वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका

वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.

वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे. असंगृहीत अशा या लहानमोठ्या लेखांची वा परीक्षणांची संख्या विसाच्या आसपास आहे. परंतु या आपल्या मोजक्या लेखांतून वा परीक्षणांतून त्यांनी अनेक तत्कालीन वाङ्मयविषयक प्रश्नांची सूक्ष्म अशी चर्चा केली आहे. ही सर्व चर्चा वाङ्मयाच्या अन्तःशोधनासाठी झालेली आहे. वाड्मयनिर्मितीची कारणे कोणती आहेत, भौतिक विकास व काव्य यांचा संबंध काय आहे, वाङ्मय, सत्य व नीती यांचे परस्परसंबंध कोणत्या प्रकारचे आहेत, काव्यानंद का होतो, इत्यादी वाङ्मयनिर्मिती, वाङ्मयाचे स्वरूप, वाड्मयानुभव व वाड्मयाचे प्रयोजन-कार्य या घटकांशी संबंधित प्रश्न यामध्ये समाविष्ट झाले आहेत. यांतील वामन मल्हारांच्या वाङ्मयविषयक भूमिकेशी संबंधित अशा प्रश्नाची, विचारांची चर्चा आपल्याला प्रस्तुत लेखात कथानी आहे.

वामन मल्हारांचा जीवनविषयक दृष्टिकोण अनेक विषयांच्या व तत्त्वज्ञानातील विविध किलपनान्यूहांच्या अभ्यासातून, गननातून संस्कारित झालेला होता. आपण आगरकरी पंतले विवेकवादी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडे आलेला विवेकवाद (rationalism) हा वस्तुत: उपयुक्ततावाद व अनुभववाद आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. त्यामुळे उदारमतवादी रानवतावाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विकासवाद इत्यादींचा प्रभाव वामन मल्हारांच्या जीवनदृष्टीवर पडलेला असणे हे स्वाभाविक आहे. अर्थात, त्यांनी विवेकबुद्धी ही ज्ञानाची अंतिम कसोटी मानणारा बुद्धिवाद स्वीकारला असला तरी आप्तवचन, भावना, परंपरा यांचे महत्वही नाकारले नाही. ते विवेकवादी असले तरी आगरकरांचा अभिनिवे त्यांच्या विचारात दिसत नाही. कारण एका सत्याचे प्रतिपादन करताना त्यांना इतरहे। भर दिसत असत.

त्यामुळेच वा.ल. कुळकर्णी यांनी वामन मल्हार हे कृतिप्रदण विवेकवादी नसून विचारप्रवण विवेकवादी आहेत, असे म्हटले आहे. स्वतः वामन मल्हारांनी आपल्यासंबंधी असे म्हटले आहे की, पुष्कळ वेळा आपण आपले मत निश्चित व निर्णयात्मक स्वरूपात दिले आहे. परंतु काही गोष्टी अजूनही अनिर्णीत, असिद्ध अवस्थेत आहेत, आणि भरभक्कम पुराव्याच्या अभावी निर्णयात्मक मत ठोकून देणे हे धाडसाचेच नव्हे तर ते अप्रामाणिकपणाचे व पापस्वरूप आहे. वामन मल्हारांच्या या दृष्टीमुळेच त्यांनी प्रत्येक गोष्टीचा, प्रश्नाचा अनेक अंगांनी विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कारणानां अनेकता’ हे त्यांच्या या दृष्टीचे एक महत्त्वाचे सूत्र ठरले आहे.

वामन मल्हार हे सर्व प्रश्नांचा अनेक अंगांनी विचार करू पाहत असल्यामुळे तत्कालीन वातावरणात त्यांचे वर्णन ‘संशयवादी’ असे केले जाणे हे स्वाभाविक आहे. परंतु मे.पुं. रेगे यांच्या मते हे वर्णन चुकीचे आहे. त्यांच्या मते वामन मल्हार हे मूलतः श्रद्धाळू होते. “वस्तुस्थिती आणि मूल्ये यांच्यात जी तफावत दिसते किंवा विरोध दिसतो, तो अपूर्ण ज्ञानाचा परिणाम आहे आणि परिपूर्ण ज्ञानाच्या पातळीवर त्यांचे सुसंगत मीलन घडून येणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती.” वामन मल्हारांनी पूर्णविकसित वाङ्मयाचे जे चित्र रेखाटलेले आहे, त्यातून त्यांचे हे मूलतः श्रद्धाळू व्यक्तिमत्व स्पष्टपणे दिसून येते. ते म्हणतात, “तें पूर्णविकसित वाड्मय वाचीत असतांना त्या त्या विषयासंबंधाने आपणांस पूर्ण सत्य कळत आहे असे वाटेल व सर्व शंकांचे समाधान होऊन ‘भिद्यते हृदयग्रंथिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।’ अशी आपली स्थिति होईल. ते अंतिमावस्थेतील उच्चतम वाङ्मय वाचतांना आपल्या सात्त्विकतम मनोवृत्ति जागृत होतील व मनोवैध आणि अंत:कलह पूर्णपणे मिटून ब्रह्मानंदाचा ज्याला सहोदर म्हणता येईल अशा प्रकारच्या अलौकिक आनंदाचा आपणांस लाभ होईल. अशा प्रकारच्या वाङ्मयांत ज्ञानाची प्रसन्नता, तपाचें तेज, कर्तृत्वाचा आत्मप्रत्यय, पावित्र्याची कान्ति, प्रेमाचे स्मित व कलेचा विलास या सर्वांचा उत्कर्ष दिसून येईल. वामन मल्हारांच्या जीवनाकडे पाहण्याच्या या दृष्टिकोणाचा, श्रद्धेचा प्रभाव त्यांच्या एकूण लेखनावर, तसेच त्यांच्या वाड्मयविषयक भूमिकेवरही पडलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या वाड्मयविषयक भूमिकेचा परामर्श घेताना त्यामागे जीवनाकडे पाहण्याची त्यांची समग्रतावादी दृष्टी आहे, तसेच जीवनाचा अनेक अंगांनी विचार करणारी समन्वयक व चिकित्सक बुद्धी आहे, याचे भान ठेवावे लागते.
वामन मल्हारांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची चर्चा करताना वाङ्मय हे मूल्य, वाड्मयाचे स्वरूप व वाड्मयानुभव या तीन घटकांच्या अनुषंगाने त्यांनी कोणते विचार मांडले आहेत, ते पाहावयास हवे. हे विचार पाहणे, त्यांची चर्चा-चिकित्सा करणे म्हणजेच त्यांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची चर्चा-चिकित्सा करणे होय. या संदर्भात एका गोष्टीचे स्पष्टीकरण येथे करावयास हवे. ती म्हणजे वामन मल्हारांनी आपल्या लेखनात अनेकदा ‘कला’ ही संज्ञा वापरलेली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी वाड्मयाखेरीज अन्य कलांचा विचार जवळपास केलेला नाही. त्यामुळेच त्यांच्या विवेचनात ‘कला’ ही संज्ञा सामान्यतः ‘वाङ्मय’ या अर्थाने योजली जाते, हे लक्षात ठेवावयास हवे.

प्रारंभी आपण ललित वाङ्मयाच्या स्वरूपासंबंधीची वामन मल्हारांची कल्पना कोणती आहे, याची चर्चा करू या. त्यांनी एकूणच वाड्मयाची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण वाङ्मयाचे त्यांनी अबुद्धिपुरस्सर (अबोधपूर्व) व बुद्धिपुरस्सर (बोधपूर्व) असे दोन भाग केले आहेत. त्यांच्या मते या दुसर्‍या वाड्मयाचा उगम सत्यसंशोधन वा सत्यकथन, सौजन्यपृथक्करण व सौजन्यबोध आणि सौंदर्यमीमांसा व सौंदर्योपासना यांमध्ये आहे. वामन मल्हारांना यांतील सौंदर्यपासना करणारे वाङ्मय हे ललित वाङ्मय म्हणून अभिप्रेत आहे. अर्थात, हे वाड्मय मूलतः सौंदर्योपासना करणारे, आनंद देणारे असले तरी सत्य, नीती (सौजन्य) यांच्याशी त्याचा संबंध असतोच, असे त्यांचे मत आहे. किंबहुना या तिहींचा परस्परसंबंध हे त्यांच्या वाड्मयविषयक भूमिकेचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. त्यांच्या मते ललित वाङ्मय हे बुद्धिपुरस्सर वाड्मयाचा एक भाग असल्यामुळे त्यात जाणीवपूर्वकता महत्त्वाची ठरते. याचा अर्थ येथे स्फूर्तीला व भावनांना अवकाश नाही असे नाही. या वाङ्मयाच्या निर्मितीसाठी नवनिर्मितिक्षम अशी कल्पकता वा प्रतिभा आवश्यक असते. परंतु वाङ्मयकृतीतील प्राथमिक स्वरूपातील स्वानुभवांवर काही बुद्धिपुरस्सर संस्कार व्हावे लागतात. त्यामुळेच वामन मल्हार वर्ड्स्वर्थच्या काव्यकल्पनेला अनुसरत असे म्हणतात की, वाड्मयकृतीतील स्वानुभव हा प्राथमिक स्वरूपाचा नसून तो ‘रूपान्तरित, स्मरणोज्जीवित, छायात्मक, मननात्मक’ असतो. आणि या अर्थाने तो सहजस्फूर्त नसून संस्कारजन्य असतो.

वामन मल्हारांनी वाङ्मयनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या नवनिर्मितिक्षम अशा प्रतिभेच्या उगमाचे एकच एक निश्चित कारण दिलेले नाही. ते त्यांच्या अनेकसूत्रवादी भूमिकेशी सुसंगत आहे. त्यांच्या मते एकूण वाड्मयात्मक प्रतिभेचे मूळ निश्चयाने सांगता येत नाही. विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट समाजात जे वाड्मय निर्माण होते, त्याला एकच एक कारण नसून अनेक कारणे असतात. व्यक्ती, परिस्थिती, आर्थिक कारणे, कामवासना, इच्छापूर्ती, आत्मप्रतिष्ठा, न्यूनगंड इत्यादी अनेक कारणे प्रतिभेमागे असू शकतात. त्यामुळेच वामन मल्हार अमुक एका कारणामुळेच वाड्मयनिर्मिती होते अशी भूमिका सहसा घेत नाहीत. परंतु अलीकडे महाकाव्याची निर्मिती का होत नाही, या प्रश्नाची चर्चा करताना मात्र त्यांनी महाकाव्यनिर्मितीसाठी समर्थ ठरणारी व्यक्तिगत प्रतिभा आज अस्तित्वात नाही, या एका कारणावरच भर दिला आहे.

वामन मल्हारांनी डी. किन्सीला अनुसरत सौंदर्योपासक वाड्मय व अन्य वाङ्मय यांचे अनुक्रमे रसप्रधान व बोधप्रधान असेही वर्गीकरण केले आहे. या रसप्रधान वाङ्मयात त्यांनी भावनाविलासाला उच्चतम स्थान दिले आहे, आणि भावनाविलासाबरोबरीनेच कल्पनाविलास व विचारविलास यांनाही महत्त्व दिले आहे. रसप्रधान वाड्मयात त्यांनी भावनेला उच्चतम स्थान दिले, ते योग्यच आहे. परंतु त्यांनी उच्च प्रतीच्या भावनात्मक काव्यात अलंकारांना स्थान नसते, ते अंगभूत नसून अनुषंगाने, गौण रीतीने व अनियमपूर्वक येणारे आहेत अशी भूमिका का घेतली आहे, ते समजत नाही. वाड्मयाच्या आशयाशी एकजीव झालेल्या, त्याला अंगभूत असलेल्या प्रयोजक अशा अलंकारांची कल्पना वामन मल्हार का करू शकले नाहीत, असा प्रश्न पडतो. त्यांच्यासमोर असणार्‍या तत्कालीन सर्वसामान्य वाङ्मयामुळे त्यांनी हा विचार मांडला असावा, असे म्हणणेही पूर्णपणे खरे नाही. कदाचित आशयाला अधिक महत्त्व देण्याच्या भूमिकेमुळे अलंकारांच्या वाड्मयातील वैशिष्ट्यपूर्ण कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे. ज्याप्रमाणे ‘अलंकार’ ही संकल्पना ते मर्यादित अर्थाने वापरतात, त्याप्रमाणेच ‘रस’ ही संकल्पनाही ते वाड्मयकृतीतील भावनात्मक, कल्पनात्मक व विचारात्मक आशय एवढयाच मर्यादित अथीने वापरतात. तत्कालीन बहुसंख्य समीक्षकांप्रमाणेच वामन मल्हारही भारतीय साहित्यशास्त्रातील संज्ञा, संकल्पना काटेकोर अर्थाने वापरत नाहीत, असे दिसते.

वाङ्मयात भावनेबरोबरीनेच कल्पना व विचार यांना महत्त्व देणारी वामन मल्हारांची ही भूमिका आशयसापेक्षतेकडे झुकणारी आहे. अर्थात, केवळ एवढ्यावरूनच ही भूमिका लौकिकतावादी ठरणार नाही. वाङ्मयकृतीतील आशयासंबंधी त्यांनी वेगवेगळ्या लेखांतून, परीक्षणांतून विचार मांडले आहेत. कोणताही जीवनाशय नसलेली वाङ्मयकृती ही कल्पनाच त्यांना शक्य वाटत नाही. त्यांच्या मते जिच्यात विचार व भावना शून्य आहेत, अशी वाङ्मयकृती असू शकणार नाही. कारण या गोष्टी वाङ्मयाच्या गाभ्यातीलच आहेत. ते हे मान्य करतात की केवळ या गोष्टींवर वाड्मयकृतीचे सौंदर्य अवलंबून नाही. परंतु या गोष्टी नसतील तर वाङ्मयकृती पोकळ होईल. याचा अर्थ असा की वाङ्मयकृतीचे मूल्य हे ह्याही गोष्टींच्या आधारे ठरणार आहे. त्यांच्या मते ज्या कलावंताला काहीएक सांगावयाचे नाही, ज्याच्याजवळ सांगण्यासारखे काही नाही, त्याची कला रबरी फुग्यासारखी दिसायला सुंदर असेल, पण ती अगदी पोकळ असेल. अशा कलेला विशेष किंमत नाही. थोर लेखक आपल्या वाङ्मयकृतीतून मानवी स्वभावविशेष, जीवनातील गुंतागुंत, मानवी मनातील संघर्ष वा प्रवाह, त्यांतील विचार- भावना-प्रवृत्तींची विलक्षण गुंतागुंत आपल्यासमोर ठेवतात. त्यातून त्यांच्या मनाची प्रगल्भता, विवेकशीलता, मार्मिकता दिसते. ती ज्या मानाने वाङ्मयकृतीत दिसेल त्या मानाने तिचे मूल्य कमीअधिक होईल. म्हणजेच विशिष्ट असा आशय वाङ्मयकृतीत असतो, एवढेच वामन मल्हार म्हणत नाहीत, तर त्याआधारे ते तिचे मूल्यही ठरवतात. त्यामुळेच त्यांची भूमिका ही लौकिकतावादी परंपरेतील ठरते.

‘काहीतरी सांगण्यासारखे’ असणे, ‘वर्णन करण्यासारखी गोष्ट’ असणे याचा वामन मल्हारांना अभिप्रेत असलेला अर्थ काहीतरी ज्ञानात्मक व/वा नैतिक आशय वाङ्मयकृतीतून व्यक्त करणे असाच सामान्यतः असलेला दिसून येतो. परंतु काही ठिकाणी त्यांना यापेक्षा वेगळा अर्थ अभिप्रेत आहे, असे दाखविता येते. उदाहरणार्थ, त्यांनी कोणते वाड्मय कला या पदवीला पोहोचते यासंबंधी केलेले विवेचन या संदर्भात पाहता येईल. त्यांच्या मते ‘वाटले ते लिहिलें’, प्रत्येक भावनेला नि:शंकपणे वाङ्मयरूप दिले, हे इष्ट आहे असे म्हणता येणार नाही. हे नैतिक दृष्टीने नव्हे, तर वाङ्मयाच्या दृष्टीने अयोग्य ठरते. वाङ्मयरूप पावलेली कृती ही स्मरणोज्जीवित, मननात्मक अशी असल्यामुळे ‘वाटले ते लिहिलें याला वाड्मय म्हणता येणार नाही. ती केवळ एक लौकिक प्रक्रिया ठरेल. कलावंताला आपल्या संवेदनात्मक वा भावनात्मक अनुभवात मनन करण्यासारखे, सांगण्यासारखे काही असेल, काही हृद्य असे मर्म, रहस्य, वैचित्र्य वा सौंदर्य त्यात असेल आणि ते त्याला रसिकाला पटेल, समजेल, आनंद देईल अशा रीतीने व्यक्त करता आले, तर त्यात कलात्मकता आहे, असे म्हणता येईल. जेथे काही सांगण्यासारखे, व्यक्त करण्यासारखे नसते, आणि ज्या वर्णनात केवळ इंद्रियजन्य सुखाचाच लौकिक आस्वाद मिळतो, त्यात कलात्मकता नसते.* वाङ्मयकृतीची घडण कशी होते, ती कलात्मक केव्हा ठरते, ते दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे. येथील विवेचनात वामन मल्हारांना सांगण्यासारखे असणे’ याचा अर्थ वेगळा आहे, आणि तो म्हणजे सौंदर्यात्मक दृष्ट्या, कलात्मक दृष्ट्या अर्थपूर्ण असे काहीतरी कलावंत व्यक्त करू पाहतो, हा होय.

