कल्पनारम्यवाद व राजकारण (Romanticism and Politics)

पाश्चात्त्य साहित्यामध्ये अनेक वर्षांपासून कल्पनारम्यवाद (Romanticism) व अभिजातवाद (Classicism) असे दोन वाङ्मयीन ‘वाद’ किंवा विचारप्रवाह प्रचलित आहेत. ह्या दोन ‘वादांना अनुसरून कल्पनारम्य साहित्य किंवा अभिजात साहित्य (विशेषतः काव्य) लिहिले गेले आहे व हे दोन प्रकारचे साहित्य परस्परांपासून अगदी भिन्न मानले गेले आहे. साधारणतः १६ व्या शतकापासून (शेक्सपिअरचा काळ) ते १९ व्या शतकापर्यंत हे साहित्यिक वाद पाश्चात्य साहित्यात (विशेषतः इंग्रजी साहित्यात) प्रामुख्याने अग्रेसर होते. तरी पण १६६० ते १७४० व १७९० ते १८४० ह्या कालखंडामध्ये हे वाद विशेष हिरिरीने पुढे आले. पहिल्या कालखंडाल (१६६०-१७४०) ‘नव अभिजात वाद युग (New-Classical Age) असे नाव इंग्रजी साहित्याच्या इतिहासात दिले आहे व दुसऱ्या कालखंडात (१७९० ते १८४०) ‘कल्पनारम्य युग (Romantic Age) असे नाव दिले आहे. पहिल्या कालखंडात (नव अभिजात युग) प्रमुख कवी जॉन ड्रायडन व अलेक्झेंडर पोप यांनी या वादाला अनुसरून काव्य लिहिले व त्याचा पुरस्कार केला. साहित्यसमीक्षक डॉ. सॅम्युअल जॉनसन यांची साहित्यिक समीक्षाही ह्या वादाला प्रोत्साहक होती. दुसऱ्या कालखंडात (१७९० ते १८४०) वर्ड्स्व र्थ, कोलरिज, बायरन, शेली व कीट्स असे पाच प्रमुख कल्पनारम्य (romantic) कवी झाले. कल्पनारम्यवादाचे हे सुवर्णयुग म्हणता येईल. पुढे मात्र यांचा प्रभाव कमी होऊ लागला. अजूनही ह्या प्रवृत्ती कायम असल्या तरीही निव्वळ त्यांनाच अनुसरून साहित्य (काव्य) लिहिले जात आहे असे म्हणता येत नाही. अलिकडच्या साहित्यात वास्तववाद (realism), अतिवास्तववाद (surrealism), अभिव्यक्तिवाद (expressionism), अस्तित्ववाद (existentialism), अर्थशून्यता वाद (absurdism) असे अनेक वाद व विचारप्रवाह उदयास आले व आधुनिक साहित्याचे (नाटक व काव्य) वर्गीकरण ह्या वादांबरहुकूम केले गेले.

साहित्यात जसे वरील प्रकारचे अनेक वाद व विचारप्रवाह आहेत तसेच ते राजकारणामध्येही आहेत. मागच्या काळात सरंजामशाही (Feudalism) व राजेशाही (monarchism) प्रचलित होते. आधुनिक काळात लोकतंत्रवादाने (democracy) त्याची जागा घेतली. पण त्याशिवाय साम्यवाद (Communisim), समाजवाद (Socialism), सर्वंकषवाद (Totalitarianism) असे राजकीय वादही अस्तित्वात आहेत. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळातील जर्मनीमधला नाझीवाद (Nazism) व इटालीमधला फॅसीझम (Fascism) ही दोन्ही सर्वकष वादाचीच रूपे होती.

