ह्या विशेषांकाविषयी

नवा सुधारकाचा हा वा.म. जोशी विशेषांक वाचकांच्या हाती देताना आमची मनोवस्था काही संमिश्र अशी झाली आहे. जुलै ९० च्या अंकात आम्ही हा अंक काढणार असल्याचे जाहीर केले तेव्हा विशेषांक प्रकाशित करणे किती दुरापास्त असते याची आम्हाला कल्पना होती. साहित्य वेळेवर मिळणे कठीण असते, हे एक तर खरेच; पण त्याचा आम्हाला फारसा प्रतिकूल अनुभव आला नाही. ज्यांनी लेख देण्याचे मान्य केले त्यांनी बहुतेकांनी वेळेवर लेख पाठविले. पण त्यात दुसरी एक अडचण आली. जुलै अंकात या संकल्पित अंकास कल्पना देताना आम्ही असे म्हणालो होतो की वा. म. जोशी यांच्या सर्वच लिखाणात एक विवेकवादी सूत्र सर्वत्र असलेले दिसून येते, आणि या विवेकवादी सूत्रावर मुख्यत: प्रकाश टाकला जावा असे आम्हाला अभिप्रेत होते. पण ही गोष्ट पुरेशा स्पष्टपणाने व्यक्त केली न गेल्याने लेखकांचे तिकडे दुर्लक्ष झाले. परिणाम असा झाला की काही लेख प्रामुख्याने साहित्यिक समीक्षेच्या स्वरूपाचे झाले आहेत. याचा सर्व दोष आम्ही आपल्यावरच घेतो, आणि लेखक व वाचक यांनी आम्हाला क्षमा करावी अशी विनंती करतो.

असे असूनही जे साहित्य आम्ही देऊ शकलो आहोत, ते बरेच विविध आहे, आणि ते वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आम्हाला आशा आहे.

या अंकात श्रीमती म. गं. नातूंच्या दोन लेखांचा अंतर्भाव केला आहे. त्यापैकी एक येथील ‘तरुण भारत’ दैनिकात वा.मं. च्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झालेला असून दुसरा त्यांच्या ‘विवेकाची गोठी’ या पुस्तकात समाविष्ट, मुळात १९६३ मध्ये नवभारत मासिकात प्रकाशित झालेला, ‘वा.म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार’ हा लेख. दुसरा लेख मुळात बराच प्रदीर्घ, ३० पृष्ठांचा आहे. तो संक्षेप करून या अंकात घेतला आहे.

अन्य लेखांपैकी कादंबरीकार वा.म. जोशी या विषयावर एकूण पाच लेख, (डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. प्रभा गणोरकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. सुशीला पाटील आणि डॉ. द. मा. हराळे) वा.मं. ची साहित्यविषयक भूमिका या विषयावरील एक लेख (डॉ. वसंत पाटणकर), दोन लेख वा.मं. च्या तत्त्वज्ञानविषयक मतांवर (डॉ. सु.वा. बखले व प्रा. प्र.ब. कुलकर्णी) असे बरेच विविध साहित्य या अंकात आहे. शिवाय ‘विवेकवाद’ आणि ‘विवाह आणि नीती’ हे नेहमीचे दोन लेखांकही या अंकात आले आहेत. ह्या बहुविध साहित्याचे वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.