हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता.