मी हे पुस्तक लिहिलं नसतं तर माझ्यासाठी बरं झालं असतं. फार फार बरं झालं असतं. हे लिहिणं मला नको इतकं महागात पडतंय.
किती प्रयत्न करते आहे, आठवायचा, पण आठवतच नाहीय, माझ्यावर पहिल्यांदा अत्याचार कधी झाला. मला जे आठवतं आहे, तीच पहिली वेळ होती की त्याआधीही असं घडलं होतं, आणि मी ते बाहेर येऊच दिलेलं नव्हतं.
या विचारांना काही अर्थ नाही, आणि ते आता महत्त्वाचेही नाहीत, हे कळतं मला; पण हे पुस्तक लिहिताना प्रत्येक वेळी मला माझ्या या विचारांशी लढावं लागतं, आणि ते माझा घात करतात.
कुठे होती माझ्या घरातली माणसं जेव्हा माझ्याशी भयंकर काही घडत होतं? मातीत जा सगळेजण, अरे कुणी एकानं तरी मध्ये हात घालून ते थांबवायला नको होतं का?
[श्रीमती पिंकी विराणी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या ‘बिटर चाकलेट’ या बाल-लैंगिक अत्याचारावरच्या भारतातल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून]