संपादकीय मागे वळून पाहताना

‘नवा सुधारका’चा पहिल्या वर्षाचा हा शेवटचा अंक. आज नवा ‘आजचा सुधारक’ एक वर्षाचा झाला. त्याची एक वर्षातील वाटचाल कशी झाली याकडे मागे वळून पाहणे उपयुक्त होईल असे वाटल्यावरून त्यांकडे टाकलेला हा दृष्टिक्षेप.

चोहोबाजूंनी होणाऱ्या अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य आणि बुवाबाजी यांच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या आपल्या समाजाला जागे करण्याकरिता, आणि त्याला योग्य मार्ग दाखविण्याकरिता आगरकरांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या अकाली निधनाने अपुरेच राहिले. ते यथाशक्ति पुढे चालविण्याकरिता विवेकवादाचे कंकण बांधलेले हे मासिकपत्र आम्ही काढले आणि गेले सबंध वर्ष ते काम पार पाडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे, त्यात काय उणीवा आहेत, दोष काय आहेत, त्यात काय सुधारणा करायला हव्या आहेत, इत्यादि प्रश्नांची उत्तरे अर्थात् आमच्या वाचकांनीच द्यावयाची आहेत. ती त्यांनी आम्हाला कळवावी अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करतो.

‘नवा सुधारका’ला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद फारसा उत्साहजनक नसला तरी तो निराशाजनकही नाही हे आम्ही नमूद करू इच्छितो. आजच्या घटकेला आमच्या वर्गणीदारांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. ही संख्या उपेक्षणीय नसली तरी मासिक आपल्या पायावर उभे राहण्याकरिता मात्र ती अपुरी आहे. ते स्वयंपूर्ण होण्याकरिता लिदान साडेसातशे वर्गणीदार हवेत. वर्तमान वर्गणीदारांनी आपली वर्गणी चालू ठेवली आणि शक्य तर प्रत्येकी एक नवीन वर्गणीदार नोंदवला तर वरील आकडा सहज प्राप्त करता येईल.

या मासिकाचे उद्दिष्ट काय आहे आणि त्याचे धोरण काय राहील याची स्थूल कल्पना गेल्या वर्षातील त्याच्या कामगिरीवरून येण्यासारखी आहे. ज्या विवेकवादच्या प्रसारार्थ हे मासिक निघाले आहे त्याचे स्वरूप काय आहे, त्यात कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत, आणि त्याचे समर्थन काय आहे-या गोष्टींची साधकबाधक आणि सविस्तर मर्चा गेले वर्षभर विवेकवाद या लेखमालेत करण्यात आली असून, ती पुढेही चालू राहणार आहे. त्याशिवाय गेले वर्षभर विवाह आणि नीती या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विवेचन या शतकातील थोर तत्त्वज्ञ आणि सामाजिक विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या अनुवादाच्या रूपाने आम्ही देत आहोत. या पुस्तकाविषयी एवढे सांगणे पुरेसे व्हावे की या विषयावरील ते अनिवार्य वाचन म्हणून मानले गेले आहे. १९२९ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची १९५८ पर्यंत बारा मुद्रणे झाली होती. माझ्याजवळची प्रत १९५८ सालची आहे. परंतु त्यानंतरही त्याची कितीतरी मुद्रणे झाली असली पाहिजेत.
त्याची अनेक जागतिक भाषांत भाषांतरे झाली आहेत. स्त्रीस्वातंत्र्याचे, समतावादी. कुटुंबसंस्थेचे इतके सडेतोड, स्वच्छ आणि निर्भीड विवेचन अन्यत्र सापडणे कठीण आहे. त्यातील विचार कदाचित् कोणाला पटणार नाहीत; पण हे पुस्तक वाचलेले नसणे ही मात्र एक मोठी उणीव मानावी लागेल.

‘नवा सुधारका’च्या स्वरूपाविषयी काही प्रतिक्रिया प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आमच्या कानापर्यंत आल्या आहेत. त्यापैकी एक अशी आहे की हे मासिक एकसुरी आहे. त्यात विषयांचे वैविध्य नाही. हे आक्षेप म्हटले तर खरे आहेत. पण विवेकवादाच्या पुरस्कारार्थ जन्मलेल्या मासिकात जर प्रामुख्याने तो विचार दिसला तर ते दूषण मानता येणार नाही. विषयांची विविधता नसल्याचा आरोप काही प्रमाणात खरा आहे, आणि त्या दृष्टीने येत्या वर्षात नेटाने प्रयत्न करण्याचे आम्ही ठरविले आहे. एक योजना अशी आहे की सध्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काही ज्वलंत प्रश्नांवर व्यासंगी विद्वानांचे परिसंवाद घडवून आणून ते मासिकात छापावे. सध्या दोन विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत : (१) मार्क्सवादाचे भवितव्य, आणि (२) सेक्युलरिझमचा अर्थ. मार्क्सवादाची गेल्या काही वर्षांत जी पिछेहाट झाली त्यामुळे त्या आर्थिक आणि राजकीय तत्त्वज्ञानात आज काय जिवंत आहे आणि काय मृत झाले आहे याचा शोध करणे अवश्य झाले आहे. आणि त्याचप्रमाणे ‘सेक्युलर’ म्हणजे नेमके काय, आपल्या घटनेच्या पहिल्याच वाक्यात आलेल्या ‘ sovereign socialist secular democratic republ.c’ या शब्दबंधातील secular’ ह्या शब्दाचा अभिप्राय काय आहे हे निश्चित करणेही अत्यावश्यक आहे. ही दोन्ही कामे या परिसंवादात केली जातील. त्यात अनेक व्यासंग विद्वानांनी भाग घेण्याचे मान्य केले आहे.

हे मासिक उपयुक्त काम करीत आहे आणि ते जगले पाहिजे असे आमच्याप्रमाणेच आमच्या वाचकांनाही वाटत असेल अशी आशा आहे. त्यांनी या संदर्भात आम्हाला चार शब्द लिहून आपले मनोगत कळविले तर आम्ही त्यांचे आभारी होऊ.

संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.