साहित्यातील वाद व राजकारणातील वाद यांचा परस्परांशी काही संबंध आहे का हे पाहणे मनोरंजक व अगत्याचे ठरेल. अनेक विचारवंतांच्या मते साहित्यातील कल्पनारम्यवाद (romanticism) व अभिजातवाद (Classicism) ह्यांचे प्रतिबिंब राजकीय क्षेत्रात पडले आहे. राजकारणातील सर्वंकषवाद (Totalitarianism) किंवा हुकूमशाही (dictatorship) व लोकतंत्रवाद (democracy) हे अनुक्रमे साहित्यातील कल्पनारम्यवाद (Romanticism) व अभिजातवाद (Classicism) ह्यांचे राजकीय आविष्कार (manifestation) आहेत असे म्हणता येईल. हा मुद्दा स्पष्ट करणे व साहित्यातील कल्पनारम्यवाद व अभिजातवाद ह्यांचा राजकारणातील वादावर झालेला परिणाम विशद करणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

सर्वप्रथम आपण कल्पनारम्यवाद (Romanticism) व अभिजातवाद (Classicism) ह्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, त्यांचा उगम काय आहे याचा मागोवा घेऊ. नंतर साहित्यामध्ये त्यांचा आविष्कार कशाप्रकारे झाला, त्या दोन साहित्यांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत याचा विचार करू व शेवटी त्यांचे राजकीय क्षेत्रात कसे स्थलांतर झाले ते पाहू.

कल्पनारम्यवाद (Romanticism) हा तसा नवीन नसला तरी त्याचा आकस्मिक उद्रेक फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (१७८९) झाला. प्रथम फ्रान्स व जर्मनीमध्ये ही लाट पसरली व नंतर सर्व पाश्चात्त्य जगात (इंग्लंडमध्येही) त्याचे पडसाद उमटले. फ्रान्समध्ये प्रसिद्ध लेखक व विचारवंत रूसोला (Rousseau) ला ह्याचा जनक मानले जाते. ‘निसर्गाकडे चला (back to nature) हा त्याचा संदेश सुप्रसिद्ध आहे.

रोमँटिसिझम्’ वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. माझ्या वाचनात आलेले E.V. Lucas ह्या लेखकाचे The decline and fall of the romantic ideal हे त्यांतील एक. १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकात Lucas म्हणतो की त्या काळापर्यंत (१९३६) ह्या विषयावर ११,३९६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत!

रोमँटिसिझम्’ वर अनेकांची अनेक मते आहेत. जनसामान्यामध्ये ‘रोमान्स’ चा अर्थ ‘तारुण्यसुलभ प्रेम (विवाहपूर्व) असा केला जातो. ‘प्रेम’भावनेशिवाय साहसा’ (adventure) ची ही जोड त्याला दिली जाते. म्हणजे साधारणतः प्रेम व साहस (Love and Adventure) ह्यांनी युक्त असलेल्या घटना, लिखाण, काव्य इ. ना रोमँटिक ही संज्ञा दिली जाते. पण ‘रोमान्स’चा हा अर्थ मागाहून प्रचलित झाला.

