतिकीच्या नियमांत बसतात. लोकार्थी (popular) विज्ञान-साहित्यांतील विधाने गुळमुळीत असतात. उदा. इलेक्ट्रॉन कधी कणासारखे तर कधी तरंगासारखे भासतात. वैज्ञानिक दृष्टीने हे वाक्य ‘इलेक्ट्रॉनचे आचरण काही प्रसंगी कणांच्या संकल्पनेद्वारे, तर काही प्रसंगी तरंगांच्या संकल्पनेने स्पष्ट करता येते’ असे पाहिजे. हे स्वरूप प्रयोग करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते याचा खरा वैज्ञानिक अर्थ म्हणजे ‘इलेक्ट्रॉनच्या कोणत्या स्वरूपाविषयी अध्ययन करावयाचे आहे हे ठरवून त्यासाठी केलेल्या प्रयोग मांडणीवर अवलंबून असते. कार्यकारणभाव (causality), नियतिवाद (determinism) यांच्या पाश्वभूमीवर क्वांटम यांत्रिकीचा अर्थ कसा लावायचा याविषयीचा बोर (Bohr)-आइन्स्टाइन वाद प्रसिद्ध आहे. त्यामध्ये आइन्स्टाइन एका बाजूला तर बोर, मॅक्स बॉर्न, हायजेनबर्ग (हे सर्व नोबेल विजेते आहेत). हे दुसऱ्या बाजूला होते. आज बोम (Bohm) हे क्वांटम यांत्रिकीच्याही पलीकडे जाण्याविषयी संशोधन करीत आहेत. परंतु त्यांनी प्रतिपादन केलेल्या अव्यक्त सुव्यवस्थेची संकल्पना प्रा. पांढरीपांडे यांच्या लेखातून सुस्पष्ट होत नाही.
प्रा. पांढरीपांडे म्हणतात त्याप्रमाणे बेटसनच्या मते ‘मन’ ही एक संकीर्ण (की क्लिष्ट, गुंतागुंतीच्या) व्यवस्थेची निर्मिती आहे. पण ती सुव्यवस्था (order) म्हणजे मन नव्हे. असे मानल्यास सुव्यवस्थेच्या निर्मितीच्या प्रक्रियेला ‘मन’ म्हणावे लागेल. ही सुव्यवस्था कशाची? मिठाच्या स्फटिकात सोडियम आणि क्लोरीन यांच्या आयनांची सुव्यवस्थित रचना असते. मग मिठालाही ‘मन’ आहे असे म्हणावे काय? तसे दगडालाही ‘मन’ आहे असे म्हणावे लागेल ! म्हणजे त्यांना विचारशक्ती भावना हेही असतात असे समजावे लागेल ! वास्तविक ‘मन’ ही भौतिक वस्तू (physical entity) नाही. विचार करण्याच्या प्रक्रियेला आपण संक्षेपाने ‘मन’ म्हणतो. हर्ष, खेद, क्रोध इ. भावनांचे स्थान मनात म्हणजे अंतिमतः मेंदूत आहे. अशी वस्तुस्थिती असताना ते सजीवांच्या शरीराबाहेरही असू शकते हे मान्य होण्यासारखे नाही. अशी काही अवकृष्ट वस्तु (abstract entity) कल्पिलेली असलीच तर तिला ‘मन’ न म्हणता ‘अधिमन’ किंवा अशीच काही नवीन संज्ञा वापरावी.
