संपादकीय

‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणाऱ्या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध आहे? आणि नव्या सुधारका’चे प्रयोजन काय आहे? हे प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे देण्याचा प्रथम प्रयत्न करतो.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नवा सुधारक’ हा जुन्या ‘सुधारका’चा नवा अवतार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहात आहोत. परंतु हे म्हणत असताना एक कबुली देणे आवश्यक आहे. आगरकरांच्या ‘सुधारका’चे तेज, सामर्थ्य आणि कर्तृत्व ‘नव्या सुधारका’त शतांशानेही असणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. आगरकर हे एक लोकोत्तर पुरुष होते, ते एक महान मानव होते. त्यांची प्रतिभा चतुरस्र होती. कोणताही विषय तिला वर्ज्य नव्हता, मग ते राजकारण असो, समाजकारण असो, साहित्य असो की व्याकरण. आणि त्यांची लेखणी एका अद्वितीय शैलीने त्या सर्व विषयांत लीलया संचार करीत असे, त्यांच्या तुलनेत आम्ही कःपदार्थ आहोत याची आम्हाला चांगली कल्पना आहे. असे असूनही आम्ही आपल्या मासिकाला त्यांच्या साप्ताहिकाचे नाव देत आहोत याचे कारण आम्ही त्यांचेच काम पुढे चालवीत आहोत अशी आमची भावना आहे. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी जे करण्याचा प्रयत्न केला, आणि जे त्यांनी मोठ्या प्रमाणात साध्यही केले, तेच कार्य आज आम्ही करीत आहोत, आणि त्याच्या सिद्ध्यर्थ यथाशक्ति प्रयत्न करण्याचा आमचा दृढसंकल्प आहे.

आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतर ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इत्यादि गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इत्यादि उपासतापासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद अजून पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघडे आवाहन केले नाही अशी आमची समजूत आहे. ती चर्चा घडवून आणणे हा ‘नव्या सुधारका’चा एक प्रधान उद्देश आहे. त्याचा आरंभ म्हणून विवेकवादावरील एक लेखमाला आम्ही या अंकापासून सुरू करीत आहोत.

विवेकवादाखेरीज व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादि मूल्यांचे विवेचन आणि समर्थन आम्हाला अभिप्रेत आहे. आपल्या जीवनात विविध प्रकारची विषमता फार मोठ्या प्रमाणात आढळते. उदा. वर्तमान कुटुंबसंस्था स्त्रियांच्या बाबतीत अतिशय अन्यायकारक असून तिच्यामुळे समाजातील दुःखांचा फार मोठा भाग निर्माण होतो. तसेच जातिभेद आणि विशेषतः अस्पृश्यता ह्याही रूढी अतिशय अन्यायकारक आहेत आणि त्यांचे खरे स्वरूप ग्रामीण भागात पाहायला मिळते. या सर्व विषयांची चर्चाही या मासिकात येईल. याचाच भाग म्हणून विवेकवादाचे एक जगप्रसिद्ध पुरस्कर्ते, थोर विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्या Marriage & Morals या ग्रंथाचा अनुवाद या अंकापासून क्रमशः देत आहोत. रसेल यांची मते आणि शिफारसी वाचकांना विवाद्य वाटतील यात शंका नाही. परंतु विचाराला चालना देणे हा नव्या ‘सुधारका’चा प्रधान हेतू असल्यामुळे त्यातून वाद आणि चर्चा उद्भवली तर ते आम्हाला इष्टच आहे. वाचकांनी पत्रांच्या रूपाने किंवा लेखांच्या रूपानेही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्याचप्रमाणे वर उल्लेखलेल्या विषयांपैकी कोणत्याही विषयावर स्वतंत्र लिखाण कोणी पाठविल्यास आम्ही त्याचाही साभार स्वीकार करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.