‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ

दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म. गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक’ चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत.

‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन ३ एप्रिल १९९० रोजी विदर्भ साहित्य संघाच्या गडकरी सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. ३ एप्रिल हा श्रीमती म. गं. नातू यांचा दुसरा स्मृतिदिन. प्रकाशनसमारंभ वि.सा. संघ आणि ‘नवा सुधारक यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. य. दि. फडके हे होते. समारंभाचे अध्यक्षस्थान न्या.मू. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी भूषविले होते. समारंभाचे प्रास्ताविक वि. सा. संघाचे अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकरांनी केले. प्रा. दि. य. देशपांडे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. प्रा. भा. ल. भोळे यांनी ‘नवा सुधारका’चा सहकारी लेखक या नात्याने आपले विचार मांडले. सभेचे संचालन ‘नवा सुधारक’च्या वतीने प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांनी केले.

या प्रसंगी झालेली सगळीच भाषणे विचारप्रवर्तक होती. त्यांचा सारांश देत आहोत. प्रा. य. दि. फडके यांचे भाषण थोडे अधिक विस्ताराने ‘खरा सुधारक कोण?’ या शीर्षकाने स्वतंत्रपणे दिले आहे.

प्रा. राम शेवाळकर: श्रीमती मनुताई नातू यांच्या स्मृतिनिमित्त त्यांचे पती प्रा. दि. य. देशपांडे यांनी ‘नवा सुधारक’ ही मासिकपत्रिका काढण्याचा मनोदय माझ्याजवळ व्यक्त केला तेव्हा या प्रकल्पाचे मी मनापासून स्वागत केले. प्रा. श्रीमती नातू यांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मला मराठी शिकवले. पण मराठी शिकवत असताना त्या शिकवण्याच्या निमित्ताने त्यांनी जे काही दिले ते फार मोलाचे होते. मनूताईंच्या वाङ्मयीन तपस्येच्या मानाने त्यांचे लेखन कमी असले तरी समग्र आगरकर वाङ्मयाचे त्यांनी केलेले संपादन हे त्यांचे एक ऐतिहासिक कार्य आहे. त्यांची वि. सा. संघाबद्दल असलेली आपुलकी आणि अभिमान एका हळव्या संबंधामध्ये रूपांतरित झाला आहे. त्यांची बहुमोल ग्रंथसंपदा त्यांनी वि. सा. संघाला दिली आहे. त्यांचे आकांक्षित आणि उर्वरित काम ‘नवा सुधारका’च्या रूपाने प्रा. दि. य. देशपांडे सुरू ठेवणार आहेत. या प्रकल्पामध्ये अनेक आह्वाने आहेत आणि त्याची देशपांड्यांना जाणीवही आहे. परंतु समाजाकडे जागरूक दृष्टीने पाहणारे जे आपण त्या आपले ह्या कार्याप्रती काही कर्तव्य आहे की नाही? आपण सर्वांनी या कार्याला भरपूर साहाय्य केले पाहिजे. कुचराई करण्याची, सबब सांगण्याची परिस्थिती समाजाची, मध्यमवर्गाची आता राहिलेली नाही.

प्रा. दि. य. देशपांडे: ‘नवा सुधारक’ हा आगरकरांच्या सुधारकाचा नवा अवतार आहे असे आम्ही समजतो. आम्ही तसे म्हणतो खरे, परंतु त्यांच्यासारखे तेजस्वी लिखाण आपण करू शकू अशी आमची समजूत नाही. ‘नवा सुधारका’च्या द्वारे आम्ही त्यांचे काम करू शकू अशी आम्हाला आशा मात्र आहे.

प्रा. भा. ल. भोळे: प्रा. देशपांड्यांनी हा जो औचित्यपूर्ण उपक्रम सुरू केला त्यात मीही सहभागी आहे याचा मला आनंद वाटतो. त्यांचा हा नवा संकल्प आगरकरांचा वैचारिक वारसा आणि वसा नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा एक आनंददायी उपक्रम आहे. ‘नवा सुधारक’ या नावाने केवळ काळातला बदल एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. सामाजिक प्रश्नांचा नव्याने विचार आपल्याला करावा लागणार आहे हे त्या नावाने सूचित व्हावे. आगरकर आणि फुले या समकालीनांचे साध्य एक असले तरी त्यांनी परस्परांची दखल घेतली होती असे दिसत नाही. नाही म्हणायला एके ठिकाणी आगरकर फुल्यांचा रेव्हरंड फुले असा किंचित् उपहासपूर्ण उल्लेख करतात. फुले मात्र आगरकरांचे नावसुद्धा घेत नाहीत. त्यांच्यात मतभेद असले तरी ते महात्म्यांचे मतभेद आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. आज मात्र काही अंशी आगरकर-फुले ही दरी कमी झाली आहे. ‘नवा सुधारक’ ही एक व्यापक संदर्भ असलेली चळवळ आहे, आणि तिला बृहत्तर वाचकवर्गाचे सहकार्य अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. अशी नियतकालिके केवळ पैशाने चालत नाहीत. ही पत्रिका आणि वाचक यांच्यात एक जैव-संवाद सुरू झाला तर तो आपल्याला हवा आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू या.

न्या. मू. चंद्रशेखर धर्माधिकारी: विदर्भातीलच काय महाराष्ट्रातीलही स्त्री-शक्तीचा आणि स्त्री-मुक्तीचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यात श्रीमती मनुताईंचा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही यात मला शंका नाही. मनुताई सदैव जोमाने, नव्या दमाने, तडजोडी न करता जगल्या. प्रकृतीच्या प्रतिकूलतेमुळे त्यांच्या कामाला मर्यादा पडल्या नसत्या तर त्यांचे विचार आणि तळमळ अधिक व्यापक झाली असती. त्यांच्या समकालीनांपैकी पुष्कळ विदुषी म्हणण्यासारखे काही न करता पुढे आल्या होत्या. पण वर उल्लेखिलेल्या मर्यादांमुळे त्यांना इतके पुढे येता आले नाही.

आता आपल्या विदर्भातही मुंबईकडची हवा येऊ लागली आहे. फ्लॅट संस्कृती आली आहे. शेजारी आहेत पण शेजारधर्म नाही. आम्ही सोबत राहातो पण सोबत जगत नाही. पथनाट्यकार हश्मी म्हणतो –

सवालोंसे घिरे हैं, हमें जवाब चाहिये ।।
अब तो जवाबही सवाल हो गये, इन्किलाब चाहिये ।।

धर्म आणि अध्यात्म यांच्याशी सुधारणांची गल्लत करणारी माणसे क्रान्ती करू शकत नाहीत. मुक्तीचा मार्ग दाखवायला निघालेल्यांना साधा पोष्टाचा मार्ग माहीत नसतो. कुसुमाग्रज म्हणतात तसे माणूस आयुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे. शंभर मैलांच्या वाळवंटापेक्षा शंभर फुटांची फुलबाग महत्त्वाची आहे. गांधींच्या अनेक चळवळी अयशस्वी झाल्या. पण गांधी म्हणत, त्या अल्पयशस्वी झाल्या. नागपुरात अजूनही चांगल्या गोष्टींना माणसं कमी पडत नाहीत, पैसा कमी पडत नाही. पण हे न मागता मिळाले पाहिजे. आगरकरांचे अनुयायी म्हणून देशपांड्यांनी हे पाऊल टाकले आहे असे नसून उत्तराधिकारी म्हणून टाकले आहे असे मी समजतो. या त्यांच्या उपक्रमातून सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्यांना शिदोरी मिळेल; जे पाथेय लागते ते इथे मिळेल अशी आशा करू या. गांधींचे सर्वोदय, हरिजन घाट्यात चालले, पण त्यांच्या वेडात जे शहाणपण होते ते शहाण्यांच्या शहाणपणात नव्हते. सामाजिक जीवनाचे आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवण्याचे वेड कोणीतरी करायला हवे. प्रा. देशपांडे त्यासाठी पुढे आले आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.