सहेतुकता
लायकेन या वनस्पतीच्या संबंधात सृजनशीलता म्हणजे नवे कार्य, नवी रचना आणि नवे गुणधर्म होय असा उल्लेख आला आहे. अशा सृजनशीलतेची हवी तेवढी उदाहरणे निर्जीव सृष्टीतही सापडतात. उदा. सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयोगाने बनणारे मीठ, हायड्रोजन आणि प्राणवायू यांच्या संयोगाने मिळणारे पाणी. त्यांच्या गुणधर्माचे काही प्रमाणात समाधानकारक उत्तर अणूंच्या संरचनेच्या आधारे देता येईल. सजीव सृष्टीच्या बाबतीत मात्र उत्तर शोधून काढणे कठीण होईल. ही सृजनशीलता कुठून आली याचे उत्तर विज्ञान देऊ शकणार नाही, तसेच ते इतर ज्ञानशाखांनाही देता येणार नाही. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीवर सहेतुकतेचा (purpose) आरोप करणारे मुख्यत्वे काही जीवशास्त्रज्ञ आहेत. दैवी शक्तीच्या संकल्पनेला आधार म्हणून काही धर्मशास्त्रीही (theologians) सहेतुकतेचा उपयोग करतात. समग्रता (Holism) ही विचारधाराही जीवशास्त्रावर आधारली आहे. आश्चर्य म्हणजे हे नाव जनरल स्मट्सने दिले आहे. त्याच्या मते भिन्न भिन्न घटक अधिकाधिक संख्येने एकत्र येऊन त्यांच्यापासून जैव सकल (organic whole) बनते. जीवशास्त्राच्या पायावरच बर्गसन्, जोड, अलेक्झांडर, व्हाइटहेड इत्यादींनी आपापल्या विचारप्रणालींचे इमले उभारले आहेत. शेल्ड्रेकचे विचार या लोकांच्या पठडीतले दिसतात. शेल्ड्रेकच्या दिलेल्या मूळ उताऱ्यात जर, तर ची भाषा आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. Conscious agent (म्हणजे परमेश्वर ?) याने विश्व निर्माण केले हे मान्य केले तर कोणत्याही घटनेचे कारण म्हणजे ईश्वरेच्छा म्हणता येईल. मग प्रश्न उरतो की त्या conscious agent ला कोणी निर्माण केले ? (पाचव्या शतकातल्या सेंट ऑगस्टीनने हाच प्रश्न विचारला होता.) त्याचे उत्तर म्हणजे conscious agent हा स्वयंभू आहे असे असावे ! वैज्ञानिक म्हणतो की ‘ब्रह्मांड हे स्वयंभू आहे.
प्रा. पांढरीपांडे यांच्या विवेचनानंतरही काही प्रश्न उरतात ते असे. ‘जीवनाची समग्रता’ ही संकल्पना निर्जीव सृष्टीला कशी लागू करायची ? सजीव आणि निर्जीव हा भेद चुकीचा मानला तर Teleonomy किंवा सर्वंकष सहेतुकतेच्या संकल्पनेचे निर्जीव पदार्थांच्या बाबत उपयोजन (application) कसे करायचे ? विज्ञानाने सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. परंतु विश्वोत्पत्तीच्या क्षणापासून आजपर्यंतच्या म्हणजे जवळजवळ २० अब्ज वर्षांमधील घटनाक्रम सुसंगतपणे मांडला आहे. प्रचंड प्रस्फोटानंतर (big bang) कोणकोणत्या मूलकणांची कशी निर्मिती झाली, त्यानंतर हायड्रोजन हीलियम – तारे – सूर्यकुल – पृथ्वी – जीवसृष्टी – मानवाचे आगमन या साखळीतील प्रक्रियांचे बऱ्याच अंशी सुसंबद्धपणे विवरण केले आहे. यांतील काही दुवे अजूनही समजले नाहीत. एका प्रश्नाचे उत्तर काढले की त्यातून नंतर नवे प्रश्न समोर येतात. प्रा. पांढरीपांडे यांच्या लेखात उल्लेखलेले प्रयोग हे प्राथमिक स्वरूपाचे असावेत असे वाटते. त्यांचे अनेकदा पुनरावर्तन करून त्या घटनांचा पडताळा आला आणि सांख्यिकीच्या काटेकोर परीक्षेला ते उतरले तर ते विज्ञानाला नवे आव्हानच ठरेल यात शंका नाही. प्रा. पांढरीपांडे यांच्या लेखात रोझेनफेल्ड यांचा परिणामसापेक्ष कार्यकारण संबंध’, शेल्ड्रेकचा ‘आकृतिप्रधान कार्यकारणबंध’, ‘गतिशील प्रतिध्वनि (संस्पंदन) क्षेत्र’, ‘आवर्ती (वर्तुळात्मक) तर्कपद्धती’ अशा अनेक नव्या संकल्पना आलेल्या आहेत. त्यांचे स्थलमर्यादेमुळे सुस्पष्ट विवेचन झालेले नाही असे वाटते.
श्रीधाम, रहाटे कॉलनी पं. नेहरू मार्ग, नागपूर-४४० ०२२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.