‘काहीतरी सांगण्यासारखे असणे’ याचा वरील अर्थ वामन मल्हारांना अभिप्रेत असला तरी तो एकमेव म्हणता येणार नाही. त्यांनी लेखक वाचकांसमोर काय ठेवतो, यासंबंधी केलेले विवेचन आपण पाहिले. तेथे त्यांनी ज्ञानात्मक व नैतिक स्वरूपाच्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात त्यांचे आणखीही काही विवेचन पाहता येईल. वाङ्मयकृतीबाबत त्यांनी कोणत्या ज्ञानात्मक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ? ‘दुहेरी जीवन’ या कादंबरीचे परीक्षण करताना त्यांनी म्हटले आहे की लेखकाने मानवी मनाचे अवगाहन करावे, तर तत्कालीन कादंबर्‍यांच्या प्रवाहांची चर्चा करताना त्यांनी म्हटले आहे की लेखकाने मानवी स्वभावातील, विचार-विकारांतील, प्रसंगांतील विविधता दाखवावी. डॉ.केतकरांच्या कादंबर्‍यांची चर्चा करताना वामन मल्हारांनी क्षेत्रव्याप्ती व विविधता यांपेक्षा केतकरांनी ‘सदशिवपेठी’ वृत्ती व दृष्टी सोडून जे नावीन्य आणले त्यावर भर दिला आहे. केतकरांच्या कादंबर्‍यांतून संसारातील विविध दृश्ये दाखविली जातात, त्यांतील खोल मर्म सुचविले जाते, सामाजिक परिस्थितीची छाननी केली जाते, मनाचा सखोल शोध घेतला जातो इत्यादी गोष्टींबद्दल त्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. केतकरांच्या कादंबर्‍यांतील वैचारिकतेचेही त्यांनी समर्थन केले आहे. सारांश, मानवी मन, मानवी संबंध, समाज इत्यादींचे सूक्ष्म व विविधतापूर्ण दर्शन लेखकाने घडवावे, अशीच वामन मल्हारांची अपेक्षा आहे. जीवनदर्शनाची तपासणीही त्यांनी ज्ञानात्मक निकषांनी केलेली आहे. ‘विरतरंग’, ‘बंधनांच्या पलीकडे’, ‘दुहेरी जीवन’, ‘भंगलेले देऊळ’ इत्यादी वाङ्मयकृतींची परीक्षण करताना त्यांनी या कृतींतील जीवनदर्शन कोठे पटण्यासारखे, स्वाभाविक वाटत नाही याची सकारण चर्चा केली आहे.

‘सांगण्यासारखे असणे’ याचा वामन मल्हारांना अभिप्रेत असलेला आणखी एक व महत्त्वपूर्ण अर्थ म्हणजे वाड्मयकृतीतील नैतिक स्वरूपाचा आशय होय. त्यांनी काही वेळा वाङ्मयातील नैतिकतेच्या संदर्भात अगदी प्राथमिक स्वरूपाची वाटावी अशी भूमिकाही घेतली आहे, हे खरे आहे. उदाहरणार्थ, नवमतवादाच्या संदर्भात ते म्हणतात की वाङ्मयकृतीतील विशिष्ट गोष्टींच्या चित्रणाने अपक वाचकांच्या मनावर विकृत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते असे सूचित करतात की लेखकाने अशा गोष्टींचे चित्रण टाळावे. परंतु सामान्यतः त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की लेखकाने अशा गोष्टींचे, लैंगिकतेशी संबंधित असे चित्रण करणे दोषार्ह नाही. मात्र या प्रकारचे चित्रण करताना लेखकाने त्याला मान्यता मिळेल अशा रीतीने करू नये. वाईट गोष्टींचा वाईटपणा त्याने दाखवून द्यावा. ‘दुहेरी जीवन’ या कादंबरीवर वामन मल्हार असा आक्षेप घेतात की या कृतीत लेखक वाईट गोष्टींचे चित्रण मिटक्या मारत करतो आहे, असे वाटते.६ वामन मल्हारांच्या मते विकृत जिज्ञासेच्या तृप्तीसाठी अमंगल, ग्राम्य व हिडीस गोष्टींचे वर्णन ते केवळ यथार्थ आहे, म्हणून समर्थनीय ठरत नाही. त्या वर्णनामागे काही कलात्मक, ज्ञानात्मक वा सुसंस्कारात्मक असा भाग असावयास हवा. त्यामुळेच त्यांना असे वाटते की वाङ्मयकृतीचे अंतरंग किडलेले, सडलेले असू नये. ते ‘शुद्ध व ससत्त्व’ असावे. वामन मल्हारांना अभिप्रेत असलेली ही शुद्धता व ससत्त्वता नैतिक संदर्भातील आहे, हे ज्या संदर्भात ते विवेचन करतात त्यावरून लक्षात येते. येथे त्यांना कोणत्या प्रकारचा नैतिक आदाय अभिप्रेत आहे? नैतिक दृष्ट्या केवळ चांगल्या गोष्टींचे चित्रण वाड़मयकृतीत असावे, असे त्यांना अभिप्रेत असेल असे वाटत नाही.

वामन मल्हारांनी वाङ्मयातील नैतिकतेसंबंधी मांडलेली कल्पना मर्यादित स्वरूपाची होती असे सामान्यत: दिसत नाही. त्यांच्या मते कलेची तत्त्वे व नियम सांभाळून मतप्रचार करणे यात गैर काहीच नाही. नीतिदृष्ट्या मर्यादा घालायचीच झाली तर ती एवढीच घालता येईल की जगात नीती-अनीती म्हणून काही नाही, ज्याने त्याने वाटेल तसे आचरण करावे अशी नीतीच्या मुळावरच घाव घालणारी मते वाड्मयकृतीत नसावीत. अर्थात, लेखकाची अशीही मते असल्यास ती व्यक्त करण्यास वामन मल्हारांची हरकत नाही. येथेच त्यांना अभिप्रेत असलेली नैतिकता ही प्रचलित नैतिकतेपेक्षा वेगळी आहे, हे स्पष्ट होते. केतकरांच्या कादंबर्‍यांसंबंधी ते म्हणतात की त्यांनी वाचकाला आपल्या नीति-अनीतिविषयक कल्पनांचा, भावनांचा फेरविचार करायला लावले, ही त्यांची मोठी कामगिरी आहे. लेखकाने परंपरागत, घातुक तत्त्वांवर प्रहार करावा, त्याने शुद्ध नीतितत्त्वे, ती जरी लोकविरुद्ध असली तरीही, सांगावीत अशी वामन मल्हारांची अपेक्षा आहे. त्यामुळेच त्यांनी असे म्हटले आहे की लेखकाने प्रचलित नीतीच्या विरुद्ध जाणाच्या आपल्या सत्कल्पनांना काही प्रबळ कारण असल्याखेरीज आळा घालू नये. लेखकहा नव्या प्रकारची नैतिकता समाजात आणत असतो, असा वामन मल्हारांचा अभिप्राय असलेला दिसतो. या विचाराचे त्यांनी विस्ताराने विवेचन केलेले नसले तरी त्यांचा हा विचार अलीकडच्या काही समीक्षकांनी मांडलेल्या नैतिकतेच्या विचाराच्या जवळ येणारा वाटतो.

