सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमाराला कोरोनाने जरा उसंत दिली होती, तो फेब्रुवारी संपेसंपेतो त्याने पुन्हा विशाल आणि विक्राळ रूप धारण केले. ही दुसरी लाट अचानक अंगावर आल्याने नेत्यांपासून सामान्य माणसापर्यंत सगळ्यांचेच धाबे दणाणून गेले. आरोग्यसेवेबरोबरच इतर अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या. यातील यशापयशाची अनेक कारणे दिली गेली. कुंभमेळ्यापासून ते बंगालमधील निवडणुका आणि आरोग्यसेवेतील अपुऱ्या आणि भ्रष्ट व्यवस्था या सर्वांवर एकतर ताशेरे ओढले गेले किंवा स्पष्टीकरणे दिली गेली.
आरोग्यसेवेच्या ढिसाळपणात व्यवस्थेतील गलथानपणाबरोबरच मानवी वृत्तीतील हव्यास अगदी ठळकपणे समोर आला. व्यक्तिगतरीत्या माणूसपणात आपण किती आणि कसे कमी पडलो, पडतो याचे विदीर्ण करणारे चित्र उघड झाले.