पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर

संपादक,
नवा सुधारक यांस,
सप्रेम नमस्कार

आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ थत्ते इत्यादींनीही आपापल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ती पत्रे आपण माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पहिली गोष्ट अशी की कोठल्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या प्रश्नाकडे बघितले जावे ह्यासाठीच मी माझे पत्र एखाद्या धर्माच्या कैवारी वृत्तपत्राला न लिहिता आपणांस लिहिले आहे. तसेच माझ्या पत्राकडे ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ ह्या हेतूने लिहिलेला मजकूर म्हणून पाहिले जावे व त्यातील शब्दांच्या अधिकउणेपणाकडे दुर्लक्ष करावे, ही नम्र विनंती. ह्या पत्राच्या लांबीला मर्यादा असल्यामुळे मी सर्व पत्रांतील सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊ शकणार नाही. काही महत्त्वाचे मुद्दे तेवढे घेईन.

माझा प्रश्न ‘दंगलींच्या संदर्भात हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय’ असा आहे. मुख्यतः प्रकाशित पत्रांपैकी ज्यांच्याशी माझा मतभेद आहे त्यांचा विचार आधी करतो. डॉ. के. रा. जोशी म्हणतात की रामजन्मभूमी ही वर्षानुवर्षे बहुसंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे हे विधान वस्तुस्थितीचे वर्णन म्हणून मला मान्य आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न ते श्रद्धास्थान असावे काय असा आहे. मला एकतर श्रद्धा नको कारण श्रद्धा म्हणजे कोणतीही गोष्ट न तपासता स्वीकारणे. ते मला करावयाचे नाही, आणि बहुसंख्य लोक एखादी गोष्ट करतात तरी ती योग्य आहे असे मला वाटत नाही व त्यामुळेच तर सारा प्रश्न आहे. माझ्या मते बहुसंख्येचा आणि योग्यायोग्यतेचा अजिबात संबंध नाही. त्याचप्रमाणे वागताचे समर्थन करण्यासाठी डॉ. जोशी लोकशाहीचा उल्लेख करतात. माझ्या समजुतीप्रमाणे लोकशाहीतील बहुमत एखादी कृती योग्य आहे असे सांगत नसते तर त्या बाबतीत बहुमताप्रमाणे कार्य घडल्यास संघर्ष टळू शकेल एवढेच सांगत असते. Consensus काय आहे हे सांगत असते. लोकसभेमधले नेते हे सारे विवेकी नसतात. ते लोकमताचे वारे कसे वाहत आहेत तेवढे लोकसभेत सांगत असतात. किंबहुना ते नेते नसतात, प्रतिनिधी असतात. आपल्या भारतातील बहुसंख्य लोक आजही पृथ्वी स्थिर असून सूर्यचन्द्र तिच्याभोवती फिरतात असे मानत असतील. पूर्वी तर सारेच तसे मानत होते. तशी त्यांची श्रद्धा होती. पण म्हणून तेवढ्यानेच बहुसंख्यकांचे मानणे वस्तुस्थितीला धरून असते काय? थोडक्यात काय तर बहुसंख्य भारतीय जनतेने एखाद्या भूमिखण्डावर तेथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म झाला अशी श्रद्धा ठेवल्याने व असा आरोप केल्यानेच केवळ ती तशी होते काय? आम्ही कोणत्याच श्रद्धा बाळगू नये असे जेव्हा मला वाटते तेव्हा रामजन्मभूमीचाही त्यामध्ये समावेश असतो.आणि फक्त एकाच पक्षाचे लोक गठ्ठा मताचे लालची आहेत असे मला वाटत नाही, पण माझ्या मूळ प्रश्नाशी ह्या बाबींचा संबंध येत नसल्यामुळे मी त्या वादात पडू इच्छीत नाही.

