स्नेह.
सर्वेपि सुखिन: संतु — म्हणजेच सर्व लोक सुखी व्हावेत ही संकल्पना प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत ह्याला समांतर कल्पना “the greatest good for the greatest number” ह्या उपयोगितावादी तत्त्वज्ञानातून व्यक्त झाली आहे.
ह्याच संदर्भात चार्वाक किंवा लोकायत, ह्या प्राचीन भारतीय इहवादी विचारसरणीची आठवण होते. लोकायताचे वैशिष्ट्य असे समजतात की त्यात केवळ प्रत्यक्षच प्रमाण मानले जात असे. त्यामुळे शब्दाधारित वेद, अनुभवता न येणारे परलोक, व देव, ह्या तिघांनाही त्यात फेटाळून लावले होते. ह्या जगात प्रत्यक्ष अनुभवलेलेच खरे, बाकी आत्मा, पुनर्जन्म, परलोक, ह्या साऱ्या केवळ कल्पना.