रोमँटिसिझमची पूर्वपीठिका
मध्ययुगीन काळात युरोपमधील ईशान्य भागातील रानटी टोळ्यांनी बलाढ्य रोमन साम्राज्याचा संपूर्ण पाडाव केल्यानंतर इटालीतील लॅटिन भाषेचा हास झाला. लॅटिनपासून नंतर Romanice नावाची लोकभाषा (vernacular) निर्माण झाली. फ्रान्समध्येही तिचा प्रसार झाला व ह्या मूळ फ्रेंचला Romanz भाषा असे नाव मिळाले. ह्या Romanz (मूळ फ्रेंच) भाषेत पुढे जे लिखाण झाले त्यालाही Romance असे नाव मिळाले. मध्ययुगीन काळात सरंजामशाही (feudalism) अस्तित्वात होती. कुठेही एकछत्र, एकसंघ राजकीय सत्ता नव्हती. लहान लहान राज्ये (feudal states) सतत आपापसांत लढत असत. सर्वत्र राजकीय अस्थिरता, गोंधळ होता व जनजीवन अतिशय असुरक्षित होते. ‘अश्वारूढ सरदारांच्या (knight errants) ह्या जगात सतत धुमश्चक्री चालत असायची. शेजारच्या राज्यातील एखाद्या राजकन्येला कोणी सरदार पळवून घेऊन जाई व त्याचा शोध घेऊन त्याच्याशी लढाई करून राजकन्येस सोडविण्यासाठी इतर सरदार प्रयत्न करीत. हा सरदार बहुधा त्या राजकन्येचा प्रियकर असे. अनेक संकटांना तोंड देऊन तो राजकन्येला सोडवून आणायचा व शेवटी त्यांचे लग्न होई. ह्या प्रकारच्या प्रेम व साहस ह्यांनी ओतप्रोत भरलेल्या दीर्घकथांना ‘Romances’ म्हणत. मूळ फ्रेंच भाषेतील असा एक Romance’ Roman de la Rose (Romance of the Rose) प्रसिद्ध आहे. ह्या ‘प्रेम व साहस’ दीर्घकथा गद्य व पद्य ह्या दोन्हीमध्ये असत. ह्यातील बहुतेक कथा अति काल्पनिक, महदाश्चर्यकारक (Fantastic) असून, अभूतपूर्व शौर्य व साहस, कल्पनातीत घटना, आत्यंतिक प्रेमभावना (passionate love), रोमांचकारी अनुभव ह्यांनी भरलेल्या असत. संकटात सापडलेल्या सुंदरीला (damsels in distress) प्राणांची पर्वा न करता वाचवणे हा त्यातील नायकांचा मुख्य उद्योग. डॉ. सॅम्यूअल जॉन्सनने अशा प्रकारच्या Romance च्या कथेचा सर्वसामान्य (typical) नमुना पुढीलप्रमाणे दिला आहे.

“To bring a lover, a lady and a rival into a fable; to entangle them in contradictory obligations; to perplex them with opposite interests, and harass them with violence of desires inconsistent with each other; to make them meet in rapture and part in agony ; to fill their mouths with hyperbolical joy and outrageous sorrow ; to distress them as nothing human was distresed and to deliver them as nothing human was delivered.”

नंतरच्या काळात ह्या Romantic शब्दाच्या अर्थात बदल होऊन कोणत्याही निव्वळ कल्पनेवर (pure imagination) आधारित; तीव्र भावनांना (intense emotion) व्यक्त करणाऱ्या लिखाणाला Romantic साहित्य असे नाव मिळाले. वास्तवापासून दूर जाणाऱ्या ह्या साहित्यात एक स्वप्निल (dreamlike), गूढ छटा ही मिळाली (एखाद्या परीकथेप्रमाणे!) कोलरिजच्या Kubla Khan, Christabel व Rime of Ancient Mariner ह्या कवितांमध्ये आपल्याला हे स्वप्निल गूढ आवरण प्रकर्षाने दिसते.

अभिजातवादाची (Classicism) पूर्वपीठिका
कल्पनारम्यवादाचे (Romanticism) मूळ पाहिल्यानंतर आपण ‘अभिजातवादाचे मूळ काय आहे ते पाहू. साहित्यात हे दोन वाद एकमेकांच्या नेमके विरुद्ध मानले गेले आहेत. खरे तर १६६० ते १७४० ह्या कालखंडात अस्तित्वात असलेल्या नव-अभिजातवादाची प्रतिक्रिया (reaction) म्हणूनच १७९०-१८४० ह्या काळात कल्पनारम्यवाद उदयाला आला. रोमन साम्राज्याच्या पूर्व काळातील सम्राटांनी आपल्या प्रजाजनांचे विभाजन पाच विभागांत केले. त्यातील पहिल्या विभागाला (जो सर्वांत उच्च मानीत) classiciअसे म्हणत. (एकवचन – classicus). एकूण classici म्हणजे पहिल्या प्रतीचे (standard),सर्वोत्कृष्ट दर्जा असलेले. पुढे Classical Writer म्हणजे पहिल्या प्रतीचा सर्वोत्कृष्ट दर्जा असलेला लेखक (classicus scriptor) असा अर्थ आला. नंतर renaissance च्या काळात (१४५० च्या नंतर) ग्रीक व लॅटिन भाषेतील सर्वश्रेष्ठ व मान्यताप्राप्त लेखकांच्या लिखाणाचे वाचन व अभ्यास शाळेच्या व महाविद्यालयाच्या वर्गात (class) होऊ लागला. पुढे पुढे class व classici ह्या शब्दांच्या गोंधळामुळे शाळा व विद्यालयांच्या वर्गात (class) अभ्यासल्या जाणाऱ्या सर्व ग्रीक व लॅटिन भाषेच्या लिखाणाला (मग ते पहिल्या प्रतीचे असो वा नसो) classical असे नाव मिळाले. Classical ह्या शब्दाच्या उत्पत्तीविषयी एवढे पुरेसे आहे. पुढे classical ह्या शब्दाच्या अर्थामध्ये बरेच स्थित्यंतर झाले.

कल्पनारम्यवाद व अभिजातवाद (romanticism and classicism) ह्या संज्ञाच्या उगमाचा शोध घेतल्यानंतर ह्या दोन साहित्यिक वादांना अनुसरून होत असलेल्या । साहित्याची प्रमुख लक्षणे व वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहू.

कल्पनारम्य साहित्याची प्रमुख लक्षणे
१) जीवनात आत्यंतिक भावना व कल्पना यांना अग्रस्थान २) तीव्र संवेदना (Keener Sensibility) व इंद्रियानुभव (Sensuousness) (Keats – “Oh ! for a life of sensations rather than of thoughts”) ३) गूढतेकडे व गूढवादाकडे झुकणारा कल (Mystery and mysticism) ४) गतेतिहासाचे – विशेषतः मध्ययुगीन इतिहासाचे आकर्षण (Medavalism) ५) सद्यः परिस्थितीपासून दूर असणाऱ्या (स्थळ आणि काळाने) गोष्टींचे आकर्षण (Love of the remote in time and place) ६) आत्यंतिक प्रेमभावना (ardent love) व त्याची प्रतिक्रिया म्हणून तेवढाच आत्यंतिक द्वेष (explosive hatred) ७) आत्मकेंद्रितता (egoism) व आत्मकणव (Self-pity) (Shelley “I fall upon the thorns of life, I bleed”) ८) अतींद्रिय गोष्टींचे (Supernatural) आकर्षण ९) बुद्धिप्रामाण्यापासून पळवाट (escape from rationality) १०) स्वप्न व स्वप्निल गोष्टींचे आकर्षण ११) बुद्धिनिष्ठतेपेक्षा अंधविश्वासाकडे कल.

अभिजातवादी (classical) साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये
१) जीवनात स्वयंनियंत्रण (self-control) व समतोल (balance) यांना प्रमुख स्थान. २) आचार व विचारामध्ये संयमाला (moderation) महत्त्व. ३) आदर्शाकडे जात असता वास्तवाचा विसर न पडणे. ४) जीवनाकडे पाहण्याचा बुद्धिनिष्ठ दृष्टिकोण (rational approach to life). ५) विचारप्रदर्शनात सुस्पष्टता (clarity of Expression) ६) सामाजिकता (sociability) व मित्रभावनेला महत्त्व. त्यासाठी विचारांचे आदान-प्रदान करून तडजोड (compromise) करण्याची भूमिका. ७) स्वयंकेंद्रितता (egoism) व विक्षिप्तता (eccentricity) यांचा तिटकारा. ८) कोणत्याही गोष्टीचे टोक न गाठणे, आत्यंतिक भूमिका न घेणे. वादग्रस्त गोष्टीबाबत विचारांचे आदान-प्रदान करून ‘सुवर्णमध्य शोधणे Golden mean व Nothing in Excess हे ग्रीक संस्कृतीचे प्रधान सूत्र होते.