हिंदुस्थानातील बहुसंख्य हिन्दुसमाज हा सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, एकात्मता, शान्तिप्रियता ह्यांच्याकडे स्वाभाविकपणे झुकणारा आहे’ असेही डॉ. जोशी म्हणतात. त्यामध्ये त्यांनी समता ह्या मूल्याचा अन्तर्भाव कसा केला नाही मला कळत नाही. (त्यांची बहुधा ‘चातुवर्यं मया पृष्टं’ ह्या वचनावर श्रद्धा असावी.) परंतु त्यांनी जी विशेषणे हिन्दू समाजाला लावली आहेत ती बहुतेक सारीच मला विवाद्य वाटतात.

सर्वधर्मसमभावाबद्दल फारतर आपण असे म्हणू शकतो की बहुसंख्य हिंदूंची इस्लाम व वैस्त्य हे दोन धर्म सोडल्यास इतर धर्मांना बरोबरीने वागविण्याची दिखाऊ तयारी आहे. सहिष्णुतेबद्दल म्हणावे तर महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेबांचे नाव एखाद्या विद्यापीठाला देण्याबद्दल आणि त्यांचे लेख शासनाने प्रसिद्ध केल्यामुळे रणे माजतात. एकात्मता म्हणावी तर रोज सकाळ संध्याकाळ दूरदर्शन आणि आकाशवाणी ह्यांना एकात्मतेच्या नावाने आक्रोश करावा लागतो आणि आमची शांतिप्रियता सिद्ध करण्यासाठी शासनाला द्वारकापीठाधीश श्रीमच्छङ्कराचार्यांना चुनारच्या किल्ल्यात बंदोबस्ताने न्यावे लागते. ते ही सारे असो. कारण माझ्या ह्या पत्राचा हेतु त्यांच्या विधानाचे खण्डन करणे हा नाही. माझ्या पहिल्या पत्राच्या साह्याने मला ह्या प्रश्नाच्या ज्या अंगांची चर्चा अभिप्रेत होती तिकडे मी आता वळतो.

हिन्दुधर्मीयांमध्ये साधनांची अनेकता असली तरी त्यांची ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ असावयास पाहिजे असे लो. टिळकांना वाटत होते. स्वा. सावरकरांना हिन्दुधर्म त्याहून अधिक विशाल व सहिष्णु करण्याची गरज वाटली. वेदप्रामाण्याची अट त्यांनी काढून घेतली. त्यांनी हिन्दुत्वासाठी आधार एकभूमित्वाचा घेतला. कारण खरोखरच सर्व हिंदूंना समान असे कर्मकाण्ड (किंवा विधिविधान) आणि तत्त्वज्ञान वा आचारतत्त्वे असलेली आढळत नाहीत आणि त्यामुळेच माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात. हिन्दू म्हणविण्यासाठी भारत ही पुण्यभू-पितृभू असणे ही अट आहे – स्वा. सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे- आणि ती का, तर दुसरे समान तत्त्व सापडत नाही म्हणून, असे मला वाटते.

आपण आता एक कल्पना करू या. काही हिन्दूंनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करिले आणि उद्या अमेरिकेने भारताकिद्ध लढाई सुरू केली. अशावेळी त्या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्या हिन्दूंना आपल्याच पूण्यभूविरुद्ध लढावे लागले तर… तर ‘हिन्दू ‘म्हणून त्यांना त्यांच्या नागरिकत्वाचा त्याग करावा लागेल किंवा त्यांना धर्माचा त्याग करावा लागेल. स्वतःच्या स्वार्थापोटी आजही ते अमेरिकेचे हिन्दू नागरिक ह्या आमच्या पुण्यभूच्या आर्थिक शोपणात तेथल्या आपल्या देशबांधवांना सामील आहेत. पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत तेही करीत आहेत. पण ते त्यांना कळत नाही. परदेशात फक्त श्री सत्यनारायणपूजा करीत राहिल्याने किंवा हरे कृष्ण हरे राम ह्यांचा जप केल्याने त्यांचे हिन्दुत्व कायम राहत नसते असे मला वाटते, म्हणून माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात. थोडक्यात काय तर परक्या राष्ट्राचे नागरिकत्व पत्करल्याबरोबर हिन्दूंचे हिन्दुत्व धोक्यात येते; माझ्या मते नष्टच होते. नागरिकाच्या निष्ठा त्याच्याच राष्ट्रावर असणे अत्यावश्यक आहे. नागरिकत्व एका देशाचे आणि निष्ठा दुसऱ्या देशावर असे असल्यास माझ्या दृष्टीने तो व्यभिचार होईल. मी आपणाला विचारलेला प्रश्न ह्या दृष्टीने होता. मला जे वाटते ते बरोबर आहे काय?

ईश्वर न मानणाऱ्यांनी हिन्दुधर्म सोडला असे होत नाही हे मला मान्य आहे. मग ईश्वर ने मानता अल्ला मानल्याने किंवा Trinity मानल्याने हिन्दुधर्म सोडला असे का होते? एक शंका आली. फक्त त्या धर्मकल्पना सांगणारे पुरुष सिन्धुनदीच्या पलिकडे जन्मले म्हणून? गीतेऐवजी वा वेदाऐवजी दीक्षा घेऊन धम्मपदाचा वा ग्रन्थसाहेबाची अभ्यास केल्याने हिन्दुत्वाचा त्याग होत नाही. मग दीक्षा घेऊन बायबल किंवा कुराणातील धर्मतत्त्वांचे अध्ययन केल्याने हिन्दुत्वाचा त्याग कसा होतो? दीक्षेला हिन्दुधर्मामध्ये इतके महत्त्व तर आपण दिलेले नाही.

मी समजा बौद्ध, जैन किंवा लिंगायत धर्म दीक्षा घेऊन स्वीकारला तरी माझे धर्मबान्धव मला हिन्दूच म्हणतील, तसा कायदाच आहे, असे डॉ. जोशी म्हणतात. आजचा कायदा काय आहे ते मला नको आहे. (कायदा गाढव असू शकतो- तो उद्या बदलू शकतो).

हिन्दुधर्माची अशी कोणती ‘सनातन’ तत्त्वे आहेत की जी मला इतर (मुख्यतः इस्लाम) धर्मापासून वेगळे काढतात व हिन्दू ठरवितात ते मला समजून घ्यावयाचे आहे!

समजा उद्या अखण्ड भारताची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे भारताचे राज्य सिन्धु नदीपर्यंत पोचले आणि आपण पादाक्रान्त केलेल्या प्रदेशाला अर्थात् भारत म्हणू लागलो; तर हिन्दुत्वाच्या
आसिन्धुसिन्धुपर्यता यस्य भारतभूमिका । पुण्यभू: पितृभूश्चैव से वे हिन्दुरिति स्मृतः ।।
ह्या व्याख्येप्रमाणे त्या भूमीवर राहणारे सगळे लोक धर्मान्तर न करता हिन्दू म्हणविले जातील काय? सगळ्या हिन्दूंना एकत्र बांधणारा धागा कोणता? व्रात्यप्टोम विधीने प्रायश्चित्त देऊन ज्यांचे शुद्धीकरण करण्यात येते त्यांना त्यांच्या पूर्वीच्या धर्मामध्ये नसलेली व सर्व यच्चयावत् हिन्दूंना मान्य असलेली अशी कोणती धर्मतत्त्वे सांगण्यात येतात ते मला माहीत नाही; मला समजून घ्यावयाचे आहे. की ते एखादे कर्मकाण्ड असते? पण कर्मकाण्डाविषयी तर हिन्दुधर्माचा आग्रह नाही. कर्मसिद्धान्तही न मानता व ईश्वरही न मानता मी हिन्दू राहू शकतो असे सर्व पत्रलेखकांनी ठासून सांगितले आहे आणि मला ते पूर्वीपासून माहितही आहे. पण त्यामुळेच रामजन्मभूमीचा वाद माझ्यासाठी फार बिकट होतो असे माझ्या ध्यानात आले होते व त्यासाठी मी त्याचा उल्लेख मागच्या पत्रात केला होता.

ईश्वरच नाही तर अवतार कसा मानता येईल? आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवल्याशिवाय अवतार कसा मानता येईल? माझ्या मते ईश्वरच नाही व तो अवतारही घेत नाही. त्यामुळे राम हा अवतार असू शकत नाही, आणि अयोध्येला ईश्वराचा जन्म झाला नाही; ईश्वरांशाचाही झाला नाही; कारण ईश्वरच नाही! वेदोक्त धर्माचे पालन करणारे दयानन्दसरस्वत्यनुयी अवतार मानणाऱ्यांना पाखंडी मानतात. त्यांच्या लेखी अयोध्या वा मथुरा ह्यांच्या ठिकाणी पावित्र्य नाही. ते मुहूर्तही मानीत नाहीत; त्यांच्यासाठी सारे दिवस सारखे. तरी बहुसंख्य लोक आर्यसमाजींना हिन्दू – कट्टर हिन्दू मानतात हे कसे? ईश्वराला न मानणारे आणि सर्व मानव समान असावे हे तत्त्व मूल्य म्हणून मानणारे जे कोणी आहेत त्यांना अयोध्या किंवा मथुरा ही स्थाने माझ्या समजुतीप्रमाणे इतर कोणाच्याही जन्मस्थानापेक्षा अधिक पवित्र मानण्याचे कारण नाही. त्यांना महापुरुपही मान्य नाहीत. त्यांच्या लेखी सारे सारखे, त्यांना पवित्रापवित्रही काही नाही. कारण त्यांना सर्वत्र समभाव हवा आहे. माझा मुद्दा पुढे आणखी स्पष्ट होणार आहे.

समजा खरोखरच अयोध्येला रामाचा जन्म झाला असला व तेवढ्यामुळेच बावराने त्या जागी कोणाकरवी मशीद बांधविली असली तरी त्याचा आज सूड घ्यावा काय? माझा प्रश्न What should we do असा नसून What ought we to do? असा आहे. मी इसापनीतीतल्या कोकराची गोष्ट तेवढ्याचसाठी लिहिली आहे.

जन्माने हिन्दू असलेल्या पण ईश्वर न मानणाऱ्या मला अयोध्येच्या ठिकाणी पावित्र्य जाणवत नाही. पावित्र्यच जाणवत नसल्यामुळे विटंबनाही जाणवत नाही. त्यामुळे माझी फार पंचाईत होते. त्याचप्रमाणे समतेचे मूल्य एकदा मान्य केल्यावर (जे आमच्या संविधानानेही आम्हाला बहाल केले आहे) माझा अपमान कशाने होतो ते मला पुनःपुन्हा तपासून पाहावे लागते. मी इतरांपेक्षा स्वतःला वेगळा, श्रेष्ठ मानत असेन, समता एक मूल्य म्हणून मी मानत नसेन तर माझा अपमान कशाने होतो ते मला चटकन कळते. पण माझ्या मनात श्रेष्ठ कनिप्ठ भाव नसेल, आपपर-भाव नसेल, मी इतरांच्या बरोबरीचा असेल, तर मानापमानाला माझ्या मनात थारा नको. ईश्वर नसेल व त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ व पवित्रापवित्र अशी स्थाने नसतील तर मी अयोध्येच्या प्रश्नावर कोणती भूमिका घ्यावी? मला तेथे मशीदही दिसत नाही, रामजन्मभूमीचे पावित्र्यही मला जाणवत नाही. मला तेथे दगडमाती दिसते आणि आजची कृती एकाने ठेवलेली दगडमाती पाहून दुसऱ्याने तेथे ती रचावयाची व त्यासाठी रक्तपाताची तयारी ठेवावयाची व तो होऊ नये म्हणून सरकारने आणखी जय्यत तयारी करावयाची हे सारे करुणास्पद वाटते. माझे असे वाटणे बरोबर आहे ना?

बाबराने तत्कालीन लोकांच्या धर्मश्रद्धांना अवमानित करण्याच्या उद्देशाने केलेली कृती कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. मला त्याचे समर्थन अजिबात करावयाचे नाही आणि ते बांधकाम पाडू नका असे आज म्हणणाऱ्यांचेही मुळीच समर्थन करावयाचे नाही. पण त्याने साडे चारशे वर्षांपूर्वी आमचे बांधकाम पाडून जी चूक केली तीच आज आम्ही केल्यासारखे होत नाही काय?

बाबर असहिष्णु होता, बुतशिकन होता. जिहाद करू पाहत होता. पण आम्ही तर सहिष्णु आहोत, आम्हाला धर्मयुद्ध करावयाचे नाही – मग आमच्यापैकी काहींनी त्या स्थानाला पावित्र्य चिकटवून ह्या विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात पूर्वीच्याच चुका करावयाच्या काय आणि आम्ही त्या निमूटपणे बघत राहायच्या काय? आम्ही दगडामातीतून प्रेरणा घ्यावयाची काय? आम्ही संस्कारापेक्षा विवेकाची कास धरली पाहिजे आणि इतिहासाचे अध्ययन आमच्या चुका टाळण्यासाठी केले पाहिजे असे माझ्याप्रमाणे आपणाला वाटत नाही काय?

आज सर्व क्षेत्रांत असलेली विषमता घालवून आम्हाला समता आणावयाची आहे ना? हिन्दूंना समता आणि सहिष्णुता मान्य आहे ना? मी ईश्वर मानीत नसलो तरी मला ते हिन्दू मानावयाला तयार आहेत ना? मग रामाला इतरांपेक्षा थोर मानल्यामुळे समतेच्या तत्त्वाला बाधा येते हे ते का समजू शकत नाहीत? मी त्यांना ते कसे समजावून देऊ. त्यांच्या कृतीमधील विसंगती त्यांच्या कशी ध्यानात आणून देऊ? गाये ही माता नसून पशू आहे असे म्हणणाच्या स्वा. सावरकरांचा वारसा सांगणाऱ्यांना ती मशीद नसून दगडमाती आहे हे वेगळे सांगावे लागू नये. ते माझ्या पहिल्या पत्रातून लक्षात यावे. हा माझा हेतु विफल झाला आहे व ते गाईलाच देव मानीत राहिले आहेत. बाबरासारखेच तेही दगडालाच महत्त्व देत आहेत. बाबराने दगडाला दगड मानले असते तर त्याने आपले हिन्दूंचे मंदिर पाडले नसते. पण आज तर आपण त्याच्या मशिदीला दगड मानू शकतो. त्या दगडाकडे दुर्लक्ष करू शकतो व त्याने केलेली चूक टाळू शकतो! दगडाला लाथ मारल्याने कोणाचाच अपमान होत नसतो. मूर्तीला लाथ मारल्याने तिच्या ठिकाणी जो देव मानतो त्याचा अपमान होत असतो. जो देवच मानीत नाही तो मूर्तीमध्ये त्याची कल्पना करू शकत नाही. मूर्तीच्या अपमानामुळे जर सर्व हिन्दूंचा अपमान होत असेल तर त्या सर्व हिन्दूंनी ईश्वर मानला पाहिजे व माझ्यासारख्या ईश्वर न मानणाऱ्याला हिन्दुधर्मात थारा न दिला पाहिजे व ईश्वर न मानणारे, अश्रद्ध असणारे हिन्दू नाहीत असे स्पष्टपणे म्हटले पाहिजे. कारण श्रद्धेशिवाये धर्म नाही. मला त्यांच्या कृतीतील विसंगतीकडे लक्ष वेधावयाचे आहे. मी हिन्दू नाही असे एकदा ठरले की आपोआपच बावरी मशिदीच्या वादात मी हिंदूंच्या बाजूने नाही, मी मुसलमानही नाही व मी दोन्ही पक्ष चुकीचे आहेत असे मानणारा आहे असे म्हणणे मला सोपे जाते. माझा अपमान होत नाही. पण आज बाह्यतः मी हिन्दू गणला जातो. त्यामुळे माझाही अपमान झालाच पाहिजे असे माझ्या ‘धर्मबांधवांना’ वाटते आणि मी कात्रीत सापडतो.

एका बाजूला सर्वसमावेशकतेचा, सर्वधर्मसमभावाचा आव आणावयाचा व दुरारीकडे मुख्यतः एकाच धर्माच्या लोकांबद्दल अत्यंत संकुचितता धारण करावयाची ही ती विसंगती आहे. दिवाकर मोहनीने ईश्वर मानला नाही तरी तो हिन्दू व त्याला क्षमा – इतरांना ईश्वर मानूनही नाही – ते अविंध आणि शिखानष्ट! कोणाचे शुद्धीकरण झाले तर आनन्दित व्हावयाचे. कोणी धर्मान्तर केले तर, परधर्मीयांची संख्या वाढली म्हणून व्यथित व्हावयाचे ही विसंगती आहे. त्यापेक्षा हा भेदभाव मान्य करावा व आम्ही सारे मूर्तिपूजक, आम्ही सारे अवतार मानणारे आहोत – तो जे मानत नसतील ते हिन्दू नाहीत. त्यांना बहिष्काराची शिक्षा भोगावी लागेल असे स्पष्ट म्हणावे. मला वाटते हिन्दुसमाजाजवळ एकतर सर्वधर्मसमभाव नसावा किंवा आपपरभाव अधिक तीव्र असावा, बाबरी मशिदीचा विवाद वाढविणे म्हणजे अल्पसंख्यकांनी दुय्यम दर्जाचे नागरिकत्व स्वीकारण्याची तयारी ठेवावी अशी त्यांना ताकीद दिल्यासारखे मला भापते. बाबराने त्याच्या वंशजांनी गाय मारली आहे यात संशय नाही, पण म्हणून आम्ही आज वासरू मारायचे काय? ते अनुदार आहेत म्हणून आम्ही अनुदार व्हावयाचे काय? आणि दगडाला देव मानून धर्मांधतेला धर्मांधतेने उत्तर देणे व त्याचे राजकीय भांडवल करणे योग्य आहे काय? हे मला पडलेले प्रश्न आहेत.

आता एकच मुद्दा राहिला. तो म्हणजे बहुसंख्येच्या जोरावर काहींनी अल्पसंख्यकांवर वर्चस्व गाजविण्याचा. लोकशाही कशासाठी असावी तर कोणी एक राजा असू नये ह्यासाठी. हुकूमशाही असू नये ह्यासाठी. कोणीही कोणावर राज्य करू नये ह्यासाठी. ह्या कोणीही मध्ये बहुसंख्यसुद्धा आले. Democracy ही जशी autocracy असू नये तशी ती प्रच्छन्न oligarchy ही असू नये. आमच्या प्रदेशात आम्ही बहुसंख्य असा भाव ज्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे ते सारे जन्मान एका धर्माचे, एका पंथाचे, एका जातीचे वा एक भाषा बोलणाऱ्यांचे गट आहेत. ते समान विचारामुळे एकत्र आलेल्यांचे गट नाहीत. ते सारे आम्हाला खऱ्या लोकशाहीपासून म्हणजेच वैयक्तिक स्वायत्ततेपासून, स्वातन्त्र्यापासून, स्वातन्त्र्यापासून वंचित. करू पाहणारे आणि चोरवाटेने oligarchy आणू पाहणारे लोक आहेत अशी माझी खात्री होत चालली आहे. शिवाय ते ‘आम्ही जन्माने एका धर्माचे (पंथाचे, भाषेचे वगैरे) आहोत म्हणून आम्हास एका मताचे, एका विचाराचेच असावयास पाहिजे’ असे मानणारे आहेत. त्यामुळे मला एवढेच म्हणावेसे वाटते की, ‘रात्र वैऱ्याची आहे, तेव्हा लोकहो, जागे राहा!’

माझी ह्या पत्रातली भूमिका अतिरक्त आदर्शवादी आहे असे आपणांस वाटेल. तशी ती आहे. पण आदर्शवाद आणि अतिरेकी आदर्शवाद ह्यामधली विभाजनरेषा, (डोळस) श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामधल्या विभाजनरेषेसारखीच मला सापडत नाही. ती विभाजनरेषा शोधण्यास आपण मला मदत केल्यास मी आपल्या सर्वांचा आभारी होईन.

पत्र बरेच लांबले ह्याबद्दल माफी असावी.

आपला दिवाकर मोहनी
धरमपेठ, नागपूर, ४४००१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.