वामन मल्हारांनी वाङ्मयाच्या स्वरूपाचा जसा विचार केला आहे, तसा तो त्यांनी वाङ्मयाच्या रचनेचाही केला आहे. त्यांना ‘कलात्मकता’ म्हणजे प्रामुख्याने वाड्मयकृतीचे रचनात्मक विशेष अभिप्रेत आहेत, असे दिसते. केतकरांच्या, कादंबर्‍यांचा विचार करताना त्यांनी ‘कलात्मक कादंबरी’ ही ‘संपूर्ण सत्यावर अधिष्ठित नसून निवड करून, सार्थ, साभिप्राय, लक्षणीय, कथनीय अशा सत्यावर अधिष्ठित’ असते असे म्हटले आहे. त्यांच्या मंते हे अधिष्ठानही संमतोलपणा, प्रमाणशीरपणा इत्यादी कलात्मक ध्येयांनी नियमित व मर्यादित असते. हे सत्यदर्शन आनंददायक होईल अशा रीतीची दक्षता बाळगून वाङ्मयकृतीतून सांगावयास हवे. त्यामुळेच ते केतकरांच्या कादंबर्‍यांचे दोष दाखविताना म्हणतात की त्यांत ‘आस्थाविषयीभूत प्रतिपादनाचे किंवा तत्त्वाच्या घटनेचे किंवा कार्याचे जे ऐक्य (unity of interest)’ त्याचा अभाव आहे. तसेच कथानकाची विस्कळीत, प्रमाणदुष्ट रचना आदी दोषही त्यांनी दाखविले आहेत. वामन मल्हारांनी त्यांच्या अनेकसूत्रतेच्या भूमिकेनुसार सौंदर्य वा कलात्मकता नेमकी कशात आहे, ते साकल्याने सांगता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कलात्मकतेच्या संदर्भात त्यांनी ऐंद्रियसुखदता, सुव्यवस्था, समप्रमाणता, प्रमाणबद्धता, अनेकतेत एकता, उपयुक्तता वा कार्यक्षमता, औचित्य, सूचकता अशा काही प्रामुख्याने रचनात्मक विशेषांचा निर्देश केला आहे. या सर्व विशेषांचे तपशीलवार विवेचन मात्र त्यांनी केलेले नाही.

वामन मल्हारांना अभिप्रेत असलेला हा कलात्मकतेचा अर्थ पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा नसला तरी तो मर्यादित स्वरूपाचा आहे. केवळ रचनात्मक विशेषांमुळेच कलात्मकता निर्माण होते, असे कलावादी समीक्षक म्हणणार नाही. आणि वामन मल्हार ज्याप्रमाणे जीवनाशय व रचना या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या करतात तशाही तो करणार नाही.

वामन मल्हारांना कलात्मक या संज्ञेचा आणखी एक अर्थ अभिप्रेत असावा असे त्यांच्या ‘दुहेरी जीवन’, ‘शाप’, ‘भंगलेले देऊळ’ अशा अनेक परीक्षणांवरून वाटते. या परीक्षणांमध्ये अनेकदा ‘कलादृष्ट्या’ हा शब्द येतो तो कथावस्तु, व्यक्तिचित्रण स्वाभाविक, सुसंगत असणे, पटण्यासारखे असणे, अपरिहार्य असणे अशा अर्थाने होय. येथे त्यांना केवळ अंतर्गत सुसंगती अभिप्रेत नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील घटकांची जी चर्चा केली आहे, त्यावरून दिसते. ‘पटण्यासारखे असणे’, ‘स्वाभाविक’ या शब्दप्रयोगांचा अर्थ बाहय वाक्तवाशी मेळ जुळणे वा न जुळणे असाच येथे आहे.

वामन मल्हारांचे वाङ्मयाच्या स्वरूपाचे हे विचार पाहिले म्हणजे त्यांची भूमिका ही वाङ्मयाचा मुख्यत्वे आशयसापेक्ष, म्हणजे आशयाच्या अनुरोधाने वाड्मयाचे मूल्यमापन करणारी भूमिका कशी आहे ते लक्षात येते. वाड्मयकृतीतील ज्ञानात्मक, नैतिक आशयाची त्यांनी आपल्या लेखांतून व परीक्षणांतून विविध अंगांनी व ज्या प्रमाणात चर्चा केली आहे, त्या प्रमाणात त्यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या कलात्मकतेसंबंधी, सौंदर्यविशेषांसंबंधी चर्चा केलेली नाही. या प्रकारची चर्चा त्यांच्या वाड्मयविषयक लेखनात अत्यंत त्रोटक स्वरूपात आलेली आहे.

वाङ्मयानुभवाच्या संदर्भात वामन मल्हारांनी घेतलेली भूमिका हीदेखील त्यांच्या समग्रतावादी व अनेकसूत्रवादी दृष्टीशी सुसंगत आहे. वाड्मयानुभव हा तादात्म्यचा असतो, हे त्यांना मान्य नाही. त्यामुळेच ते न.चिं. केळकरांच्या ‘सविकल्प समाधी’च्या उपपत्तीतील सविकल्पत्व स्वीकारतात व ‘समाधीपासून आनंद होतो’ हे अमान्य करतात. त्यांच्या मते रसिक वाङ्मयानुभवात बराच समरस झाला तरी स्वत:ची भूमिका सोडत नाही. म्हणजेच तो पूर्ण तादात्म्य पावत नाही. तादात्म्याच्या कल्पनेवर त्यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. आपल्याला त्याची चर्चा येथे करावयाची नाही. परंतु ‘तादात्म्य’ – कल्पनेवरील त्यांचे हे आक्षेप फारसे टिकणारे नाहीत, हे रा.भा.पाटणकर व म.सु.पाटील यांनी दाखवून दिले आहे, हे नमूद करावयास हवे.

वामन मल्हारांच्या मते ‘सविकल्प समाधी’च्या उपपत्तीत जे. एक प्रकारचे तादात्म्य स्वीकारलेले आहे, त्या तादात्म्याची व्याप्ती पात्राच्या मनोविकाराचे आकलन करण्यापुरती मर्यादित क्षेत्रातील आहे, अशी सुधारणा करून सविकल्पत्वावर अधिक भर द्यावयास हवा.

काव्यातील रसाचे अधिष्ठान पात्र नव्हे तर प्रेक्षकांचे हृदय आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते काव्य वाचीत असताना ‘अल्पांशाने जागृत होणारे स्थिरभाव (Sentiments) व छायारूपाने किंचित् उद्दीपित झालेल्या भावना या सर्वांवर विचारशक्तीचे व कल्पनाशक्तीचे संस्कार होऊन मनाची जी एक विशिष्ट ठेवण व बैठक तयार होते, तीबर काव्यानंद अवलंबून असतो. मनाच्या या वृत्तीत वाचक कोणत्याही एका पात्राशी, अनेक पात्रांशी वा लेखकाशी पूर्ण तन्मय पावत नाही, तर त्या पात्रांचे विचार-विकारांचे आकलन करण्यापुरते एक प्रकारचे समरसत्व तेथे असते. परंतु त्यामुळे वाचकाच्या मनाचे तटस्थत्व पूर्णपणे केव्हाही नष्ट होत नाही.२३ वामन मल्हारांचा भर तादात्म्यापेक्षा ताटस्थ्यावर अधिक आहे, हे येथे लक्षात येते.