अभिजातवाद व कल्पनारम्यवाद यांची मानसशास्त्रीय चिकित्सा
अभिजातवाद व कल्पनारम्यवाद यांच्या वरील वैशिष्ट्यांचे मूळ मानवाच्या द्विविध (dual) मनामध्ये आहे व त्या द्विविध मनाची ती बाह्य रूपे आहेत. स्थूलपणे असे म्हणता येईल की ‘कल्पनारम्यवाद’ माणसाच्या भावनिक मनाचा (emotional mind) त्याच्या पशुतुल्य जन्मजातप्रवृत्तीचा (animal instincts) व त्याच्या निद्रिस्त मनाचा (unconscious mind) आविष्कार आहे. या उलट अभिजातवाद माणसाच्या बुद्धीचा (reason) जागृत मनाचा (conscious mind) आविष्कार आहे. सूत्ररूपाने ते असे मांडता येईल
कल्पनारम्यवाद → भावना → जन्मजात प्रवृत्ती – निद्रिस्तमन
अभिजातवाद – निद्रिस्त मन → वास्तवाचे भान → जागृत मनी

माणसाचे ‘निद्रिस्त मन’ (unconscious mind) सर्वांत जुने आहे व त्याचा संबंध पशुमेंदूशी (animal brain) आहे. ह्याच मनात मानवाच्या मूलभूत जन्मजात प्रवृत्ती (instincts)असतात. भावनांचा (प्रेम, द्वेष, क्रोध, घृणा, मत्सर, भय, इ.) उगमही ह्याच मनात आहे. सर्व कलांचे उगमस्थान ही हे ‘निद्रित मन’ (unconscious mind) आहे असे मानसशास्त्रज्ञ मानतात. स्व-जाणीव, विवेक, सारासार बुद्धी, विचारक्षमता, नीतिकल्पना, सामंजस्य व परस्पर सहकार, विज्ञान, तार्किकता, सामाजिक सहजीवन इ. गोष्टींचे मूळ माणसाच्या जागृत मनात (conscious mind) आहे. ह्या मनाचा संबंध माणसाच्या नवीन मेंदूत (neo-cortex) आहे. ह्या नवीनतम, खास मानवी मेंदूला ‘Thinking Cap’ असे म्हणतात. कारण माणसाचे सर्व विचारविश्व (Thought world) ह्या भागातूनच उद्भवते.

‘कल्पनारम्य प्रवृत्ति प्रकर्षाने आत्मकेंद्रित असते कारण ती मूलतःच अंतर्लक्षी आहे (inward-looking) विद्यमान, प्राप्त परिस्थितीचा विचार न करता सामोरे न जाता एखाद्या भव्य, दिव्य (बहुधा काल्पनिक) भूतकाळाकडे (किंवा तशाच भविष्यकाळाकडे) तिची दृष्टी असते. या अर्थाने ही प्रवृत्ति पलायनवादी (escapist) आहे. तशीच ती प्रतिगामी (regressive) ही आहे.

‘कल्पनारम्यवाद’ व ‘अभिजातवाद यांचे एवढे विवेचन केल्यानंतर राजकीय वादांशी त्यांचा काय संबंध आहे ते पाहू. चाणाक्ष वाचकांच्या लक्षात बहुतेक हा संबंध आलाच असेल. माझ्या मते (खरे म्हणजे बऱ्याच राजकारण तत्त्वज्ञांच्या मते) राजकारणातील सर्वंकषवाद (totalitarianism) किंवा हुकूमशाही (dictatorship) हा कल्पनारम्यवादाचा राजकीय अवतार आहे. प्रक्षोभक भावनांवरच त्याची उभारणी झाली असते. विवेक, बुद्धिनिष्ठता (Rationality) विचारांचे आदानप्रदान व तडजोड यांचे त्यांना वावडे आहे नाझीझम्, फॅसिझम (किंवा आजच्या जगात उदयास आलेला ‘धार्मिक मूलभूतवाद (religious fundamentalism) हे मूलतः ‘एकभाषणा’ वर (Monological) आधारित आहेत. ‘मी सांगतो, तुम्ही फक्त ऐका व करा हे त्यांचे सूत्र आहे. हा समाज बंदिस्त (closed society) आहे. लोकतंत्रवाद (democracy) मुक्तसमाज (open society) मानतो. त्याची उभारणी सं-भाषणावर आहे (dialogue).

