मनोगत

गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 साली सुधारक या नावाचे साप्ताहिक सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे 1895 पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालवले. आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपूरे राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षांनंतर ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रध्दा, जादूटोणा, मंत्रतंत्र बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतकाच जोमाने सुरू आहे. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगुस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इत्यादी उपासतापासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोध्दार होताहेत आणि नवीन मंदीरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातीभेद अजून पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघडे आवाहान केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती असे म्हणण्याची पाळी आली आहे.

या सर्व शोचनीय स्थितीवर उपाययोजना करणे अतिशय कठीण आहे. आभाळच फाटल्यावर त्याला ठिगळ तरी कोठे कोठे लावणार ?  परंतु तरी या कामास प्रत्येकाने हातभार लावणे जरूर आहे असे आम्हाला वाटतेच आणि म्हणून त्यात आपला वाटा उचलणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.

हा प्रयत्न करण्याचा विचार आमच्या मनांत अनेक वर्षांपासून होता. त्यावेळी माझी पत्नी प्राध्यापक मनू गंगाधर नातू हिची त्याला प्रेरणा होती. अनेक कारणास्तव ते काम आम्ही पुढे ढकलत राहीलो. पण तेवढ्यात आमच्यावर एक दुर्धर आघात झाला. ३ एप्रील १९८८ रोजी श्रीमती नातूंचा एका शस्त्रकक्रियेनंतर अंत झाला. त्या धक्क्यातून सावरायला इतके दिवस लागले. आता अधिक विलंब लावल्यास कदाचित हे काम आपल्याच्याने कधी होणारच नाही अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून आता ते एकट्यानेच करायचे ठरवले आहे. त्यात अर्थात अनेक जिवलग मित्रांचे साह्य आहेच. पण त्यामागील स्पूर्तिप्रद प्रेरणास्रोत नाहीसा झाला आहे ही खंत आहे.

श्रीमती नातू हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त असूनही मनाने त्या अतिशय खंबीर, आनंदी आणि उत्साही होत्या. प्रखर बुध्दिमत्ता आणि अखंड व्यासंग यांच्या जोडीला समाजसुधारणेची तळमळ हा त्यांचा विशेष होता. दलित आणि स्त्रिया यांच्यावर शतकानुशतके होत आलेले अन्याय आणि अत्याचार यांनी त्या फार व्यथित होत . आगरकरांच्या सर्वांगीण सुधारणावादाने त्या भारलेल्या होत्या.  विवेकवादी जीवनाच्या स्वप्नाने त्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या.  आगरकरांचे विचार पुन्हा जनतेपुढे मांडायची त्यांची मनीषा होती. शारीरिक दौर्बल्यामुळे वैचारिक क्षेत्रातच काम करणे त्यांना शक्य होते,  आणि ते त्या यथा शक्ती करीत.  आगरकरांचे जवळपास नामशेष झालेले वाड्मय पुन्हा उपलबध्द करून देण्यासाठी त्यांनी १९८३ ते १९८६ सतत चार वर्षे खपून त्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकरिता संपादन केले. मरणापूर्वी आपल्या सर्व संपत्तीचा न्यास करून त्याचा विनीयोग अनौरस, अनाथ मुलींचे संगोपन, शिक्षण, विवाह, इत्यादीकरिता व्हावा अशी त्यांनी व्यवस्था केली. अशा या विवेकी, परोपकारी, तेजस्वी व्यक्तीचे स्मारक तिला अतिशय प्रिय अशा कार्याला वाहिलेले मासिक – पत्र चालवून करणे याहून चांगले अन्य कोणते असू शकेल ?

या मासिकपत्रात विवेकवादी तत्त्वज्ञानाचे सर्व बाजूंनी विवेचन आणि चर्चा करण्यात येऊईल. विवेकी जीवन म्हणेजे काय ? याचा सांगोपांग ऊहापोह त्यात क्रमाक्रमाने येईल. सत्य आणि असत्य, तसेच इष्ट आणि अनिष्ट यांचे निकष काय आहेत ? विशेषतः श्रध्दावादी आणि भावनावादी लोकांचे आक्षेप असे आहेत की श्रध्दा आणि भावना या दोहोंनाही मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे. म्हणून विवेकाला थोडा आवर घालायला हवा. हे आक्षेप कितपत समर्पक आहेत ? आणि अशाच प्रश्र्नांची हवी  तितकी चर्चा अजून मराठीत झालेली नाही अशी आमची समजूत आहे.  ती चर्चा घडवून आणणे हा या नव्या सुधारका चा एक प्रधान ऊद्देश आहे. त्याचा आरंभ म्हणून विवेकवादावरील एक लेखमाला आम्ही या अंकापासून सुरू करत आहोत.

विवेकवादाखेरीज व्यक्तीस्वातंत्र्य, समता, न्याय, इत्यादि मूल्यांचे विवेचन आम्हाला अभिप्रेत आहे.  आपल्या जीवनात विवीध प्रकारची विषमता फार मोठ्या प्रमाणात आढळते. उदाः वर्तमान कुटुंबसंस्था स्त्रियांच्या बाबतीत अतिशय अन्यायकारक असून तिच्यामुळे समाजातील दःखाचा फार मोठा भाग नर्माण होतो. तसेच जातीभेद आणि अस्पृश्यता ह्याही रूढी अतिशय अन्यायकारक आहेत आणि त्याचे खरे स्वरूप ग्रामिणभागात पहायला मिळते.

विचाराला चालना देणे हा नव्या सुधारकचा प्रथम हेतू असल्यामुळे त्यातून वाद आणि चर्चा उद्भवली तर ते आम्हाला इष्टच आहे. वाचकांनी पत्रांच्या रूपाने किंवा लेखांच्या रूपानेही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आम्ही त्याचे स्वागत करू. त्याचप्रमाणे वर उल्लेखलेल्या विषयांपैकी कोणत्याही विषयावर स्वतंत्र लिखाण कोणी पाठवल्यास आम्ही त्याचाही साभार स्वीकार करू.

दि.य. देशपांडे

(1917-2005)

 (‘आजचा सुधारक’च्या एप्रिल 1989 या  अंकातील संपादकीयावरून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.