आगरकर म्हणतात –

धर्ममंदिराची रचना श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे, असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाही व थारा नाही, या संबंधात बुद्धिवादाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो! एखाद्या दिवाळखोर कर्जबाजाऱ्यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहण्याचे धैर्य होत नाही, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबल झाली आहे त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वर्याकडून करवत नाही, त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती व त्यावर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही. या तीव्र धगीचा खरपूस ताव देण्यास तयार होण्यात त्यांची धडगत दिसत नाही! त्यांना अशी भीती वाटते की ते हिणकस ठरल्यास पुढे काय करावे? आम्हांस असे वाटते की असले भित्रेपण फार दिवस चालावयाचे नाही. विवेक पूर्ण जागृत झाला नव्हता तोपर्यंत विश्वासाने किंवा श्रद्धेने प्रत्येक गोष्टीत आपला अंमल चालविला यात काही वावगे झाले नाही. जसा लोकांस तसा मनास कोणीतरी शास्ता पाहिजे; व ज्याप्रमाणे मुळीच राजा नसण्यापेक्षा कसला तरी राजा असणे बरे, त्याप्रमाणे वर्तनाचे नियमन करणारे असे कोणतेच तत्त्व नसण्यापेक्षा विश्वासासारखे एखादे स्खलनशील तत्त्व असणेदेखील इष्ट आहे. पण हे कोठपर्यंत? अधिक चांगले तत्त्व अस्तित्वात आले नाही तोपर्यंत. ते आले की जुन्या प्रमादी तत्त्वाने आपली राजचिन्हे श्रेष्ठ तत्त्वाच्या स्वाधीन केली पाहिजेत. हे सरळ अधिकारान्तर येथून पुढे विश्वास आणि विवेक यांच्या दरम्यान होणार आहे व तसे होण्यातच मनुष्यतेस प्राप्त होण्यासारखे ऐहिक व पारमार्थिक सुख लौकर प्राप्त होऊ लागणार आहे अशी आमची समजूत आहे व ती तशी असल्यामुळे विश्वासावलंबी कल्पनांस विवेकाची आच देऊन झाळून पाहणे हे सुधारकाच्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य होऊन बसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.