वरील सर्व विवेचनातून रोमटिसिझम् व क्लासिसिझम् यांच्या राजकीय वादांच्या संबंधाविषयी मी पुढील समीकरण मांडतो.
१) कल्पनारम्यवाद (Romanticism) +निद्रिस्त मन (unconscious mind), जन्मजात प्रवृत्ती (instincts) → भावना (emotion) – विवेकहीनता (irrationality) अंधविश्वास, आत्मकेंद्रितता इ. →सर्वंकषवाद (Totalitarianism)
२) अभिजातवाद (classicism)-जागृत मन (conscious mind) →बुद्धिप्रामाण्य व बुद्धिनिष्ठ जीवन →सामाजिकता (Sociability);-संयम, तडजोड (moderation & restraint, compromise)-लोकतंत्रवाद (democracy)

‘रोमँटिसिझम साहित्यातून जसा राजकारणाकडे वळला (कमीत कमी काही बाबतीत तरी) तसा तो तत्त्वज्ञानातही शिरला. हेगेल, शोपेनहॉर, नीत्शे यांच्या तत्त्वज्ञानातही आपल्याला रोमॅटिसिझमची छटा दिसते. खरे तर हिटलरचा नाझीवाद हेगेलच्या Ab solutist theory of state वरच आधारित आहे.

नाझीवादामध्ये ‘शुद्ध वंशाला’ (Racial Purity) प्राधान्य होते. जर्मन लोक ‘शुद्ध आर्यन वंशा’ चे आहेत व त्यांना सर्व जगावर सत्ता गाजविण्याचा अधिकार आहे असे हिटलर म्हणत असे. हे पूर्ण तत्त्वज्ञान अज्ञानमूलक व तर्कदुष्ट (irrational) आहे. शास्त्रीयदृष्ट्या ‘शुद्ध वंश ही कल्पनाच मिथ्या आहे. लोकांच्या शुद्धवंशीयत्वाच्या भावना भडकवून, जग पादाक्रांत करण्याचे स्वप्न रंगवून, फसव्या व खोट्या प्रचाराने लोकांना भुरळ पाडून हिटलरने जर्मनीला (व पर्यायाने सर्व जगाला) दुसऱ्या जागतिक युद्धाच्या खाईत ओढले. सर्वंकषवादात स्वतंत्र विचाराला, संभाषणाला स्थान नाही. विभूतिपूजा (hero worship) व आंधळे आज्ञापालन (blind obedience) ह्यावरच त्याची उभारणी झाली असते. हिटलरने एकदा असे म्हटले होते असे म्हणतात, “Whenever I hear the word democracy Ireach for my gun.”
आत्यंतिक राष्ट्रीयता (extreme nationalism) व युद्धाचे गौरवीकरण (glorification of war) ही सुद्धा सर्वंकषवादाची प्रमुख लक्षणे आहेत. युद्धाच्या बाबतीत Hegel चा पुढील उतारा लक्षणीय आहे.

“It is in war that a nation displays its true nature. It is the perfect form of state activity. It is the very element in which the State is em bedded. War protects the people from the corruption which ever-lasting peace would bring upon them. There is an ethical element in war. War proves some to be gods and others to be mere men, by turning the latter into slaves and the former into masters war is just. Individuals are mere instruments for the fame and glory of the State.”

पुढे एका ठिकाणी तो म्हणतो “ Live dangerously and think with your blood.”
‘कल्पनारम्यवाद’ सर्वस्वी त्याज्य आहे असे मुळीच नाही. भावनांना जीवनांत विशेषतः कलांमध्ये – महत्त्व आहे. काव्याचा तर तो आत्माच म्हणता येईल. राजकारणात (सर्वंकषवादात) आपल्याला त्याचे जे स्वरूप दिसते ते भ्रष्ट (perverted) स्वरूप आहे. आज जरी सर्वंकषवाद – नाझीवादाप्रमाणे – फारसा दिसत नसला तरी कोणत्यातरी स्वरूपात तो पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनेक समाजांत रुजू पाहणारा ‘धार्मिक मूलभूत वादाचा’ (religious fundamentalism) तोंडवळा बराचसा सर्वकषवादा सारखाच आहे व त्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.