वाङ्मयापासून आनंद का होतो, याचे कोणतेही एकच एक कारण देणे वामन मल्हारांना मान्य नाही. त्यांच्या मते या आनंदात ज्ञानात्मक स्वरूपाचा आनंदही असतो. परंतु तो वाड्मयानंदाचा व्यवच्छेदक विशेष नव्हे. काव्यानंद वा कलात्मक आनंद वा सहजसौंदर्यजन्य आनंद अनेक कारणांनी निर्माण होतो. ते म्हणतात,”काव्यानंदानुभवांत…इंद्रियसुखास्वाद, आत्माभिमानाचा उत्कर्ष, आत्मसामर्थ्यप्रतीति, परसामर्थ्यप्रतीतीमुळे उत्पन्न होणारे आदरयुक्त कौतुक, साहचर्यनियमांमुळे उत्पन्न होणार्‍या बोधपूर्व किंवा अबोधपूर्व सुखकर आठवणी, सामान्यतः ध्यानांत न येणारे अशा वस्तुनिष्ठ किंवा प्रसंगनिष्ठ गूढ किंवा गहन सत्याचे, सौंदर्याचे, श्रीमत्त्वाचें, उदात्तत्वाचे वगैरे ज्ञान होऊन ते पटल्यामुळे मनाला येणारी सात्त्विक प्रसन्नता, इत्यादि अनेक गुंतागुंतीचे धागे म्हणा, पापुद्रे म्हणा किंवा अंगें म्हणा असून केवळ स्वप्रतीतिपूर्वक परव्यक्तीशी तादात्म्य एवढ्यासच महत्त्व देणे हे गैरसमज उत्पन्न करणारे आहे, म्हणून मी त्याला विरोध करतो.”
शोकात्मिकेनेही आपल्याला आनंद होतो, असे वामन मल्हारांचे मत आहे. परंतु शोकात्मिकेतील प्रसंग हे ‘स्मृतिरूप, काल्पनिक व प्रतिबिंबात्मक’ असतात, ते ‘खरे’ नसतात म्हणून रसोत्पत्ती होते, किंवा अशा नाटकांमुळे अल्प प्रमाणात दुःख वा आघात होतो, म्हणून रसोत्पत्ती होते, ही मते त्यांना मान्य नाहीत. शोकात्मिकेच्या संदर्भात अॅरिस्टॉटलच्या ‘कॅथार्सिस’ या संकल्पनेच्या वेगवेगळ्या अर्थाची चर्चा त्यांनी केली आहे. त्यांतील त्यांना मान्य असलेला अर्थ पुढीलप्रमाणे आहे: वाचक शोकात्मिकेतील विशिष्ट धीरोदात्त नायकाशी तादात्म्य पावल्यामुळे मन:शुद्धी होत नाही, तर नाटक पाहताना आपली एकंदर वृत्ती, आपल्या मनाची घडण वा ठेवण उच्चतर होते, आणि त्या शोकात्मिकेतील देवघटित वा दैवघटित न्यायाचा प्रत्यय येऊन व तो योग्य आहे, असे आपणास पटून मनाला एक प्रकारचे समाधान वाटते, प्रसन्नता येते आणि अशा रीतीने शोकात्मिकेपासून ‘कॅथार्सिस’ वा अन्त:शुद्धी होते. शोकात्मिकेच्या अनुभवाच्या संदर्भात वामन मल्हारांनी असेही म्हटले आहे की, तिच्यामुळे कटू सत्य कळते व पटते, आणि सत्य कटू असले तरी ते कळले व पटले म्हणजे मनुष्याला एक प्रकारचा आनंद होतो. आनंदाची ही कारणमीमांसा नैतिक व ज्ञानात्मक स्वरूपाचीच आहे. याबरोबरीनेच त्यांनी शोकात्मिकेपासून मिळणाच्या आनंदाची अन्य कारणेही दाखविली आहेत. त्यांचे म्हणणे असे की शोकात्मिकेतील उदात्त, रम्य, चमत्कृतिजनक अशा प्रकारच्या प्रसंगांकडे आपण तादात्म्यपूर्वक नव्हे, तर तटस्थ, नि:स्वार्थ व अलौकिक अशा मनोभूमिकेवरून प्रेक्षक या नात्याने पाहू शकतो, म्हणून आपल्याला आनंद होतो.

वाङ्मयानुभवाच्या संदर्भात वामन मल्हारांनी ताटस्थ्याचा आग्रह धरल्याचे आपण पाहिले. परंतु त्यांना अभिप्रेत असलेले ताटस्थ्य हे विश्वचैतन्यवाद्यांचे नैतिक व ज्ञानात्मक संकल्पना नसलेले ताटस्थ्य नाही. प्रामुख्याने ‘तादात्म्या’तील अडचणींचा परिहार करण्यासाठी त्यांनी ‘ताटस्थ्या’ची कल्पना मांडलेली आहे, असे दिसते. हे मर्यादित ताटस्थ्य आहे. वामन मल्हारांच्या ताटस्थ्याच्या कल्पनेत ज्ञानात्मक व नैतिक संकल्पना वगळलेल्या नाहीत. त्याप्रमाणेच काव्यानंदाचा विचार करताना त्यांनी संवेदनांमुळे रचनासौंदर्यामुळे आनंद मिळतो असे म्हटले असले, तरी या घटकांनाच त्यांनी काव्यानंदात महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. काव्यानंदाची जी अनेक कारणे त्यांनी दिलेली आहेत, त्यांतील बहुतांश कारणे ही नैतिक व ज्ञानात्मक स्वरूपाची आहेत. शोकात्मिकेपासून होणाच्या आनंदाची चर्चा करतानाही त्यांनी नैतिक व ज्ञानात्मक घटकांना अधिक महत्त्व दिल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळेच ‘अलौकिक’ असा शब्दप्रयोग जरी त्यांनी काव्यानंदाच्या संदर्भात योजलेला असला तरी एकूण वाङ्मयानुभव हा लौकिक अनुभवांपेक्षा वेगळ्या कोटीतील असतो, असे त्यांना अभिप्रेत होते, असे दिसत नाही, तर हा अनुभव इतर अनुभवांपेक्षा अधिक वरच्या पातळीवरील आहे, एवढेच त्यांना अभिप्रेत असावे, असे दिसते. वामन मल्हार भारतीय साहित्यशास्त्रातील संकल्पना काटेकोर अर्थाने वापरत नाहीत, हे आपण पाहिले आहे. अलौकिक’ ही संज्ञाही त्यांनी अशीच सैलपणे वापरली आहे, असे म्हणावे लागते.

वामन मल्हारांनी त्यांच्या वाड्मयविषयक विवेचनात सामान्यतः अनेकसूत्रवादी भूमिका स्वीकारलेली असली, आणि काव्यानंदाच्या संदर्भातही त्यांनी कारणे सांगितलेली, सुचविलेली असली तरी त्यांनी काव्यामुळे आनंद होतो, अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येते. ही त्यांची भूमिका जरी अलौकिकतावादी नसली, तरीही ही भूमिका केवळ आनंदावरच र देत असल्यामुळे वाङ्मयानुभवाच्या व्यामिश्रतेचे पूर्ण स्पष्टीकरण देणारी आहे, असे म्हप ना येत नाही. वाड्मयानुभव हा आनंदाबरोबरीनेच दु:खाचा, अस्वस्थतेचा, उद्विग्नतेचा अरा असू शकतो, हे या भूमिकेत नाकारले जाते. वस्तुत: भारतीय साहित्यशास्त्रीय परंप त सुखदुःखवादी परंपरा अस्तित्वात असताना, अनेक कारणांचा विचार करणार्‍या वा न मल्हारांनी केवळ केवलानंदवादी परंपरेतील मताचा काही प्रमाणात का होईना स्वीकार करावा याचे आश्चर्य वाटते.

वामन मल्हारांनी वाङ्मयानुभवाच्या संदर्भात आनंदाला महत्त्व दिले असले, त ते केवलानंदवादी ठरत नाहीत, हे आपण पाहिले. अर्थात, त्यांच्या कलात्मक आनंदाच्य कल्पनेचे एक अंग स्वायत्ततावादाला काही प्रमाणात पूरक आहे, हे निश्चित. मर्ढेकरांच्या ‘वाङ्मयीन महात्मते’ला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी रसिकाची कलात्मक भावना कलाकृती पाहण्यातच रममाण होते, कलाकृतीचा आस्वाद हेच तिचे आद्यन्ती फळ असते, असे म्हटले आहे. त्यांच्या मते कलात्मक आनंद हा लौकिक वा व्यावहारिक आनंदापेक्षा भिन्न असतो. कारण लौकिक वा व्यावहारिक आनंद बहुधा केवळ इंद्रियतृप्ती करणारा असतो, किंवा तो साधन-स्वरूप, सोपाधिक असतो. कलात्मक आनंद हा अलौकिक, ब्रह्मास्वादसहोदर असतो. तो अनन्यसापेक्ष, स्वत:सिद्ध, निरुपाधिक असतो. परंतु बामन मल्हार असेही दाखवितात की काही लौकिक आनंद हे कलात्मक आनंदाच्या जवळ जाणारे आहेत. आणि शुद्ध ज्ञानाचा आनंद हाही अनन्यसापेक्ष, स्वत:सिद्ध असतो. याच प्रस्तावनेत त्यांनी असेही म्हटले आहे की कलात्मक आनंद निराकांक्ष, निरपेक्ष (disinterested) असतो, परंतु येथे त्यांना अभिप्रेत असलेला ‘निरपेक्ष’ या शब्दाचा अर्थ कांटच्या ‘disinterersted’ – ‘अस्तित्वनिरपेक्षता’ या अर्थासारखा नाही.२६ हा आनंद निरपेक्ष असतो असे म्हणताना त्यांना प्रामुख्याने तो द्रव्य, कीर्ती, बोध इत्यादी उपाधींवर अवलंबून नसतो, असे म्हणावयाचे आहे. सारांश, कलात्मक आनंदाची वामन मल्हारांची कल्पना ही आधी म्हटल्याप्रमाणे मूलत: उच्च प्रतीचा आनंद अशीच आहे, हे स्पष्ट व्हावे.

वामन मल्हारांच्या कलात्मक आनंदाच्या कल्पनेला असणार्‍या आणखीही काही अंगांची चर्चा करता येईल. त्यांच्या मते रसास्वाद हाच कलेचा हेतू व हेच फळ मानले, तरी हा रस किंवा आनंद ‘शुद्ध’, ‘औचित्ययुक्त’ असला पाहिजे. तरच वाचकाला ‘परिपूर्ण व ध्येयात्मक’ आनंद मिळू शकेल. कलेतील आनंद शुद्ध, सात्त्विक असावा यावर ते भर देतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, कलेत सत्य किंवा नीती यापेक्षा आनंदाला अधिक महत्त्व असले, तरी हा आनंद देताना कलेने तत्त्वत: सत्याचा अपलाप वा असद्धोध करू नये. बाह्यतः असत्य व बाह्यत: अनैतिक अशा गोष्टी कलेत चालू शकतील. परंतु तत्त्वतः असत्य व तत्त्वतः अनैतिक बोध रसिकाला केव्हाही रुचू शकणार नाही. कारण असे केले तर सात्विक आनंद मिळणे शक्य नाही. वामन मल्हार जेव्हा कलेपासून वा वाड्मयापासून मिळणाच्या आनंदाला उद्देशून ‘शुद्ध’, ‘औचित्ययुक्त’, ‘परिपूर्ण व ध्येयात्मक’ अशी विशेषणे लावतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेला आनंद हा नैतिकतेशी संबद्ध आहे, हे स्पष्ट होते; तसेच जेव्हा ते असे म्हणतात की वाड्मयकृतीमुळे आपल्या अनुभवात चांगली भर पडते आणि त्यामुळे आनंद होतो, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेला आनंद हा ज्ञानात्मकतेशी संबद्ध आहे, हेही स्पष्ट होते.

वामन मल्हारांच्या कलात्मक आनंदाच्या कल्पनेला असणारे आणखी एक अंग म्हणजे रंजनात्मकता हे होय. कादंबर्‍यांसंबंधी विवेचन करताना ते म्हणतात की काही कादंबच्या या ‘वर्तमान जीवनाची विस्मृती’ पडावी व ‘काल्पनिक जीवनात मन रममाण व्हावे याच हेतूने प्राधान्याने लिहिलेल्या असतात, आणि त्याच हेतूने त्या वाचल्या जातात. यात वावगे असे काही नाही. परंतु काही कादंबच्या वर्तमानाची विस्मृती उत्पन्न करून जीवनाचा खोल अर्थ सुचवितात; त्या आत्मोन्नतीच्या व समाजोन्नतीच्या मार्गाचे दिग्दर्शन करून त्या मार्गाने जाण्याबद्दल आवड व उत्साह उत्पन्न करतात. कलेने आनंददानाचे कार्य साधून हे दुसरे कार्य साधले तर त्यात चुकीचे काही नाही. वामन मल्हारांच्या ह्या नैतिकतावादी विचारातील कलात्मक आनंदाची कल्पना ही प्रामुख्याने रंजनबादी आहे, हे ‘वर्तमान जीवनाची विस्मृती’ व ‘काल्पनिक जीवनात मन रममाण होणे’ या त्यांच्या शब्दप्रयोगावरून लक्षात येते. तत्कालीन कलावाद्यांच्या रंजनात्मकतेच्या कल्पनेचा प्रभाव वामन मल्हारांवरही काही प्रमाणात कसा होतो ते येथे दिसून येते.

वामन मल्हारांचे वाङ्मयानुभवासंबंधीचे हे विवेचन सामान्यतः त्यांच्या अनेकसूत्रवादी भूमिकेला पूरक असेच आहे. वाड्मयाच्या स्वरूपाचा विचार करताना ते आशयसापेक्ष दृष्टिकोण कसा स्वीकारतात त्याची चर्चा आपण केली आहे. वाड्मयानुभवाचा त्यांचा विचारही प्रामुख्याने आशयसापेक्ष म्हणजेच ज्ञानात्मकता व नैतिकता या अंगांनी जाणारा आहे. हे आतापर्यंतच्या चर्चेवरून लक्षात येते.

समग्र मानवी जीवनात कलेचे, वाङ्मयाचे मूल्य काय, स्थान काय, पर्यायाने वाड्मयाचे प्रयोजन-कार्य कोणते, यासंबंधी वामन मल्हारांनी अतिशय सुस्पष्ट दिग्दर्शन केले आहे. जीवनाचा सामग्याने विचार करू पाहणाच्या वामन मल्हारांच्या मते सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना करणे हे जीवनाचे ध्येय आहे. वाड़मय हे उच्चतम जीवनाचे एक अंग आहे. त्यामुळे वाड्मयाचे ध्येयही सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना करणे हेच आहे. एके ठिकाणी ते म्हणतात,”सर्वांगीण विकास हे आपले ध्येय अहि… कलात्मक आनंद व कलादृष्टीचा विकास हेदेखील स्वत्त्वविकासाचे किंवा आत्मप्राप्तीचे (self realizationचे) एक अंग आहे, इतकेच नव्हे तर प्रमुख अंगांपैकी एक आहे.” या विचाराने सूत्र वामन मल्हारांच्या वाङ्मयविषयक भूमिकेत कायम असलेले दिसते.

ज्ञान, नीती व सौंदर्य या जीवनाच्या तीन अंगांचा, त्यांच्या परस्परसंबंधांचा वामन मल्हारांनी वेळोवेळी विचार केला आहे. त्यांच्या मते आपण मनाचे ‘ज्ञानप्रिय, नीतिप्रिय व कलाप्रिय’ म्हणजेच सत्य, शिव व सौंदर्य असे तीन भाग करतो ते सोयीसाठी होय. वस्तुत: हे विभाग भिन्न नाहीत, तर ते ‘अन्योन्यसापेक्ष, अन्योन्याश्रयी व अन्योन्यसंस्कारक’ आहेत. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ही क्षेत्रे स्वतंत्र, स्वायत्त आहेत. कलेला, वाड्मयालादेखील मर्यादित स्वायत्तता आहे. कारण या तिन्ही क्षेत्रांची पूर्णावस्थेतील ध्येये सुसंवादी असली तरी अपूर्णावस्थेतील ध्येये विशिष्ट मर्यादेनंतर विसंवादी होऊ लागतात. त्यामुळे त्यांनी शक्यतोवर आपापल्या क्षेत्राबाहेर पाहू नये. याचाच अर्थ वाड्मय हे मूल्य पूर्णपणे रवायत्त असते, ही भूमिका त्यांना मान्य नाही. किंबहुना जीवनाचे कोणतेही क्षेत्र पूर्णपणे स्वायत्त असू शकत नाही, ती जीवनाची एकेक अंगे आहेत याचे भान त्यांना होते. मानवी जीवनाच्या पूर्णावस्थेत या सर्व क्षेत्रांमध्ये सुसंवादच असेल ही त्यांची श्रद्धाही येथे दिसून येते.

