विषय «जात-धर्म»

जातिविग्रहाच्या मर्यादा व धोके

सध्या भारतात, विशेषतः उत्तर भारतात, मंडल आयोगाच्या काही शिफारसी केंद्र सरकारने अंमलात आणल्या म्हणून व्यापक प्रमाणात दंगली होत आहेत. राखीव जागांचे समर्थक व विरोधक मोठ्या अहमहमिकेने समर्थन व विरोध करीत आहेत. अशा वातावरणात पहिला बळी जातो तो विवेकाचा. या चळवळीत तरुण माणसे अविवेकी बनतात आणि उत्तर भारतात सवर्ण वर्गातील अनेक. रुणांनी आत्मदहन करून घेतले. त्यात दोघांचा बळी गेला. सरकारने विवेक दाखवला नाही तर अनेक लोकांचा बळी जातीजातीतील दंगलीत, गोळीबारात आणि आत्महत्येत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. सरकार जर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार नसेल, त्यांचे भवितव्य धोक्यात घालणार असेल, तर आत्मदहनाचा मार्ग कितीही आततायी असला तरी तो समजू शकण्यासारखा आहे असा युक्तिवाद राखीव जागांचे विरोधक करीत आहेत, तर कोणत्याही समाजसुधारणेस असा विरोध होतच असतो.

पुढे वाचा

फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने

हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता.

पुढे वाचा