समतावाद्यांचे ध्येय

समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वाना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही लोकांना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समताप्रस्थापनाच्या ध्येयाला विरोध करणे होय. ह्या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण बरोबर लागू पडते. सुदृढ माणसाला जोडेभरडे अन्न चालते. पण सुदृढ माणूस व रोगी माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ समतावादी’ ते जाडेभरडे अन्न रोग्याला देईल तर तो रोग्याचा प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल. त्याचप्रमाणे श्रीमंतांवर जितका कर असतो, तितकाच गरिबांवर ठेवावा, कारण तसे न केल्यास असमानता होईल असे जर कोणी म्हणेल तर लोक त्यास वेड्यात काढतील. सारखा कर देण्याची ऐपत असणार्‍या श्रीमंतांपैकी काहींवर कमी व काहींवर जास्त कर लावला किंवा सुदृढ माणसाला पचण्याजोगे अन्न पचविण्याची ज्यांच्यात ताकद आहे त्यांना रोग्याचे अन्न दिले तर मात्र विषमता होईल. ह्या उदाहरणांवरून तात्पर्य घ्यावयाचे ते हे की, समानांना असमानतेचे व असमानांना समानतेने न वागविणे हा समतावाद्यांचा दस्तूर आहे.

बहिष्कृत भारत
१ फेबुवारी १९२९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.