वामन मल्हारांच्या मते जर नुसते जगावयाचे असेल, तर कलेचा काही उपयोग नाही. परंतु केवळ जगणे हे मनुष्याचे ध्येय नाही. ‘शुद्धतम, सात्विकतम, उच्चतम, उदात्ततम, सर्वांगपरिपूर्ण, सर्वानुभूतिगर्भ, सर्वप्रेरणातृर्भि ’ जीवन हे मनुष्याचे ध्येय आहे. आणि अशा जीवनाकरिता कला आवश्यक आहे. कला ही जीवनाच्या अन्य गांपेक्षा ‘भिन्न’ असली तरी ती ‘अलग’ नसून इतरांशी संलग्न, संबद्ध आहे. कलाकृती व कलास्वाद ही जीवनाचीच अंगे असल्यामुळे इतर अंगांचा त्यांच्यावर व त्यांचा इतरांवर परिणाम होणारच. त्यामुळे एकान्तिक पृथक्त्व शक्य नाही व इष्टही नाही.

वामन मल्हारांनी कलेची मर्यादित स्वायत्तता मान्य केल्यामुळेच कलेवर अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणतीही बंधने, नियंत्रणे घालू नयेत अशी भूमिका घेतली. त्यांच्या मते अशा नियंत्रणाने कलेत वैगुण्येच निर्माण होण्याची शक्यता असते. कला किंवा सत्य किंवा नीती स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेतच फोफावते, फुलते व फलदायी होते. त्यामुळेच कलेला, नीतीला वा सत्याला आपापल्या क्षेत्रात सामान्यत: स्वातंत्र्य असावे. अर्थात, वामन मल्हारांना असेही वाटते की कलेचा संघर्ष होतो तो खर्‍या नीतीशी किंवा मुत्याशी नसतो. तिचा संघर्ष होतो तो संकुचित नीती वा संकुचित सत्य यांच्याशी होय. या संदर्भात ते भा.रा. तांब्यांच्या आदर्श कला व आदर्श नीती यांत विरोध नाही, या मताचे अनुसरण करतात. वामन मल्हारांना येथे अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य हे विश्वचैतन्यवाद्यांचे स्वातंत्र्य नव्हे. कारण त्यांच्या विचारात ज्ञान व नीती यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य हे प्रामुख्याने विषयनिवडीचे व आविष्कारपद्धतीच्या निवडीचे स्वातंत्र्य असावे. कारण अमुक एक विषय वा आशय, तसेच अमुक एक आविष्कारपद्धती ही कलेस योग्य वा अयोग्य अशा प्रकारची बंधने तत्कालीन वाड्मयीन वातावरणात असलेली दिसतात. त्यांना विरोध करताना वामन मल्हारांनी वरील भूमिका घेतली असावी.

वामन मल्हारांच्या दृष्टीने जीवन हे केवळ कलामय नाही. कला जीवनसर्वस्व नव्हे. जीवनात ज्या अत्यंत रम्य व वंद्य गोष्टी आहेत, त्यांत कलेबरोबरीनेच नीतीचा व सत्याचाही समावेश होतो. कला, सत्य व नीती यांना आपापल्या क्षेत्रात सामान्यतः स्वातंत्र्य असावे. कलेने बोध करावा, विचार सांगावा असे नाही. ती समाजहितोन्मुख असली तर उत्तमच, परंतु प्रत्येक वेळी तिने समाजहिताचा विचार करावा असे म्हणणे दुराग्रहाचे आहे. कलेने सामान्यत: आपल्या कलेच्या ध्येयापेक्षा, नियमापेक्षा दुसरी-तिसरीकडे पाहू नये. कलात्मक आनंद देणे-घेणे हेच तिचे ध्येय असावे व त्यासाठी तिने आपल्या कलाविषयक नियमांकडे लक्ष द्यावे. कलावंताने नीती, बोध, समाजहित वगैरे गोष्टींकडे सामान्यतः लक्ष देऊ नये. परंतु असामान्य परिस्थितीत मात्र त्याने ‘कलेसाठी कला’ या तत्त्वाला मुरड घालावयास हवी. ही असामान्य परिस्थिती म्हणजे समाज व व्यक्ती यांच्या जीवनातील बिकट व प्रतिकूल क्षण होय. असा काळ हा अपवादात्मकच असतो. त्यामुळेच आपल्याला कलेकरिता कला’ हे प्रमेय सामान्यतः मान्य आहे, अशी भूमिका वामन मल्हार घेतात. अर्थातच, जोवर नीती वा सत्य यांना धक्के न देता कला कार्य करते तोवरच हे प्रमेय ते स्वीकारतात. त्यांच्या मते आनंद देणे हे कलेचे ‘अवतारकृत्य’ खरे. परंतु कला जर ‘नीतीच्या नरड्याला नख लावून’ किंवा ‘सत्य पायाखाली तुडवून नाच करू लागली तर सात्त्विक आनंद मिळणे शक्य नाही. म्हणूनच कला, नीती व संत्य यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ती त्यांना मोठी आपत्ती वाटते.

वामन मल्हारांना अभिप्रेत असलेला सात्त्विक आनंद हा मुख्यत्वे नैतिकतेशी कसा संबंधित आहे, ते आपण मागे पाहिले आहे. त्यामुळेच व त्यांना सामान्यतः मान्य असलेल्या ‘कलेकरिता कला’ या प्रमेयाचा आशय मर्यादित स्वरूपाचा कसा आहे, ते येथे लक्षात येते. एकान्तिक बोधवाद टाळण्यासाठी ‘कलेकरिता कला’ हे प्रमेय त्यांनी सामान्यतः मान्य केले आहे. दुसरे असे की कलेचा संघर्ष हा खया, उच्चतर नीतीशी वा सत्याशी होणे शक्य नाही, अशी भूमिका घेतली की कला, नीती व सत्य यांचे एकमेकांशी पटेल किंवा नाही याची विवंचना करण्याचे कारण उरत नाही. अर्थात, वामन मल्हारांची भूमिका इतकी सरळसोपी नाही. त्यामुळेच ते वरील विवंचना करतात. मात्र कलेचा नीतीशी वा सत्याशी संघर्ष नेमका कोणत्या प्रकारे होतो, तेथील नैतिकता वा सत्य यांचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते, याचे विस्ताराने विवेचन त्यांनी करावयास हवे होते. ते त्यांनी केले आहे, असे दिसत नाही.

वामन मल्हारांच्या ‘कलेकरिता कला’ या भूमिकेचा आशय एवढाच आहे की नीती व सत्य यांचा अविष्कार कलेतून व्हावयास हवा असा आग्रह धरता येत नाही. परंतु कलेचे मूल्य आनंदाबरोबरीनेच नीती व सत्य यांवरही अवलंबून आहे, या त्यांच्या विचाराची चर्चा आपण केली आहे. त्यांच्या मते कलावंताने आपल्या कलेचा विलास हा एकूण जीवनाच्या ध्येयास अपायकारक होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी. आणि त्याने जर आपल्या कलाविषयक आकांक्षा न सोडता शक्य असेल तेथे आपली कला उत्तम जीवनाला उपकारक व्हावी अशीही आकांक्षा बाळगली तर ते अधिकच चांगले आहे. वाड्मय हे ज्ञान देण्याकरिता किंवा नैतिक उपदेश करण्याकरिता नाही, हे खरे असले तरीही नैतिक दृष्टी व काव्यदृष्टी या पूर्णपणे वेगळ्या करता येणार नाहीत, असे वामन मल्हारांना वाटते. त्यांच्या मते कला ही नीतीची दासी नाही, तिने आपल्या ‘आत्मप्रसादाकरिता’ स्वत:ला योग्य वाटेल ते करावे, त्यासाठी नीतीची फाजील प्रतिष्ठा ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नव्हे की कलेने नीती-अनीतीचा विचारच करू नये. औचित्यभंग करावा. औचित्य हे सर्वांनीच पाळायला हवे. वामन मल्हार वेगवेगळ्या लेखांतून व परीक्षणांतूनही हा विचार लटसुलट पद्धतीने मांडत होते याचे कारण म्हणजे तत्कालीन दोन एकान्तिक भूमिकांची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता.

फडकेप्रणीत तत्कालीन ‘कलावादा’चा प्रतिवादही वामन मल्हारांनी केला आहे. वाड्मय हे आत्मविस्मृतीकरिता, दु:खापासून क्षणभर विरंगुळा मिळावा म्हणून, जीवनाचा विसर पडावा म्हणून असते, ही फडक्यांची भूमिका त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते काही गोष्टी समजून घेण्याची, जाणण्याची इच्छा असते, म्हणून आपण वाड्मय वाचते. वाड्मय म्हणजे केवळ विसर नव्हे. ते आपल्याला क्षुद्र जीवनाचा विसर पाडून उच्च, उदात्त जीवनाचा अनुभव देत असते. त्या उदात्त जीवनाच्या कल्पनेने आपल्याला आनंद होत असतो. असा उदात्त जीवनाचा अनुभव देणारे वाङ्मय हे केवळ विलास वा क्री म्हणता येणार नाही. वामन मल्हारांना येथे उच्च, उदात्त जीवन म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट होत नाही. सर फिलिप सिडनीने अशा प्रकारची भूमिका घेतली आहे की काव्यातील विश्व हे आपल्या व्यावहारिक विश्वापेक्षा चांगले, आदर्श असते. कारण काव्य हे आदर्शाचीच अनुकृती करते. वामन मल्हारांना हाच अर्थ अभिप्रेत असेल तर तो मान्य करणे अवघड आहे. कारण काव्य, वाङ्मय हे प्रत्यक्ष जीवनातील चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींचे चित्रण करते. तसेच चांगले वाड्मय हे या जीवनाचा विसर पाडते असेही म्हणतः येणार नाही. उलट असे वाड्मय जीवनाविषयी छोट्या-मोठ्या मर्मदृष्टी देऊन या जीवनाबलची आपली जाणीव समृद्ध व सक्षमही करीत असते. वामन मल्हार हे मूलत: श्रद्धाळू असले तरी सिडनीचा अर्थ त्यांना अभिप्रेत असेल असे वाटत नाही. कारण तसे असते तर केतकरांच्या कादंबर्‍यांची प्रशंसा त्यांनी केली नसती. त्यांचे नैतिकतेसंबंधीचे विचार आपण मागे पाहिले आहेत. त्याआधारे असे म्हणता येईल की वाङ्मय हे उच्चतर नैतिकतेचे दर्शन घडवते असे त्यांना वरील विवेचनात अभिप्रेत असावे.

वामन मल्हारांच्या वरील सर्व विवेचनावरून एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते ती म्हणजे त्यांची वाड्मयविषयक भूमिका ही लौकिकतावादी परंपरेतील आहे. वाड्मय हे मूल्य पूर्णपणे स्वतंत्र, स्वायत्त नसून ते जीवनाच्या अन्य अंगांवर, ज्ञान, नीती यांवर अवलंबून असणारे मूल्य आहे. ही तिन्ही मूल्ये परस्परसंबंधित, परस्परपोषक आहेत, हे या भूमिकेत मांडले जाते. या भूमिकेत वाङ्मयाला मर्यादित स्वायत्तता दिल्यामुळे ही भूमिका एकान्तिक बोधवादापेक्षा वेगळी ठरते. वाङ्मय हे उच्चतम जीवनाचे एक अंग आहे, हे येथे सांगितले जाते.

वामन मल्हारांनी वाड्मयाविषयी घेतलेली ही भूमिका त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोणाशी सुसंगत अशी आहे. जीवनाचे एक अंग मानून ते वाड्मयाचाही सामग्रयाने विचार करू पाहतात, वाङ्मयाकडे अनेक अंगांनी, दृष्टिकोणांतून पाहण्याचा प्रयत्न करतात, हे येथवरच्या विवेचनावरून स्पष्ट व्हावे. त्यांच्या या भूमिकेचा एकूण विचार केल्यावर असा प्रश्न पडतो की या भूमिकेत वाङ्मयाचा साधन म्हणून विचार केला जात आहे की साध्य म्हणून? कलेविषयी, वाड्मयाविषयी दोन भूमिका घेतल्या जाऊ शकतात. एक म्हणजे कला हे उच्चतम जीवनाचे एक साधन आहे, ही भूमिका आणि दुसरी म्हणजे कला ही उच्चतम जीवनाचे केवळ एक साधन नसून तो एक मार्गच आहे, ही भूमिका होय. यापैकी वामन मल्हार कोणती भूमिका घेत आहेत, यांविषयी निश्चितपणे प्रतिपादन करणे अवघड होते. बाड्मय हे उच्चतम जीवनाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे, अशा आशयाची भाषा त्यांनी काही वेळा वापरलेली आहे, हे खरे. या ठिकाणी ते वाङ्मयाचा केवळ एक साधन म्हणून विचार करत नाहीत, असे लक्षात येते. परंतु त्यांच्या वाड्मयविषयक लेखनात याच्या विरोधात जाणारी भाषाही काही वेळा दिसून येते. कलेने सत्याला सजवायचे असते, कला आनंदाच्या मार्गाने सत्य सांगते, सद्बोध करते, अशा आशयाची वाक्येही वामन मल्हारांच्या लेखनात काही वेळा आलेली दाखविता येतात. ही भूमिका उघडपणे साधनवादी ठरते. त्यामुळेच वामन मल्हारांची नेमकी भूमिका कोणती याविषयी संभ्रम निर्माण होतो.

वामन मल्हारांनी क्वचित काही ठिकाणी घेतलेली भूमिका तर कलाव्यवहाराच्या मुळावर घाव घालणारी आहे. उदाहरणार्थ, ते म्हणतात,”रामाचे किंवा सीतेचे चरित्र काव्यमय होते तसे आपलें चरित्र व्हावे अशी इच्छा धरावी; वाल्मीकीप्रमाणे रामायण लिहिण्याची आकांक्षा धरणे हे त्याहून कमी दर्जाचे ध्येय होय…” येथे वामन मल्हारांचा भर प्रत्यक्ष आदर्श जीवन जगण्यावर आहे. वाङ्मयनिर्मिती ही त्या तुलनेने दुय्यम महत्त्वाची ठरते. त्यांचा एकूण जीवनविषयक दृष्टिकोण पाहता त्यांनी कलेपेक्षा जीवनाला अधिक महत्त्व देणे हेही स्वाभाविक वाटते. अर्थात, त्यामुळे त्यांची वाङ्मयविषयक भूमिका एकान्तिक बोधवादी ठरत नाही, हे आपण पाहिले आहे. किंबहुना बोधवादाच्या प्रभावाखालील या कालखंडात वामन मल्हारांनी साधनवादी भूमिकेच्या मर्यादा ओलांडून साध्यवादी भूमिकेकडे जाण्याचा, लौकिकतावादी भूमिकेचा स्वीकार करूनही वाड्मयकृती हे साध्य ठरू शकते हे काही वेळा का होईना, दाखविण्याचा प्रयत्न केला हेच त्यांचे मोठेपण आहे, आणि त्यामुळेच त्यांची बाङ्मयविषयक भूमिका त्यांच्या समकालीन समीक्षकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र ठरते. समग्रतावादी दृष्टी व अनेकसूत्रवाद ही या भूमिकेची खास वैशिष्ट्ये आहेत.

वामन मल्हारांच्या एकूणच वाङ्मयविषयक लेखनाबाबत एक मुद्दा येथे अखेरीस आवर्जून मांडावयास हवा. पण त्यांच्या वाड्मयविषयक भूमिकेचा परामर्श घेताना असे पाहिले की ते अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडतात, परंतु त्यांचा पुरेसा विस्तार मात्र करत नाहीत. काव्यानंदाची कारणे, वाङ्मयनिर्मितीची कारणे इत्यादींचा त्यांनी काही प्रमाणात विस्ताराने विचार केला आहे हे खरे. परंतु त्यातून कोणतीही एक व्यवस्था विकसित केली जात आहे, तिची बांधणी केली जात आहे असे दिसत नाही. त्या त्या प्रसंगी मन:प्रकटन करून ते थांबले आहेत, असेच दिसते. तसे झाले नसते तर मराठी समीक्षेतील जीवनवादी, लौकिकतावादी भूमिकेची काटेकोर अशी मांडणी रा.भा. पाटणकरांच्या सौंदर्यमीमांसेपूर्वीच झाली असती. परंतु अशा जर-तरला तसा विशेष अर्थ नसतो, हे प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाने दाखविले आहेच.

३७/बी- ४९५, नचिकेत, आनंदनगर, दहिसर (पू.), मुंबई ४०००६८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.